Login

नणंदबाई माझी लाडाची भाग १

नणंद भावजय
जलदलेखन

शीर्षक:- नणंदबाई माझी लाडाची भाग १

©® सौ.हेमा पाटील

"अगं सीमा, काय करतेय? आली बघ ताई. भाकरी तुकडा ओवाळून टाकायला ये." हे सासूबाईंचे शब्द ऐकून किचनमध्ये काम करत असलेली सीमा भाकरीचा तुकडा, पाण्याचा तांब्या घेऊन दारात आली. दारात उभ्या असलेल्या रोहिणीवरुन तिने भाकरी ओवाळून टाकली आणि तिच्या पायावर पाणी ओतून ती बाजूला झाली.

ती बाजूला होताच सासुबाई पुढे झाल्या व त्यांनी लेकीला हात धरुन घरात घेतले.

"किती वाळली गं माझी बाय ती. सासरी खूप कामं असतात ना? सगळं तुझ्या एकटीवर टाकतात ना!" असे म्हणत सरिता ताईंनी तिच्या तोंडावरुन हात फिरवला. रोहिणीही आईला बिलगली. तेवढ्यात सीमा पाण्याचा तांब्या घेऊन आली. तिने फुलपात्रात पाणी ओतून नणंदेसमोर धरले. रोहिणीने घोटभर पाणी पिले व फुलपात्र सीमाच्या हातात दिले.

सीमाने टीपाॅयवर तांब्याभांडे ठेवले व ती चहा आणायला आत निघून गेली. तिने चहाचा कप रोहिणीच्या व सासुबाईंच्या हातात दिला.

"कसे काय ताई? बरे आहे ना सगळे?" सीमाने विचारले.

"हो गं, सगळे ठीक आहे."रोहिणी म्हणाली."आज जेवायला काय बनवणार आहे?"

"आज भरले वांगे व भाकरी बनवणार आहे." सीमाने सांगितले.

यावर रोहिणी काही बोलण्याआधीच सरिता ताई म्हणाल्या,

"माझी पोरगी काय माहेरात पडीक नसते. चार- सहा महिन्यांतून जेव्हा तिला जमते तेव्हा येते. तिला काय वांगे खायला घालणार आहे?" हे बोलणे ऐकून सीमा वरमली. ती म्हणाली,

"मग काय बनवू सांगा. मी बनवते."

"इडली आणि चटणी बनव." रोहिणी म्हणाली.

"अहो, त्याचे पीठ आधी तयार करावे लागते. ते कुठे केलेय?" सीमा म्हणाली.

"मी येणार आहे हे आठवडाभर आधी सांगितले होते. तरीही तुम्ही काहीच तयारी केली नाहीत?अवघड आहे सगळे." रोहिणी म्हणाली.

"तसं नाही गं, तयारी तर केली आहे, पण आज लगेच इडल्या बनवणे शक्य नाही. पीठ फुगावे लागते." सरिताताई म्हणाल्या.

त्यांनी सीमाला सांगितले,

"जा, अंडी आहेत घरात, आज अंड्याचे कालवण बनव. तोंडी लावायला सोबत सुकटीची चटणी बनव." सीमा निमूटपणे आत निघून गेली.

तर ही आहे सरिताताईंची लाडाची लेक रोहिणी! तिची वहिनी सीमा, तिच्या जोरावर लेकीची ऊठबस अगदी तालेवार पध्दतीने केली जाते. सासरी नांदून आलेल्या लेकीला माहेरी आल्यावर अजिबात काम लावायचे नाही, तिला जे खावेसे वाटेल ते बनवायचे. ती आल्यावर मिष्टान्नाचे जेवण बनवायचे असा त्या घराचा दंडक होता. सीमा लग्न झाल्यापासून तो दंडक पाळत असे.

तिने अंड्याचे कालवण बनवले. पहिली भाकरी बनवली की तिने "जेवायला या" अशी हाक मारली. तोपर्यंत मायलेकींचे हितगुज रंगात आले होते. ते अर्धवट सोडून जेवायला उठायची रोहिणीची इच्छा नव्हती. एवढे एकच हक्काचे ठिकाण आहे, जिथे सासू, सासरच्या त्रासाबद्दल मन मोकळे करता येते असे रोहिणीला वाटत होते. सरिताताई अगदी आत्मीयतेने ती जे जे सांगेल ते ऐकत. त्यात मधून मधून "हो का? असं केलं त्यांनी? कसं काय असं बोलू शकतात त्या?" अशी वाक्ये त्या उच्चारत. त्यामुळे अशी रंगलेली मैफिल अर्ध्यावर सोडून उठायचे तिच्या जीवावर आले होते.
क्रमशः
काय होते पुढे? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा
0

🎭 Series Post

View all