जलदलेखन
शीर्षक:- नणंदबाई माझी लाडाची भाग २
©® सौ.हेमा पाटील
लाडाची लेक माहेरी आली आहे. मायलेकींचे हितगुज सुरू आहे. सीमा जेवायला या अशा हाका मारतेय. आता पुढे...
सीमाची परत एकदा हाक आली तशी रोहिणी उठली व स्वयंपाकघराकडे चालू लागली. तिच्या मागोमाग सरिता ताई मंत्रमुग्ध होऊन चालू लागल्या. आत जाऊन रोहिणीने वाढलेले ताट घेतले व ती जेवू लागली. सरिताताईंना मात्र स्वस्थ बसवेना. लेक सांगत होती तो सासूचा किस्सा अर्धवट राहिला होता. पुढे काय झाले ते ऐकण्यासाठी त्या अस्वस्थ झाल्या होत्या.
डायनिंग टेबलवर लेक जेवत असतानाच दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. सरिता ताईंनी विचारले,
"मग पुढे काय झाले? नणंद राहिली की गेली निघून?" भाकरी करत असलेल्या सीमाच्या कानावर वरील वाक्य पडले. बाहेर आधी दोघींची काय चर्चा सुरू होती, तिला माहित नव्हते. त्यामुळे ती आपल्या कामात गढून गेली, पण चालू असलेल्या गप्पांमधून त्या दोघींचे काय बोलणे सुरू आहे याचा अंदाज सीमाला आला होता.
"मग काय? गेली निघून रागाने. आई गेली लेकीच्या मागे पळत तिला समजवायला, पण मी काय गेले नाही. सासूनं तिला परत आणलं समजूत घालून, पण मी काही माझी साडी तिला दिली नाही. तशी तर तिनं फक्त नेसायला मागितली होती, पण एवढ्या भारी साडीवर
डाग-बिग पाडला तर काय घ्या! अगं ती पिस्ता कलरची साडी नाही का, गेल्या वर्षी मला भाऊबीजेला घेतलेली." रोहिणी म्हणाली.
डाग-बिग पाडला तर काय घ्या! अगं ती पिस्ता कलरची साडी नाही का, गेल्या वर्षी मला भाऊबीजेला घेतलेली." रोहिणी म्हणाली.
"मग काय! दुसऱ्यांच्या साड्या कशाला मागाव्यात. आपल्यापाशी नाही तर गप्प बसावे, पण नाही. दुसऱ्यांची जरा काही चांगली वस्तू दिसली की यांच्या नजरेत लगेच भरते." सरिताताई म्हणाल्या.
"द्यायची की एकदा नेसायला, एवढे काय लगेच डाग पाडले असते का त्यांनी! मन राखायचे त्यांचे." सीमा म्हणाली.
"हो का! त्यांचे मन राखायला माझ्या साडीची आहुती देऊ का मी? मला खूप आवडलीय ती साडी." रोहिणी म्हणाली.
"तुला काय जाते सांगायला? सगळीच माणसं काय सारखी नसतात. तुला कुठं माणसांचा अनुभव आहे म्हणा. माहेरी तुम्ही दोघंच बहीण भाऊ. इथेही लग्न होऊन येण्यापूर्वीच रोहिणी नांदायला निघून गेली होती. दिसतात तशी नसतात बरं माणसं." सरिताताई म्हणाल्या. यावर सीमा पुढे काहीच बोलली नाही. पण तिला तो प्रसंग आठवला.
गेल्या वर्षी संक्रांत झाल्यावर रोहिणी माहेरी आली होती. त्यानंतरच्या शुक्रवारी त्यांच्या घरी हळदीकुंकू ठेवले होते. त्यासाठी तिने आपली गर्द जांभळ्या रंगाची साडी नेसण्यासाठी वर काढून ठेवली होती. ती साडी पाहिल्यावर रोहिणीचा त्यात जीव अडकला.
"वहिनी, किती सुंदर साडी आहे. कुठून घेतली?" असे साडीवर हळुवारपणे हात फिरवत रोहिणीने विचारले.
"माझी यंदाची भाऊबीजेची ओवाळणी आहे." सीमाने सांगितले.
"खूपच सुंदर आहे गं." रोहिणी म्हणाली.
"मग तुम्ही नेसताय का आज? मी दुसरी नेसते. तुम्ही ही नेसा." हे ऐकल्यावर रोहिणीचे डोळे लकाकले. तिच्या मनात भरलीच होती साडी. तिने लगेचच ती साडी नेसली. तिच्याकडे त्या साडीवर मॅच होणारा ब्लाऊज होता तो घातला व आरशापुढे उभी राहून ती स्वतःच्या छबीकडे पाहत होती. किती सुंदर आहे ही साडी! असा विचार तिच्या मनात आला.
क्रमशः काय होते पुढे? साडी तर रोहिणीने नेसली आहे. बघूया. सब्र का फल मीठा होता है ||
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा