Login

नणंदबाई माझी लाडाची भाग ३

नणंद भावजय

जलदलेखन

शीर्षक:- नणंद माझी लाडाची भाग ३

©® सौ.हेमा पाटील

सीमाची साडी नेसून रोहिणी आरशात पाहत होती, तेव्हाच सीमा खोलीत आली. रोहिणीकडे पाहून ती म्हणाली,

"छान दिसतेय साडी. चला, आईंनी बाहेर बोलावले आहे. आईंच्या मैत्रिणी हळदीकुंकवाला आल्या आहेत." रोहिणी आरशाकडे पाहतच बाहेर पडली. आईच्या मैत्रिणींच्या सोबत गप्पा सुरू असताना सीमाने सर्वांना मसाले दूध आणून दिले. दूध पित असताना भाग्यश्री काकूंच्या विनोदावर हसताना चुकून रोहिणीच्या हातातील कप हेंदकाळून कपातील दुधाने बोटाला भाजले आणि दूध साडीवर सांडले.

ते पाहून भाग्यश्री काकू म्हणाल्या,

"अरेरे! नवीन साडीवर दूध सांडले वाटतं. आता डाग निघेल का?"

यावर रोहिणी म्हणाली,

"वहिनी बघेल कसा डाग काढायचा ते. ही साडी वहिनीची आहे." ते ऐकून सीमा म्हणाली,

"असुदेत. निघाला तर ठीकच आहे, तुम्ही काळजी करू नका."

आज मात्र स्वतःची साडी नणंदेला नेसायला द्यायला रोहिणी तयार नव्हती. वहिनीच्या नव्याकोऱ्या साडीवर चुकून का होईना आपल्याकडून डाग पडला होता, हे ती विसरली होती. तिच्यावर वेळ आली की, बदलली होती ती. स्वत: वहिनीच्या आवडतील त्या साड्या, वस्तू बिनदिक्कतपणे वापरायच्या, स्वतःवर कुणाला द्यायची वेळ आली की मात्र नाही म्हणायचे.

'किती स्वार्थी असतात ना माणसे! ' असा विचार सीमाच्या मनात पहिल्यांदाच आला. आपल्या नणंदेचे चुकतेय. आपण तिला चूक सुधरवायला लावली पाहिजे. असे सीमाला वाटले. यासाठी दुसऱ्या दिवशीच संधी चालून आली.

"वहिनी, हा तुमचा ब्लाऊज किती सुंदर आहे हो. कुठून घेतला?" रोहिणी म्हणाली.
"रुपतारा मधून घेतला. तुम्हाला आवडला का?" सीमा म्हणाली.

"हो. खूप छान आहे. मी घालू का? याच्यावर मॅचिंग साडी माझ्याकडे आहे." रोहिणी म्हणाली.

"कसं आहे ना ताई, तुमच्याशी खोटं कशाला बोलू, पण मागे माझ्या साडीवर दूध सांडले होते ना, तो डाग निघालाच नव्हता. साडी नेसली की समोरच डाग दिसतोय अजून. तसेच ब्लाऊजच्या बाबतीत व्हायचे. त्यामुळे माहेरची माणसे पण रागावतात मला. ती साडी माझ्या माहेराकडून मिळाली होती ना."

सीमा इतक्या स्पष्टपणे बोलल्यानंतर रोहिणीने चेहराच पाडला. सासुबाई लेकीची बाजू घ्यायला पुढे सरसावल्या. आज सीमा अशी का बोलतेय असा प्रश्न त्यांना पडला.

"काय पण कौतुक सांगतेय माहेराचे. माहीत आहे किती तालेवार आहे तुझे माहेर ते. हजार रुपड्याची साडी तुझी, अन् किती कौतुक लावलेय." सरिताताई म्हणाल्या.

"प्रश्न किमतीचा कुठे आहे? भावनेचा आहे. माझी साडी तुमच्या लेखी कवडीमोलाची असेल, पण माझ्यासाठी ती अनमोल आहे." सीमाचे हे बोलणे ऐकून रोहिणीच्या डोक्यात ट्युब पेटली. आपण आपल्या वहिनीला किती गृहित धरतो. आपल्या नणंदेने आपल्याला साडी मागितली तर ती साडी खराब करेल म्हणून आपण दिली नाही. वहिनीला माहेराहून मिळालेली साडी मात्र आपण अगदी हक्काने मागून नेसतो. एवढेच काय, डाग पडला तरी आपल्याला त्याचे विशेष काही वाटले नाही. रोहिणीची बाजू घेऊन सीमाला बडबड करणाऱ्या आपल्या आईला रोहिणी रागावली.

"आई, वहिनी बरोबर बोलतेय. माझ्या नणंदेला साडी देताना मी किती विचार करते! मग वहिनी तशी वागली तर तिचे काय चुकले?" हे ऐकून सीमा म्हणाली,

"तुमची चूक तुम्हाला समजली ना! तोच हेतू होता माझा. कापडाचे काय हो, कापड आणि चोपड, फाटून जाईल एक दिवस; पण एकदा जर का मने दुरावली तरी कशानेही सांधली जाणार नाहीत. माणसाचे मन राखायला शिका." सीमाचे बोलणे ऐकून सरिताताई म्हणाल्या,

"ए, गप्प बस. काय वटवट लावलीय?" आईला मध्येच अडवत रोहिणी म्हणाली,

"आई,तूच गप्प बस. वहिनी बरोबर बोलतेय. मीच चुकीची होते. माझे डोळे उघडले. वहिनी, इथून पुढे कसे वागायचे ते समजले मला." हे ऐकून सीमाला आनंद झाला. एका लेकीला माहेरी मिळणारी कमीपणाची वागणूक आता बदलेल. आपल्या नणंदेच्या नणंदेला तिच्या माहेरी अगत्याची वागणूक मिळेल याची सीमाला खात्री पटली होती.