मागील भागात आपण पाहिलं कि, अदितीला अजिबात अर्पिताच कौतुक सहन झालं नाही आणि एका क्षणी तिचा उद्रेक झाला. आता पाहूया पुढे,
अदिती रागाने उठली आणि आपल्या खोलीत गेली. तिने रागाने दरवाजा लावून घेतला. तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळत होतं. मनात गोंधळ, डोक्यात विचारांची गर्दी झाली होती.
“एवढी परकी झाले का मी ह्या सगळ्यांना? माझंच घर, माझंच आयुष्य इतकं बदलून गेलंय का?”
ती कपाट उघडते, बॅग काढते. असलेले सगळेच कपडे ती भरत राहते.
"झालं संपलं सगळं आता इथलं... हक्क, माया, ओळख... सगळं इथं संपलं!" ती स्वतःशीच पुटपुटली.
तेवढ्यात हलक्याच आवाजात दार उघडतं. आई आणि बाबा दोघंही तिच्या खोलीत येतात. थोडा वेळ शांततेनं पाहून आई थोडं थांबून म्हणाली,
"आदू... एवढा राग? बॅग भरून निघायचं ठरवलंस? नक्की कसला राग आलाय तुला बाळा??"
बाबा तिच्या शेजारी येतात व तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात,
"तुला आठवतं का, जेव्हा तुझं लग्न होऊन ह्या घरातून त्या घरात गेलीस , तेव्हा तुझ्या सासरच्या घरात सगळं काही तुझ्या नणंदेभोवती फिरत होतं. तेव्हा तुला किती वाईट वाटलेलं, तू नवीन असून देखील त्यांच्या नजरेत नव्हतीस. आजही तुझ्या सासूला तुझी नणंद सोडून दुसरं काही दिसत नाही. ह्याचा परिणाम काय झाला आहे?? तू मनातून त्यांच्यापासून दुरावलेली आहेस. त्यावेळी तू म्हणाली होतीस, ‘घरात आलेल्या नवीन माणसाला आपलंसं करणं हे घरच्यांचं काम असतं.’"
त्यांच्या आवाजात संयम आणि माया असते. ते ऐकून अदिती थोडी स्थिरावते, तिचे हात कपडे आवरायचं थांबतात पण डोळ्यांतला राग काही केल्या कमी झालेला नसतो.
ते पाहून आई हळूच पुढे येते. तिचा हात पकडुन डोळ्यात थोडं ओल येऊन म्हणाली,
"अर्पिता... तुझी जागा घेऊ शकत नाही ग... ती सुनच आहे आमची, पण तुझ्याबाबतीत जे झालं ते तिच्या बाबतीत आम्हाला होऊन द्याऊच नव्हतं. पण ह्याने तुझं महत्व कधीच कमी होणार नाही. ती ह्या घरची सून आहे, तिला आपण आता आपलंस नाही केल तर ती कधीच मनाने आपल्याशी जोडली जाणार नाही. त्या पोरीने देखील खूप जीव लावलाय आम्हाला. तुझी आठवण तिच्या वावरण्याने कमी होते. दिवसभरात आम्हाला जेवढी तुझी आठवण येत नाही तेवढी ती पोरगी आदू दीदी आदू दीदी करत असते.
अदितीचा राग थोडा विरघळला... तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिने हळूच आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आईने तिला मिठीत घेतलं आणि तिला थोपटत राहिली.
बाबा सुद्धा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून म्हणाले,.
"प्रेमाचं मोजमाप नसतं, फक्त त्याची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. तू आमची पहिली लाडकी मुलगी आहेस... आणि राहशील. कुणीही तुझं स्थान घेऊ शकत नाही.. आईवडिलांसाठी सगळी मुलं सारखीच..."
" मग तरी तुम्ही माझी रूम देताना मला नाही विचारलं.... "
आदिती नाक पुसत म्हणाली.....
का नसेल विचारलं आदितीला???
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा