Login

नणंदबाईचे माहेरपण भाग-१

नणंदबाईला तिचे माहेरपण अनुभवायला मिळेल का?
#जलदलेखनस्पर्धा

विषय: नणंदबाई येती घरा.
शीर्षक: नणंदबाईचे माहेरपण भाग-१

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

"ताई , या भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही घरी यावे; असे मला वाटते." निशा म्हणाली.

"पण, वहिनी मी कसं काय घरी येऊ शकते, म्हणजे तुम्हाला सर्व माहीतच आहे." शिवानी फोनवर नाराजीने म्हणाली.

" तुम्हाला घरी यायचे आहे की नाही?" निशाने विचारले.

तेवढ्यात शिवानीने उत्तर दिले आणि फोन कट केला.

निशाने सुस्कारा सोडला.

निशाचे लग्न होऊन सहा महिने झाले होते. लग्नानंतरचे पहिले सर्व सण तिने आनंदाने साजरे केले होते.

निशाचा नवरा रोशन स्वभावाने तापट होता, परंतु निशा समजूतदार असल्यामुळे तिने सर्व निभावून नेले होते.

"सुनबाई, तुला जर भाऊबीजेच्या दिवशी तुझ्या माहेरी जायचं असेल तर तू जाऊ शकते." निशाच्या सासुने सांगितले.

"दादाला वेळ आहे की नाही मला माहीत नाही, परंतु जर मी तिकडे जाऊ शकत नसेल तर दादाच इकडे येतो का, हे मी विचारून तुम्हाला सांगते." निशा म्हणाली.

" माहेरी जाणार आहेस का?" रोशनने आपल्या बायकोला विचारले.

" हो जायचा तर विचार करते आहे, परंतु दादाला सुट्टी आहे की नाही ते पण बघावे लागेल."  निशा म्हणाली.

" गेलीस तरी एक दिवस जा आणि लगेच ये. तुझ्याशिवाय हे घर खूप शांत आणि मला एकटे वाटते." रोशन तिला जवळ घेऊन म्हणाला.

" या घरामध्ये अजून सुद्धा लोक आहेत. आई, बाबा सुद्धा आहेत आणि तसे पण मामा सुद्धा त्या दिवशी येणार आहेत मग तुम्ही कसे काय एकटे राहणार ?" तिने विचारले.

" ते सगळे असतात, पण तुझी कमी नेहमीच तू इथे नसताना जाणवते." तो तिच्याशिवाय करमत नाही, हे शब्दांतून व्यक्त करत म्हणाला.

" मी तर एक आठवडा राहण्याचा विचार करते आहे." ती म्हणाली.

" नाही, एकच दिवसासाठी जा. आई आणि बाबासुद्धा तू माहेरी गेल्यावर सारखं तुझं नाव घेऊन तुझी किती आठवण येत आहे, हे परत बोलतात. घरामध्ये सुद्धा तुला माहीत आहे की जास्त कोणी माझ्याशी बोलत नाही." तो म्हणाला.

"जास्त कोणी का बोलत नाही, याचे कारण तुम्हाला माहीतच आहे." ती म्हणाली.

"मला त्या विषयावर पुन्हा बोलायचं नाही आणि यावर आपले आधीच बोलणं झाले आहे." त्याला थोडा रागच आलेला होता, म्हणून तो म्हणाला.

" बरं, ठीक आहे. मी आता विषय नाही काढणार. आता साफसफाई तर झालेलीच आहे, तर उद्या कंदील लावायला मदत करा." ती म्हणाली.

" ते तर मी नक्कीच करेन, तसेच फराळाला सुद्धा मदत करेन. आईला सुद्धा आता पहिल्या सारखं काम होत नाही. मला आधीपासूनच फराळ बनवण्यामध्ये मदत करण्याची सवय आहे."

"बापरे! माझे नवरोबा तर किती गुणी आहेत." ती म्हणाली.

" आता आपल्या लग्नाला सहा महिने झाले आहेत तर, तुम्हाला समजलंच असेल." तो हसतच म्हणाला.

दुसऱ्या दिवशी पटापट आवरून सर्वजण फराळ आणि घरामध्ये दिवाळीसाठी रोषणाईही करण्यामध्ये व्यग्र होते.

" हे असं नाही लावायचे आणि मला हे असेच लावलेले हवे." बाबा त्याला म्हणत होते.

" बाबा, पण हे तर अशा पद्धतीने लावले तर खूप सुंदर दिसेल. तुम्ही ते नेहमी याच पद्धतीने लावता आणि मला ते कधीच पटत नाही." तो आपल्या बाबांना म्हणाला.

" तसेही तुला कधी हट्ट सोडायचा नसतो. तुला काय करायचं आहे म्हणा, ते तुझ्या हट्टीपणामुळे मी तर तिला.." असे अर्धवट म्हणून ते आपल्या खोलीत निघून गेले.

हे सर्व हॉलमध्ये असणाऱ्या रोशनच्या आईने आणि बायकोने बघितले होते. त्याने मग एकट्यानेच आपल्या मनाला हवी तशी रोषणाई  केली होती.

" बाबांना हव्या त्या पद्धतीने सजावट केली असती तर काय फरक पडला असता?" दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ आराम करण्यासाठी ती खोलीमध्ये आलेली होती तेव्हा ती त्याला म्हणाली.

" तुम्हा लोकांना माझे काही पटतच नाही ना आणि एकदा सांगितले की त्या व्यक्तीचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाही तर कशाला तुम्ही घेता ? " तो पुन्हा चिडला होता.

क्रमशः

कोणत्या व्यक्तीबद्दल रोशनला राग होता?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.

0

🎭 Series Post

View all