#जलदलेखनस्पर्धा
विषय: नणंदबाई येती घरा.
शीर्षक: नणंदबाईचे माहेरपण-भाग २
शीर्षक: नणंदबाईचे माहेरपण-भाग २
" वहिनी मला यायला जमणार नाही." असे म्हणून तिने फोन ठेवला
दिवाळीच्या फराळामध्ये रोशनने मदत केली होती, तसेच त्याचे बाबा त्याच्याशी मोजकेच बोलत होते.
"याच्यामध्ये लाल रंग घातला तर छान दिसेल?" रांगोळी काढत असताना निशाने सासुला विचारलं.
" नाही, पिवळा रंग छान दिसेल." सासू म्हणाली.
" एक दिवस आमच्या मनासारखं केलं तर काय फरक पडतो ?" रोशन तिथे उभा होता आणि त्याला आपल्या आईचं म्हणणे पटले नव्हते, म्हणून तो बोलला.
मुळात रोशनला बदलत्या जमान्यासोबत राहण्याची सवय होती, त्यामुळे त्याला कोणी रोखठोक केलेले आवडत नव्हते. त्यात पण आपली बायको सगळ्यांना समजून घेत आहे, तरीसुद्धा आपली आई तिचं मन राखण्यासाठी एकदा पण का बोलत नाही, असं त्याला वाटत होते.
थोड्यावेळाने रांगोळी बघण्यासाठी तो बाहेर आला, तर त्याच्या बायकोने पिवळा रंगच त्याच्यामध्ये भरलेला दिसला होता.
' ही एक कधी सुधारणार नाही. हिला सर्वांना नुसतं खुशच ठेवायचं असतं.' रोशन स्वतःशीच म्हणाला.
थोड्यावेळाने जेवण झाल्यावर तो सोशल मीडिया बघत होता. त्याच्या आईने स्टेटस ठेवला होता," माझ्या सुनेने काढलेली रांगोळी."
तेव्हा कुठे आता त्याला समजले की आईचे मन राखण्यासाठीच तिने तिला हवा तो रंग रांगोळीमध्ये न भरता आईने सांगितलेलाच रंग भरला होता.
" सगळ्यांना तू काढलेली रांगोळी खूपच आवडली." तिची सासू त्यावर आलेले प्रतिसाद पाहून तिला सांगत होती.
" हो, मी सुद्धा ठेवला आहे बरं का सुनबाई!" रोशनचे बाबा सुद्धा त्यांनी रांगोळीचा स्टेटस ठेवलेला आहे हे सांगत होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असल्यामुळे सर्वजण लवकर उठून अभंगस्नान करून लक्ष्मीपूजन करत होते.
" सुनबाईच्या रुपामध्ये आपल्या घरी लक्ष्मी आलेली आहे, परंतु मला माझ्या दुसऱ्या लक्ष्मीची सुद्धा आठवण येत आहे." बाबांचे डोळे भरून आलेले आणि ते बाल्कनीमध्ये बसून आपल्या बायकोशी बोलत होते.
चहा देण्यासाठी आलेल्या निशाने ते ऐकले होते.
हॉलमध्ये समोर बसलेल्या रोशनकडे तिची नजर गेली. तो मात्र कोणतातरी मोबाईल मधला गेम खेळण्यामध्ये मग्न होता.
निशाने पुन्हा एकदा फोन केला होता आणि त्यावेळीही तिला नकारच ऐकायला मिळाला होता.
रात्री सुद्धा तिने नवीन रांगोळी काढली आणि बाजूला दिवे लावले आणि दिवे लावत असतानाचा फोटो तिच्या नवऱ्याने काढून स्टेटसला सुद्धा ठेवला होता.
" माझ्या घरची गृहलक्ष्मी." असे त्या फोटोच्या खाली लिहिले होते.
ते बघून तिला आनंद झाला होता.
' देवा, मी जे आता करणार आहे. त्याने दोन जण खुश होतील; परंतु एक व्यक्ती खूपच दुखावला जाईल. एक व्यक्ती दुखावण्यापेक्षा दोन व्यक्ती आनंदी असलेली मला बघायला जास्त आवडेल. त्यामुळे तू माझ्यासोबत रहा.' देवाजवळ हात जोडून ती मनातल्या मनात मनात होती.
" काय गं? काय झालं?", मागून रोशन ती अशीच मध्ये देवाला हात जोडून मनात काहीतरी प्रार्थना करते ते बघून विचारत होता.
"काही नाही देवाला म्हणत आहे की, मला पाच दिवस माहेरी राहण्याची परवानगी माझ्या नवऱ्याला द्यायला सांग." ती म्हणाली.
पाठीमागून येणारे तिचे सासू-सासरे सुद्धा हसत होते.
" देवाकडे जरी प्रार्थना केली. तरीही मी काही तुला पाच दिवस माहेरी राहायला पाठवणार नाही. हे तू लक्षात ठेव." तो म्हणाला.
" ह्या बाबतीत आम्ही सुद्धा आमच्या मुलाच्या बरोबर आहोत." त्याचे आई-वडील हसतच म्हणाले.
निशा आणि रोशनचे लग्न होऊन सहा महिने झाले असले, तरीसुद्धा एक सून आणि बायको म्हणून सर्व कर्तव्यात ती तत्पर होती. घराला घरपण तिच्यामुळे आलेले होते, एक दिवस सुद्धा जर ती नजरेसमोर नसेल तर त्यांना करमत नसायचे.
भाऊबीजेच्या आदल्या दिवशी मामा-मामी सुद्धा घरी आले होते. आपल्या भावाला बघून सासुला सुद्धा खूप आनंद झाला होता.
सगळ्यांनी मस्त बोलत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला होता.
"म्हणजे ती अजूनही इकडे येतच नाही का ?" मामींनी विचारले.
" मामी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय पाहुणे म्हणून आला तर ठीक आहे, पण त्या व्यक्तीचे नाव या घरात घेतलेले मला चालणार नाही." असे म्हणून रागाने रोशन आपल्या खोलीत झोपायला निघून गेला.
हॉलमध्ये शांतता पसरली होती. निशाने कसेतरी मामीला समजावले आणि झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये निघून गेली.
' अरे देवा ! यांना तर खूपच राग आला आहे. आता उद्या काही माझे खरे नाही.' असे ती मनाशीच म्हणाली आणि विचार करत असताना मध्येच कधी ती झोपली ते तिला समजलेच नव्हते.
क्रमशः
निशा असे पुढे काय करणार आहे?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा