नंदिनी श्वास माझा १३

लग जा गले, फिर ये हसी रात हो ना हो...
भाग-१३ : लग जा गले, फिर ये हसी रात हो ना हो


" काय यार नंदू , तू स्वप्नात सुद्धा माझ्या खोड्या करत असतेस, झोपु दे गं!" आपल्या हातांनी आपले कान चोळत शरू झोपेतच बोलत होता.

" मी स्वप्नात नाही , खरोखरच इथे आली आहे. उठ ना आता , उद्यापासून तर झोपायचंच आहे तुला." खुसुरपुसुर आवाज करत नंदू त्याच्या कानात बोलत होती..

तिच्या त्या वाक्याने त्याने ताड्कन डोळे उघडले तर डोळ्यांसमोर नंदू होती.

" ये बाई , अशी रात्रीची तू इथे काय करते आहे ?" तो थोडा जोरात बोलणारच होता की नंदूने तिचा हात त्याच्या तोंडावर दाबून धरला .

" shhh ! ए हळु बोल ना, जागे होतील ना सगळे." नंदू आजूबाजूला बघत हळू आवाजात म्हणाली.

नंदुचा हात शरूच्या ओठांवर होता , त्यामुळे त्याला बोलता येत नव्हते. तो इशाऱ्याने तिला तोंडावरचा हात काढ म्हणत होता. नंदूने त्याच्या तोंडावरून हात काढला तसा तो झोपल्या ठिकाणी उठून बसला आणि आजूबाजूला बघत होता तर त्याला रोहन दिसला नाही.

" इतक्या रात्रीची तू इथे काय करतेस ? हार्ट अटॅक येता येता राहिला मला. असं कोणी येऊन बसतं काय समोर? ते ही इतक्या मध्यरात्री? आणि तू आतमध्ये कशी आली, दार तर बंद होते ना ?" शरू म्हणाला.

" हा ते ... रोहन बाहेर बाल्कनी मध्ये काहीतरी करतोय. खोलीचं दार उघड होतं." नंदू म्हणली.

" इतक्या रात्रीची तू इथे काय करायला आली आहे? इतकी आठवण येते माझी मला सांगायचं असतं. मी आलो असतो." शरू तिची मस्करी करत बोलला.

" ए फाजीलपणा पुरे कर आता . दोन-तीन दिवसापासून मला तुझ्या सोबत काहीच वेळ घालवायला मिळाला नाही. ही चांडाळ चौकडी सतत तुझ्या सोबत असते. आता काय तो शांत वेळ मिळाला आहे , चल आता लवकर." म्हणत नंदू त्याच्या हाताला धरून त्याला तिच्या गच्चीवर घेऊन येत होती. शरूने रोहनला इशारा केला आणि तो नंदू सोबत तिच्या घरी गच्चीवर दोघंही उड्या मारून आले.


उद्या सकाळी शरू परत जाणार होता. एकच रात्र मध्ये उरल्याने आणि इतके दिवस तिला त्याच्या सोबत पाहिजे तसा वेळ न घालवता आल्यामुळे , नंदूने ही रात्र शरू सोबत घालवण्याचा प्लॅन केला होता. ती रात्री सगळे झोपायची वाट बघत होती. शरूच्या रूमचा लाईट बंद दिसल्यावर तिच्या लक्षात आलं की आता सगळे झोपले असेल. तशी ती गच्चीवरून उडी मारून शरूच्या गच्चीत गेली. तिला रोहन बाहेर बालकनीमध्ये सिगरेट ओढताना दिसला. त्यामुळे शरूच्या रुमचं दार अनायसे तिला उघडं सापडलं आणि ती आतमध्ये शरूला उठवायला गेली होती. दोन तीन दिवसाची दगदग आणि नंदूच्या तब्येतीमुळे रात्रीची झोप नीट न झाल्याने थकलेला शरू आज लवकरच झोपी गेला होता.


" बापरे ! तू तर पूर्ण रात्र जागायचे प्लॅनिंग करून ठेवलेले दिसते आहे.!" शरू गच्चीवर नजर फिरवत बोलला.

आजीच्या डब्यातल्या खाऊचे चार-पाच प्लेट, पाण्याची बॉटल ,खाली चटई टाकलेली, अशी सगळी त्याच्या आवडीची अरेंजमेंट केलेली होती.

नंदू चटईवर जाऊन बसली.

" ए इथे माझ्या समोर येऊन बस ना, मला तुला डोळे भरून बघून घ्यायचे आहे." नंदू शरूला म्हणाली.

" बापरे ! मॅडम तर आज फूल रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत." शरू नंदूची मस्करी करत तिच्यासमोर जाऊन बसला, " जशी आपली आज्ञा राणी सरकार !" तो हसत म्हणाला.

" रोमँटिक वगैरे काही नाही हा, मला तुझ्यासोबत खूप खूप खूप गप्पा मारायच्या आहे आणि इथे आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणी नसेल आहे, फक्त तू आणि मी !" नंदू त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.

" ओ हो , मोठ्या झाल्या तर नंदिनीबाई." तो डोळे मिचकावत म्हणाला.

" श्रीराज !" नंदूने शरुला हळूच आवाज दिला. तिच्या हातात एक छोटासा बॉक्स होता.

खाऊ खाताखाता तो आपलं नाव ऐकून तसाच डोळे मोठे करत तिच्याकडे बघत राहिला.

" काय म्हणालीस? तुला श्रीराज म्हणता येते? " शरूने आश्चर्याने तिला विचारले.

आज तिने पहिल्यांदा त्याला श्रीराज म्हणून आवाज दिला होता.

" हो ! पण मला शरूच म्हणायला आवडते. तुला शरु फक्त मी एकटीच म्हणते ना. मी दिलेलं नाव आहे ते , म्हणून मला ते फार आवडते." नंदू थोडीशी लाडात येत म्हणाली.

" मी एक छोटसं गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी." म्हणत तिने तिच्या हातातला बॉक्स ओपन केला. त्यात एक छोटसं ' श्री ' अक्षर कोरलेलं गोल्ड पेंडंट होतं. तिने ते त्याच्या हातात दिले.

" खूप छान आहे." शरू ते पेंडेंट हातात घेत म्हणाला.

" श्री फॉर श्रीराज ! त्याची अजून एक स्पेशालिटी आहे. ते टर्न करून बघ." नंदू म्हणाली.

शरूने ते पेंडेंट टर्न केले , तर त्यावर बारीक अक्षरात SN असे लिहिले होते.

" SN.. म्हणजे श्रीराज नंदिनी!" नंदू खूप एक्साईटेड होत म्हणाली .

" खूप सुंदर आहे. हे मी सदैव आहे माझ्याजवळ ठेवेल." शरू म्हणाला.

" ठेवेल नाही घालायचं." असं म्हणत नंदूने तिच्या गळ्यातली एक लांब चेन काढली त्यात ते पेंडंट घातलं आणि ती चेन शरूच्या गळ्यात घातली .

" हे बघ , आता मी नेहमी तुझ्या ह्रदयाजवळ राहील , नेहमीकरिता." ते पेंडंट हातात घेऊन त्याच्या हृदय वर धरत म्हणाले.
" आता मी तुझ्या हृदयाच्या एकदम जवळ राहिल आहे नेहमीसाठी. आता तू तिकडे गेला तरी तुला माझी नेहमी आठवण राहील म्हणजे तुझी दुसऱ्या मुलीकडे चुकूनही नजर जाणार नाही." नंदू म्हणाली .

" अरे सोन्या, तुझ्याशिवाय कोणी नव्हतं आणि कधीच कोणी नसणार आहे. मी हे नेहमी घालून ठेवेल , कधीच काढणार नाही. " शरू तिला आपल्या जवळ घेत म्हणाला.

" तू खरच परत येशील ना? टीना त्यादिवशी म्हणाली होती, तिकडे गेले की तिथून कोणी परत येत नाही." नंदू थोडी चिंतित स्वरात म्हणाली.

" अरे बाबा , असं काहीही नाही होणार आहे ,
तू कुणाचेही ऐकत बसते. मन्या , आता तू मोठी झाली आहे, खूप लोकं तुझ्या लाईफ मध्ये येतील, कोणाचे ऐकायचं , कोणाचे सोडून द्यायचं , कोणाचं मनावर घ्यायचं , आता तुला समजायला हवं. असं प्रत्येकाचं बोलणं जर मनावर घेतलं तर आयुष्यातले आनंदाचे क्षण घालवून बसशील." शरू तिचे केस कुरवाळत तिला समजावनीच्या सुरात म्हणाला.

" ह्म्म ." नंदू
तरी तिचं त्याच्या उत्तराने समाधान झाले नव्हते , पण तिने तो विषय बदलला.

नंतर बराच वेळ तो तिला बारावीनंतर काय शिकायचं , कॉलेजमध्ये कसं राहायचं , असं बरंच काही सांगत होता. मध्येमध्ये एकमेकांची मस्करी करणं, मारामारी करणं सुद्धा सुरू होतं.

" शरू माझ्यासोबत डान्स करशील , माझ्या वाढदिवसाला केला होता तसा ?" नंदू लडिवाळपणे म्हणाली.

" म्युझिक ?" शरू.

" म्युझिकची गरज आहे काय ? आपल्या दोघांचे हार्ट बिटस च आपल्यासाठी खुप स्वीट म्युझिक आहे." नंदू त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून तो गालातच हसला आणि तो डान्ससाठी उठून उभा राहिला. शरूने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या एका हाताने तिची नाजुक कंबर पकडली. नंदूने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती घातले , ती त्याच्या पावलांवर जाऊन उभी राहिली आणि नजर त्याच्या नजरेला भिडवली.

म्युझिकविना सुद्धा ते खूप छान डान्स करत होते. दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले होते. आता शरूने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घेतले होते आणि तिच्या कपाळाला स्वतःचे कपाळ टेकवून , तिच्याकडे बघत डान्स करत होता. तो एकटाच पायाने स्टेप्स घेत होता ,नंदू तर त्याच्या पायावर त्याला पकडून उभी होती. पुष्कळ वेळ ते दोघे एकमेकांत हरवून डान्स करत होते.

रात्र बरीच झाली होती, त्यामुळे आता थोडी थंड हवा जाणवायला लागली होती.

" नंदू , चल खाली जाऊन झोप, इथे आता थंडी वाढत आहे." शरू म्हणाला.

" नाही , मला पूर्ण रात्र तुझ्या सोबतच घालवायची आहे." नंदू हट्ट करत म्हणाली.

तिचे मन मोडेल , तो शरू कसा...

" बरं थांब एक मिनिट, मी जाऊन येतो." म्हणत शरू खाली नंदूच्या रूममध्ये गेला आणि तिथून त्याने एक उबदार शाल घेऊन आला.

" बरं , आता इथे मोकळ्या हवेत बसू नको . आत्ताच दोन दिवस तुला ताप होता. चल आपण तिकडे झुल्यावर बसू , तिथे थोडं शेड आहे, हवा लागणार नाही " , शरू म्हणाला.

शरूने नंदूला झुल्यावर नेऊन बसवले आणि तिच्या खांद्यावर , डोक्यावरून शाल नीट ओढली आणि तिच्या जवळ जाऊन बसला. नंदूने शरूचा एक हात आपल्या माने खालून घेतला, आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवले आणि आपले दोन्ही पाय वर पोटा जवळ घेऊन त्याच्या कुशीत जाऊन बसली.

" शरू, आई-बाबा खरंच तारे बनून आकाशात चमकत असतील काय रे ? आजी मला लहानपणी असंच सांगायची." नंदू आकाशाकडे बघत म्हणाली.

" हो. बघ ते तिकडे ते दोन तारे , एक आई एक बाबा . ते बघ आपल्याकडेच बघत आहेत. तू आता नीट राहायचं, असं रडायचं वगैरे नाही. असं खचून जायचं नाही. तुला असं रडताना , दुःखी झालेलं बघून त्यांना किती वाईट वाटत असेल?" शरू म्हणाला.

" ह्म्म "

" शरू, केस कापणारे तुझे . तू आणि टिना सेमच दिसता. असे लांब केस कुणी मुलगा वाढवत असतो काय ? ही तुझी असली कसली फॅशन ?" त्याच्या डोक्यातून हात फिरवत नंदू म्हणाली.

" ओके. नेक्स्ट टाईम येईल तेव्हा केस छोटे करून येईल." शरू हसत म्हणाला.

" पण तू तुझे हे लांबसडक केस हे असेच ठेवायचे. बिलकुल कापायचे नाही की छोटे करायचे नाही. मला तुझे हे केस असेच खूप आवडतात." तिची केसांची एक बट आपल्या बोटांमध्ये फिरवत , खेळत तो म्हणाला.

" ह्म्म..."

आता जवळपास पहाटेचे तीन-साडेतीन वाजत आले होते. तरी त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. नंदू हळूहळू पेंगत होती. ती तशीच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली. त्याने पांघरून तिच्या अंगावर नीट केले. तो सुद्धा समोर टेबलवर पाय लांब करुन, झुल्याला पाठ टेकवून , त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेल्या नंदूच्या केसात हात फिरवत, बसल्या जागीच झोपी गेला.


पहाटेच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने शरूला जाग आली. घड्याळात बघितले तर साडेपाच झाले होते.

" बापरे ! मी पण इथेच झोपलो की काय ?"

नंदू शरू च्या मांडीवर छान गाढ झोपली होती . तिला तसं झोपलेलं बघून त्याला आतून आनंद झाला.

" मन्या , अशीच सकाळ हवी आहे ग रोज मला. बघ आता एकदा शिक्षण पूर्ण झाले आणि करियर चांगलं सेट झालं की लगेच इकडे येऊन आबाकडून तुला नेहमीसाठी माझ्यासोबत घेऊन जाईल. प्रॉमिस आहे माझं तुला !" तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत शरू मनातच बोलत होता.

त्याने तिला आपल्या कुशीत दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि खाली तिच्या रूममध्ये आला. तिला बेडवर नीट झोपवून तिच्या अंगावर पांघरूण घालून , तिच्या कपाळाचं किस घेऊन तो गच्ची वरूनच उडी मारून त्याच्या रूममध्ये निघून गेला..

*******


🎭 Series Post

View all