Login

नंदिनी श्वास माझा १४

आणि तो पहिला किस... कदाचित शेवटचा
भाग १४ : आणि तो पहिला किस... कदाचित शेवटचा

सकाळी सगळ्यांची निघायची तयारी झाली होती. चहा -नाश्ता आटोपून सगळ्यांना भेटून शरू आणि त्याचे मित्र गाडीत सामान ठेवत होते.

" तुम्ही सामान ठेवा , मी आजी , आबा आणि नंदूला भेटून येतो." शरू त्याच्या मित्रांना बोलला आणि नंदूच्या वाड्यात निघून आला.


" सगळी तयारी झाली बाळा?" आजी शरूला म्हणाली.

" हो आजी. नंदू कुठे आहे ?" शरू म्हणाला.

" जा बघ , बहुतेक झोपलीये, उठव तिला." आजी तिचे काम करत म्हणाली.

शरूने काही मोगऱ्याची फुलं तोडली.
फुले आणि एक मोरपीस घेऊन तो नंदूच्या रूममध्ये गेला. रात्री उशिरा झोपल्यामुळे नंदू खूप गाढ झोपेत होती.

शरू तिच्या शेजारी जाऊन बसला . त्याने मोगऱ्याचा फुलांची टोपली तिच्या डोक्याजवळ ठेवली आणि आपल्या हातातील मोरपीस त्याने अलगदपणे तिच्या चेहऱ्यावर फिरवले.

" श....शू..... !!" करत नंदूने चेहऱ्यावर हाताने माशी उडवण्या सारखे केले आणि परत झोपी गेली.

तिच्या अशा वागण्याने शरूला हसू आले. "बावळटच आहे माझी चिमणी!" तो पुटपुटला.

त्याने ते मोरपिस तिच्या अंगावर ठेवले आणि तिचं ते गोड रूप डोळ्यात साठवून घेतलं.

"स्वतःची काळजी घे राजा." म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिच्या कपाळावर कीस करून , आपल्या उलट्या हाताने डोळे पुसत तो बाहेर आला. खाली येऊन आजीला जाऊन नमस्कार केला आणि मिठी मारली.

" नंदू खाली नाही आली ?" वरती पायाऱ्यांकडे बघत आजी म्हणाली .

" अगं नाही, ती झोपली आहे. माझं तिला उठवायचं मन झालं नाही . ती रात्री उशिरा झोपली होती." शरू म्हणाला.

(शरूने तिला मुद्दाम उठवले नव्हते. नाहीतर त्याला जायला खूप जड गेले असते आणि त्याला जाताना बघून नंदूला त्रास झाला असता. जे त्याला नको होते..)

" हो रे लबाडा , तरीच म्हटलं डब्यातला खाऊ संपला कसा ?" आजी त्याचा कान ओढत म्हणाली.

" अरे पण उठवायचं होतं तिला. उठल्यावर तू दिसला नाही तर ती आमचं डोकं खाईल, मला उठवलं का नाही म्हणून." आजी म्हणाली.

" ठीक आहे ग, एवढं काही नाही." शरू म्हणाला.

आबा खुर्चीवर पेपर वाचत बसले होते. तो खाली त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला. त्यांच्या मांडीवर आपले हात ठेवले.

" आबा काळजी घ्या." शरू त्यांना नमस्कार करत म्हणाला.

"लवकर परत ये बाळा !" आबा त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.

" हो आबा , हा गेलो आणि हा आलो बघा." हसतच शरू म्हणाला आणि घराबाहेर पडण्यासाठी तो दरवाजाजवळ आला. परत काहीतरी आठवून तो आबाजवळ परत आला.

" आबा, परत आल्यावर मी नंदूला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे , कायमचं. काय ते लाड करायचे ते आत्ताच करून घ्या. नंतर मी ऐकणार नाही हा कोणाचं." बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होते. त्याचा आवाज आता कापरा झाला होता.. तो आपले डोळे पुसतच घराबाहेर पडला.

" सगळं कळते रे बाळांनो , असेच नेहमी खुश राहा." आबा आपले दोन्ही हात वर करत आशीर्वाद दिल्यासारखे मनातच बोलले. शरूच्या डोळ्यातल्या अश्रूंनी खरं काय ते सगळं आबांना सांगितलं होतं.


**********

शरूने नंदिनीच्या चेहऱ्यावर मोरपिस फिरवल्यामुळे तिची झोप मोडली होती. शरू गेल्यावर दहा मिनिटातच ती जागी झाली होती. आळस देत ती उठली. बघते तर तिच्या अंगावर मोरपीस ठेवलं होतं आणि बाजूला मोगऱ्याची फुलं तिला दिसली. मोरपीस हातात घेऊन एकटक त्याच्याकडे बघत गोल गोल फिरवत होती.

" अच्छा , तर हा शरू येऊन गेला वाटतं." आणि मग अचानक तिला आठवलं, " अरे आज तर हा परत मुंबईला जाणार होता."
तिने घड्याळाकडे बघितलं 8.05 मिनिट झाले होते. ती होती त्या अवतारात तशीच पळत खाली आली.

" आजीssss आजी sssss शरू आला होता काय ?" नंदू पायऱ्यांवरून खाली उतरत ओरडतच म्हणाली.

" अग हो ,पाच मिनिट झाले, आत्ताच गेला. वरती तुझ्या खोलीमध्ये तुला भेटायला आला होता, पण तू गाढ झोपली होती म्हणाला. म्हणून तुला त्याने उठवले नाही बोलला. " आजी म्हणाली.

" अगं पण उठायचं होतं ना मला." नंदू ओरडतच बाहेर पळाली.

" अग कुठे चालली ?" आजी तिला बाहेर जातांना बघून म्हणाली.

" अगं थांब , येते बघून, तो जास्ती दूर नसेल गेला." म्हणत तिने बाहेर धूम ठोकली.

तिचा जीव आता घाबराघुबरा झाला होता. ती होती त्या स्थितीत पळत निघाली होती. तिने आड वळणाचा छोटा शॉर्टकट रस्ता धरला आणि त्या रस्त्यावरून पळत होती..

" मला न भेटता कसा काय जाऊ शकतो शरू तू ? आपल्या या भेटीचा हा शेवटचा क्षण तू माझ्याकडून कसा हिरावून घेऊ शकतो ? मला, मला बघायचे होते तुला. तुझ्या मिठीत एकदा यायचे होते. एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं." मनातच बोलत, रडत रडत ती पळत होती आणि मोठ्या रस्त्याच्या जवळ येऊन पोहोचली. तिथे उभी रस्त्यावर नजर जाईल तिथवर बघत होती आणि तिला शरूची गाडी दिसली. गाडी अजून यायची होती.

" शरू......शरू.... !" जोराने ती आवाज देत होती. रस्त्यापासून थोड्या उंच भागावर ती उभी होती. गाडी तिथून निघायला नको म्हणून घाईघाईने ती खाली उतरायला गेली. तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर घसरत खाली पडली.

शरूने तिला पडलेले बघितले आणि लगेच रस्त्याच्या एका साईडला गाडी उभी केली. गाडी थोडी पुढे निघून गेली होती. तो गाडीतून उतरून पळतच नंदू जवळ आला.

त्याला असे पळताना बघून बाकीचे पण गाडी बाहेर येऊन उभे राहिले.

नंदू घसरल्यामुळे खाली पडली होती होती. कसेबसे स्वतःला सावरून ती बसली होती. तिचा लाईट पिवळा पटियाला सलवार मातीने खराब झाला होता. ओढणी सुद्धा घ्यायला ते विसरली होती. घरातून तशीच पळत निघाली होती, तिला एक मिनिटाचा ही उशीर करायचा नव्हता. मोकळे विस्कटलेले केस, डोळ्यात पाणी, पडल्यामुळे तिच्या कपाळावर थोडं खरचटलं होतं, त्यातून थोडसं रक्त येत होतं आणि हाताला कोपरा जवळ खरचटलं होतं. ती तो जखमी झालेला हात आपल्या दुसऱ्या हातात पकडून पाणावलेल्या डोळ्यांनी शरूकडे बघत बसली होती. तिचा श्वास चांगलाच फुलला होता.


तिचा तो अवतार बघून शरूच्या काळजात धस्स झालं. त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर त्याच्या कुशीत उचलून घेतले . तिने पण तिचा एक हात त्याच्या मानेत टाकला , दुसऱ्या हाताने त्याच्या शर्टची कॉलर पकडली होती.. आणि रडक्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती. जवळच असलेल्या झाडाच्या कठड्यावर त्याने तिला आणून बसवीले .

" रोहन, फर्स्ट किट बॉक्स , क्विक !" शरू रोहनकडे बघत ओरडला.

रोहन धावतच फर्स्ट किट बॉक्स घेऊन आला. शरूने त्याच्या हातातून बॉक्स घेतला. कॉटन आणि डेटॉलने नंदूच्या कपाळावरची जखम क्लीन करत होता..

" स... स्...." नंदुच्या तोंडून आवाज आला.

नंदुला डेटॉलमुळे थोडी जळजळ झाली होती . ती त्याच्याकडे बघत बसली होती . शरू झालेल्या जखमेवर फुंकर घालत औषध लावत होता. ती मात्र एकटक त्याच्याकडे बघत होती.

आता सगळे त्यांच्याजवळ जमले होते. मीना सुद्धा नंदूच्या मागे आली होती. नंदू तिला रस्त्याने धावताना दिसली तेव्हा ती नंदूच्या मागे आली होती. ती पण खाली नंदू जवळ येऊन उभी राहिली.

नंदू शरू दोघे उभे होते. त्यांच्या आजूबाजूला हे सगळे उभे होते. त्या दोघांना असे त्रासात बघून बाकीच्यांना पण आता वाईट वाटत होतं.

"मला न भेटता का निघून आलास?" नंदू डोळ्यांनीच शरू सोबत बोलत होती.

" तू जागी असताना तुला बघून मला निघायला त्रास झाला असता."शरूने पण डोळ्यांनीच उत्तर दिले.

शरू नंदू दोघांनाही आता शब्दांची गरज नव्हती, त्यांचे डोळेच एकमेकांशी बोलत होते आणि वाहत होते.

" तुला न भेटता मला किती त्रास झाला असता?" नंदू.

" बाळा , काय अवतार करून घेतला आहेस राणी? असं धावत-पळत यायची काही गरज होती काय ? मला तुझा त्रास बघवला गेला नसता , म्हणून तुला न उठवता निघून आलो. " शरू..

" हो होती ,खूप गरज होती, नाहीतर तू निघून गेला असतास." नंदू.

" परत येशील ना?" नंदू त्याच्या डोळ्यात बघत होती.

शरूने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या हृदयावर ठेवला. आता तिला त्याचे हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवत होते. जसं काही त्याचं हृदय तिला सांगत होतं , ' हो मी नक्कीच लवकर परत येणार आहे.' आणि त्याने तिच्या डोळ्यात बघत होकारार्थी मान हलवली.

" तुला भेटायचा, तुला बघायचा, तुला स्पर्श करायचा , माझा हक्क होता. का निघून आला असाच मला न भेटता ? मला तुला एकदा करकचून मिठी मारायची होती." तिच्या डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू लागले होते .

" मिठी मारायची होती. " हे तिच्या ऐकून , समजून घेत त्याने तिला मिठीत घेण्यासाठी आपले दोन्ही हात पसरले. पण लगेचच त्याच्या लक्षात आले की आपण रस्त्यावर उभे आहोत. त्याने इकडे तिकडे बघितले आणि मग त्याने त्याचे हात मागे घेत खिशात घातले. सामाजिक नियमांना तो बांधल्या गेला होता . त्याचे हात तिला मिठीत घेण्यासाठी आसुसले होते, पण आजूबाजूच्या वातावरणामुळे बांधल्या गेले होते . तिला मिठीत घ्यायची इच्छा असूनही त्याला काही करता येत नव्हतं , याचं त्याला खूप वाईट वाटत होते . त्याच्या सुद्धा डोळ्यातून आता पाणी ओघळू लागलं होतं..

दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांना बघत तसेच उभे होते . मनाशी मनाचं बोलणं सुरू होतं.

शरू आजूबाजूला बघत होता तेव्हा रोहनने त्याला बघितले होते आणि शरूच्या मनाची अवस्था त्याच्या लक्षात आली होती . त्याने सगळ्यांच्या कानात काहीतरी सांगितले , तसे ते सगळे एक लाईन मध्ये उभे होत त्यांनी त्या दोघांभोवती भिंती सारखा आडोसा बनवला. त्यामुळे रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना नंदू आणि शरू दोघं दिसत नव्हते. सगळे जवळजवळ आले आणि रस्त्याच्या साईडने चेहरा करून उभे होते. सकाळची वेळ असल्यामुळे तसेही रस्त्यावर वाहने कमी होती.

जशी सगळ्यांनी एकमेकांजवळ उभे राहून भिंत बनवून रस्त्याच्या साईडने आपले चेहरे वळवले, हे लक्षात येताच नंदूने एकही क्षणाचा विलंब न करता , आपले पाय उंचावत , आपल्या दोन्ही हातांनी शरूची मान आणि डोकं पकडून त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले आणि ती त्याला रडतच किस करु लागली. शरूला काही कळायच्या आत हे सगळं घडलं होतं. त्याच्या मानेभोवती तिचे हात फिरत होते. त्याच्या ओठांना ती स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती. श्वास घ्यायला जड होऊ लागलं तसं तिने त्याला सोडलं. तो एकटक तिच्या डोळ्यात आरपार बघत होता. तिच्या डोळ्यात त्याला विरहाच्या खूप वेदना दिसत होत्या. त्याने तिच्या डोक्याला पकडून तिला आपल्या छातीजवळ मीठीमध्ये ओढले आणि तिच्या डोक्यावर , कपाळावर , केसांवर गालांवर किस करत सुटला.

थोड्या वेळाने जड मनाने त्याने तिला आपल्या मिठीतून बाजूला केले.

" मीना , नंदूची काळजी घे." एवढं बोलून तो परत जाण्यासाठी मागे वळला, तसे सगळे गाडीत जाऊन बसले..

नंदू पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभी होती........



५ वर्ष नंतर..............


********

शरू नंदुचा आता पर्यंतचा प्रवास तुम्हाला आवडला...खूप छान वाटतेय...आता इथून पुढे कथा वेगळे वळण घेत आहे ...अपेक्षा आहे की ते पण तुम्हाला आवडेल..