Login

नंदिनी श्वास माझा १६

श्रीराज ची लगीन घाई.. काय तुफान घेऊन येईल
भाग-१५ : श्रीराज ची लगीन घाई , काय तुफान घेऊन येईल

" आई , तीन दिवसांनी माझं लग्न आहे. तू येते आहेस ना ?" श्रीराज फोनवर आपल्या आईसोबत बोलत होता .

" अरे बाळा , इतकी कशाची घाई आहे ? थोडा तरी विचार करून निर्णय घ्यायचा ना ? हा तुझ्या पूर्ण आयुष्याचा , भविष्याचा प्रश्न आहे . मला तुझी खूप काळजी वाटते आहे.!" आई काळजीने म्हणाली .

" आई , मी पूर्ण विचार केला आहे . आधीच फार उशीर झाला आहे , आता परत उशीर करायला मला परवडणार नाही . तू येते आहेस ना ? मी तुझी वाट बघेल." श्रीराज म्हणाला.


आई त्याला पुढे काही बोलणार तेवढ्यात आईच्या हातातला फोन आजीसाहेबांनी घेतला.

" हे लग्न आम्हाला मान्य नाही. ती मुलगी आमच्या घरची सून बनण्याच्या योग्यतेची नाही . हे लग्नाचे खूळ आपल्या डोक्यातून काढून टाकावे. तुम्ही त्वरित इकडे घरी परत यावे. "आजीसाहेब एकदम कडक आणि कठोर आवाजात म्हणाल्या.


" मी परवानगी मागत नाही आहो , सांगतोय. तीन दिवसांनी माझं लग्न आहे , तेव्हा सर्वांनी इकडे गावी यावे. आणि कोणाची काय योग्यता आहे ते मला तुम्ही न सांगितलेले बरे. तुम्ही सगळे माझ्याशी खोटे बोललात. तुम्ही सगळे माझ्यासोबत इतके कठोर वागाल, असे मला वाटले नव्हते. मला तुमच्याकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती."श्रीराज थोडा रागात बोलत होता.


" तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात. या लग्नाने तुमचं सगळं आयुष्य बरबाद होणार आहे. तुम्ही आंधळे होऊन विचार करत आहात. तुम्ही इतके मोठे बिझनेसमॅन आहात , आपला नफा कुठे आहे , कोणासोबत आहे , हे बघून निर्णय घ्यायला हवे. समाजामध्ये आपला इतका मानसन्मान आहे. तुमच्या या लग्नाच्या निर्णयाने तुमच्या सोबत आमची सुद्धा प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. कदाचित तुमच्या बिजनेसवर सुद्धा याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला सगळ्यात चांगली , हवी तशी मुलगी भेटू शकते. तुमच्या मागे मुलींची लाईन लागली आहे. तुम्ही म्हणाल त्या मुली सोबत तुमचं लग्न करून देऊ.. पण यांना आता विसरायचं." आजीसाहेब म्हणाल्या.


" बिझनेस , प्रतिष्ठा ,स्टेटस , लाईफ , फ्युचर, या कोणत्याही गोष्टी तिच्यापुढे मला महत्त्वाच्या नाही." श्रीराज म्हणाला.


" तुम्ही जर हे लग्न केलं , तर तुम्ही या घरात पाय ठेवायचा नाही. या घराचे दार तुमच्यासाठी बंद. तुमचा आमचा संबंध संपला. इथून कोणीही तुमच्या लग्नाला येणार नाही. " आजीसाहेब म्हणाल्या.


" तुम्ही जसं म्हणाल तसं! पण मी हे लग्न करणारच आहे." श्रीराज म्हणाला.

आजीसाहेब फोनवर बोलताना खूप रागात आहे बघून शशिकांतने आजीसाहेब कडून फोन काढून घेतला आणि फोनवर बोलले , "आम्ही सगळे लग्नाला येत आहोत " आणि फोन ठेवला.


" तुमचं पण डोकं तुमच्या मुलासारखं फिरलं वाटते. मुलाच्या हट्टापुढे तुम्हाला काहीही दिसत नाहीये. ते एक मूर्ख , आपले आयुष्य खराब करायला निघाले आहे आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करत आहात ?" आजीसाहेब चीडतच बोलत होत्या .

" आई , तुम्ही शांत व्हा आधी आणि माझे ऐकून घ्या." शशिकांत म्हणाला.

" माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी मी राज साठी बघितली आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हा बिजनेस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. जर माझ्या बिझनेस पार्टनरने ही पार्टनरशिप तोडली तर आपल्याला खूप मोठा लॉस होईल. वरून बिजनेसमध्ये जे काही नाव आहे ते सुद्धा कमी होईल. तुम्हाला पण माहिती आहे राजचे हे लग्न टिकू शकत नाही. सहा महिन्यातच ते मोडेल आहे, गॅरेंटी देतो मी तुम्हाला. जर तो या घरातून बाहेर गेला , तर मग कधीच तो परत घरात येणार नाही. तो किती स्वाभिमानी आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. सध्यातरी हे लग्न होऊन जाऊ द्या. तो स्वतः हे झालेले लग्न मोडेल आणि आपण आहोतच घरात , आपणही तशी व्यवस्था करूच." शशिकांत म्हणाले.


हे सगळं ऐकून श्रीराज आईच्या डोळ्यात पाणी आले.

" अहो , पण तो आपला मुलगा आहे. तुम्ही त्याच्यासोबत असे कसे वागू शकता?" आई म्हणाली.

" हे बघ नीती , जे मी करतोय ते योग्यच करतोय.. तुला तरी पटतय का ते लग्न? तुला तरी काही सुख दिसते आहे का त्या लग्नामध्ये?" शशिकांत म्हणाले.

आई गप्प उभी होती. या सगळ्या सुरू असलेल्या गोष्टीचा विचार करून तिचा डोक्याचा भुगा झाला होता. तिला काहीच कळत नव्हतं , काय चांगले , काय वाईट ? तिने सुद्धा शशिकांतला गप्पपणे होकार दिला.

" सुनबाई , यातलं काहीही राजला कळता कामा नये." आजीसाहेब म्हणाल्या .

******


इकडे श्रीराज लग्नाच्या तयारीसाठी लागला होता. लग्न अगदी साध्या घरगुती पद्धतीने , जवळच्या लोकांमध्ये होणार होते.

" रोहन , मला तु संध्याकाळपर्यंत इथे हवा आहेस. माझ्या लग्नाची सगळी तयारी तुला बघायची आहे. लग्नासाठी काय हवं नको ते तू बघून घे. फार फार वाटलं तर मदतीला तू राहुलला घेऊ शकतोस. बाकी जास्ती कोणाला काही कळू देऊ नको." श्रीराज फोनवर त्याचा मित्र रोहनला इन्स्ट्रक्शन्स देत होता. श्रीराजच्या एका बोलावण्यावर रोहन लगेच तिथे हजर झाला .


समोर टेन्ट वाले टेंट उभारत होते. रोहन जातीने सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत होता. काय हवं नको ते बघत होता. त्यांच्या वाड्या समोरच खूप मोठं अंगण होतं , तिथेच लग्न होणार होतं.

श्रीराज समोर पडवीमध्ये चेअर वर बसून लग्नाची सुरू असलेली तयारी शांतपणे बघत होता. त्याचे डोळे पाणावले होते. पाच वर्षापासून त्याने जे सुंदर, गोड गुलाबी स्वप्न रंगवले होते ते अशा पद्धतीने पूर्ण होईल हा विचार मनात येऊनच त्याच्या हृदयामध्ये कळ उठली होती. सारखे तेच तेच विचार मनात येऊन त्याचा गळा दाटून आला होता. त्याच्या डोळ्यांतले पाणी खाली त्याचा गालांवर ओघळले.. रोहन काम करता करता दुरून त्याच्याकडे बघत होता. त्याला सुद्धा श्रीराजच्या मनाची अवस्था कळत होती. त्याच्याजवळ येत रोहनने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला शांत केले.

" राज, सगळ ठीक होईल. तुझं प्रेम सगळं ठीक करेल आहे , काळजी नको करूस."रोहन म्हणाला.

तेवढ्यात मामी तिथे त्यांच्या जवळ आल्या , त्या सुद्धा श्रीराजला खूप वेळापासून असे खचलेले शांत बसलेले बघत होत्या. शेवटी त्यांना पण त्याला असे दुःखी बघावल्या गेले नव्हते आणि त्या तिथे त्याच्या जवळ आल्या होत्या.

" बाळा, तू खूप मोठा निर्णय घेतला आहेस. तुझं प्रेम आम्हाला कळत होतं , पण आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. तुझ्या आजीसाहेबांनी तसे इकडे सगळ्यांना बजावलले होते. आम्हा सगळ्यांना माफ कर बाळा." मामी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या.

मामीचा तो मायेचा स्पर्श झाला आणि त्याच्या भावना अनावर झाल्या. तो मामीच्या कमरेला बिलगून लहान मुलासारखा रडायला लागला.

" बाळा, असं खचून कसं चालणार आहे? तुला आता खूप खंबीर व्हायला लागेल आहे." मामी त्याला समजावत बोलत होत्या.

त्याने होकारार्थी मान हलवली. डोळ्यातील अश्रू पुसले आणि तो जोमाने , हसत मुखाने कामाला लागला.


अखेर तो लग्नाचा दिवस उजाडला. त्याने लाईट गोल्डन कलरचा कुर्ता पायजमा आणि त्यावर रेड सांस्कृतिक प्रिंटचे वेस्टकोट घातला होता. डोक्यावर रेड कलरचा फेटा बांधला होता. कपाळावर मोत्यांच्या मुंडावळ्या खूप शोभून दिसत होत्या. श्रीराज आईने त्याच्या कपाळावर कुंकू लावले , आरतीचे ताट ओवाळून त्याचे औक्षवाण केले. राजबिंडा तो नवरदेव खूप शोभून दिसत होता. त्याचं असं सुंदर लोभसवाणे रूप बघून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले .जी आई मुलाच्या लग्नाचं सुंदर स्वप्न बघत असते , ते आज अशा प्रकारे पूर्ण होईल , हे बघून तिला असह्य झालं. तिने त्याच्या कपाळावर कीस केलं आणि डोळे पुसत ती तिथून निघून गेली.

मुहूर्ताची वेळ झाली. श्रीराज मांडवात स्टेजवर येऊन तिची वाट बघत उभा होता. आणि फायनली ती वेळ आली. ती समोर गेटमध्ये तिच्या आजी सोबत आणि काही लहान मुलींसोबत येऊन उभी राहिली. तिने लाल रंगाचे गोल्डन काठ असलेली प्युर सिल्कची साडी नेसली होती, त्यावर सोन्याचे दागिने घातले होते. हातात हिरवा चुडा , त्याच्या आजूबाजूला सोन्याचे तोडे , केसांची लांब वेणी त्यावर तिच्या आवडत्या फुलांचे गजरे माळले होते. चेहऱ्यावर नावापुरतीच मेकअप होता. नाकात नथ , कपाळावर मोत्यांची नाजूक मुंडावळ आणि कपाळावर तिची नेहमीची चंद्रकोर टिकली.

दिसायला ती आधीपासूनच खुप सुन्दर होती. त्याला नेहमीच ती कुठल्याही अवतारात आवडत होती. पण आज नववधू रूपात ती खूप सुंदर दिसत होती. श्रीराज मंत्रमुग्ध होत तिला बघत उभा होता. तिचे ते सोज्वळ सुंदर रूप बघून त्याच्या ओठांवर समाधानाचं हसू पसरले.

" फायनली , आज तो दिवस आला. आज तू माझी होणार आणि आता मी तुला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही राजा . माझी खूप मोठी चूक झाली , जे मी तुला सोडून तिकडे परदेशात गेलो. पण आता कधीच कधीच तुला सोडून कुठेच जाणार नाही. तू माझी आहेस , फक्त माझीच आहेस राणी. आय लव यू मोर द्यान माय लाईफ." श्रीराज तिच्याकडे बघत मनातच बोलत होता.

तिला तसं नववधूच्या रुपात बघून त्याच्या डोळ्यातील एक अश्रू खाली ओघळला आणि त्याला तो चार दिवस आधी तिला भेटायला आला होता तो दिवस आठवला .