Login

नंदिनी श्वास माझा ९

सुड प्लॅन
काहीतरी पडल्याच्या आवाजाने सुजी , रोहन, राहुल , शरूने मागे वळून बघितले तर टिना खाली चिखलात दोन्ही हात टेकवून बसल्यासारखी पडली होती. तिच्या गालांना, कपाळाला, पायाला , हाताला चिखल लागला होता. कपडे तर पार चिखलाने माखले होते . तिचा तो अवतार बघून सगळ्यांना हसायला आले. सगळे जोरजोराने हसायला लागले. नंदू, मीना सुद्धा हसत होत्या.

" परत जाणार काय माझ्या वाट्याला ? उगाचच नको तो मॉडर्नपणा दाखवते." नंदू टिनाला बघत मनातच बोलत होती.

सगळ्यांना हसतांना बघून टिना खूप राग येत होता..

" it's not funny !' टिना थोडी ओरडल्यासारखी बोलली.

तिला रागात बघून आता सगळे शांत झाले, पण तिचा तो अवतार बघून ते सगळे एकमेकांकडे बघून हसू गालात दाबत होते. त्यांना हसू कंट्रोल झाले नाही आणि परत ते जोऱ्याने हसायला लागले..

" you , shut up guys! आता मला उठायला मदत करणार आहात की हसतच राहणार आहात?"टिना चिडतच बोलली.

टिनाला उठायला मदत करण्यासाठी शरूने त्याचा हात पुढे केला . टिनाने त्याचा हात पकडला आणि स्वतःचा तोल सांभाळत उभी राहिली.

" आधी ते हिल्स काढ ,नाही तर परत पडायची. इथे कोणी असे हाई हिल्स घालतात काय ग ? तुम्हा मुलींचं पण ना काही कळत नाही , सतत डोक्यात किती आणि कशी फॅशन करतात येईल ना, तेच असते." रोहन हसत म्हणाला.

" बस पुरे झालं आता!" शरू.

टिनाला खाली पडल्यावर उठायला मदत केल्यामुळे शरूचा सुद्धा हात खराब झाला होता. टीना तर पूर्णच चिखलाने माखलेली होती.

शरूला टिनाची मदत करतांना बघून नंदूला राग येत होता. तर इकडे शरूला काळजी घेताना बघून टिनाला खूप छान वाटत होते.

शरूने तिथे जवळच पडलेला पाण्याचा पाइप उचलला आणि स्वतःचे हाथ स्वच्छ धुतले.

" माझं काय?" टिना स्वतःकडे बघत शरूला म्हणाली.

तिला पूर्णपणे चिखलाने माखलेले बघून शरूचा डोक्यात कल्पना आली आणि त्याने पाइपने टिनावर पाणी उडवायला सुरुवात केली. आधी ती बावरली पण नंतर तिला पण गंमत वाटत होती. तिने तिचे हातपाय सगळं नीट धुवून घेतले.
आता शरू बाकी सगळ्यांवर सुद्धा पाणी उडवायला लागला . पाण्याचा वर्षाव होतांना बघून सगळे दूर पळाले. राहुल गाडी मधून टिनाची बॅग आणायला गेला होता. बीच वर जायचा प्लॅन असल्यामुळे सगळ्यांनी एक्स्ट्रा कपडे आणले होते . टिना पूर्णपणे ओली झाली होती. तिचे सगळे कपडे तिच्या अंगाला चीपकले होते. शरूचे असे पाणी उडवणे ती एन्जॉय करत होती.

दूर उभी नंदू हे सगळं बघत होती, ' आपण अशी फालतू आयडिया का केली ' म्हणून आता तिला स्वतःचाच राग येत होता. हे सगळं तिच्याच मुळे झालं होतं.

थोड्या वेळाने शरूचे नंदूकडे लक्ष गेले. त्याला तिच्या डोळ्यात राग आहे असे जाणवले.

" जेलस !"शरू मनातच बोलत स्वतःशीच हसला. त्याने पाण्याचा पाइप खाली टाकला आणि पाण्याचा नळ बंद करून नंदू जवळ जात तिच्या समोर उभा राहिला. नंदुचे त्याचाकडे काहीच लक्ष नव्हते. नंदू एकटक टिनाकडे बघत होती. मीना आणि शरू तिला तसे रागात आणि इर्षेमध्ये बघून गालात हसत होते ..

नंदुचे लक्ष नाहीये बघून शरुने नंदूच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली , तसे नंदूचे लक्ष शरूकडे गेले. तर मीना आणि तो तिला बघून हसत होते.

"काय ?" नंदू डोळे मोठे करत शरूकडे बघत होती.

" काय? " शरू भुवया उडवत नंदू कडे बघत म्हणाला.

" काय, काय?" नंदू.

" भारी मजा येत होती ना तुला तिकडे? इथे काय करतोय? जा ना तिकडे. मी सोबत आहे , त्याची तुला तर आठवण सुद्धा नाहीये." नंदू चिडत म्हणाली.

" अल्ले बापले ! कित्ती मोथ्था लाग या छोट्याश्या नाकावर? रागा मध्ये सुद्धा खुप्पच क्युट दिसते बाबा कोणीतरी." नंदुचे नाक ओढत , तिला चिडवत शरू म्हणाला.

" असं काय ? थांब सांगतेच तुला माझी क्यूटने" नाक चोळत नंदू त्याला मारायला लागली आणि अशी त्यांची मारामारी नी पळापळी सुरू झाली.

राहुल बॅग घेऊन आला होता. सगळे शेतात असलेल्या घरात गेले. तिथे ४-५ बायका होत्या, शेतात काम करणाऱ्या होत्या. त्यांची ३-४ लहान मुलं तिथे खेळत होते . पुरुष मंडळी बाहेर शेतात काम करत होते.

" रमिला काकी , हिला बाथरूम दाखवा. " टिना कडे इशारा करत शरू तिथल्या एका बाईला म्हणाला.

" हो जी छोटे मालक." म्हणत रमिला टिनाला घेऊन आतमध्ये गेली. टीना कपडे बदलून करून बाहेर आली.

" बसा पोरांनो !" म्हणत रखमाने खाली चटई अंथरली . तसे तिथे लाकडी जुन्या स्टाईलचा सोफा आणि दिवाण होता. कोणी त्यावर बसले तर कोणी खाली चटईवर बसले.

रमिला सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली.
" चहा टाकते , तुम्ही बसा निवांत इथे." रमिला सगळ्यांना पाण्याचा ग्लास देत म्हणाली.

रमिला आणि रखमा दोघी आता गेल्या.

नंदू भिंतीला टेकून खाली चटईवर पाय लांब करून पायावर पाय घेऊन बसली होती.

टिना सोफ्यावर बसली होती , तिच्या बाजूला मीना बसली.

दिवाण वर रोहन , राहुल आणि सुजी बसले होते.

थोडे बाजूला सरकत टिनाने तिच्या बाजूची जागा रिकामी केली. तिला वाटलं शरू तिथे बसेल पण शरू नंदूच्या शेजारी जाऊन चटईवर तिला खेटूनच बसला. नंदू रागात होतीच, त्याला जवळ आलेले बघून ती बाजूला सरकली. तो परत तिच्या शेजारी सरकला. ती परत त्याचा दूर सरकली. त्यांचा हा खेळ सगळे बघत होते . नंदूचे सगळ्यांकडे लक्ष गेले , तसे तिने शरूकडे डोळे मोठे करून बघितले..
ते बघून सगळे हसायला लागले.

"तुमचा हा काय खेळ चालला आहे?" रोहन हसत म्हणाला.

" काही नाही, लहानपणीचा खेळ आठवला. " शरू नंदुकडे बघत तिला एक डोळा मारत बोलला.

रखमा सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. सगळ्यांनी गरम गरम चहाचा मस्त आस्वाद घेतला. लहान मुलं टिना आणि सुजीकडे जास्तीच बघत होते. त्या दोघींची वेशभूषा बघून त्या लहान मुलांना त्या दोघी वेगळ्याच भासत असाव्यात , असेच वाटत होते.

" काकी , आज दुपारी आम्ही इथेच जेवणार आहोत . आपला मस्त चुलीवरचा पण साधाच बेत होऊन जाऊ द्या. तोपर्यंत आम्ही फिरून येतो. मी यांना आपला शेत वगैरे दाखवून येतो." शरू.

" हो जी , छोटे मालक !" रमिला.

सगळे शेत बघायला निघाले.....

" मला नाही यायचं, मी सगळं बघितले आहे." नंदू.
नंदूला टिना सोबत असताना शेत बघायला जाणे जीवावर आलं होतं.

" अगं अशी काय करते? चल, सगळ्यांसोबत खूप मजा येईल." शरू.

" नको , मला बोर होईल. मी इथेच थांबते. तसे पण एवढं फिरायचं म्हणजे पाय दुखतात माझे ."नंदू वेळ मारून नेत बोलली.

" बरं ठीक आहे , इथेच रहा. पण कुठे एकटीने बाहेर जाऊ नको." शरू.

" अरे हो , जा तुम्ही. इथेच आहे मी." नंदू थोडी वैतागत म्हणाली.

" मी पण थांबते."मीना.

" ए जा ग तू, उगाच नौटंकी नको करू." नंदू.

काकी नंदू इथेच आहे. लक्ष ठेवाल आहात." शरू म्हणाला.

"ए , मी काय लहान आहे काय आता ?" नंदू.

" नाही , लहान नाही, पण मोठी तरी कुठे झालीयेस?" शरू तिची मस्करी करत बोलला आणि बाहेर पळाला.

ते बघून सगळे हसायला लागले.

नंदू तोंड वाकडे करत तिथेच बसली.

सगळे बाहेर निघून गेले. शरू त्यांना शेत आणि आजूबाजूचे सगळं दाखवत त्याबद्दल माहिती देत होता. तिथे काही लोकं काम करत होते. त्यांना बघून रोहन, टिना , सुजी, राहुलला त्यांचं कौतुक वाटत होते .मीना पण त्यांच्या सोबत चालत होती . रोहन मीना सोबत बरच बोलत होता. जवळपास २-३ तास ते सगळे तिकडे फिरत होते . मीना आणि शरूने झाडावर चढून सगळ्यांना आंबे तोडून दिले. मीनाला तसे झाडावर चढलेलं बघून सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटलं.

" मानावे लागते बाबा इकडच्या मुलींना ! काय कडक असतात , कशाला म्हणून घाबरत नाही. नाही तर आपल्या कडील मुली,फॅशन मध्येच वाया गेल्या आहेत." रोहन टिनाकडे बघत बाकीच्यांना डोळा मारत बोलला.

" हो का ! तुम्हाला खुप्पच पुळका येतो आहे ना? तुला या मीनाचा आणि राजला त्या नंदिनीचा. किती बदमाश आहे ती, किती खुरापती करत असते. आजही तिच्याच मुळे मी खाली चिखलात पडले होते .तरी पण तुम्हाला तिचेच भारी कौतुक." टिना चिडत बोलत होती.

" तिच्यामुळे?"शरू.

" नाही रे, असे काही नाही आहे . या टीनाला तिला हाय हिल्स घालून दाखवायचे होते, ती तर म्हणाली सुध्दा होती , इकडल्या रस्त्यावर हाई हिल्स घालून चालणे जमत नाही म्हणून." सुजी हसत म्हणाली.

" whatever ?" टिना तोंड वाकडं करत बोलली.

अशीच एकमेकांची थट्टा मस्करी करत ते लोक शेतीच्या सैरचा आनंद घेत होते.

इकडे नंदू सोफ्यावर बसून बोर झाली होती. सकाळी लवकर उठल्यामुळे आणि रात्री सुद्धा झोप नीट न झाल्यामुळे ती बसल्या बसल्या झोपी गेली होती. जवळपास एक दिड तासांनी तिला जाग आली.

"अरे यार , अजूनही हे लोकं परतले नाहीत."आळस देत नंदू उठली. " चला आता फ्रेश वाटतेय."

आता काय करावं, विचार करत नंदू किचन कडे गेली. रखमा आणि रमिला चुलीवर स्वयंपाक करत होत्या.

" काकी , मला पण तुम्हाला मदत करायची आहे."नंदू.

"ताई , सैपाक झालाच बघा सगळा. या भाकऱ्या तेवढया राहिल्या आहेत. आम्ही करतो त्या . तुम्ही बघा , बाहेर फिरा तोपर्यंत. " रमिला.

" अरे वाह भाकरी , मला पण करायची आहे." नंदू खूप उत्साहात म्हणाली .

" नको ताई , इकडे चुलीजवळ लय गरम व्हायचं बघा तुम्हास." रमिला.

" नाही हो काकी , काही गरम नाही व्हायचं . इकडे किती थंड वातावरण आहे बघा." म्हणत ती आतमध्ये लाकडी पाट घेऊन रमिला जवळ बसली आणि त्या हातावर भाकऱ्या कशा प्रकारे फिरवत थापतात, ते टक लावून बघत होती.

" काकी काकी, मी पण भाकरी करते ना. मला पण द्या थोडं पीठ. "नंदू चुलीजवळ सरकत बसली.

रमिलाने तिला पीठ दिले . नंदू त्या दोघींना भाकरी करतांना बघत आपल्या हातावर भाकरी थापायचा प्रयत्न करत होती. पण ती हातावरील भाकरी प्रत्येक वेळ तुटत होती.

" काय , शी बाप्पा , किती कठीण आहे हे? आजी नेहमी म्हणत असते शिक म्हणून , पण आपणच कधी लक्ष दिले नाही. आज तर आता शिकायचंच." नंदू मनातच बोलत परत परत भाकरी थापण्याचा प्रयत्न करत होती .

" ताई , तुम्ही हा पाट घ्या, यावर थापा भाकरी." रमिला नंदूला पाटावर भाकरी कशी थापायची ते दाखवत म्हणाली . नंदू सुद्धा मन लावून त्या सांगत होत्या तसे करून बघत होती.

इकडे सगळे बाहेरून फिरून , हातपाय धूवून आतमध्ये आले.

" हुश्श ! बरं वाटतेय बाबा आता इथे बसल्यावर.फिरून खूप दमलो बाबा." सुजी.

" ह्मम !" राहुल.

रमिलाने सगळ्यांना माठातले गार पाणी आणून दिले .

" काकी नंदू कुठेय? दिसत नाही आहे?" नंदू आजूबाजूला कुठे दिसत नाहीये बघून शरूने रमिला काकींना विचारले .

" ताईसाहेब होय? हे बघा त्या इकडेआहेत." स्वयंपाकघराकडे हात दाखवत रमिला म्हणाली.

शरू जागेवरून उठून लगेच तिकडे गेला आणि तिला बघण्यात हरवून गेला.

नंदू चुलीजवळ भाकरी थापत बसली होती. चुलीजवळ बसल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. तिच्या काही चुकार बटा वारंवार तिच्या गालावर यायच्या , ती त्या हाताच्या कोपऱ्याने मागे करायचा प्रयत्न करत होती. चेहऱ्याला पीठ लागलं होतं. ती भाकरी करण्यात खूप मग्न झाली होती, तिला हे कोणी बाहेरून आलेले सुद्धा कळले नव्हते.

तिथे नंदू जवळ रखमा बसली होती.

" काकी, तुम्ही वाढायला घ्या."शरू.

तशी रखमा तिथून उठून बाहेर गेली. त्या दोघी ताट पाट मांडत होत्या, मीना पण त्यांना मदत करत होती.

शरू नंदू जवळ येऊन बसला. तिचे ते लोभस रूप त्याला मंत्रमुग्ध करत होते. तो तिची प्रत्येक हालचाल टिपत बसला होता. तेवढयात परत तिचे केस पुढे आलेत. तिचा परत तोच केस मागे करण्याचा प्रयत्न सुरू होता. शरूला आता ते केस मागे करण्याचा मोह आवरला नाही . त्याने हळूच आपल्या हाताने तिचे केस कानामागे अडकवले . त्याच्या स्पर्शाने नंदू भानावर आली. डोळे वर करून बघते तर शरू तिच्या पुढे बसला , खूप प्रेमाने तिला बघत होता .त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी गोड स्माईल होती. त्याला असे प्रेमाने स्वतःकडे बघतांना पाहून , नंदूला आता लाजयाला झालं.

" अग बाई! चिमणीबाई भाकरी करताय तर ?" तो हसत म्हणाला.

" काय ग चिमणे , तू भाकरीचा आकार विसरलीस काय? कोण खाणार ही भाकरी ?"शरू तिची मस्करी करत म्हणाला.

" तू, तू खाणार आहेस." नंदू.

" मी? दात तुटायचे माझे. " भाकरी हातात घेत तिची तो गम्मत करत म्हणाला.

" येसss , चुपचाप खायचं हा. एकतर तुझ्यासाठी बनवली , त्यात माझ्या हातचे बोट सुद्धा भाजले आणि तू नाटक करतोय?" नंदू.

" काय? काय गरज होती तुला हे सगळं करायची? " तिचा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला आणि कुठे भाजले आहे ते बघत होता.

" चल, उठ आता इथून, काकी बघतील सगळं." म्हणत तिला हाताला पकडून तिथून उठवत बाहेर घेऊन आला.

" अरे ठीक आहे , थोडेसेच भाजले होते . आता ठीक झालंय." ती हात सोडवत म्हणाली.

" बसा पोरांनो, ताट पाट मांडून झालिये बघा. " रमिला.

मीना आणि नंदू पाणी वगैरे घ्यायला मदत करत होत्या . सुजी आणि टिना बसल्या होत्या , त्यांना हे काही जमत नव्हते.

जेवायला सगळे पाटावर जाऊन बसले. नंदूला शरू जवळ बसायचे होते पण आता सुद्धा टिना हुशारीने शरू जवळ जाऊन बसली.

नंदूला ते बघून टीनाचा राग आला. ती रागात शरूच्या पुढल्या पाठावर जाऊन बसली.

रमिला आणि रखमा या सगळ्यांना जेवण वाढत होत्या.

"वाह! काकी खूप छान बेत दिसतोय. " राहुल जेवण वाढलेल्या ताटांकडे बघत म्हणाला.

चुलीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा , भाकरी, आंब्याचा रस , असा मस्त बेत केला होता. सोबतीला दह्याचे थंड ताक सुद्धा होते.

फिरून , चालून सगळे खूप दमले होते. सगळे जेवणावर तुटून पडले .

" हे राज ! बघ , किती सुपर टेस्टी आहे हे." म्हणत टिनाने मुद्दाम नंदू कडे बघत एक भाकरीचा घास त्याच्या तोंडापुढे धरला .

त्या दोघांना असे बघून नंदूला जोराचा ठसका लागला आणि तिच्या डोळ्यात पाणी आले .

नंदूच्या आवाजाने शरू लगेच त्याच्या पाटा वरुन उठला आणि पाण्याचा ग्लास घेऊन नंदू जवळ गेला . एक हात तिच्या पाठीवरून फिरवत एका हाताने तिला ग्लासने पाणी पाजत होता.

" राजा , हळू खायचं रे. " शरू तिच्याजवळ बसत काळजीने म्हणाला.

"नक्कीच नंदूने हे मुद्दाम केले असेल." टीना तिच्याकडे रागाने बघत मनातच बोलत होती.

सगळे पोटभर मस्त जेवले होते. थकल्यामुळे आता सगळे बसल्या जागेवरच पेंगायला लागले होते .

टीना, सुजी दिवान आणि सोफ्यावर आडव्या झाल्या.
मीना खुर्चीत बसून पेंगत होती.
रोहन , राहुल आणि शरू खाली चटईवर पहुडले.

सगळे पडल्या पडल्या गाढ झोपी गेले..

नंदूने आत्ताच एक दीड तास झोप काढली होती त्यामुळे तिला मात्र झोप येत नव्हती.

नंदू थोड्यावेळ तिथेच त्यांचे सगळ्यांचे निरीक्षण करत बसली होती . तिचं लक्ष बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांकडे गेले. तिला पण त्यांच्यासोबत खेळण्याची ईच्छा झाली आणि उठून ती बाहेर गेली . त्या लहान मुलांसोबत तिचे पळापळी , पकडापकडी, लपाछुपी असे खेळ सुरू होते.

नंदूच्या पैंजण आणि बांगड्यांच्या छनछन आवाजाने शरू जागा झाला होता. त्याने पुढे बघितले, त्याचे लक्ष नंदू कडे गेले . नंदू मुलांसोबत खेळण्यात मग्न झाली होती. ते सगळे कोंबड्यांच्या पिल्लांच्या मागे पळत होते. शरू तिथे आपल्या जागीच पडल्यापडल्या नंदूकडे बघत होता. तिला असे मनसोक्त लहान मुलांसारखे खेळताना बघून, त्याला फार छान वाटत होते. मुलांसोबत त्यांच्या वयाची बनून ती खेळत होती . तिच्या पैंजण आणि बांगड्यांचा लयीत येणारा छनछन छुमछुम आवाज सुंदर म्यूजिक बनून, त्याची धून त्याच्या कानात वाजत होते. तो आवाज त्याचा मनाचा ठाव घेत होता . तो हे सगळं खूप एन्जॉय करत होता. इकडे सगळे अजूनही झोपले होते. तो एकटा एकटक नंदू कडे बघत बसला होता.

आता त्याला सुद्धा तिच्यासोबत खेळण्याचा मोह झाला . तो तिथून उठून जात , त्या मुलांमध्ये खेळायला आला . सगळे मिळून पकडापकडी खेळायला लागले. सगळे मिळून शरूला आऊट करायचे. शरू आऊट झाला की नंदू आणि लहान मुलं उड्या मारत टाळ्या वाजवायचे. शरूला त्यांची फार गंमत वाटायची. मग तो मुद्दाम आऊट व्हायला लागला होता .

आता ऊन उतरत आलं होतं . जवळपास पाच वाजत आले होते. शरूने सगळ्यांना आवाज दिला, तसे सगळे आळस झटकत उठले आणि फ्रेश व्हायला गेले. रमिला काकींनी सगळ्यांसाठी थंडगार सरबत बनवून आणलं.

जवळच असलेल्या बीचवर जाण्यासाठी सगळे तयार झाले. काकींना आणि मुलांना बाय करून सगळे गाडीमध्ये जाऊन बसले. बीच शेता पासून जवळ होते. अर्धा तासात ते बीच वर पोहोचले. आता ऊन कमी झाल्यामुळे तिथे खेळण्यात त्यांना मजा येत होती. उन्हाळा असल्यामुळे फार काही तिथे गर्दी नव्हती .

शरू , रोहन, राहुल , सुजी पाण्यामध्ये जाऊन हॉली बॉल खेळत होते . नंदू आणि मीना तिथेच काठाजवळ उभ्या, त्या सगळ्यांना खेळताना बघत होत्या. सगळ्यांची खूप धमाल , मस्ती सुरू होती. खेळतांना टिना शरूच्या फार जवळजवळ करत होती. तिला तसे शरूच्या जवळ जाताना बघून नंदूला फार राग येत होता.

नंदू उभी होती तिथे बॉल आला. टीना बॉल घ्यायला नंदू जवळ आली. सकाळी नंदू मुळे पडल्याचं तिला आठवलं. तिला आता एक आयडिया सुचली. तिने बॉल घेता-घेता हळूच नंदूला धक्का मारला. नंदू बेसावध असल्यामुळे ती धपकन पाण्यात पडली . नंदूला पाण्यात पडलेले बघून मीना तिच्याजवळ आली आणि तिला उठायला मदत करू लागली. नंदूला पडलेले बघून शरूचे सुद्धा लक्ष तिच्याकडे गेले . तो लगेच खेळ सोडून धावत तिच्याकडे आला. तिचा हात धरून त्याने तिला पाण्यातून उठवले.

"नंदू , तु ठीक आहेस ? लागलं तर नाही ना कुठे?" शरू काळजीने म्हणाला.

" हा , मी ठीक आहे." म्हणत नंदू उभं राहण्याचा प्रयत्न करत होती. तिला माहिती होतं टिनाने तिला जाणून-बुजून धक्का दिला आहे. पण तिने आता तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

पाण्यात पडल्यामुळे नंदुचे कपडे भिजले होते. केस सुद्धा ओले झाले होते . मीना बॅग मधून टॉवेल घेऊन आली.

"तिकडे झाडाजवळ चल, कठड्यावर बसू." म्हणत नंदूचा हात पकडत शरू तिला झाडाजवळ घेऊन गेला. पण पडल्या lमुळे नंदूला नीट चालता येईना. ती लंगडत लंगडत चालत होती.

" का गं , अशी का चालते आहे ? पायला लागलं आहे काय? " म्हणत शरू तिचा पाय बघायला लागला. तिच्या पायाजवळ थोडं खरचटलं होतं. तिला चालतांना त्रास होत होता. ते बघून शरूने तिला त्याच्या दोन्ही हातावर उचलून घेतले आणि झाडाच्या कठड्याजवळ आणून बसविले.

" तू ठीक आहे ना रे राजा? कसं ग तुझं लक्ष नसते? थोडं सांभाळून खेळायचे ना." म्हणत शरू तिचा पाय बघत होता.

" हम्म ! आता लक्ष देईल , काळजी करू नको." नंदू शरूच्या डोळ्यात बघत म्हणाली.

त्या दोघांना जवळ बघून टिनाच्या तळ्पायातली आग मस्तकात गेली. ती रागाने नंदूकडे बघत होती.

मीना टॉवेलने नंदूचे अंग पुसून देत होती.

"केस पण पुस नीट, नाहीतर तिला सर्दी व्हायची." शरू मीनाला म्हणाला.

मीनाने तिची वेणी उकलली, केस मोकळे केले आणि तिचे डोकं पुसायला घेतले. ती केस हळूहळू पुसत आहे बघून शरूने मीना कडून टॉवेल घेतला आणि स्वतः नंदूचे डोकं पुसायला घेतले.

शरूला तिचं केस कोरडे करतांना बघून टिना धावत तिथे आली.

" चल न यार , केस कोरडे झाले बघ. बाकीचे करेन तिचं ती. चला आपण परत खेळूया. " असे म्हणत टिना शरूला ओढत घेऊन जाऊ लागली.

" तुम्ही जा , मी ठीक आहे. " नंदू सगळ्यांना म्हणाली.

"अगं पण तुला लागलंय. तुला असे एकटीला इथे बसवून कसा जाऊ? " शरू नंदूच्या काळजीने म्हणाला.

" मी ठीक आहे आता , तुम्ही जा खेळायला. मी इथूनच तुमचा गेम बघते." नंदू सगळ्यांना म्हणाली.

ती ठीक आहे बघून सगळे परत खेळायला निघून गेले.
ते सगळे आता ग्राउंडमध्ये रेती वर बॉल खेळत होते..

शरुला असं खेळताना बघून नंदूला फार छान वाटत होते , ती त्याला एकटक बघत होती.

टिनाचे लक्ष नंदू कडे गेलं, नंदूचे असं एकटक शरूकडे बघणे तिला आवडलं नव्हतं. पाणी प्यायचं कारण सांगून ती नंदू जवळ आली.

दुरून मीना नंदू आणि टिनाला बघत होती. त्यांच्यात नक्कीच काहीतरी बोलणं सुरू आहे , सगळं ठीक नाही आहे असे तिला जाणवत होते. नक्कीच काही तरी वेगळं आहे. खेळ सोडून मीना पळतच नंदू जवळ गेली.