Login

नंदिनी

A different love Story
माझा तिचा संबंध पुन्हा व्यवसायाच्या निमित्ताने आला.आधी ती आमच्याच गल्लीच्या जवळच कुठेतरी राहायची.जातायेता दिसायची..पण तिच्याबद्दल फारशी माहिती नव्हती.मग ती आमच्या ऑफिसमध्ये काम घेऊन येऊ लागली.बहुदा ती जिथे private जॉब करत असेल तिथले काम घेऊन येत असावी. चेहऱ्यावर थकवा, वैतागलेले भाव आणी अजीजींचेही.कपडे बरे असायचे पण रंगसंगतीचे भान नाही.एकंदरीत कठीणच काम. तशी तोंड ओळख असल्याने ती माझ्याकडे काम घेऊन यायची.ते आमच्या डिपार्टमेंटशी संबधीत नसले तरी मी कोणालातरी सांगून ते काम करून द्यायचो.तरुण नव्हतीच ती.पुढे ती यायची बंद झाली.बहुदा तो जॉब सोडला असावा.माझ्याही ते एवढे लक्षात नाही कारण त्याचं दरम्यान माझ्याही पत्नीला दुर्धर् आजार जडला आणी तिच्या ट्रीटमेंटमध्ये मीही व्यस्त झालो.

एकदा फिरतफिरत मी नेहमीचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने निघालो. तोही रस्ता तसा गजबजलेला होता. अचानक माझी नजर कार जवळ उभ्या असलेल्या तिच्यावर पडली.तीच होती ती.पण अमूलाग्र बदललेली.छान निटनेतका ड्रेस.उजळलेला आत्मविश्वास असलेला चेहरा.केस थोडे कापून सेट केलेले.पण पूर्वीसारखी मेंदी लावली न्हवती. अर्धे पांढरे केस उलट चेहऱ्याला शोभत होते. मी काहीसा आश्चर्यचकीत होऊन तिच्याकडे बघत राहिलो. तेवढ्यात तिचीही नजर माझ्यावर पडली.किंचित हसत तीने मला अभिवादन केले आणी ती पुढे आली.

" काय म्हणता सर?"

"ठीक आहे. आता येत नाहीत ऑफिसला?"

"तो जॉब सोडला सर.काम खूप होते.पगार कमी.बाहेरचेही कामे असायची."

"आता कुठे आहे मग?"

"इथेच एका मॅडमकडे आहेत.बुटिकचे दुकान आहे त्यांचे."

"खूप फरक पडला तुझ्यात."

" मॅडममुळेच.त्यांनी सांगितले की दुकानात काम करतांना चेहरा व व्यतिमत्व प्रसन्न पाहिजे.सुंदर नसले तरी चालेल."

मला काय वाटले कुणास ठाऊक मी तिला म्हटले
" वेळ असेल तर येतेस.कॉफी घेऊ."

"चालेल.आहेत 10 मिनिटे." तिनेही आढेवेढे घेतले नाही.

कॉफी घेऊन साधारण गप्पा मारून मी निघालो.तिच्यात आलेले आत्मविश्वास आश्चर्यचाकीत करणारा होता.

त्यानंतर मी दोनतीनदा तिकडे गेलो(मुद्दाम). 10-15 मिनिट गप्पा मारत कॉफी पित बसणे आता सरावाचे झाले.तिचा फोन नंबर पण तीने दिला. आमच्यात जनरल गप्पा चालायच्या.माझ्याबरोबर यायला तिला संकोच वाटायचा नाही...किंवा आमच्या कॅफेत बसण्यालाही कोणाला संशय येण्याचे कारण नव्हते कारण आम्ही दोघेही तरुण नव्हतो.

पण एकदा मी कॉफ़ी पित असतांना सहज विचारले
"नंदा तुझे वय काय? चालीस.. 42 असेल नाही?"

" नाही सर. 45 पूर्ण होईल पुढच्या महिन्यात्."

" एक प्रश्न विचारू?"

"विचारा."

"लग्न का केले नाही? करावसे वाटले नाही?"

"सर..मनासारखा जोडीदार नाही मिळाला त्या वेळी."

"आता मिळाला तर?"

"वय उलटून गेलंय सर? आता काय मिळणार?"

" मी जर प्रपोज केले तर?"

"काहीही काय बोलता सर. कुठे तुम्ही कुठे मी?"

" मी सिरियसली विचारतोय. पत्नी वारली आहे.मूले स्वतंत्र राहतात."

"कस सांगू सर?"

" take your own time. काहीच घाई नाही. तू घरी विचार.माझ्याबद्दल तपास कर. तूला वाटले तर हो म्हण.नाही वाटत असेल तर नकार दे."

"तुमच्याबद्दल काहीच म्हणणे नाही सर. पण...."

"पण काय?"

"सर.एक विनंती आहे. तुम्ही पुढील रविवारी माझ्या घरी येऊ शकाल?"

"का ग? आईशी बोलायचे आहे?"

"तुम्ही या तर घरी."

"चालेल.मी येतो. रविवारी ना?"

"हो. मी फ्री असते संध्याकाळनंतर."

तिने घरी का बोलावले असेल याचा मला प्रश्न पडला. आईला मला बघायचे असेल..काही शंकांचे निरसन करावयाचे असेल.माझे वय पाहता माझे काही बरेवाईट झाले तर तिच्या भविष्यासंबधी मी काय करणार हे विचारायचे असेल कदाचित. मी सगळे कागदपत्रे जमवून ठेवली.

रविवारी मी संध्याकाळी पोहचलो तिच्या घरी.छोटेसे दोन खोल्यांचे घर.तसे बऱ्यापैकी आवरलेले.तिच्या आईने स्वागत केले.आई बरीच थकल्यासारखी वाटत होती.

"बसा" तिने खुर्चीकडे निर्देश केला.मी बसलो.

"नंदिनी कुठे आहे?"

"येते आहे बसा."

मी बसलो आणी तेवढ्यात माझी नजर "ती"च्यावर पडली. खाली परकर आणी वरती शर्ट.नजर स्थिर नाही. तोंडाच्या एका बाजूने लाल गळते आहे. वय असावे चाळीशीपार.हात वरती उचलून काहीशी पाय फाकवत ती चालत आली. आई घाईघाईने पुढे आली.तिचा चेहरा पुसत तिला म्हणाली

" घरी साहेब आले आहेत, त्यान्ना नमस्कार कर."

तिने हात जोडून नमस्कार केला.नमस्कार असे ती म्हणाली असावी पण तिच्या बोबड्या बोलण्याने ती काय बोलली ते मला समजलेच नाही.ती नेमकी कुठे पाहत होती तेही समजले नाही. तिला हाताला घेऊन आई आत घेऊन गेली आणी नंदिनी बाहेर आली. फारशी आनंदी वाटली नाही.

"सर.काय घ्याल? चहा? पोहे?"

"अर्धा कप चहा दे फक्त."

चहा घेतल्यावर मी थोडा वेळ बसलो. ती काही बोलली नाही.अखेर मीच म्हणालो

"कशासाठी बोलावले होते घरी.?"

"तुम्ही बघितले ना सर तिला? ती माझी बहीण आहे.मंदबुद्धी आहे.आईचे वय झाले. तिच सांभाळते तिला.पण पुढे काय? मी ठरवले आहे की जो तिला संभाळेल त्याच्याशीच लग्न करणार.अगदी तरुणपणापासून...म्हणून माझे लग्न झाले नाही.कोणालाच ती नको आहे.पण माझा जीव आहे तिच्यावर.मी सांभाळेन तिला जिवंत असेपर्यंत."

मी उठलो.तिला मी निघतो या अर्थाने मान हलवली.तिनेही मान हलवली. मी तिचे घर सोडले. मध्ये चारपाच दिवस गेले असतील.मी ती नेहमी भेटायची तिथे गेलो.ती तिथे नव्हती.मग त्या ब्युटीकमध्ये तपास केला.ती रविवारपासून आलेलीच नव्हती. मी मोर्चा तिच्या घराकडे वळवला.

घरी पोहचलो तर तिच स्वतः पुढे आली.चेहरा ओढलेला,केस असेतसेच बांधलेले.

"मला माहित आहे तुम्ही नकार द्यायला आला आहात. असे अनेक नकार पचवलेत मी. " ती करारी आवाजात म्हणाली.

" अग पण माझे ऐकून तर घेशील?"

" मला माहित आहे तुम्ही माझ्या बहिणीला सांभाळायला तयार नाही. तुम्ही कोणतेही कारण द्या पण मी माझ्या बहिणीला सोडणार नाही हे सांगून ठेवते."

मी शांत राहिलो.ती माझ्याकडे रागाने बघत होती.

" तुझे बोलून झाले असेल तर मी बोलू?" मी शांतपणे म्हणालो.
ती काही न कळल्यासारखी माझ्याकडे बघत राहिली.

"मी घर थोडे साफ केले.दोन रूम ज्या वापरात नव्हत्या त्या साफ केल्या.एका बाईलाही कामाला ठेवले.तुझी आईही आता वृद्ध झाली आहे."

"म्हणजे?"

"म्हणजे आपण लग्न करू.माझ्याच घरात सॉरी..आपल्याच घरात आता तुझी आई आणी बहिणही राहणार आहे. चालेल ना?"

ती दोन क्षण माझ्याकडे अविश्वासाने बघत राहिली आणी माग एकदम माझ्या गळ्यात पडून रडू लागली.मी तिला थोपटत राहिलो....

©®विवेक चंद्रकांत वैद्य.नंदुरबार.