Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ७

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ७


मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्ध दोघे हनिमूनला जातात. आता बघू पुढे काय होते ते.


" ही ज्वेलरी तुझ्यासाठी." रियाच्या हातात एक छोटी पिशवी देत सानवी म्हणाली.

" वॉव.. मस्तच.. थँक यू वहिनी." रियाने सानवीला मिठी मारली.

" आणि आई , तुमच्यासाठी, काकूंसाठी हे स्वेटर्स.. बाबा हे तुमच्यासाठी स्वेटर आणि टोपी." सानवी आणलेल्या वस्तू देत होती. "विरेन भाऊजी, हे तुमच्यासाठी जॅकेट."

" अरे व्वा.. मस्तच वहिनी. थँक यू हो."

विरेन जॅकेट बघून खुश झाला होता. ज्योतीताईंची नजर राहून राहून सानवीच्या बॅगकडे जात होती. आत अजून काही वस्तू दिसत होत्या. पण चुलत जावेसमोर आणि विरेनसमोर विचारायला कसंतरी होत होतं. विरेन, रिया निघून गेल्यावर सानवी आणि अनिरुद्धदेखील त्यांच्या खोलीत आराम करायला म्हणून गेले. ज्योतीताई थोड्या अस्वस्थ झाल्या होत्या. माधवरावांशी बोलू की नको हा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी त्यांनी बोलायचे ठरवलेच.

" बघितलेत का?" आत आराम करत बसलेल्या माधवरावांना त्यांनी विचारले.

" काय बघायचं होतं?" माधवरावांनी उलट विचारले.

" सानवीने आणलेल्या वस्तू."

" हो.. आवडल्या मला. ती टोपी, तो स्वेटर. पण इथे घालायची सोय नाही. मी काय म्हणतो, आपण पण बाहेर फिरायला जाऊ थंड हवेच्या ठिकाणी. तिथे घालीन मी हे कपडे." माधवराव खुश झाले होते.

"मी ते म्हणत नाहीये.." ज्योतीताई वैतागल्या.

" मग काय म्हणायचे आहे? पटकन बोला."

" त्या सानवीच्या बॅगेत अजून काहीतरी होते."

" असेल.. तिने जर आपल्या सगळ्यांसाठी काही ना काही आणले आहे. मग तिच्या घरातल्यांसाठीही आणलं असेल. कश्याला विचार करता एवढा?"

" अहो पण, दाखवायची म्हणून काही पद्धत असते की नाही. मी काय लगेच घेणार होते का?"

" घेणार नव्हता मग एवढा विचार का करताय? सोडून द्या. आणि अजून एक, बाहेरच्या कामांचा आधीच आमच्या डोक्याला ताण असतो, तो अश्या कटकटी करून वाढवू नका. तो विरेन मदतीला आहे म्हणून तेवढं तरी होतंय. नाहीतर शेतीवाडीचं काय झालं असतं देवास ठाऊक."

" झालं? केलं मला गप्प? मी बोलतच नाही काही." चिडून ज्योतीताई बाहेर निघून गेल्या. या सगळ्यापासून अनभिज्ञ सानवी आणि अनिरुद्ध अजूनही प्रेमसागरात डुंबत होते.

" बरं.. आईबाबा उद्या मला घ्यायला येणार आहेत. तू सांगशील ना घरी?" सानवीने विचारले.

" ऐक ना.. जायलाच पाहिजे का?" सानवीच्या केसांशी खेळत अनिरुद्धने विचारले.

" हो.. आईबाबा एकटे पडले आहेत. आणि मी त्यांना सोडून कधीच इतके दिवस राहिले नाही. मला पण आठवण येते आहे त्यांची." सानवी डोळ्यात पाणी आणत म्हणाली.

" काय बोलू मग?" अनिरुद्ध नाराज होत म्हणाला.

" अनि.. असं काय करतोस? तुझ्या आईबाबांची इच्छा म्हणून आपण दोन महिने घरून काम करणार आहोत ना? मग त्यातले काही दिवस जाऊ दे ना मला?"

" अग ए, रडतेस काय? मी तर मस्करी करत होतो. मी आईबाबांना संध्याकाळीच सांगतो." अनिरुद्ध म्हणाला.

" घ्यायला येशील ना मला?"

" तू म्हणशील तेव्हा.."

" थॅंक यू.." म्हणत सानवी अनिरुद्धच्या गळ्यात पडली. संध्याकाळी आवरून दोघे हॉलमध्ये आले. माधवराव नुकतेच शेतावर फेरी मारून आले होते.

"चहा मिळेल का?" माधवरावांनी विचारले.

" देते की.. मी कामं करण्यासाठीच आहे इथे." चिडलेल्या ज्योतीताई म्हणाल्या.

" मी करते चहा." ज्योतीताईंचा राग बघून सानवी स्वयंपाकघरात गेली. जाताना तिने अनिरुद्धला खुणावले. अनिरुद्ध खुर्चीवर बसला.

" बाबा..." त्याने माधवरावांना हाक मारली.

" बोला.. अजून किती दिवस सुट्टीवर? जरा आहात इथे तर सूनबाईला शेत वगैरे दाखवून आणा. त्यांना जरा गावाची ओळख वगैरे करून द्या."

" बाबा, तेच सांगायचे होते. सानवीचे आईबाबा उद्या तिला घ्यायला येणार आहेत. ते मांडवपरतणीसाठी."

" मग.. आम्हाला विचारायची पद्धत नाही का?" माधवरावांचा मूड बदलला. अनिरुद्ध टेन्शनमध्ये आला. सानवी आतून हे सगळं ऐकते आहे याचा विचार करून त्याचे टेन्शन जास्तच वाढले.

" त्यातूनही जा म्हटलं असतं पण दोन दिवसांनी वटपौर्णिमा आहे. ती जाणार कधी आणि येणार कधी?" ज्योतीताई म्हणाल्या. अनिरुद्धला समोरून सानवी येताना दिसली. तिचे पाण्याने भरलेले डोळे बघून त्याला कसेतरी वाटले.

" आई, त्यात काय? ती तिकडे करेल वटपौर्णिमा. आपल्याला काय पूजा झाली म्हणजे झालं." अनिरुद्ध बोलू लागला.

" असं कसं? आजूबाजूच्या बायका विचारणार नाहीत का? पहिलीच वडाची पूजा आणि सूनबाईंचा पत्ता नाही. ते काही नाही. सानवी तू पूजेनंतर जा माहेरी." ज्योतीताई म्हणाल्या.

" आणि हो.. तुझ्या बाबांना माझ्याशी सुद्धा बोलायला सांग. या घरात मी आहे अजून. " माधवराव म्हणाले. खूप काही ओठांवर आले असूनसुद्धा सानवी गप्प बसली. चहा तिथेच ठेवून ती खोलीत जायला वळली.

" सानवी, आपण जरा गावात जाऊन येऊयात." अनिरुद्ध म्हणाला.

"माझी इच्छा नाहीये." सानवी आत जाऊ लागली.

" सूनबाई, एकदा बघून तरी या गाव. जमलंच तर ग्रामदैवतेचे दर्शन घेऊन या. माधवराव बोलले. इच्छा नसताना देखील सानवी अनिरुद्धसोबत बाहेर जायला निघाली.

" सानवी.. बाईकवर जाऊयात?" गप्प बसलेल्या सानवीला बोलते करण्यासाठी अनिरुद्धने विचारले. सानवी चुपचाप बाईकजवळ जाऊन उभी राहिली.

" अजिबातच बोलणार नाहीस का?" गाडी सुरू करत अनिरुद्धने परत विचारले. सानवी गाडीवर बसली.

" अस्सं.." म्हणत अनिरुद्धने जोरात गाडी चालवायला सुरूवात केली.

" अरे हळू.." सानवीने अनिरुद्धचा खांदा धरला. तरिही त्याचा स्पीड कमी झाला नाही. नाईलाजाने तिने त्याच्या कंबरेला धरले. अनिरुद्ध गालातल्या गालात हसला. नदीकाठावरील मंदिरात आल्यावरच त्याने गाडी थांबवली. दोघेही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले. अनिरुद्ध सानवीला घेऊन घाटावर आला.

" बस ना.." त्याने सानवीला सांगितले. "सॉरी ना." तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला.

" किती वेळा सॉरी म्हणणार? आणि फक्त आपलं लग्न झाले म्हणून माझ्या आईबाबांनी मला भेटायला तुमची परवानगी घ्यायची? मला नाही पटत."

" हो.. मला समजतं आहे. पण इकडे अजूनही थोड्या जुन्या चालीरिती पाळतात."

" म्हणूनच मी सगळ्यांसमोर तुला अहोजाहो करते. आतासुद्धा वटपौर्णिमा आहे म्हणून नाहीतर मी खरंच उद्याच गेले असते आईबाबांकडे."

" तू माझ्यासाठी पूजा करणार?" अनिरुद्धने विचारले.

" नको का करू?" सानवीचा राग अजून कमी झाला नव्हता.

" तुला मी सातजन्म हवा आहे?"

" हवा आहेस असं नाही.. पण चालवून घेईन."

" बरं मग आईबाबांना मी फोन करू का नंतर या म्हणून?" अनिरुद्धने हळूच विचारले.

" माझ्याकडे काही ऑप्शन आहे का?" सुस्कारा टाकत सानवीने विचारले.

" थॅंक यू सानवी.. डोक्यावरचे खूप मोठे ओझे कमी केलेस माझ्या." अनिरुद्धला हायसे वाटले.

"थॅंक यू आणि सॉरी सोडून माझ्या नवर्‍याला बहुतेक बाकी काही बोलताच येत नाही."

"तो बिचारा नवरा बायकोला खुश ठेवायला बघतो. मग काय आहेतच हे जादूई शब्द."

" या दोन शब्दांपेक्षा भारी शब्द आहेत माझ्याकडे."

" कोणते?"

" आय लव्ह यू.."

" ओ.. हो.. बायकोच्या तोंडून चक्क चक्क आय लव्ह यू. असं वाटतं इथेच तुला मिठीत घ्यावं."

" एवढेही लाडात यायची गरज नाही. चल निघूयात."

" निघायच्या आधी मी बाबांशी बोलू?" अनिरुद्धने गंभीर होत विचारलं.

"घे बोलून. आई चिडणार हे नक्की."

अनिरुद्धने प्रदीपरावांना फोन लावला.

" बाबा, सानवी तिकडे चार दिवसांनी आली तर चालेल का? ते इथे वटपौर्णिमा जोरात असते ना म्हणून."

" हो का?" प्रदीपरावांच्या आवाजात नाराजी जाणवली. पण त्यांनी स्वतःला पटकन सावरले. "अरे हो. चालेल की. त्यात काय एवढे?"

" पण आईंना?" अनिरुद्ध बोलता बोलता थांबला.

" तिला मी समजावतो. तू नको काळजी करूस. " प्रदीपराव म्हणाले.

"आणि अजून एक.. माझ्या बाबांशी एकदा बोलाल का तुम्ही सानवीला नेण्याबद्दल."

" बोलतो ना.."

" थॅंक यू बाबा.."

निश्चिंत होऊन अनिरुद्धने फोन ठेवला पण यामुळे शोभाताई नाराज होणार हे जाणून प्रदीपराव टेन्शनमध्ये आले.

शोभाताई नाराज होतील की घेतील समजून बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all