नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ८
मागील भागात आपण पाहिले की मांडवपरतणीसाठी जाऊ पाहणाऱ्या सानवीला नंतर जा असं सांगण्यात येते. आता बघू पुढे काय होते ते.
" बरं, उद्या तिकडे जाताना साडी नेसू की ड्रेसच घालू? चार तासांचा प्रवास आहे म्हणून प्रश्न पडला. आणि कोणाचा फोन होता?" शोभाताईंनी हातात फोन धरून उभे असलेल्या प्रदीपरावांना विचारले.
" अग सानवीचा फोन होता. ते दोघे बाहेर आले होते वटपौर्णिमेची खरेदी करायला. त्यांच्याकडे जोरात असते म्हणे. मी म्हटलं कर तिथेच पूजा. मग येतो आम्ही न्यायला. बरोबर केलं ना मी?" प्रदीपराव हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले.
" खोटं बोलायला जमत नाही.. मग कश्याला करावा माणसानी तो प्रयत्न? बोलून टाकायचं ना खरंखरं. ती लोकं नको म्हणाले ना?" शोभाताईंनी विचारले. प्रदीपराव इकडेतिकडे बघत राहिले.
" वाटलंच होतं मला. त्यांना बघितलं ना तेव्हाच वाटलं होतं की ही लोकं माझ्या मुलीला माझ्यापासून तोडणार." शोभाताई तणतणत म्हणाल्या.
"काय बोलते आहेस? याच्यात तोडायचा संबंध येतो कुठे? अनिरुद्धने फक्त सांगितले की पूजेनंतर पाठवतो. फक्त आपल्याला त्याच्या वडिलांना एक फोन करावा लागेल. " प्रदीपराव समजवण्याच्या प्रयत्नात बोलून गेले.
" फोन कश्यासाठी?"
" ते बहुतेक सानवीला इथे घेऊन येऊ का हे विचारण्यासाठी."
" हो का? लेक आमची.. आम्ही तिला वाढवणार, मोठं करणार आणि हे कोण टिकोजीराव मध्येच येणार? आम्ही का विचारायचं यांना, आमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ का?" शोभाताई आता खूप चिडल्या होत्या.
" हे बघ.. त्यांच्याकडे तश्या पद्धती आहेत. आणि जर सानवीला चालणार असेल तर तू कश्याला त्रास करून घेतेस?" प्रदीपराव समजावत होते.
" विचारतेच थांबा तिला." शोभाताई हातात फोन घेत म्हणाल्या.
" शोभा.. शांत हो.. हे बघ आता तू रागात आहेस.थोडी शांत हो. मग बोल. आणि आता हे त्यांचं आयुष्य आहे, हे स्विकार."
" तुम्हाला काय होतंय बोलायला? त्यासाठी आईचं काळीज पाहिजे. तिच्याशिवाय माझं आहे तरी कोण?"
" मी बोलत नाही, म्हणजे मला भावना नाहीत असं होत नाही ना? आज नाही तर उद्या ती येईलच."
" येऊच दे.. आली की चांगले पंधरा दिवस ठेवून घेईन तिला." शोभाताई डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या.
वटपौर्णिमा झाली. त्याच्याआधी सानवी शेतावर चक्कर मारून आली. ज्योतीताई जास्त बोलणे टाळत होत्या. सानवीही वाद नको म्हणून जेवढ्यास तेवढे बोलत होती. वटपौर्णिमेच्या दिवशी सानवी छान नऊवारी नेसली. उपवास केला. ज्योतीताई जे जे सांगत होत्या ते ते ती सगळे करत होती. गावात नवी नवरी म्हणून तिचे कौतुक सुरू होतेच. पूजा करून घरी येताच तिने जायची तयारी सुरू केली.
" हे काय करते आहेस?" अनिरुद्धने विचारले.
" बाबांनी तुझ्या बाबांना फोन केला होता. उद्या ते मला न्यायला येणार आहेत. बॅग भरून ठेवते आहे." सानवीने अनिरुद्धकडे न बघताच सांगितले.
" आता काय झाले? इतकावेळ तर छान हसत होतीस." अनिरुद्ध वैतागला होता.
" माझे आईबाबा इतक्या दुरून येणार, आणि तुझ्या बाबांनी साधं जेवायला या म्हणूनही सांगितलं नाही." सानवी कपडे बॅगेत आपटत म्हणाली.
" अग, या इथे अजूनही मुलीच्या घरचे पाणीही पित नाहीत. म्हणून कदाचित सांगितलं नसेल बाबांनी." अनिरुद्ध समजूत काढत म्हणाला.
" आपण एकविसाव्या शतकात आहोत. अजूनही हे विचार?" सानवीने डोक्याला हात लावला.
" एकविसाव्या शतकात असलो तरी आहोत तर माणसेच ना? काही प्रथा असतात. तरिही आता ते बरंच कमी झालं आहे. म्हणजे आता नातवंड झालं की मुलीच्या सासरी जेवतात. मग त्यांनी आपल्या घरी कधी जेवायचे हे आपल्याच हातात आहे ना? मग काय करायचे?" प्रेमाने सानवीला जवळ घेत अनिरुद्ध म्हणाला.
" तू ना फार चावट झाला आहेस. लग्नाआधी ऑफिसमधला शांत तू कुठे आणि आत्ताचा हा तू कुठे?" सानवी हसत म्हणाली. सानवीचा राग कमी झालेला बघून अनिरुद्धने कळेल ना कळेल असा सुस्कारा सोडला.
" मग लग्नाआधीचा मी जास्त आवडलो की लग्नानंतरचा?"
" तुला ना माझा राग कसा काढायचा हे चांगलं समजलं आहे. दुष्ट आहेस फार.." सानवी त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली.
" मी तर कधीचं तेच म्हणतो आहे. छान आयुष्य मिळालं आहे ते रागात घालवण्यापेक्षा प्रेमात घालवा." अनिरुद्धचे ओठ सानवीच्या ओठांवर टेकणार तोच खालून ज्योतीताईंनी आवाज दिला,
" सानवी, अनिरुद्ध येताय ना जेवायला?"
सानवी हसतच पाठी झाली.
सानवी हसतच पाठी झाली.
" ही आई पण ना नको त्या वेळेस हाक मारते. पण रात्री भेटूच." अनिरुद्ध सानवीच्या कपाळावर ओठ ठेवत म्हणाला. "आणि अजून एक. तू नऊवारीत ही छान दिसते आहेस. आता खाली येणार की उचलून घेऊ?"
" तुझ्या आईबाबांना चालेल का बघ. आणि अनि, मला न्यायला आठ दिवसांनी ये हं. आत्ताच सांगते आहे. उद्या आईबाबांसमोर वाद नको." सानवी गंभीर होत म्हणाली. दोघेही खाली आले. ज्योतीताईंनी ताटं करायला घेतली होती.
" या.. काय रे उशीर झाला यायला?"
" ते उद्या जायची तयारी करत होते." सानवी म्हणाली.
" तू जाते आहेस. पण चैन पडणार नाही ग मला तुझ्याशिवाय. चार दिवसातच ये हं." ज्योतीताई म्हणाल्या.
" आता जाते आहे तर आठदहा दिवसांनीच येईन." सानवी शांतपणे म्हणाली.
" अग आई, तिची तिथे भरपूर कामं राहिली आहेत. ती करूनच ती येईल. बरं जेवायला काय केलं आहेस? भुकेने जीव जाईल माझा आता." अनिरुद्ध विषय बदलत म्हणाला. जेवणाच्या गडबडीत तो विषय पाठी पडला. दुसर्या दिवशी ज्योतीताई आणि प्रदीपराव येताच त्यांच्या पाठोपाठ विरेन पाण्याच्या बाटल्या आणि चहा, कॉफीचे थर्मास घेऊन आला.
" बसा आईबाबा." अनिरुद्ध स्वागत करत म्हणाला. आईबाबांना बघून सानवी त्यांच्या गळ्यातच पडली.
" किती दिवसांनी बघते आहे ग तुला." शोभाताई सानवीच्या चेहर्यावरून हात फिरवत म्हणाल्या.
" आई, बाबा.. दमला असाल. हे चहापाणी घ्या." अनिरुद्ध आतून कपबश्या घेऊन आला. त्याने विरेनने आणलेला चहा त्यात ओतला.
"घ्या.." अनिरुद्धने वापरलेली युक्ती बघून ज्योतीताई आणि सानवी बघतच राहिल्या.
"माधवराव?" प्रदीपरावांनी विचारले.
" बाबा शेतावर गेले आहेत. दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत येतीलच. तोपर्यंत तुम्हाला चालणार असेल तर आपणही शेतावर जाऊन येऊ." अनिरुद्ध म्हणाला.
" अरे पण. " ज्योतीताईंनी मध्ये बोलायचा प्रयत्न केला.
" पण नको आणि परंतु नको. नाहीतर आपण असं करू, आपण सगळेच शेतावर जाऊ. काय म्हणतोस विरेन?"
" चालेल की.. मला एक चक्कर मारायला लागेल. पण मी मारेन."
" नको. आम्ही निघतोच. यांना औषधं घ्यायची असतात. त्यासाठी वेळेवर खाणं यांच्यासाठी गरजेचे असते." शोभाताई तुटकपणे बोलल्या.
" मी आहे ना? कशाला चिंता करता? तुम्ही फ्रेश होऊन या. आई, तू सुद्धा आवरून घे. आपण शेतावर जाऊ. चालेल ना?" अनिरुद्धने प्रदीपरावांना विचारले. त्यांनी मान हलवली.
पाहुण्यांसमोर शोभा नको म्हणून ज्योतीताई काही बोलल्या नाहीत. पण ते इतक्या दुरून आलेले, त्यात जेवायच्या वेळेपर्यंत थांबवायचे म्हणजे? खरंतर दोन माणसांचं जेवण त्यांच्यासाठी जड नव्हतं. पण रीतीरिवाज एवढं भिनले होते की थोडाही वेगळा विचार त्या करू इच्छित नव्हत्या. पटकन आवरून त्या बाहेर आल्या. तोपर्यंत शोभाताई आणि प्रदीपराव चहापाणी घेऊन, फ्रेश होऊन तयार होते. गाडीत बसून सगळे शेतावर निघाले. शेत वगैरे बघून शोभाताई आणि प्रदीपराव खुश झाले. पण चालायची सवय नसल्याने त्यांना दमायलाही झाले. ते थकून एकाजागी बसले.
" थकलो रे आता.. पुढे नाही चालवत. तसेही आम्हाला निघायचे आहे लवकर." दम खात प्रदीपराव म्हणाले."जवळपास कुठे हॉटेल असेल तर सांग बाबा."
" इथे शेतात कुठे आलं हॉटेल आणि अजून काय? इथं खायचा रानचा मेवा." अनिरुद्ध म्हणाला.
" त्या मेव्याने काय पोट भरणार?" शोभाताई म्हणाल्या.
" खाऊन तर बघा." समोरून येणाऱ्या विरेनला बघत अनिरुद्ध म्हणाला. तोपर्यंत माधवराव सुद्धा तिथे पोहोचले. विरेनने त्याच्या घरून स्वयंपाक करून आणला होता. गड्याच्या मदतीने झाडाखाली त्याने चटई टाकली. तिथेच सगळ्यांना जेवायला वाढले.
" तर आजचे हे जेवण म्हणजे आपल्याला विरेनकडून पार्टी आहे. जे खाऊन माझ्या आईबाबांच्या प्रथा मोडणार नाहीत आणि तुम्ही इथून उपाशी जाणार नाही." सानवीकडे बघत अनिरुद्ध प्रदीपरावांना म्हणाला. सानवीला त्याला खूप काही सांगायचे होते.. पण ती बोलू शकत नव्हती. न बोलतासुद्धा अनिरुद्धला तिच्या डोळ्यांमध्ये असलेले प्रेम दिसत होते. ज्यासाठी त्याने एवढा आटापिटा केला होता.
अनिरुद्ध आणि सानवी दोघेही एकमेकांच्या आईवडिलांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहेत. ठेवू शकतील का ते दोघेही त्यांना सतत खुश? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा