Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ९

कथा एका प्रेमी युगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ९

मागील भागात आपण पाहिले की सानवीचे आईबाबा शेवटी तिला माहेरी घेऊन जातात. आता बघू पुढे काय होते ते.


" आई, अगं किती काय काय करशील. भरपूर झालं हे." सानवी तिच्या ताटात पुर्‍या वाढणाऱ्या शोभाताईंना म्हणाली. माहेरी आल्यावर तिने छान झोप काढली होती. आणि आता जेवायच्या वेळेस थेट उठली होती. तेवढ्या वेळात शोभाताईंनी सानवीचा आवडता स्वयंपाक करून ठेवला होता.

" किती दिवसांनी जेवायला वाढते आहे तुला. खा की पोटभर."

" आई, अग मी तिथे जंगलात नव्हते. मस्त खातपित होते." सानवी हसत म्हणाली.

' तरिही.. आता मला सांग, ही बटाट्याची भाजी. ती काय आपण करतो तशी त्यांनी केली असेल का?"

" ते मात्र आहे. तिथे बटाट्याच्या भाजीत कांदा लसूण घातला होता. चव तशी बरी होती पण मला सवय नाही ना."

" अग मग अश्या वेळेस वेगळ्या चवीचा अनुभव घ्यायचा." प्रदीपराव म्हणाले.

" तेच करते आहे. पण आज मला आश्चर्य वाटते आहे ऑफिसला दांडी न मारणारे तुम्ही दोघंही आज घरी कसे?"

" आमची लाडाची लेक आली आहे मग ऑफिसला कसे जाणार? तू नको काळजी करूस." बोलता बोलता शोभाताई खोकू लागल्या.

" आई, काय ग काय झाले अचानक?" सानवी खाता खात उठली.

" काही नाही ग.. गेले काही दिवस नुसता खोकला येतो आहे."

" डॉक्टरकडे नाही का घेऊन गेलात?' सानवीने काळजीने विचारले.

" गेलो होतो. डॉक्टरने टेस्ट करायला सांगितल्या आहेत. पण ही आली तर ना?" प्रदीपराव म्हणाले.

" आई, काय ग हे? मी पंधरा दिवस नव्हते तर एवढं? चल खाऊन झाल्यावर आपण टेस्ट करायला जाऊ." सानवी आईला जबरदस्ती सगळ्या टेस्ट करायला घेऊन गेली. येईपर्यंत त्यांना रात्री खूप उशीर झाला. सानवीने आल्यानंतर थोडेफार स्वयंपाकपाणी केले. आईबाबांना जेवायला वाढले. दिवसभराच्या दगदगीने थकलेली ती झोपायला गेली. झोपायच्या आधी तिला मोबाईलची आठवण आली. दिवसभर आईच्या नादात तिला मोबाईल काढायला सुद्धा मिळाला नव्हता. त्यात हॉस्पिटलमध्ये फोन तिला सायलेंटवर ठेवायला लागला होता. फोन ओपन केल्या केल्या तिला अनिरुद्धचे आलेले अनेक मिस्ड कॉल्स दिसले आणि त्यासोबत मेसेजेस ही. मेसेजेस न वाचताच तिने अनिरुद्धला फोन लावला. पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला गेला.

" होतीस कुठे तू? कधीपासून फोन करतो आहे, मेसेज करतो आहे.. उचलत का नाहीस फोन?" अनिरुद्ध खूपच चिडला होता. सानवीला काहीच बोलू न देता तो एकटाच बोलत होता.

" तू बोलत का नाहीस?" ही काही बोलत नाही म्हणून त्याने परत चिडून विचारले.

" तू बोलू देशील तर ना.. आणि एवढं चिडायच्या आधी एकदा विचारायचे तरी की काय झाले होते?"

"सॉरी.. तू फोन नाही उचललास मग मला टेन्शन आले. मी आईबाबांना पण फोन लावला होता. त्यांनीही फोन उचलला नाही.. तर.."

" म्हणून मला एवढं बोलायचं?"

" सॉरी म्हटलं ना.. आता सांग का फोन उचलत नव्हतीस ते."

" आईला गेले काही दिवस खोकला येत होता. तिला काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. त्याच करायला घेऊन गेले होते. दिवसभर तिथेच होते. आईचा फोनही सायलेंटवर. आणि बाबांना अर्जंट मिटिंगसाठी ऑफिसला जावे लागले होते. त्यांनी बहुतेक मिटिंगमध्ये फोन सायलेंटवर ठेवला असेल त्यामुळे त्यांना समजलं नसेल."

" माझं चुकलं.. मी विचारायला हवं होतं तुला." अनिरुद्ध अपराधीपणे बोलला.

"ठिक आहे. एवढे का फोन करत होतास?"

" ते.." सांगू की नको अनिरुद्ध विचारात पडला. " तू कधी येणार आहेस?"

" मी आठ दिवस म्हटलं होतं ना.. त्यातही आईचा खोकला डॉक्टरांना साधा वाटत नाहीये. जरा बघते ते काय म्हणतात ते."

" लवकर यायला नाही जमणार?"

"आई बरी असती तर आले असते. काही झाले आहे का?"

" ते घरी मामामामी येणार आहेत. आपल्या लग्नात आले नाहीत म्हणून. आईचं म्हणणं होतं आली असतीस तर."

" अनि.. तुझ्या मामामामींना मला भेटायचं होतं का?"

" हो. त्यांना बघायचे आहे तुला."

" मग यायच्या आधी त्यांना फोन करून विचारावेसे नाही का वाटले? त्यातही बाकीच्या प्रथा पाळता मग लग्नानंतर नवी नवरी माहेरी जाते ही प्रथा आठवत नाही का?" सानवी बोलत होती. सानवीचे बोलणे पटत असल्यामुळे अनिरुद्ध इच्छा असूनही काहीच बोलत नव्हता. "तू ही त्याचसाठी फोन केला होतास का?"

" म्हणजे?" काहीच न समजून अनिरुद्धने विचारले.

" म्हणजे.. तुला मामामामींबद्दलच बोलायचे होते का?"

" हो.. का? काय झाले?"

" मला वाटले तुला माझी आठवण आली, काळजी वाटली, म्हणून तू फोन करत होतास." सानवीच्या आवाजात निराशा जाणवत होती.

"तुझी आठवण कशी येईल?" अनिरुद्धचा आवाज आता बदलला होता.

" बरोबर आहे, का येईल आठवण? त्यासाठी मनात प्रेम असावे लागते." सानवीच्या नाकावर राग आला होता. सानवी अजून काही बोलणार तोच समोरून फोन कट झाला.

" आता याला फोनच करणार नाही मी." चिडून सानवी स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात अनिरुद्धचा व्हिडिओ कॉल आला. अनिच्छेनेच सानवीने फोन उचलला. ती बघतच राहिली. त्यांच्या पलंगावर एका बाजूला सानवीचे लग्नातले अनेक फोटो होते.

" आठवण यायला माणूस दूर असावं लागतं. माझी बायको तर इथेच आहे." अनिरुद्ध कॅमेरा स्वतःवर वळवत म्हणाला.

" अनि... तू खरंच वेडा आहेस." सानवीच्या डोळ्यात पाणी होते.

" हो.. फक्त तुझ्यासाठी. म्हणूनच तुला यायला सांगत होतो. तू एकच दिवस गेली आहेस तर मला खूप वर्ष गेल्यासारखे वाटते आहे."

" अनि.. प्लिज ना. आईला डॉक्टरकडे नेणे फार गरजेचे आहे." सानवी विनवत होती.

" परवा येशील? मामाला भेट आणि मग लगेच जा. वाटल्यास मी येतो तुला सोडायला."

" अनि.. तू येशील चार दिवस इथे रहायला? मी बहुतेक सुट्टी वाढवून घेते आहे. आईबाबांचा दोघांचाही मेडिकल चेकअप करूनच घेते. तू सोबत असशील तर मदत होईल मला." सानवी गंभीर होऊन बोलू लागली.

"परवा तू एकटी येशील की मी घ्यायला येऊ?" अनिरुद्धने परत विचारले.

"मी येते.." त्याला नाही न म्हणू शकलेली सानवी सुस्कारा सोडत म्हणाली. आता हे सगळं आईला कसं सांगावं या विचारातच तिने फोन ठेवून दिला. रात्रभर सानवी तळमळत होती. एका बाजूला आईच्या तब्येतीची काळजी तर दुसरीकडे अनिरुद्धच्या डोळ्यातलं आर्जव. तिला काहीच सुचेना. लग्न होऊन महिनाही झाला नाही तरी ही अवस्था. पुढे काय होईल या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रू खाली घरंगळला.

" आई, मी जाऊन तुझे रिपोर्ट्स घेऊन येते." सकाळी नाश्ता करत असताना सानवी म्हणाली.

" माझ्यामुळे तुला त्रास. चार दिवस आलीस आणि ही सुरुवात. "

" आई, काहीही काय बोलतेस? खरंतर मला राग आला आहे तुझा. तू हे दुखणं अंगावर का काढलंस? तेव्हाच टेस्ट करून घ्यायच्या ना."

" नको वाटत होतं तेव्हा. अगदी एकटं एकटं वाटत होतं. तू तिथे सासरी. असं वाटत होतं की जगायचं तरी कोणासाठी? मग नाही गेले टेस्ट करायला." शोभाताई बोलत होत्या.. तसतसं सानवीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं.

" आई, असं केलंस तर माझं कसं मन लागेल तिथे? मी आहे ना? मग माझ्यासाठी खूप खूप जगायचं आहे तुम्हा दोघांनाही." सानवी आईला मिठी मारत म्हणाली.

" हो ग.. तुझ्यामुळेच आमच्या आयुष्याला अर्थ आहे. तू आहेस तर जगणे ग आमचे."

" आई, ऐक ना.. मी उद्या पटकन तिकडे जाऊन येऊ?" सानवीने थोडं घाबरतच विचारलं.

" का ग? कंटाळलीस का आईबाबांना?"

" तसं नाही ग आई.. तिथे अनिरुद्धचे मामामामी येणार आहेत. त्यांना भेटायचे होते."

" तुला जायचे आहे तर जा. मी बोलणारी कोण?" शोभाताई आत जात म्हणाल्या. सानवीला वाईट वाटले पण एकावेळेस ती सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नव्हती. ती तशीच डॉक्टरांकडे रिपोर्ट आणायला गेली. तिथे त्यांचा गंभीर चेहरा बघून सानवीच्या ह्रदयाचा ठोका चुकला.

" बस ना.."

" डॉक्टरकाका काही सिरियस?"

" हो.. उगाचच बोलण्यात मी वेळ घालवत नाही. शोभाताई तब्येतीची फार हेळसांड करत आहेत. न्युमोनिया पसरत चालला आहे. काळजी घेतली नाहीतर काही खरं नाही."

"काका, मी घेते आईची काळजी. बघतेच कशी बरी होत नाही लवकर ते." सानवी ठामपणे म्हणाली.


आजारी आई आणि नवीन संसार सांभाळू शकेल का सानवी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all