Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १०

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १०


मागील भागात आपण पाहिले की शोभाताईंचा न्युमोनिया वाढला आहे. आणि अनिरुद्धने सानवीला घरी बोलावले आहे. बघू पुढे काय होते ते.


" आलीस तू? थँक यू सो मच.. एकही बॅग नाही आणलीस?" गाडीतून उतरणाऱ्या सानवीला अनिरुद्धने विचारले.

" नाही.. मला तसंही संध्याकाळी परत जायचे आहे म्हणून.." सानवी म्हणाली.

" बरं.. आत जा.. सगळे वाट बघत आहेत तुझी. मी आलोच गाडी पार्क करून." गाडीच्या चाव्या अनिरुद्धकडे देऊन सानवी घराकडे वळली. आत सगळे गप्पा मारत बसले होते. सानवीला बघून ज्योतीताई पटकन उठल्या.

" ही आमची सानवी. आणि हा माझा दादा आणि ही वहिनी. लग्नात जमलं नाही म्हणून भेटायला आले आहेत." सानवीने पुढे होऊन नमस्कार केला.

" मुलगी शिकलेली असली तरी संस्कार आहेत हो तिच्यावर वन्स." मामींनी आपली पसंती दिली. सुनेचे कौतुक ऐकून ज्योतीताईंचा चेहरा खुलला. "पण नव्या नवरीचे तेज काही दिसत नाही. चेहराही जरा पडलेला दिसतो आहे. राग आला की काय आम्ही असं अचानक बोलावून घेतलं म्हणून?"

" मामी, अग चार तास गाडी चालवून आली आहे ती तुम्हाला भेटायला. नाही म्हटलं तरी थोडी दमली असेलच ना ती?" गाडी पार्क करून आलेला अनिरुद्ध म्हणाला. "त्यात एकटीच आली म्हणून चहाकॉफी घ्यायला पण थांबली नसेल. बरोबर ना?" अनिरुद्धने सानवीला विचारले. सानवीने मान हलवली.

" अग्ग बाई.. हो का. बस मग जरा. आणि सासूने केलेला चहा घे." मामी म्हणाल्या.

" नको.. मी तिच्यासाठी कॉफी करून आणतो. तुम्ही बसा गप्पा मारत." अनिरुद्ध स्वयंपाकघरात जात म्हणाला.

" काही पण म्हणा वन्स. मुलं लग्नानंतर किती बदलतात नाही. आधी हाताने पाणी ही न घेणारे आता बायकोसाठी कॉफी करायला लागलेत."

" नवा जमाना आहे वहिनी.. आपले दिवस गेले. आपण तर मेलं कितीही आजारी असलो तरी आपल्याला पाणीही नाही मिळणार. उठा आणि घ्या हाताने." ज्योतीताईंनी पुस्ती जोडली.

" आमच्याकडे तर अजूनही तेच आहे." मामी म्हणताच मामांनी मामींकडे रोखून बघितले. "बघताय काय? मी आहे ना
म्हणून टिकले आहे तुमच्या घरात. तुम्हाला सांगते वन्स.. हा तुमचा भाऊ म्हणजे जगासाठी देव पण घरात नुसता जमदग्नीचा अवतार." मामींनी बोलायला सुरुवात केली.

ही बोलणी ऐकण्यात सानवीला अजिबात रस नव्हता. डोळ्यासमोर फक्त खोकत असलेली आई येत होती. अनिरुद्धसुद्धा आत होता. तिला पाणीही प्यायचे होते. सगळ्यांसमोर कसे उठायचे हा प्रश्न तिला पडला होता. शेवटी ती उठलीच.

" मी जरा हातपाय धुवून येते. आणि आई स्वयंपाकाचे काही करायचे आहे का?"

" नाही ग. मी आपल्या सुधाबाईंना सांगितलं आहे. त्या पोळ्या करून गेल्या आहेत. भाजी चिरलेली आहे. मी टाकते ती फोडणीला. तुला नाही काही करण्यासारखे."

" हो.. आणि हिला काम सांगितलं तर हिचा नवरा येईल पळतपळत माझ्या बायकोला काम का सांगितलं म्हणून." मामींच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागले. पण सानवीला ते बोलणे लागले. ती तिच्या खोलीच्या दिशेने निघाली. तोवर अनिरुद्ध कॉफी घेऊन आलाच.

" कुठे चाललीस?" त्याने विचारले.

" जरा फ्रेश होते."

" हा तुझा मग घे. मी बाकीच्यांनाही देऊन येतो." अनिरुद्ध सानवीला कॉफी देत म्हणाला. तिथे आजचा जमाना आणि आधीचा जमाना यावर वाद रंगला होता.

" घ्या कॉफी घ्या, मग अंगात अजून एनर्जी येईल भांडण करायला." अनिरुद्ध कॉफी ठेवत म्हणाला.

" तू पण बस.. ऐकून घे एकेक मुद्दे." मामा अनिरुद्धला म्हणाले.

" तो कश्याला बसेल इथे. तो जरा बायकोला बघून येईल. थकली भागलेली ती." मामी बोलल्याच.

" मामी, आय लव्ह यू.." अनिरुद्ध पटकन म्हणाला.

" आता हे काय रे नवीन?" मामी तोंडावर हात ठेवत म्हणाल्या.

" तुला कसं माझ्या मनातलं समजलं.. म्हणून आय लव्ह यू. तूच ग तूच."

" म्हणजे?"

" म्हणजे काही नाही. मी आलोच सानवीला घेऊन. " अनिरुद्ध तिथून निघत म्हणाला. अनिरुद्धला जाताना बघून मामी म्हणाल्याच,

" वन्स.. सांभाळा बरं अनिरुद्धला. जरा जास्तच वाहवून जातो आहे बायकोसाठी. तुम्हाला आपल्या बाजूच्या आळीतला तो कुणाल माहित आहे ना.. गेला की आईबापाला सोडून घरजावई व्हायला. बापाने कर्ज काढून शिक्षण दिलं आणि पोरगं बसलंय बायकोच्या माहेरी तिच्या आईबापांचं करत. नुसती रडत असते बघा त्याची आई." मामीच्या बोलण्याने ज्योतीताई आणि माधवराव दोघेही अस्वस्थ झाले. खरंतर अनिरुद्ध कधीच जास्त बोलायचा नाही पण त्या दिवशी त्याने सानवीच्या आईवडिलांसाठी शेतात न सांगता केलेलं जेवण नाही म्हटलं तरी त्यांच्या मनाला दुखावून गेलं होतं. आणि आता तो ज्याप्रकारे मामींशी बोलला, ते तर नवलच होतं. लग्न झाल्यावर अनिरुद्धही बदलेल का? हा विचार त्यांचे मन पोखरू लागला.

" झालीस का फ्रेश?" दमलेल्या सानवीला अनिरुद्धने विचारले.

" हो.. कॉफी छान झाली होती. थँक्स. "

" बस??"

" नाही मी कारने आले.."

" वेरी फनी.. फक्त थँक्स म्हणून चालणार नाही. अख्खा दोन रात्रींचा विरह आहे. भरपाई कशी करायची ते तू ठरव." रोमँटिक होत अनिरुद्ध म्हणाला.

" दोन नाही.. पंधरा.. मी आजच संध्याकाळी निघणार आहे, हे विसरलास बहुतेक. " सानवी म्हणाली.

" मी काहीच विसरत नाही." तिला जवळ घेत अनिरुद्ध म्हणाला.

" हो का? पण आता आपण खाली जाऊ. नाहीतर परत मला बोलणी बसायची." सानवी मिठीतून बाहेर पडत म्हणाली.

" सानवी.. सॉरी. ते.." अनिरुद्धला बोलायला शब्द सापडत नव्हते.

" गरज नाही. मला अंधार पडायच्या आधी तरी निघालंच पाहिजे."

अनिरुद्ध, सानवी दोघे खाली आले. गप्पा सुरूच होत्या. मामामामींनी सानवीला आणि अनिरुद्धला छानसा आहेर केला. ज्योतीताईंचे बहुतेक त्यांना देऊन झाले होते. मानपान झाल्यावर सगळे जेवायला बसले. सानवी सगळ्यांना वाढत होती.

"बरं झालं हो दादा, वहिनी तुम्ही आलात ते. फार वाईट वाटत होतं मला लग्नात माहेरचं कोणी नाही म्हणून. " ज्योतीताई म्हणाल्या.

" अग नेमकी तेव्हाच सूनबाई बाळंत झाली.. काय करणार? असो. पण आत्ता आले ना?"

" कसं आहे ग बाळ?"

" छान आहे. अगदी रोहितसारखा दिसतो. लबाड आहे हो गुलाम. लगेच आवाज ओळखतो." मामा कौतुकाने बोलत होते.

" दादा, तुम्ही बोलताय हे?" विश्वास न बसून माधवराव म्हणाले.

" हो.. बदलवलं हो गुलामाने. तुम्हाला सांगतो पंत, नातवंडांना मांडीवर खेळवण्यासारखे सुख नाही. त्या दिवशी सूनबाईंच्या माहेरी गेलो होतो त्याला बघायला. रडून धुमाकूळ घातला होता. पण मी घेताच शांत झाला लबाड."

" हो तर.. आता समजेल तुम्हालाही. काय रे अनिरुद्ध?" मामी म्हणाल्या. अनिरुद्धला जेवताना ठसका लागला.

" ते प्लॅनिंग वगैरे काही करत असाल तर विचार सोडा हं. तुम्हाला म्हणून सांगते हं वन्स. तो अलिकडच्या आळीतला गणेश.. ही जादा शिकलेली माणसं बरं का. लग्न झालं मूल नको, मूल नको म्हणाले. राहिलेलं पाडलं, आणि आता बसले आहेत देवदेव करत. एकतरी होऊ देत म्हणून. नकोच ते असं काही." सानवीने अनिरुद्धकडे बघितले.

" मामी, अग आत्ताच तर लग्न झालं आहे माझं. जरा बायकोला वेळ देऊ देत. मग आहेच मूलं आणि बाळं." अनिरुद्धचे बोलणे ऐकून मामींनी फक्त ज्योतीताईंकडे बघितलं आणि त्यांनी माधवरावांकडे. फक्त मामा सानवीला म्हणाले,

" कढी छान झाली आहे.. वाढ जरा सूनबाई." जेवणं झाली. सानवीने मागचे सगळे आवरले. परत ती थोडा वेळ गप्पा मारायला बसली. पण सतत तिचे लक्ष घड्याळाकडे जात होते. ज्योतीताईंच्या ते लक्षात आले.

" काय ग सानवी, सतत काय घड्याळ बघते आहेस? कुठे जायचे आहे का?"

" आई, अग आम्ही सानवीच्या घरी जातो आहोत." सानवीने आश्चर्याने अनिरुद्धकडे बघितले.

" अचानक?" माधवराव आणि ज्योतीताई पटकन म्हणाल्या.

" अग आईंची तब्येत बरी नाहीये. त्यांना कसल्या कसल्या टेस्ट करायला सांगितल्या आहेत. सानवी एकटीच तिथे सगळं करते आहे. तिला सोबत म्हणून जाईन. तसेही वर्क फ्रॉम होमच करायचे आहे. मग कुठूनही केले तरी काय फरक पडतो."

" पण तू इथे राहणार होतास ना?" ज्योतीताईंनी नाराजपणे विचारले.

" अग पण आई.. त्यांचे आजारपण. त्यांचं सगळं झालं की येतोच की इथे. वाटलं तर अजून काही महिने घरून काम करतो. पण आता त्यांना गरज आहे तर मी जातो तिथे." अनिरुद्ध आणि सानवी घरातल्यांना नमस्कार करून निघाले. मामी काही बोलल्या नाहीत. पण त्यांची नजर खूप काही बोलून गेली.


ज्योतीताई आणि माधवराव यांना वाटते तसे खरंच अनिरुद्ध होईल का घरजावई, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all