नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ११
मागील भागात आपण पाहिले की सानवी अनिरुद्धच्या मामामामींना भेटायला त्याच्या घरी जाते. आता बघू पुढे काय होते ते.
" अनिरुद्ध, तू खरंच येतो आहेस घरी?" गाडीत बसलेल्या सानवीने विचारले.
" माझी बॅग पाठी आहे.. तरिही तू हा प्रश्न विचारते आहेस?" गाडी सुरू करत अनिरुद्ध म्हणाला. त्याने गाडीच्या काचा खाली केल्या आणि बाहेर उभे असलेल्या आईबाबा, मामामामींना हात केला.
" आई, येतो ग लवकरच." अनिरुद्धने निरोप घेतला. तो जाताच ज्योतीताईंनी डोळ्याला पदर लावला.
" चार दिवसांसाठी सासरी गेला आहे तो फक्त. येईल लवकरच. यात रडायला काय झालं?" स्वतःचा अस्वस्थपणा लपवत माधवराव म्हणाले.
" आला तर बरंच आहे. मुलाला जास्त पण मोकळं सोडू नका. नाहीतर कधी घरजावई झाला समजणार पण नाही. मी आपलं सांगायचं काम केलं." मामी आत जात म्हणाल्या. ज्योतीताई आणि माधवराव मात्र आपला एकुलता एक मुलगा कायमचा सासरी गेला तर आपलं काय होणार या विचारात गढून गेले.
" अनि, माझा विश्वासच बसत नाहीये, तू खरंच माझ्यासोबत येतो आहेस याच्यावर." सानवी खुश झाली होती.
" मग मी परत जाऊ का?"
" अजिबात नाही. तू फक्त सोबत आहेस तर मला किती बरं वाटतं आहे, मी तुला सांगू शकत नाही." अनिरुद्धने सानवीकडे बघितले. सकाळपासून तिच्या चेहर्यावर जाणवणारा ताण दिसत नव्हता.
" बायकोसाठी काहिही.." अनिरुद्धच्या चेहर्यावरसुद्धा हसू आले.
" थॅंक यू.. थॅंक यू.. थॅंक यू.. तू जगातला बेस्ट नवरा आहेस."
" लवकर समजलं.."
" अनि, तू आईबाबांना आधी सांगितलं नव्हतं?" सानवीचा आवाज बदलला होता.
" नाही.. काल मामाचा फोन आल्यापासून आई आनंदात होती. मी जर हे सांगितलं असतं तर दोघेही चिडले असते." अनिरुद्ध गंभीरपणे बोलत होता.
" आता?"
" आता काही नाही. मामामामी आहेत आठ दिवस. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. आईंचे औषधोपचार व्यवस्थित करू. चार दिवसांनी मी परत जाईन. आईबाबांची समजूत काढेन. तू ये हवं तेव्हा."
" तुला चालेल मी इथे जास्त दिवस राहिलेलं?"
" चालवून घ्यावं लागेल. आपण दोघेही आपापल्या आईवडिलांचे एकुलते एक आहोत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आपलीच आहे. हे नक्कीच मी समजू शकतो." अनिरुद्ध बोलत होता. सानवी भारावल्यासारखी त्याच्याकडे बघत होती.
" बघू नकोस.. प्रेमात पडशील." डोळा मारत अनिरुद्ध सानवीला म्हणाला. सानवीने लाजून मान फिरवली.
" हाय.. तुझ्या याच अदांवर तर मरतो आहे."
" नाटक बंद कर आणि पुढे बघून गाडी चालव." सानवी अनिरुद्धचे तोंड समोर करत म्हणाली. दोघेही रमतगमत घरी पोहोचले. रात्री पोहोचायला उशीर होईल म्हणून मध्येच हॉटेलमध्ये त्यांनी जेवून घेतलं होतं. सानवीने घरी फोन करून दोघेही येत असल्याचे कळवले होते.
दुसर्या दिवशी अनिरुद्धसुद्धा सानवीसोबत हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे शोभाताईंची ट्रिटमेंट सुरू केलीच पण प्रदीपरावांचा सुद्धा मेडिकल चेकअप करून घेतला. त्यांची रक्तातील साखर वाढली होती. या दोघांचा चेकअप सुरू असताना सानवी अनिरुद्धशेजारी खिन्नपणे बसून होती.
" काय झालं तुला?" अनिरुद्धने विचारले.
" कसं असतं बघ ना.. इतके दिवस मी कधीच आईबाबांच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. ते त्यांचं त्यांचं सगळं करत होते. पण माझं फक्त लग्न झालं आणि ते किती दुर्लक्ष करायला लागले आहेत स्वतःकडे."
" नको असा विचार करूस. जर शिक्षणासाठी परदेशी गेली असतीस तर हा विचार केला असतास का?"
" शिक्षणासाठी परदेशी? माझ्या आईबाबांनी कधी मला बाजूच्या शहरात जाऊ दिले नाही. म्हणूनच थोडी काळजी वाटते."
" त्यांची काळजी सोड." अनिरुद्ध बोलताच सानवीने त्याच्याकडे रोखून बघितले. "म्हणजे ते बरे होणारच. काळजी करू नकोस. असं म्हणायचं आहे मला." अनिरुद्ध जीभ चावत म्हणाला. दोनतीन दिवसांत शोभाताई घरी आल्या. सानवी सुट्टीवरच होती. अनिरुद्धचे घरून काम सुरू झाले होते. तरिही घरी दोघांचं असणं त्यांना सुखावून जात होतं. त्यांच्या असण्यानेच त्यांचं अर्ध्याच्यावर दुखणं बरं झालं होतं. हे असंच रहावं अशी इच्छा हळूहळू त्यांच्या मनात मूळ धरू लागली.
" आई, अनिरुद्ध उद्या निघणार आहे हं." सानवी उदासपणे बोलली. तिलाही त्याचा सहवास हवा होता. पण आईमुळे तिला जाता येत नव्हतं.
" एवढ्या लवकर?" शोभाताईंना आश्चर्य वाटले.
" लवकर? अग चार दिवस राहिला ना तो. तसेही घरून आईंचे फोन यायला लागले आहेत. त्याचे मामामामी पण आहेत."
" मला वाटलं राहिल तो इथे."
" नाही ग.." सानवीला असं वाटत होतं की आई तिलाही जायचं आहे का म्हणून विचारेल पण शोभाताई विचारात पडलेल्या बघून शेवटी तिनेच विचारले.
" आई, तू कधीपासून कामाला जाणार?"
" मी? बघू पुढच्या आठवड्यात जाईन. का ग?"
" नाही असंच.." सानवी तिच्या खोलीत गेली. अनिरुद्धला सुद्धा वाईट वाटत होतं. पण आता त्याला विचार करायला वेळ नव्हता. कारण इतके दिवस सुट्टीवर असल्यामुळे कामाचा लोड वाढला होता.
" सानवी, प्रयत्न कर तिथे लवकर येण्याचा. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." कुशीत झोपलेल्या सानवीच्या केसांशी खेळत अनिरुद्ध म्हणाला.
" मला पण नाही रहायचे. आईने पुढच्या आठवड्यात ऑफिसला जायला सुरुवात केली की मी येतेच."
" सानवी, नको ना उदास होऊस. तू तिथे येईपर्यंत माझ्या डोळ्यासमोर सतत तुझा हसरा चेहरा आला पाहिजे. रडका नाही." अनिरुद्ध सानवीची हनुवटी उचलत म्हणाला. सानवीने डोळे मिटून घेतले. अनिरुद्ध गेल्यावर सानवीचा दिवस कंटाळवाणा जाऊ लागला. लग्नाच्याआधी ऑफिस, मैत्रिणी यांच्यामध्ये तिला वेळच नसायचा. आता ऑफिसला सुट्टी, मैत्रिणी कामात. घरी स्वयंपाक केला की होऊन जात होतं. आठ दिवस असेच गेले. शोभाताई छान फिरायला लागल्य हे बघितल्यावर सानवीने सासरी जाण्याचा निर्णय घेतला. अनिरुद्धचा रोज फोन येत होता. पण दिवसभर काम करून थकलेला तो थोडंफार बोलला की फोन ठेवून द्यायचा. त्यांच्या लग्नाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस जवळ येत होता. सानवीने शनिवारी जाऊन अनिरुद्धला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला.
" अनिरुद्ध, आज काय करतो आहेस?" विरेनने अनिरुद्धला फोन केला होता.
" काही नाही रे.. पकलो आहे जाम. काम काम आणि नुसतं काम." आळस देत अनिरुद्ध म्हणाला.
" मग येतोस का? बसू यात जरा. तसंही लग्न झाल्यापासून तू भेटलाच नाहीस."
" कधी भेटणार? तुझ्यासमोरच सुरू आहे ना सगळं. कालच तर मामामामी गेले. ते असताना चार दिवस सासरी होतो त्याच्यावरून किती बोलणी खाल्ली. वैताग आहे रे सगळा."
" सगळ्या वैतागावर एकच उपाय. दोन घोट घ्या आणि मजा करा." विरेनने गळ घातली.
" नको यार.. सानवीला ते सगळं आवडत नाही. समजलं तर उगाच." अनिरुद्ध आढेवेढे घेऊ लागला.
" वहिनी इथे येणार आहेत की तू तिथे जाणार आहेस सांगायला? मी तर आपलं तोंड बंदच ठेवतो. विचार कर. तसाही उद्या शनिवार आहे." विरेनने अनिरुद्धला मोहात पाडले. तो थोडीफार घ्यायचा हे घरात माहित होतं. माधवराव पण अधूनमधून घ्यायचे म्हणून त्याला कोणी घेऊ नको म्हणत नव्हते. सानवीदेखील पुढच्या आठवड्यात येणार होती. हो नाही करता करता अनिरुद्धने विरेनला पार्टीसाठी होकार दिलाच.
" कोण कोण येणार आहे?"
" तू सांग कोणाकोणाला बोलावू ते."
" जास्त कोणी नको.. आपला जुना ग्रुपच फक्त. आणि मी जास्त घेणार नाही हां. दुसर्या दिवशी त्रास होतो." अनिरुद्ध म्हणाला.
" यस बॉस.." म्हणत विरेन पार्टीच्या तयारीला लागला.
" मग सानवी, उद्याचा काय प्लॅन?" अनिरुद्धने सानवीला फोन लावला.
" काही नाही. नेहमीचंच. डॉक्टर आणि औषधं. तू येतो आहेस का इथे?"
" नाही अग.. कसं शक्य आहे? भरपूर काम आहे. मला या आठवड्यात जास्तीचं काम करायचं आहे. आणि रविवारी यायचं म्हणजे.. तू कधी येणार ते सांग."
" मी? म्हटलं तसं पुढच्या आठवड्यात." अनिरुद्धने सोडलेला सुस्कारा सानवीला ऐकू गेला.
" तुला मी नको आहे का यायला?" तिने विचारले.
" असं काय म्हणतेस? उलट मी तर किती मिस करतो आहे तुला." आवाजात व्याकुळता आणत अनिरुद्ध म्हणाला. तो आवाज ऐकून काहिही झालं तरी जायचंच असा सानवीने निश्चय केला.
नवर्याला सरप्राईज द्यायला निघालेल्या सानवीला स्वतःलाच सरप्राईज मिळेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा