Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १२

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १२

मागील भागात आपण पाहिले की सानवी अनिरुद्धला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या घरी जाणार आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" हॅलो.. सरप्राईज.." सानवी गाडीतून उतरतच ओरडली. पण गाडीचा आवाज ऐकूनही कोणीच बाहेर आलं नाही याचं तिला आश्चर्य वाटलं. दरवाजाकडे बघितलं तर त्याला टाळा होता. तिचा सगळा मूड ऑफ झाला. हिरमुसून तिने गाडी पार्क केली. आणि अनिरुद्धला फोन लावला. फोन वाजून वाजून बंद झाला. ती वैतागली. तिला स्वतःचाच राग येऊ लागला. काय गरज होती सरप्राईजची? ते ही कुठेतरी जाऊ शकतात ना? पण अनिरुद्ध तर म्हणाला होता की त्याला शनिवारी काम आहे. आईबाबा नसले तरी तो असायला हरकत नव्हती. तिने परत अनिरुद्धला फोन लावला. त्याने परत फोन उचलला नाही. तिने नाईलाजाने ज्योतीताईंना फोन लावला.

" बोल ग सानवी.." तिचा आलेला फोन बघून त्यांना आश्चर्य वाटले.

" आई, घरी कोणी नाही का?"

" का ग?"

" ते मी घरी आले आहे. बघते तर घराला कुलूप. अनिरुद्धसुद्धा फोन उचलत नाही."

" अग बाई.. हो का? अग आम्ही आलो आहोत बाजूच्या गावात. आम्हाला थोडा उशीर होईल."

" आणि अनिरुद्ध?"

" तो विरेनकडे गेला आहे."

" तो फोन उचलत नाहीये माझा. तुम्ही विरेन भावजींना फोन करू शकाल का?" सानवीला बोलताना लाज वाटत होती.

" सांगते.. आम्ही पण निघतोच इथून." ज्योतीताई म्हणाल्या. सानवीलाही तुम्ही आरामात या असं बोलण्याचे धाडस झालं नाही. तिने परत एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून अनिरुद्धला फोन लावला. यावेळेस त्याने उचलला.

" हॅलो सानवी.." अनिरुद्धचा आवाज तिला पटकन वेगळा वाटला.

" कुठे आहेस अनिरुद्ध?"

" कुठे असणार? घरीच.. काम करतो आहे."

"मी घराच्या बाहेर उभी आहे. घराला कुलूप आहे." समोर चिडीचूप शांतता पसरली.

" तू अचानक आलीस?"

" तुला आवडलं नसेल तर मी परत जाते." उद्वेगाने सानवीच्या डोळ्यात पाणी आले.

" मी आलोच.. थांब तिथेच."
अनिरुद्ध घाई करत म्हणाला. सानवी तशीच पायर्‍यांवर बसून राहिली. अंधार पडत चालला होता. आणि ती स्वतःला दोष देत होती. कितीही लवकर निघायचे ठरवले होते तरीही निघे निघेपर्यंत तिला उशीर झाला होता. निघताना शोभाताईंनी तिला परत परत सांगितले होते, अनिरुद्धला फोन करायला. पण तिला सरप्राईज द्यायचे होते ना? किती इमले बांधले होते तिने मनात. मागच्या वेळेस जसा अनिरुद्ध वागला तसाच या ही वेळेस वागेल. दोघे छान मजा करू. झालेला विरह विसरून एकमेकांच्या सहवासात रमून जाऊ. पण मिळाले काय? ती इथे पायर्‍यांवर बसून डासांना आपल्या रक्ताची मेजवानी देत होती. थोड्या वेळातच अनिरुद्ध तिथे आला.

" सानवी.. यायच्या आधी फोन तरी करायचा?" त्याच्या आवाजात सानवीला चिड जाणवली. दरवाजा उघडेपर्यंत ती काहीच बोलली नाही. सानवीला एक विचित्र नकोनकोसा वास आला.

" तू दारू पिऊन आला आहेस?" सानवीची भुवई वर झाली.

" प्रश्न आधी मी विचारला. तू यायच्या आधी फोन का नाही केलास?"

" कारण आपल्या लग्नाला सोमवारी एक महिना पूर्ण होईल.. त्यासाठी तुला सरप्राईज द्यायचे म्हणून आले होते. मला काय माहीत इथे मलाच सरप्राईज मिळेल." सानवीचासुद्धा पारा चढत होता.

" माझेसुद्धा काही प्लॅन्स असू शकतात."

" मान्य.. पण त्यासाठी खोटं बोलायची काय गरज?"

" ती मला कटकट नको होती म्हणून."

"मी कटकट करते?"

" मग काय चालू आहे आल्यापासून?"

" तू बोलतो आहेस. मी फक्त ऐकते आहे."

"तू ऐकणार? तुझ्यामुळे मला काय काय ऐकायला लागलं आहे."

" तुला मी आल्याचा एवढाच त्रास होतो आहे तर मी निघते." डोळ्यातलं पाणी पुसत सानवी म्हणाली.

" हो म्हणजे तुझ्या आईबाबांनी मला बोलायला." अनिरुद्ध थांबतच नव्हता.

" तुझी जेव्हा उतरेल तेव्हा आपण बोलू. मी आता खरंच निघते. सॉरी माझ्यामुळे तुझा प्लॅन फिसकटला." आणलेली बॅग उचलत सानवी जायला वळली. बाहेर ज्योतीताई आणि माधवराव आले होते.

" काय हे? किती भांडता? बाहेर पर्यंत आवाज येतो आहे." ज्योतीताई म्हणाल्या.

" आई ते..." अनिरुद्ध बोलता बोलता थांबला.

" सानवी, कुठे निघालीस?" माधवरावांनी विचारले.

" घरी जाते आहे परत." अनिरुद्धकडे बघत सानवी म्हणाली.

" आत्ताच आलीस ना? मग? तू जा खोलीत. बॅग ठेव. काहीतरी खाऊन पिऊन घे. आराम कर. नंतर बोल." माधवरावांनी त्यांच्या बाजूने प्रश्न सोडवला.

" आत खायला काही नसेल. हा बाहेर जाणार होता. आपल्यालाही बाहेर आमंत्रण होते. मी काही केलेच नाही. थांब मी करते काहीतरी."

" नको.. मला भूक नाही." सानवी वर जात म्हणाली.

" बाई.. काय ते वागणं? आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का ती येणार म्हणून? आणि तुला नव्हतं का रे माहित?" ज्योतीताईंची गाडी अनिरुद्धवर घसरली.

" माहिती असतं तर गेलो असतो का बाहेर?"

" तुझ्याशी का भांडत होती?"

" ते मी..." अनिरुद्ध बोलता बोलता गप्प झाला.

" तुमच्या ऑफिसमध्ये तर होतात ना पार्ट्या?"

" तिला नाही आवडत."
अनिरुद्ध अस्वस्थ झाला होता. त्याला एक दिवस मित्रांबरोबर मजा करायची होती. सानवी अचानक आल्यामुळे त्याला निघावे लागले होते. तिथे त्याच्या मित्रांनी त्यावर भरपूर बोलून घेतले होते. त्याचा तो सगळा राग सानवीवर निघाला होता. ती दुखावली गेली असणार होती. आता त्यात आईची उलटतपासणी. आधीच चढलेलं डोकं अजून फिरलं. तो तसाच सोफ्यावर डोकं धरून बसला. दहा एक मिनिटात ज्योतीताईंनी त्याच्यासमोर पोह्यांची बशी धरली. अनिरुद्धने वर बघितले.

" तिने रस्त्यात काही खाल्लं नसेल ना? भूक लागली असेल तिला. लोकाच्या पोरीला घरात उपाशी कसं ठेवायचं?" अनिरुद्धला आता खूपच अपराधी वाटू लागलं. त्याने हा विचारच केला नव्हता. फक्त त्याच्यासाठी ती आठ दिवस आधी आली होती. आणि तो काय वागला होता? तो ती बशी घेऊन खोलीत गेला. त्याला वाटलं होतं तसंच सानवी कपडे बदलून खिडकीत उभी राहिली होती. खिडकीतून दिसणार्‍या चंद्राकडे बघत.

" पोहे आणले आहेत, खाऊन घे." अनिरुद्ध बशी पलंगावर ठेवत म्हणाला.

" मला भूक नाहीये.. सांगितलं होतं." सानवी पाठी न बघता म्हणाली.

" तू दमून आली असशील, काही खाल्लं नसशील.. खाऊन घे."

" खोटी काळजी दाखवायची गरज नाही. आल्या आल्या तू जे स्वागत केलेस तेवढं पुरेसे आहे.."

" माझ्या आईने तुझ्यासाठी केले आहेत. इथे ठेवतो. खायचे असतील तर खा नाहीतर फेकून दे." अनिरुद्ध रागाने बोलला. ती बशी तिथेच ठेवून तो खाली निघून गेला. सानवीने पोह्यांकडे बघितले आणि जाणाऱ्या अनिरुद्धकडे. हाच का तो, त्यादिवशी कॉफी आणून देणारा? अन्नाचा अपमान नको म्हणून तिने कसेबसे ते पोहे संपवले. बशी खाली ठेवण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी ती खाली निघाली. अनिरुद्ध खाली बसला होता. ज्योतीताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

" इथेच झोपणार आहेस का?"

" ठरवलं नाही अजून.."

" सानवी एवढा कसला बाऊ करते? तरी तुला सांगत होते लग्न सोपं नसतं. ती फक्त दाखवते मोकळ्या विचारांची पण आहे का? ती राधा बघ.. किती ऐकून घेते. सालसपणाचा नमुना जणू. तुला हिची भूल पडली होती ना? म्हणून आता झोपतो आहेस खोलीच्या बाहेर." ज्योतीताईंनी मनातली मळमळ बोलून दाखवली. ते ऐकून अनिरुद्ध उठला.

" आता कुठे चाललास?"

" माझ्या खोलीत झोपायला." येणाऱ्या अनिरुद्धला बघून सानवी उलट्या पावलांनी तिच्या खोलीत गेली. ज्योतीताईंचे बोलणे ऐकून तिथे तिला क्षणभरही थांबावेसे वाटले नव्हते ना आता त्यांच्यासमोर जाण्याची तिची इच्छा होती. ती खोलीतल्या खुर्चीत जाऊन बसली. पाठोपाठ अनिरुद्ध आला आणि पलंगावर झोपला. ती मात्र तशीच बसून राहिली. समोरचा अनिरुद्ध तिला खूप अनोळखी वाटू लागला. याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचे आहे.. तिला आईचे शब्द आठवले.. पुरूष लग्नाआधी वेगळा आणि लग्नानंतर वेगळा वागतो..


शोभाताईंचे बोल अनिरुद्धसाठी पण खरे ठरतील? दोघे नांदतील का सुखाने? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all