नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १३
मागील भागात आपण पाहिले की सानवी अनिरुद्धला सरप्राईज देण्यासाठी घरी येते तर घरी कोणी नसते. अनिरुद्ध दारू पिऊन तिच्याशी भांडतो. आता बघू पुढे काय होते ते.
" सानवी.. अशी अवघडून का झोपली आहेस? मान दुखेल ना?" खुर्चीवर झोपलेल्या सानवीला उठवत अनिरुद्ध म्हणाला. " नाहीतर थांब.." डोळे उघडत असलेल्या सानवीला अनिरुद्धने उचलले आणि पलंगावर ठेवले.
" सोड मला." सानवी अनिरुद्धचा हात झटकत म्हणाली.
" मी काय केलं?"
" काय नाही केलंस? मी निघते आहे लगेचच माझ्या घरी." सानवी रागाने उठायला गेली. अनिरुद्धने तिला स्वतःवर ओढले.
" मग हे काय आहे?"
" हे तुझे घर आहे.."
" मी ही तुझाच आहे.." अनिरुद्ध सानवीला मिठीत घेत म्हणाला.
" ते काल बघितलं मी. आई नको नको म्हणत असताना फक्त तुझ्यासाठी आले मी. आणि तू फोन उचलत नव्हतास. मला शेवटी आईंना फोन करायला लागला. आलास ते ही माझ्यावर ओरडायला लागलास. हा ही विचार केला नाहीस की मला भूक लागली असेल. मी दमली असेन. त्या पायरीवर बसून डासांना रक्तदान करून आले आहे." सानवी रागाने बोलत होती. आणि अनिरुद्धला तिचे हसू येत होते.
" हसायला येतं आहे? हे बघ किती चावले आहेत डास." सानवी हातावरचे गांधी दाखवत म्हणाली.
" बघू.." अनिरुद्धने तिचा हात हातात घेतला. तिच्या सुजलेल्या भागावर आपले ओठ ठेवले. एक गोड शहारा सानवीच्या अंगावर आला.
"अजून कुठे चावले डास?" अनिरुद्धने कुजबुजत विचारले.
" कुठेच नाही.." सानवी हलकेच म्हणाली. "सोड मला.. खाली जायचे आहे."
" काल मी केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेतो. मग जा." अनिरुद्ध सानवीच्या कानात कुजबुजला.
" मी गोळी नाही घेतली." सानवी त्याच्यापासून दूर जाण्याचा लटका प्रयत्न करू लागली.
" एक दिवस नाही घेतली तर काही बिघडत नाही." सानवीचा सगळा प्रतिकार मोडून काढत अनिरुद्ध म्हणाला. आणि दोघांचे भांडण प्रेमाच्या वर्षावात वाहून गेले.
" अनि, तू परत माझ्याशी खोटे बोलून दारू प्यायला नाही ना जाणार?" अनिरुद्धच्या कुशीत झोपलेल्या सानवीने विचारले.
" नाही.. कधीच नाही. तू येणार आहेस हे सांगितलं असतंस तर विरेनलासुद्धा टांग मारली असती."
"झालं ते झालं.. परत नाही ना असं वागणार?"
" नाही ग.. विश्वास ठेव." अनिरुद्ध परत तिच्या मिठीत हरवत म्हणाला.
" नाही ग.. विश्वास ठेव." अनिरुद्ध परत तिच्या मिठीत हरवत म्हणाला.
दोघांना आवरून हसत खाली येताना बघून ज्योतीताई आणि माधवरावांचा जीव भांड्यात पडला.
" या.. बसा नाश्ता करायला. काल रात्री खाल्लं नाही ना जास्त." ज्योतीताई नाश्ता दोघांच्या पुढे ठेवत म्हणाल्या.
" आई, दुपारचा स्वयंपाक मी करू?" सानवीने विचारले.
" तू? नको ग.. मी करते पटकन. काही लागलं तर सुधाताई करतील मदत."
" सुधाताईंवरून आठवलं.. सुधाकरने एक दिवस जेवायला बोलावलं आहे. तुला कधी वेळ आहे ते सांग. " माधवराव म्हणाले.
" नको.. तिथे राधा असेल."
अनिरुद्ध पटकन बोलून गेला. आणि सानवीला काल रात्री ज्योतीताईंनी केलेला राधाचा उल्लेख आठवला. सकाळपासून चांगला झालेला मूड क्षणात बदलला. 'यांना अनिरुद्धचे राधाशी लग्न लावून द्यायचे होते, इथपर्यंत समजू शकते. पण आता आमचं लग्न झाल्यावरदेखील या तिला सुनेच्या रूपात बघतात?'
अनिरुद्ध पटकन बोलून गेला. आणि सानवीला काल रात्री ज्योतीताईंनी केलेला राधाचा उल्लेख आठवला. सकाळपासून चांगला झालेला मूड क्षणात बदलला. 'यांना अनिरुद्धचे राधाशी लग्न लावून द्यायचे होते, इथपर्यंत समजू शकते. पण आता आमचं लग्न झाल्यावरदेखील या तिला सुनेच्या रूपात बघतात?'
" ए हॅलो.. चल आपण शेतात जाऊन येऊ. परत काम सुरू झाल्यावर मला यायला मिळणार नाही." अनिरुद्ध विचारात गढलेल्या सानवीसमोर टिचकी मारत म्हणाला. सानवी न बोलता त्याच्यासोबत चालू लागली.
" तुला अधूनमधून झटके येतात का ग?" अनिरुद्धने विचारले.
" काय झाले?" सानवीचा चेहरा उतरला होता.
" आता खाली येताना छान होतीस. मग अचानक?"
" ही राधा कोण?" सानवीने विचारले. ते ऐकून अनिरुद्धचा चेहरा उतरला.
"तुला काय माहित?"
" मला कोण ते हवं आहे."
" बाबांच्या मित्राची मुलगी."
" तिच्याशी तुझा काय संबंध?"
" तू उलटतपासणी घेते आहेस का?" अनिरुद्ध वैतागला होता.
" तसं समज हवं तर.. पण ती कोण आहे?"
" ओके.. ती बाबांच्या मित्राची मुलगी. माझं लग्न तिच्याशी व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. पण आपलं लग्न झालं. समजलं? आता संपवूयात हा विषय?" अनिरुद्ध गाडी जोरात चालवत म्हणाला.
" हळू ना. विषय मला काढायचाच नव्हता. तो विषय काल आईंनी काढला होता. तुझे लग्न तिच्याशी झाले असते तर तुझे काल झाले तसे हाल झाले नसते असं त्यांचं म्हणणं आहे." सानवी म्हणाली. ते ऐकून अनिरुद्धने ब्रेक दाबला. गाडी थांबवली. अनिरुद्धने गाडी एकाबाजूला घेतली
"काय म्हणालीस?"
" काल जेव्हा नशेत तू खाली जाऊन झोपला होतास, तेव्हा तुझ्या आईचे असे मत होते की तुझे त्या राधाशी लग्न झाले असते तर बरे झाले असते." सानवी बोलत होती.
" काहिही.." अनिरुद्धचा विश्वास बसत नव्हता.
" मग मला राधा हे नाव कसे समजले असेल?" सानवी शांतपणे बोलत होती.
" हे बघ सानवी. ही जुनी गोष्ट आहे. तसेही मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?" अनिरुद्धने सानवीचा चेहरा ओंजळीत धरला.
" माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण कालचे तुझे ते अनोळखी रूप अजूनही डोळ्यासमोरून जात नाही."
" सॉरी म्हटलं ना? मी एवढा वाईट वागलो?"
" खूपच.. अगदी परक्यासारखं वाटत होतं काल मला. लांब पळून जावंसं वाटत होतं. ज्या अनिरुद्धसाठी मी आले होते तो इथे जणू नव्हताच." सानवीचे डोळे बघता बघता पाण्याने भरले.
" प्लिज, मी नाही बघू शकत तुझ्या डोळ्यात पाणी.. ते ही माझ्यामुळे." अनिरुद्ध अपराधी स्वरात बोलला.
" तू अजून किती महिने वर्क फ्रॉम होम करणार आहेस?" सानवी विषय बदलत म्हणाली.
" मी विचार करतो आहे,होत असेल तर वाढवून घ्यायचे काही महिने. का ग?"
" काही नाही. आज ना उद्या ऑफिस जॉईन करावं लागेलच ना.. मग तिथे आपण राहणार कुठे? काहीच ठरवलं नाहीये."
" मी ज्या फ्लॅटमध्ये रहात होतो तिथे काय वाईट आहे?"
" तिथे सगळी मुले रहात होती, राहतात.. मला नाही जमणार. आपल्याला नवीन घर बघावं लागेल." सानवी म्हणाली.
" ते बघूच.. पण होता होईल तेवढे दिवस इथे राहूयात? आईबाबांना पण बरं वाटेल."
" चालेल.." सानवीने होकार दिला.
" सानू नाहीतर घर कसं सुनेसुने वाटते आहे ना?" शोभाताई प्रदीपरावांना म्हणाल्या.
" हो ना.. आठ दिवस राहिली आणि चिवचिवाट करून परत गेली." प्रदीपराव म्हणाले.
" मी काय म्हणते तिला बोलावून घेऊयात का?" शोभाताई म्हणाल्या.
" अग, आत्ता तर ती राहून गेली ना? सतत कसं बोलवायचं?"
" अहो पण.. आतडं तुटतं ना.."
" तुमचं आतडं, यकृत, किडनी काहिही तुटत असेल तर शिवून घेऊ. पण लेक सासरी गेली आहे तर रूळू दे तिला तिकडे. काही महिन्यांनंतर येईलच ना इथे?" प्रदीपराव ठामपणे बोलले. शोभाताई अस्वस्थ होत होत्या. त्यांची लेक सासरी होती. तिच्या आवाजावरून तरी ती तिथे रूळली आहे असं वाटत होतं. तिचा फोन आला की तिथे हसायचे आवाज यायचे. पण इथे त्यांचं घर मात्र तिच्याशिवाय ओकंओकं वाटत होतं. 'काहीतरी कारण काढून तिला बोलावून घ्यायचंच.' असा निश्चय त्यांनी स्वतःशीच केला. आणि तशी संधीही त्यांना लवकरच मिळाली.
सानवीने दोघांचाही चेकअप करून घेतल्यानंतर प्रदीपराव स्वतःची औषधे तर वेळेवर घेत होतेच पण शोभाताईंची तब्येत बिघडून सानवीला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या औषधांवरही लक्ष देत होते. त्यातही रोज सकाळी सानवी आठवण करून द्यायचीच. पण त्या दिवशी प्रदीपरावांची दुपारची एक मिटिंग अचानक सकाळी ठेवण्यात आली. वेळेत पोहोचायच्या घाईगडबडीत प्रदीपराव स्वतःची गोळी घ्यायची विसरले. मिटिंगमध्ये खूप वेळा झालेला चहा आणि गोड खाणं यामुळे शरीरात गेलेली साखर त्यांना त्याक्षणी जाणवली नाही. बरं वाटत नाही म्हणून मिटिंग संपताक्षणीच घरी आलेले प्रदीपराव चक्कर येऊन पडले. आणि शोभाताईंनी घाबरत आधी सानवीला फोन लावला.
सानवीने दोघांचाही चेकअप करून घेतल्यानंतर प्रदीपराव स्वतःची औषधे तर वेळेवर घेत होतेच पण शोभाताईंची तब्येत बिघडून सानवीला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या औषधांवरही लक्ष देत होते. त्यातही रोज सकाळी सानवी आठवण करून द्यायचीच. पण त्या दिवशी प्रदीपरावांची दुपारची एक मिटिंग अचानक सकाळी ठेवण्यात आली. वेळेत पोहोचायच्या घाईगडबडीत प्रदीपराव स्वतःची गोळी घ्यायची विसरले. मिटिंगमध्ये खूप वेळा झालेला चहा आणि गोड खाणं यामुळे शरीरात गेलेली साखर त्यांना त्याक्षणी जाणवली नाही. बरं वाटत नाही म्हणून मिटिंग संपताक्षणीच घरी आलेले प्रदीपराव चक्कर येऊन पडले. आणि शोभाताईंनी घाबरत आधी सानवीला फोन लावला.
सानवी येईल परत माहेरी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा