Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १४

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १४

मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्धचे भांडण मिटते. पण शोभाताईंना सानवीने आपल्यासोबत रहावे असे वाटत असते. आता बघू पुढे काय होते ते.

"अनिरुद्ध, सानवी झाले का आवरून?" माधवरावांनी आवाज दिला.

" हो बाबा.. येतोच.." अनिरुद्ध वरून ओरडला.

" सानवी, आटप ना लवकर." साडी नेसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सानवीला अनिरुद्ध म्हणाला.

" कसं आटपू? माझ्या साडीचा पदरच नीट येत नाहीये. माझा हात दुखायला लागला हा पदर नीट घेता घेता." सानवी रडवेली झाली होती.

" आईला बोलावू?" अनिरुद्धने विचारले.

" नको.. मला परत ऐकावे लागेल, राधाला किती छान साडी नेसता येते ते."

" सानवी, वादग्रस्त विषय कमीतकमी आता देवाला जाताना तरी नको. मी करू का मदत तुला?" अनिरुद्ध जवळ जात म्हणाला.

" मग झालंच.. इथेच रहावं लागेल आपल्याला." त्याच्या डोळ्यातले भाव ओळखून सानवी म्हणाली.

" अनिरुद्ध.." आता ज्योतीताईंचा आवाज आला.

" आलोच.." अनिरुद्ध म्हणाला. "पटकन बोल.." अनिरुद्धने सानवीला विचारले.

" तुला येते का?" सानवीने आश्चर्याने विचारले.

" तुला येत नाही का?" त्याने उलट विचारले.

" खूप छान येत नाही पण येते. आणि या साडीला आज काय झालं आहे तेच समजत नाहीये. ना निरी नीट येतीये ना पदर."

" चल, मी प्रयत्न करतो.. दोघे मिळून करू काहीतरी." अनिरुद्धने साडी हातात घेतली. सानवीने सांगितला तसा पदर तिला घेऊन दिला. एकदाची साडी नेसून झाली.

" थॅंक यू.." अनिरुद्धच्या गालावर ओठ टेकवत सानवी म्हणाली.

" बस.. एवढंच?" अनिरुद्ध गाल फुगवत म्हणाला.

" उरलेलं घरी आल्यावर.. चल लवकर आई ओरडतील." सानवीने ओढतच अनिरुद्धला बाहेर आणले. खाली ज्योतीताई सगळी तयारी करून बसल्या होत्या.

" किती वेळ तो? एकतर आज मुहुर्त मिळाला आहे कुलदेवतेला जायचा. त्यातपण तुम्ही." ज्योतीताई कुरकुरल्या.

" ते जरा.. साडी नेसायला उशीर झाला." सानवी म्हणाली.

" निघायचे का?" माधवरावांनी बोलणं थांबवत विचारले.

" हो.. मी गाडी काढतो." अनिरुद्ध बाहेर जाणार तोच सानवीचा फोन वाजला. शोभाताईंचा फोन बघून तिने पटकन उचलला.

" बोल आई.. काय?? मी निघते लगेच.. हो हो.. तू घाबरू नकोस. येतेच आहे मी." सानवी घाबरून म्हणाली.

" मला जावे लागेल.." सानवी तिच्याकडे बघणाऱ्या तिघांकडे बघून म्हणाली. "बाबांना दवाखान्यात ठेवले आहे. आई एकटी पडली आहे तिथे."

" घ्या.. लग्नानंतर कुलदेवतेचा गोंधळजागरण करायचं ठरवलं तर हे?" ज्योतीताई त्राग्याने म्हणाल्या.

" पण माझे बाबा दवाखान्यात आहेत."

" दवाखान्यात आहेत ना? मग तू आजच्याऐवजी उद्या जा ना. काय होते?"

" मला नाही बरोबर वाटतं." सानवीच्या डोळ्यात पाणी भरू लागले.

" आम्हालाही नाही बरोबर वाटत. तुम्हाला विचारूनच पुढचं सगळं ठरवलं होतं ना? मग? देवाचं काम अजून किती दिवस लांबवणार?" ज्योतीताई बोलत होत्या. माधवराव ऐकत होते.

" आई, ते दवाखान्यात आहेत. असं केलं तर मी आणि सानवी तिथे जातो. गोंधळ आणि जागरण तुम्ही करा." अनिरुद्धने सुचवले.

" नवीन जोडप्याच्या हातून करायचे असते ते."

" एक सुचवू?" माधवराव म्हणाले.

" बोला बाबा."

" अनिरुद्ध, आपण जागरण गोंधळ करून घेऊ. सूनबाई जातील पुढे." सानवीने अनिरुद्धकडे बघितले.

" पण बाबा.."

" माझं वाक्य पूर्ण झालेलं नाही. विरेन सोडेल तिला. म्हणजे दोन्ही कामे होऊन जातील."

" अहो पण ते जोडप्याने बसायचे असते."
ज्योतीताई नाराजी दाखवत म्हणाल्या.

" सुपारी बांधेल तो.. विषय संपवायचा की वाढवायचा ते ठरवा." माधवराव चिडून म्हणाले. "मी गाडीत बसतो. तुमचं काय ते ठरवा आणि या." माधवराव गेलेले बघून ज्योतीताईसुद्धा बाहेर पडल्या.

" मी येतो तुझ्यासोबत." अनिरुद्ध सानवीजवळ जाऊन म्हणाला. तिलाही तेच हवे होते पण तिने मनावर नियंत्रण ठेवले.

" नको.. अजून आपल्या अडचणी वाढायला नको. तू जा मंदिरात. मी जाते विरेनभावजींसोबत. पण तू राहशील ना सतत टचमध्ये?"

" हो.. काळजी नको करूस. हे गोंधळजागरण झालं की लगेच येतो. पैसे वगैरे काही हवेत?" अनिरुद्धने सानवीला मिठीत घेत विचारले. 'पैसे नकोत.. तुझी साथ हवी आहे." सानवीच्या मनात आले.

" नको.. आहेत माझ्याकडे. तुला जमलं तर ये लवकर." सानवी बाजूला होत म्हणाली. तोपर्यंत माधवरावांनी विरेनला फोन केला होता. तो येताच सानवी घरी निघाली आणि अनिरुद्ध मंदिरात. गोंधळजागरण करून दुसऱ्या दिवशी सानवीकडे जाणार तोच त्याच्या बॉसने महत्वाच्या कामासाठी त्याला बाहेरगावी जायला सांगितले. अनिरुद्धला पेचात पडल्यासारखे झाले होते. त्याने सानवीशी बोलून सांगूयात असा विचार केला. इथे प्रदीपरावांची तब्येत स्थिर झाली होती. सानवी तिथे त्यांच्यासोबत होती. अनिरुद्धने सानवीला फोन लावला.

" अनि.."

" सानवी.. कसे आहेत बाबा?"

" आता बरे आहेत. डॉक्टर सांगत होते उशीर झाला असता तर कोमात गेले असते." सानवी रडत होती.

" तिथे एकटीच आहेस का?" अनिरुद्धने अस्वस्थ होत विचारले.

" हो.. बाकी सगळे येऊन जाऊन आहेत. आईही आजारी पडू नये म्हणून मी थांबते आहे इथे." 'तू येणार आहेस का?' सानवीच्या तोंडून हे शब्द मात्र फुटत नव्हते.

" सानवी, सरांनी विचारले आहे की पंधरा दिवस बंगलोरला जायला जमेल का?"

" काय??" अनिरुद्धला सानवीचे उत्तर मिळाले. तरिही त्याने प्रयत्न करून बघायचं ठरवलं.

" अग, आधी प्रशांतसर जाणार होते. पण ते एका दुसर्‍या कामात अडकले आहेत म्हणून सरांनी मला विचारले. खरंतर त्यांनी माझ्या एका विनंतीवर मला वर्क फ्रॉम होम करायची परवानगी दिली आहे. त्यांना नाही म्हणणं सुद्धा जीवावर आले आहे. मला माहिती आहे मी तिथे तुझ्यासोबत असणं गरजेचं आहे. पण.."

" अनिरुद्ध, तू ये जाऊन बंगलोरला." सानवी शांतपणे म्हणाली.

" खरंच?" अनिरुद्धचा विश्वास बसत नव्हता.

" हो.. तसेही हे माझे बाबा आहेत. ते आता बरे आहेत. मी आहे इथे. तू ये जाऊन. काम महत्त्वाचं." सानवीने फोन कट केला. सानवीची समजूत नंतर काढता येईल असा विचार करत अनिरुद्ध बंगलोरला जायच्या तयारीला लागला. पंधरा दिवस तो तिथे कामात अडकला तर सानवी इथे. प्रदीपरावांना डिस्चार्ज मिळाला. ते घरी आले. सानवीचेही वर्क फ्रॉम होम परत सुरू झाले. दिवस कामात आणि आईबाबांची काळजी घेण्यात संपून जायचा. अनिरुद्धचा रोज फोन यायचा पण दोघेही घाईत असल्याने बोलणे व्हायचे नाही. दिवस रात्र एक करून काम केल्यामुळे अनिरुद्धचे काम एका दिवस आधी संपले. तो दिवस इथे घालवण्यापेक्षा सानवीसोबत घालवूया या विचाराने अनिरुद्ध तिथून निघाला.


" काकू, सानवीला सांगा ना." सानवीच्या शाळेतल्या मैत्रिणीचा पृथाचा शोभाताईंना फोन आला होता.

" काय सांगायचे आहे?"

" आमच्यासोबत पिकनिकला यायला. ती नाही म्हणते आहे. काकांची तब्येत बरी नाही सांगते आहे." शोभाताईंनी आत काम करत असलेल्या सानवीकडे बघितले. पंधरा दिवसांत चेहरा सुकला होता. वडिलांचे आजारपण, त्यात अनिरुद्धचा विरह. थोडी हडकल्यासारखी वाटत होती. बहुतेक तिचं आणि अनिरुद्धचं काहीतरी भांडण सुरू होतं. दोघेही जास्त बोलताना दिसत नव्हते. शोभाताईंनाच कुठेतरी वाईट वाटलं.

"कुठे जायचं आहे तुम्हाला आणि किती दिवस?"

" काकू वन डे.. शनिवारी सकाळी जाणार. रात्री परत. रविवारी आराम. सोमवारी परत ऑफिस."

" मी सांगते तिला.. आणि शहाणे , मैत्रिण असली की फोन कर फक्त. इतरवेळी नको."

" असं नाही ओ काकू. नाही वेळ मिळत. पण यापुढे नक्की करत जाईन. प्रॉमीस. बरं सानवीला तयार रहायला सांगा शनिवारी. आम्ही येतोच." फोन ठेवून शोभाताई सानवीकडे वळल्या.

" सानू, शनिवारी काय घेऊन जाशील?"

" कुठे आणि काय न्यायचे आहे?" वर न बघता सानवीने विचारले.

" सानू, बाबा बरे आहेत आता. तू ये जाऊन शनिवारी. हे बघ मित्रमैत्रिणींबरोबर नेहमी जायला नाही मिळत. त्यात अनिरुद्धही नाही इथे. जाऊन आलीस तर तुलाच बरं वाटेल." सानवीने बोलण्यासाठी तोंड उघडलं पण काहीच बोलली नाही.

" मी जाते.." सानवीचे उत्तर ऐकून शोभाताई खुश झाल्या. सानवीच्या चेहर्‍यावरचे दुःखाचे ढग मात्र होते तसेच राहिले.


पंधरा दिवसांनंतर अनिरुद्ध आणि सानवीची होईल भेट? मिटेल का त्यांच्यातला दुरावा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all