नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १५
मागील भागात आपण पाहिले की बाबा आजारी आहेत म्हणून सानवी माहेरी येते तर अनिरुद्धला कामासाठी बंगलोरला जावे लागते. आता बघू पुढे काय होते ते.
"अरे अनिरुद्ध, तू? कधी आलास बंगलोरहून?" शोभाताईंना दरवाजात अनिरुद्धला बघून आश्चर्य वाटले.
" हे काय.. उतरतोच आहे. सानवी कुठे आहे?" अनिरुद्धने अधीर होत विचारले.
" आत ये ना.. बस आधी. सानवी गेली आहे मैत्रिणींसोबत फिरायला." शोभाताईंनी अनिरुद्धला पाणी देत सांगितले. सानवी घरी नाही हे ऐकल्यावर अनिरुद्धचा चेहरा उतरला.
" ती बोलली नाही काही मला तसं."
" अरे, त्यांच्या शाळेच्या ग्रुपचे ठरत होते. ती नाहीच म्हणत होती. मी पाठवले जबरदस्ती तिला." शोभाताई आपल्याच तालात होत्या. 'तुम्ही जा म्हणालात, ती गेली. पण एका शब्दाने मला सांगावेसे वाटले नाही?' अनिरुद्धला राग येत होता.
" बाबा, कसे आहेत?" त्याने विचारले.
" बाबा, कसे आहेत?" त्याने विचारले.
" ते बरे आहेत. पण थोडी काळजी घ्यावी लागते खाण्यापिण्याची. खूप केलं हो सानूने. ती आली म्हणून मदत झाली मला. नाहीतर काय केले असते मी एकटीने?"
" आई, सानवी कधी येणार?"
" येईल आज रात्रीपर्यंत. "
" मग मी निघतो." अचानक उठत अनिरुद्ध म्हणाला.
" असं कुठे निघतोस? थांब चहा ठेवते."
" नको.. मी निघतोच. करतो नंतर सानवीला फोन." अनिरुद्ध घाई करत निघत म्हणाला.
" सानवी, चल ना पाण्यात जाऊ." पृथा सानवीला खेचत म्हणाली.
" नको ग. जरा गरगरतं आहे. मी बसते इथे झाडाखाली." सानवी झाडाखाली बसत म्हणाली.
" काय ग.. गरगरतं आहे.. काही गोड बातमी?" पृथाने हसत विचारले.
" चल.. काहीतरीच काय? बाळ आणि एवढ्या लवकर? अनिरुद्ध तर पाच वर्ष थांब म्हणतोय." सानवी म्हणाली.
" अग हो.. किती ते स्पष्टीकरण? मी सहज म्हणाले. धर बसल्या बसल्या चकल्या खा. आम्ही आलोच पाण्यात जाऊन." पृथा डबा सानवीकडे देऊन पाण्यात गेली. सानवीने तो डबा उघडला. पण त्या वासानेच तिला मळमळलं. ती धावतच उलटी करायला गेली. ते बघून पृथा बाहेर आली.
" काय ग? काय झालं?" तिने काळजीने विचारले.
" काही नाही.. उन्ह लागलं बहुतेक. जा तू मजा कर." सानवी पृथाला आग्रह करत म्हणाली. तिला थोडा एकांत हवा होता. हे गरगरणं, उलट्या होणं.. नक्की काय सुरू होतं? या महिन्याची पाळीही चुकली होती. तिच्या आता ते लक्षात आले. खरंच आपल्याला बाळ होणार आहे? तिचा हात आपोआप पोटावर गेला. अनिरुद्धला काय वाटेल? त्याला फोन करू का? सानवीने फोन हातात घेतला. अनिरुद्धला फोन लावला. त्याने उचलला नाही. कामात असेल तो तिने मनाची समजूत काढली. खरंच बाळ होणार असेल तर? आता बाबांना बरं वाटतं आहेच. होता होईल तेवढं अनिरुद्धच्या सहवासात रहायचं. हे येणारे क्षण भरभरून जगायचे. पण तो बाळ नको म्हणाला तर? सानवीला अनिरुद्ध विरेनला जे बोलला होता ते आठवलं. उलटसुलट विचार करून सानवीचे डोके दुखायला लागले. आणि ती चक्कर येऊन पडली. पृथाचे तिच्याकडे लक्ष होतेच. ती लगेचच बाहेर आली आणि तिने लगेचच सानवीला खोलीत झोपवण्याची व्यवस्था केली. सगळ्या मैत्रिणींनी पिकनिक आवरती घेतली आणि त्या घरी निघाल्या.
"आय ॲम व्हेरी सॉरी.." गाडीत सानवी सगळ्यांना म्हणाली.
" वेडी आहेस का? तुझा जीव आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तुला बरं नव्हतं तर आधीच का नाही सांगितलंस."
"आधी नव्हतेच येणार. पण आईने आग्रह केला. मग मलाही बाहेर पडावसं वाटलं या सगळ्यातून. तुम्हाला सांगू, आमचं नवीन लग्न झालं आहे. पण असं वाटतंच नाही. आधी आईचं आजारपण, मग बाबांचं. आता अनिरुद्धही बाहेरगावी गेला आहे. मला समजतच नाही कसं होणार आहे माझं." सानवी बोलत होती.
" हे बघ.. आपलं प्रेम असेल ना तर सगळं निभावून नेता येतं. माझंच बघ ना. सासरी नुसता सासुरवास होता. पण आता वेगळं राहते आहे तर सगळ्यांशी छान संबंध आहेत. आपला आपल्या नवर्यावर प्रेम आणि विश्वास पाहिजे." प्राजक्ता सानवीला समजावत म्हणाली.
"ह्म्म.. एक रिक्वेस्ट करते. घरी आईबाबांना सांगू नका मला चक्कर आलेली. ते उगाच पॅनिक होतील." सानवी मैत्रिणींना म्हणाली. सानवी घरी पोहोचली.
" कशी झाली पिकनिक?" शोभाताईंनी विचारले.
" छान.. दिवसभर हुंदडलो." सानवी नजर चोरत म्हणाली.
" अरे व्वा. तू अर्ध्या रस्त्यात गेली असशील नसशील तोच अनिरुद्ध आला होता."
" काय?? अनि आला होता? पण तो तर उद्या येणार होता." सानवी जोरात ओरडली.
" आता मला काय माहित? बसलाही नाही. तू नाहीस तर लगेच गेला. चहाही घेतला नाही."
" तू मला का नाही फोन केलास लगेच?" सानवी चिडली होती.
" नाही आलं लक्षात. मी विसरले पण मग त्याने करावा ना." शोभाताईंचे बोलणे ऐकून सानवी गप्प झाली. ' का नाही केला त्याने फोन? म्हणजे मी फोन केला तेव्हाही तो कामात नव्हता. मग माझा फोन का नाही उचलला?' सानवीला अनिरुद्धचा प्रचंड राग आला. ती तशीच तिच्या खोलीत निघून गेली. शोभाताई पाठून काहीतरी बोलत होत्या पण तिने ऐकलेच नाही. दरवाजा लावून ती रडत राहिली.
" अनिरुद्ध, असा अचानक कसा काय आलास?" ज्योतीताईंना आश्चर्य वाटले.
" काम संपले म्हणून आलो. नको का येऊ?" रागाने अनिरुद्ध म्हणाला.
" असं का बोलतो आहेस? तू घरी यायला नको असं आम्हाला का वाटेल? मला वाटलं तू सानवीला घेऊन येशील." ज्योतीताई म्हणाल्या आणि अनिरुद्धची जखम भळभळली. कधीपासून सानवीला भेटायचं होतं, तिच्या मिठीत स्वतःला हरवून जायचे होते. मी तिच्यासाठी तडफडतो आहे आणि ती मात्र मैत्रिणींसोबत मजा करते आहे.
" घे.. चहा घे. थकला असशील. यायच्या आधी एखादा फोन तरी करायचा. माणूस स्वयंपाकपाणी करून ठेवतो." ज्योतीताई चहा देऊन आत गेल्या. फोन म्हणताच अनिरुद्धला फोनची आठवण झाली. त्याने फोन काढला. फोन सायलेंटवर होता. सानवीचा येऊन गेलेला मिस्ड कॉल त्याला दिसला. त्याच्या ह्रदयात काहीतरी हलले. किती रागारागात आलो आपण. स्वतः विरेनसोबत केलेली पार्टी चालते आणि ती मैत्रिणींसोबत गेलेली नाही चालत. मूर्ख, दुष्ट.. अनिरुद्धने स्वतःला शिव्या घालून घेतल्या. दोन मिनिटात त्याने चहा संपवला.
" आई, मी फ्रेश होऊन आलोच ग.." खोलीत येताच त्याने सानवीला फोन लावला. 'फोन उचल सानू.. फोन उचल.'
" हॅलो.. " सानवीचा रडका आवाज अनिरुद्धच्या कानावर पडला.
" सानवी.. तू रडते आहेस?"
" तू मला न भेटताच निघून गेलास. मला बोलायचं होतं तुझ्याशी खूप आणि तू..." सानवी हुंदके देत होती.
" पण तू रडत का आहेस?" अनिरुद्ध टेन्शनमध्ये आला.
"तुला का समजत नाही? गेले पंधरा दिवस बाबांचं आजारपण मी एकटी निभावून नेते आहे. मला तुझी खूप गरज आहे. मला तुझ्यासोबत रहायचे आहे.. आणि तू मला न भेटताच गेलास ही?"
" सॉरी ना.. मी पण तुझ्यासाठी एक दिवस लवकर आलो होतो. तू मैत्रिणींसोबत गेली आहेस हे ऐकून मला राग आला. आणि मी निघालो. सॉरी ना.." अनिरुद्ध माफी मागू लागला.
" राग आला म्हणून मला सोडून जाणार?" सानवीने व्याकुळ होत विचारले.
" मी आता येऊ तुला घ्यायला?"
" नको. मी उद्या येते."
" एका अटीवर.."
" कोणत्या?"
" गाडी चालवताना मध्ये ब्रेक घेशील."
" मी उद्या गाडी घेऊन नाही येणार. म्हणजे मी नाही चालवणार."
" का?" अनिरुद्धने काळजीने विचारले. गाडी म्हणजे दुसरं प्रेम असलेल्या सानवीला असं बोलताना पाहून अनिरुद्धचं टेन्शन परत वाढलं.
" आल्यावर सांगते. उद्या भेटू.." अनिरुद्धशी बोलून मन हलकं झालेल्या सानवीने फोन ठेवला आणि ती जाते आहे हे सांगायला ती बाहेर गेली.
" आई, बाबा.. मी उद्या जाते."
" एकटीच जाणार?" प्रदीपरावांनी विचारले.
"हो.."
" काय बाई तो अनिरुद्धही.. थांबला असता तर दोघं सोबत नसता का गेला?" शोभाताई बोलू लागल्या. "मी तर म्हणते सानू तू एकटी जाऊच नको. त्याला येऊ देत पुढच्या आठवड्यात. मग जा."
" काही गरज नाही. मी बरा आहे आता. आधीच तुला जा सांगणार होतो. पण अनिरुद्ध बंगलोरला होता म्हणून बोललो नाही. तू जा सानवी. मला काही लागलं तर बोलवेन मी तुला. तुझ्याशिवाय अजून आहेतरी कोण आम्हाला?" प्रदीपराव सानवीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. भरलेल्या डोळ्यांनी सानवी तयारी करायला निघाली.
सानवी खरंच आई होणार आहे? अनिरुद्धला बाळ हवं आहे की नको? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा