Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १६

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १६

मागील भागात आपण पाहिले की सानवीला ती गरोदर असल्याची शंका आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" आई, आज एवढी तयारी?" अनिरुद्धला आश्चर्य वाटले.

"हो.. ते सदाशिवभाऊजींना कधीपासून तुला भेटायचे होते. तू जात नाहीस त्यांच्याकडे म्हणून मग तेच येणार आहेत आता."

" त्यांना कसं समजलं मी आलो आहे ते?" अनिरुद्धच्या कपाळाला आठ्या पडल्या.

" काल रात्री मी फोन केला त्याला." माधवराव म्हणाले. "आता तुला विचारून ठरवायचे का सगळे?"

" पण मी कालच आलो.. आज लगेच? आणि सानवीही नाहीये." अनिरुद्ध म्हणाला.

" ती असते कधी इथे? तुझं लग्न झालं की नाही तेच समजत नाही.लग्न होऊनही घरात सूनबाईंचा पत्ता नाही. बाकीच्या सासवा सुनांना घेऊन मिरवतात. आणि बघावं तेव्हा आमची सून माहेरी." ज्योतीताई फणकार्‍याने बोलल्या.

" अग आई, तिचे आईबाबा आजारी होते म्हणून ती तिथे गेली ना?" अनिरुद्ध समजावण्याचा प्रयत्न करत होता.

" हो.. लग्नाच्याआधी नाही कधी आजारी पडले ते? लग्न झालं रे झालं.. आधी काय आईलाच बरं नाही. नंतर काय बाबाच आजारी. जरा म्हणून मुलीला सासरी राहू द्यायचे नव्हते तर लग्नच कशाला करायचे?"

" आई.." अनिरुद्ध हतबल झाला होता.

" काही बोलू नकोस. त्यांना घरजावईच हवा होता. आमचंच मेलं नशीब खोटं."

" बरोबर बोलते आहे ती. अनिरुद्ध, मलाही असंच वाटते आहे की ते सानवीला तिथे ठेवून घेण्यासाठीच असं वागत असावेत." माधवराव गंभीरपणे म्हणाले.

" माझे आईबाबा दुष्ट नाहीत." या तिघांची चर्चा एवढी गंभीरपणे चालू होती की गाडी कधी आली, सानवी कधी घरात आली कोणालाच समजले नव्हते.

" सानवी.." अनिरुद्ध तिच्याजवळ जात म्हणाला.

" अनिरुद्ध, माझे बाबा खरंच आजारी होते." सानवीच्या डोळ्यात पाणी होते.

" म्हणून काल मैत्रिणींसोबत फिरायला गेली होतीस?" ज्योतीताई म्हणाल्या. अनिरुद्ध आणि सानवी दोघे त्यांच्याकडे बघतच राहिले.

" मी काल रात्री हिच्या आईला फोन लावला होता, हिला कधी पाठवणार ते विचारायला. तेव्हा त्या म्हणाल्या की दमून येऊन झोपली आहे. ती कधी येणार ते तिच सांगेल." सानवी बघतच राहिली.

" माझी आई खोटं का बोलेल?"

" मग आम्ही खोटं बोलतो? मला कसं समजलं तू बाहेर गेली होतीस ते? तुला म्हटलं नव्हतं अनिरुद्ध, यांना हिचं लग्नच करून द्यायचं नव्हतं." ज्योतीताई बोलत होत्या.

"माझ्या आईबाबांच्या विरोधात मी काहीच ऐकून घेणार नाही." सानवी म्हणाली.

" जसे तुझे आईबाबा म्हणजे देव आहेत ना?"

" माझ्यासाठी ते माझे देव आहेतच."

" मग आम्ही कोण राक्षस?"

" मला नाही माहित." सानवी शांतपणे बोलली.

" बघितलंस अनिरुद्ध.. तुझी बायको काय म्हणाली ते मला." ज्योतीताई डोळ्याला पदर लावत म्हणाल्या.

" सानवी आईला सॉरी म्हण." अनिरुद्ध अस्वस्थ होत होता.

" मी काही चुकीचे बोलले नाही. मी माफी मागणार नाही."

" सूनबाई, मोठ्यांचा मान वगैरे काही असतो की नाही." इतका वेळ शांतपणे ऐकणारे माधवराव म्हणाले.

" बाबा, मान मागावा लागणं हिच नामुष्कीची गोष्ट नाही का?" सानवी माधवरावांना बोलते आहे हे अनिरुद्ध सहन करू शकला नाही.

" सानवी.. बस्स.."

"माझी चुकी नसताना मी गप्प बसायचे?"

" गप्प बस सांगतो आहे मग बस ना.." अनिरुद्धचा हात सानवीवर उठला. सानवी त्या धक्क्याने पाठी झाली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

" माझी चुकी नसताना तू माझ्यावर हात उचललास?" सानवीने दुखावलेल्या आवाजात विचारले. काहीच न बोलता अनिरुद्ध आपल्या वर झालेल्या हाताकडे बघतच राहिला. सानवी आल्या पावली परत निघाली. सानवीला भेटायला आलेला विरेनला रडणार्‍या सानवीला बघून धक्का बसला.

" वहिनी.. आत्ताच आलात ना?"

"निघाले आहे परत." डोळे पुसत सानवी म्हणाली.

" लगेच? अहो चहापाणी तरी घेतले का?" त्याने काळजीने विचारले.

" भाऊजी.. मला.." बोलता बोलता सानवीला चक्कर आली. इथे काहीतरी झाले आहे हे समजून विरेनने तिला तसेच आपल्या घरी नेले. त्याने आईला चहापाणी करायला सांगितले. विरेनच्या आईने सानवीला जबरदस्ती खायला लावले. सानवीची इच्छा नव्हती पण पोटात उसळलेला भुकेचा आगडोंब नकार देऊ देत नव्हता.

" वहिनी, मी तुम्हाला काय झाले हे विचारणार नाही. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आज इथे आराम करू शकता."

" नको.. मी निघते. माझ्यासाठी फक्त गाडी बुक करू शकाल?" सानवीने त्याला विनंती केली. विरेनला क्षणभर वाटलं की अनिरुद्धला फोन करून शिव्या घालाव्यात. पण कोणत्याही नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही हे तो जाणून होता.

" तुम्ही जेवून जाल का?"

" नको.. हे एवढं पुरेसं आहे." यावर जास्त आग्रह न करता विरेनने सानवीला गाडी बुक करून दिली. पूर्ण रस्ताभर सानवी रडत होती. घरी पोहोचल्यावर पैसे देताना पर्समध्ये तिला प्रेग्नन्सी कीट दिसलं. बाळ खरंच आहे की नाही ही गोष्ट तिला सर्वात आधी अनिरुद्धला सांगायची होती. ते कीट जणू तिला वाकुल्या दाखवत होतं. स्वतःला सावरत ती कशीबशी घरात गेली.

" सानवी तू??" दरवाजात सानवीला बघून चकित झालेल्या शोभाताई म्हणाल्या. हातातलं सामान तसंच टाकून सानवी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. काहीतरी चुकीचं झालं आहे हे शोभाताईंना जाणवलं.

"तुझं बरोबर होतं आई.. त्याने.. त्याने माझ्यावर हात उगारला." सानवी रडत म्हणाली.

" त्याची ही हिंमत?" सानवीचा आवाज ऐकून बाहेर आलेले प्रदीपराव चिडले. "थांब मी विचारतो त्याला फोन करून, आमची मुलगी काय रस्त्यावर पडली आहे का? आम्ही आजपर्यंत तिला बोटही लावलेलं नाही आणि हिच्या अंगावर हात उचलणारा हा कोण?"

" बाबा, काही गरज नाही फोन करायची. कश्याला आपण चिखलात दगड मारून आपल्या अंगावर चिखल उडवून घ्यायचा. मी पडते आत. मला खूप दगदग झाली आहे." सानवी आत जाऊन बसली. तिचा अजूनही जे झालं त्यावर विश्वास बसत नव्हता. तिला फुलासारखा झेलणारा तिचा अनि.. त्याने तिच्यावर हात उगारला?


"अनिरुद्ध, बाहेर येतोस? एक फेरी मारून येऊ." विरेन अनिरुद्धला बोलवायला आला होता.

" घेऊनच जा रे. सकाळपासून नुसता गप्प बसला आहे. पाहुण्यांसमोर ही आला नाही." ज्योतीताई अनिरुद्धची तक्रार करत म्हणाल्या.

" हो.. काकू. चल अनिरुद्ध. मला बोलायचं ही आहे थोडं." विरेनचा आग्रह अनिरुद्ध मोडू शकला नाही.

" कश्यासाठी आणलंस बाहेर?" अनिरुद्धने रागाने विचारलं.

" वहिनी घरी पोहोचल्या?" विरेनचा प्रश्न ऐकून अनिरुद्ध हडबडला.

" तुला काय माहित?"

" त्या सकाळी जेव्हा रडत निघाल्या तेव्हा त्यांना चक्कर आली होती. मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो. बहुतेक त्यांनी काही खाल्लं नव्हतं." अनिरुद्धला अजून अपराधी वाटलं. लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सानवी गाडी मध्ये थांबवत नाही हे तो कसं विसरला होता.

" लक्षातच आलं नाही बघ."

" आईला असं वाटतंय की वहिनी आई होणार आहेत." विरेन बोलून मोकळा झाला.

" काय?? काकूंना कसं समजलं?"

" माझी आई वैद्य आहे हे तू विसरलास वाटतं. अजूनही गावातली लोकं आईकडे औषधं घ्यायला येतात. आईने नाडी बघितली वहिनींची." विरेन गंभीरपणे बोलत होता.

" असं काही असतं तर सानवीने मला सांगितलं असतं." अनिरुद्ध स्वतःच्या मनाची समजूत काढत होता.

" तेवढा वेळ आहे तुमच्याकडे? आणि आईला असं वाटतं आहे की ते त्यांनाही बहुतेक माहित नसावं. नाहीतर त्या अश्या वागल्या नसत्या."

" अश्या म्हणजे?"

" एका दिवसात एवढा प्रवास, काही न खाता राहणं. तब्येतीची हेळसांड. पहिले तीन महिने खूप जपायचं असतं."

" मी बोलतो तिच्याशी." अनिरुद्ध फोन काढत म्हणाला.

" आत्ता नको. थकल्या असतील दिवसभराच्या प्रवासाने. उद्या बोल."

" थँक्स यार.. " अनिरुद्ध विरेनला मिठी मारत म्हणाला.

" अनिरुद्ध, नवराबायको वेगळे होऊ शकतात, भांडू शकतात. आईबाप नाही. त्यांची भांडणे झाली की माझ्यासारखं आयुष्य पदरात पडतं." डोळ्यातलं पाणी लपवत विरेन गेला.


अनिरुद्ध जाईल का सानवीची समजूत काढायला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all