Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १७

कथा एका प्रेमी युगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १७

मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्धला भेटायला आलेली सानवी दुःखी होऊन तिच्या माहेरी परत जाते. आता बघू पुढे काय होते ते.


"तुला काय वाटतं एक रेष येईल की दोन येतील?" सानवीने ते कीट उघडले होते.

"जे असेल ते.. मी आता अजून नाही थांबू शकत." अनिरुद्ध अधीरपणे म्हणाला. सानवीने त्या कीटवरचे हात काढले. त्यात दोन रेघा दिसत होत्या.

" मला वाटलंच होतं.. तू बाबा होणार. मी आई होणार. मला वाटलंच होतं." सानवी आनंदाने ओरडली.

" सानवी... सानवी, अग काय झालं ओरडायला? दरवाजा उघड ना." शोभाताई दरवाजा ठोठावत म्हणाल्या. सानवीने आजूबाजूला बघितले. अनिरुद्ध तिथे नव्हताच. समोर कीट होते, ज्यात दोन रेघा दिसत होत्या. तिने ते कीट उचलून पर्समध्ये ठेवलं. आतातरी ही गोष्ट तिला कोणालाच सांगायची नव्हती. तिने दरवाजा उघडला. बाहेर घाबरलेल्या शोभाताई होत्या.

" काय झालं ओरडायला आई?"

" मी तेच विचारते आहे. का ओरडलीस तू? अनिरुद्ध इथे आला का?"

" आई, तो जर आला तर दरवाजातूनच येणार ना? दिसला का तुला?" सानवी उदासपणे बोलली.

" ते आहेच. बरं मी आणि बाबा ऑफिसला निघतो आहे. तुझा नाश्ता करून ठेवला आहे. तुझं अजूनही वर्क फ्रॉम होमच आहे ना?"

" हो आई.. पण बघू. मी सरांशी बोलून घेणार आहे, ऑफिस परत सुरू करण्यासाठी." सानवीचा निराश चेहरा बघून शोभाताईंना गलबलून आले. त्यांनी तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवला. सानवी भकासपणे हसली. एक क्षण शोभाताईंना वाटले की घ्यावे बोलून अनिरुद्धशी आणि राहू द्यावे हिला त्याच्यासोबत. पण त्याने तिच्यावर उगारलेला हात आठवला की त्यांची चिडचिड व्हायची. आठवडा होत आला होता. ना तिथून काही फोन आला ना हिने केला. पोर मात्र पार सुकून गेली या सगळ्यात. त्या तश्याच ऑफिसला निघून गेल्या. प्रदीपराव पण जाताना तिला सांगून गेले. सानवीने आजकाल खोलीबाहेर येणंसुद्धा सोडलं होतं. तिची खोली आणि ती.

" पृथा, कामात आहेस का?" सानवीने पृथाला फोन लावला.

" मी आणि कामात? तुझ्यासाठी नेहमीच अव्हेलेबल. बोल ना."

" शनिवारी मला भेटशील?"

" परत बाहेर जायचं का?"

" पृथा प्लिज.." सानवीचा आवाज ऐकून काहीतरी गंभीर असल्याचा पृथाला अंदाज आला.

" ओके.. मला जागा आणि वेळ सांग. मी येतेच."

" मी मेसेज करते." सानवीने फोन ठेवला. खरंतर आता तिला अनिरुद्धला फोन करावासा वाटत होता. आयुष्यातली सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट त्याला सांगायची होती. पण त्या दिवसानंतर त्याने तिला साधा मेसेजही केला नव्हता. एवढे चुकलो का आपण? सानवी मनात विचार करत होती. मी त्याच्या आईबाबांना बोलले तर त्याला वाईट वाटलं पण मग ते माझ्या आईबाबांना बोलत होते तेव्हा? खरंतर त्याला माहिती होतं मी प्रवासात मध्ये थांबत नाही. त्याने तर साधी पोहोचलीस का अशी चौकशी ही केली नाही. त्याच्यापेक्षा ते विरेनभाऊजी बरे. रोज विचारतात तरी, तब्येत कशी आहे म्हणून. आणि अनिरुद्ध?? सानवीच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळला.

"अनिरुद्ध, तू का नाही वहिनींना सांगू देत आहेस?" विरेन अनिरुद्धवर चिडला होता आणि अनिरुद्ध बेडवर बसून हसत होता.
" कसला दुष्ट आहेस रे तू.. त्या बिचार्‍या काळजीत असतील. थांब मी सांगतो त्यांना." विरेन फोन उचलत म्हणाला.

" नको रे. एकतर जास्त काही झालेले नाही. आणि तिला समजलं तर ती पळत येईल. ती एकटी असती तर सांगितलं ही असतं. पण काकूच म्हणाल्या ना की कदाचित आम्ही आईबाबा होणार असू. मग बाळाला त्रास कशाला द्यायचा?"

" तू पण चक्रम आहेस. मग साधा मेसेज तरी कर."

" मेसेज केला की फोन आला, फोन केला की व्हिडीओ कॉल. आणि तिला मी असा दिसलो की संपलंच."

" पण असा कसा रे तू वेंधळा? आणि कुठे जात होतास गाडीवर सकाळी सकाळी?"

" हसणार नसशील तर सांगतो."

" एवढीच मित्राची किंमत?" तोंड फुगवत विरेन म्हणाला.

" नाही रे.. ही गोष्ट मी आईबाबांना पण सांगितली नाही म्हणून. मी मंदिरात गेलो होतो. देवाला हे सांगायला की आमचा विरेन म्हणतो तसं आमचं भांडण लवकर मिटू दे. आणि नवीन पाहुणा खरंच येऊ देत. त्या निमित्ताने तरी माझ्या आईच्या डोक्यातलं राधाचं भूत उतरेल."

" राधाचं भूत उतरेल म्हणजे?"

" सानवी माहेरी काय गेली आहे, आई सतत त्या राधाचं गुणगान करते आहे. मला ना असं वाटतं आहे की आईला सानवी आवडत नाही. बाळ आलं की सगळं छान होईल बघ." अनिरुद्ध उत्साहाने बोलत होता.

" कोण आलं की सगळं छान होईल?" ज्योतीताई आत येत म्हणाल्या. त्या येताच अनिरुद्ध गप्प बसला.

" अहो काकू, छान नाही. तो म्हणत होता की लग्न झाल्यावर सगळं समजेल." विरेनने सावरून घेतले.

" होतं रे सगळं छान. पण मुलगी बघताना आपल्यासारखीच बघ रे. आमचं बघतो आहेस ना? लग्न होऊनही तसंच." ज्योतीताई म्हणाल्या.

" काकू.." विरेन पुढे काही बोलणार तोच अनिरुद्धने त्याला गप्प बसायचा इशारा केला. ज्योतीताईही गप्प झाल्या.

" अनिरुद्ध, थोडा उपमा खाऊन घे. गरमच चांगला लागेल." अनिरुद्धने बशी हातात घेऊन खायला सुरूवात केली. ज्योतीताईंनी विरेनच्या हातातही एक बशी दिली. अनिरुद्ध काही बोलत नाही हे बघून विरेन म्हणाला,

" काकू, यासोबत थोडा चहा.. काय मजा येईल सांगतो. बरोबर ना अनिरुद्ध?" अनिरुद्धने मान हलवली. त्याबरोबर ज्योतीताई उठल्या.

" काकू, चहा झाला की मला हाक मारा. तुम्हाला त्रास नको." विरेन म्हणाला.

" आपल्या माणसांचा त्रास होतो का कधी? आणते हं. जिने करायचं ती बसली आहे तिथे आरामात. मी आहेच राबायला." ज्योतीताई जाताना बोलल्याच.

" हे असं असतं बघ. सतत सानवीला नावं ठेवणं. अरे ती राहिली आहे का इथे? तिला कसली माहिती आहे का? तुला सांगतो त्यादिवशी गाडीसमोर येणाऱ्या मुलाला वाचवायला गेलो आणि गाडी घसरली. त्याचा ही दोष सानवीवर."

" पण खूपच लागलं रे तुला."

" शरीराला झालेल्या जखमांचे काही वाटत नाही रे. पण हे मनाला लागणारे शब्द नको वाटतात. सानवीने तिथे काही गैरसमज करून घेतले नाहीत तर उपकार होतील हिच प्रार्थना करतो आहे सतत."

" तू काकाकाकूंना काही बोलला नाहीस?"

" काय बोलणार? मी सानवीच्या बाजूने काही बोललो की म्हणणार तू लग्नानंतर बदललास. नाही बोललो तर राधाचे गुणगान सुरू करणार. हे मोठे असे का वागतात रे? त्यादिवशी सानवीचे बाबा आजारी आहेत या गोष्टीवर ठेवला असता विश्वास तर कशाला वाढला असता वाद? पण नाही? स्वतःचं मोठेपण सिद्ध करायला हवं ना? मग त्यात दुसरे भरडले गेले तरी चालतील." अनिरुद्ध खूपच निराश झाला होता.

" बाळाबद्दल काहीच बोलला नाहीस?"

" आधी खरंच ते आहे का? ते तरी समजू देत. तसं काही नसलं तर परत बोलणी."

" लग्न करणं एवढं भयंकर का असतं रे?"

" लग्न भयंकर नसतं. आजूबाजूची माणसं त्याला भयंकर करतात. आता आईलाच बघ ना.. खरंतर आईबाबा दोघांनाही विचारलं होतं, सानवी त्यांना भेटून गेली होती. लग्न झाल्यावर ती त्यांच्या मनाप्रमाणे वागली तर ती चांगली. माहेरी गेली तर वाईट. बरं, ती गेली आहे तर ती कायमची नाही ना गेली? तर लगेच राधाला मध्ये आणायचे. माझी काय इच्छा आहे, काय मत आहे विचारायचेच नाही."

" काय बोलू यावर मी?" विरेन अनिरुद्धच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

" काही बोलू नकोस. शनिवारी माझ्यासोबत फक्त सानवीकडे चल. ती चिडली असेल तिची समजूत काढतो. येशील का?"

" तुझ्यासाठी काहीपण.. तू म्हणशील तिथे यायला तयार आहे."

" हे घ्या चहा." ज्योतीताई आत येत म्हणाल्या.

" झाला पण?" विरेनने आश्चर्याने विचारले

" अरे मगाशी इथे येतानाच आधण ठेवून आले होते. गाळला आणि आणला. कुठे जायचं ठरतं आहे का?"

" हो.. जरा दोघेही बाहेर जायचा विचार करत होतो."

" त्या राधाला घेऊन जाल का?" अनिरुद्धने विरेनकडे बघितले. ज्योतीताईंना ते समजले.
" अरे, तिला ती कसली पुस्तकं हवी आहेत म्हणून सांगत होती म्हणून म्हटलं."

"बरं.. जातो." विरेनने विषय संपवला.

अनिरुद्ध आणि सानवीची होईल का भेट? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all