नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १८
मागील भागात आपण पाहिले की सानवी गरोदर आहे. अनिरुद्धचा अपघात झाल्यामुळे तो तिला फोन करत नाहीये. आता बघू पुढे काय होते ते.
" अभिनंदन.. तुम्ही आई होणार आहात." डॉक्टरांनी सानवीचे अभिनंदन केले. "तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे कारण मला तुम्ही खूप अशक्त वाटत आहात. तुमच्यासोबत कोणी आहे का? म्हणजे मी तसं त्यांना समजावून सांगते."
" माझ्यासोबत.. म्हणजे माझी मैत्रिण आहे." सानवी अडखळत म्हणाली. "डॉक्टर, मला विचारायचे आहे की मी हे ॲबॉर्शन केले तर." सानवीने हा प्रश्न विचारायला आणि रिसेप्शनीस्ट आत यायला एकच गाठ पडली.
" किती वेळा सांगितलं तुला, पेशंट आत असताना नॉक करून येत जा." डॉक्टर तिच्यावर चिडल्या.
" ते..." तिचं ततपप झालं.
" काही महत्त्वाचं नसेल तर बाहेर जा. मी नंतर बोलते." रिसेप्शनीस्ट बाहेर गेल्यावर डॉक्टरांनी परत बोलायला सुरुवात केली. "हां बोल आता. का ॲबॉर्शन करायचे आहे तुला? लग्न नाही का झाले?" सानवीने गळ्यातले मंगळसूत्र दाखवले. ते बघून डॉक्टर वरमल्या.
" तुझी अगदीच काही मोठी अडचण असेल तर तू नक्कीच हा निर्णय घेऊ शकतेस. पण परत एकदा विचार कर. लवकर बाळ नको म्हणून बर्याचजणी आधी गर्भपात करतात. नंतर मग बाळ होत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेतात. तुझे वयही बरोबर आहे. म्हणजे या वयात बाळंतपण झेपण्यासारखे आहे. आणि..." बोलता बोलता डॉक्टर थांबल्या. सानवीने त्यांच्याकडे बघितले.
" नवर्याशी भांडण म्हणून ॲबॉर्शनचा विचार करत असशील तर दहा वेळा विचार कर. भांडण मिटू शकतं पण गेलेलं बाळ परत नाही येऊ शकत."
" तुम्हाला कसं समजलं?" सानवीला आश्चर्य वाटलं.
" पहिल्यांदाच आई होणारी मुलगी जेव्हा आई किंवा नवर्याला घेऊन डॉक्टरकडे येत नाही, तेव्हा बर्याचदा हिच कारणे असतात. आमचा अनुभव. अजून काही नाही. घरी जा, भांडण मिटव. तू खुश रहा म्हणजे बाळ बघ कसं छान होईल ते." डॉक्टरांचे ते आश्वासक शब्द ऐकून सानवीच्या डोळ्यात पाणी आले. ती बाहेर आली. तिला बघून पृथा उठली.
" काय ग? सगळं ओके का? आतातरी सांग काय झालं ते?" पृथाने बाहेर पडताना विचारले.
" पृथा.. मी आई होणार आहे." सानवीने सांगितले.
" ओ यार.. सहीच.. चला तर मग मी मावशी होणार." आनंदाने बोलणारी पृथा बोलता बोलता अचानक थांबली. " तू हे अनिरुद्ध किंवा काकूंना नाही का सांगितलेस?"
" नाही.. आज आठ दिवस झाले आहेत मी येऊन पण अनिरुद्धने फोनही केला नाही. साधी चौकशीही केली नाही की तू घरी पोहोचलीस की नाही. आणि आईबाबांचं म्हणशील तर सतत एकच टुमणं, अनिरुद्धने तुझ्यावर हात उगारला, आम्ही तुला बोटही लावलं नाही. त्यांना काय बोलू तेच समजत नाही. मला त्या दिवशी अनिरुद्धचा राग आला होता. पण त्याच्या बाजूने विचार केला तर असं वाटतं मी त्याच्या आईबाबांच्या विरोधात बोलले म्हणून त्याला राग आला. त्याच्याजागी मी असते तर मी ही तेच केलं असतं ना? मला वाईट याचं वाटतं आहे की मी चिडले आहे, तिथून बाहेर निघाले आहे तरी अनिरुद्धला साधा एक फोन करावासा वाटला नाही मला, ना मी चिडले आहे का हे विचारावेसे वाटले. माझी ना माझ्या आईवडिलांना काळजी आहे ना नवर्याला. म्हणून मी विचारायला आले होते ॲबॉर्शन केले तर चालेल का?"
" सानवी.. प्लिज यार.. मारीन धरून तुला माझ्या भाचीला काही केलेस तर." पृथा चिडली होती.
" काय??" डोळे पुसत सानवीने विचारले.
" माझ्या भाचीला काही केलेस तर बघ. तुमची भांडणे तुम्ही निस्तरा. त्या जन्माला न आलेल्या बाळाचा काय दोष त्यात?" पृथाच्या डोळ्यात पाणी होते.
" हो.. ग.. काही नाही होऊ देणार मी माझ्या बाळाला. बाकी कोणी नसलं तरी आता त्याला मी आणि मला ते. अजून एक कश्यावरून ते मुलगी असेल? मुलगाही असू शकतो."
" नाही.. मुलगीच असणार. मग आम्ही दोघी छान मेकअप करणार, मॅचिंग कपडे घालणार, मस्त फोटोशूट करणार." पृथा बडबडत होती.
" अग ए.. जमिनीवर ये. ते बाळ अजून जन्माला यायचे आहे. आधीच तुझे स्वप्नरंजन सुरू झाले."
" हो.. तिच्यावर तुझ्यापेक्षा जास्त हक्क माझा असणार. सांगून ठेवते. नंतर तुझी कटकट नको."
" नको अशी स्वप्न दाखवूस मला. खरंतर आता या क्षणी मला गरज आहे माझ्या नवर्याची, माझ्या बाळाच्या बाबाची. पण तोच इथे माझ्याजवळ नाहिये."
" तो फोन करत नाहीतर तू कर ना? तू का आखडून दाखवते आहेस?"
" पडतं नेहमी बाईनेच घ्यायचं का?"
" बाईने नाही.. ज्याला सुखसमाधान आणि मुख्य म्हणजे ते नातं हवं आहे त्याने पडतं घ्यायचं."
" बरं. करते नंतर फोन. मला ना आता चीज सँडविच खावेसे वाटते आहे. जाऊया का?"
" लगेच.." इकडे सानवी आणि पृथा सँडविच खायला गेल्या तिकडे अनिरुद्ध सानवीच्या घराखाली पोहोचला.
" विरेन, तू आणि राधा खालीच थांबा. मी बघतो सानवी घरी आहे का? मग बोलावतो तुला." अनिरुद्ध आणि विरेनचे ठरल्याप्रमाणे अनिरुद्ध म्हणाला.
" म्हणजे सानवी घरी नसेल तर आपण त्यांच्या घरी जायचेच नाही का? काय त्या शहरातल्या पद्धती." राधाने नाक मुरडले.
" वहिनींचे आईबाबा आत्ताच आजारातून उठले आहेत म्हणून म्हणतो आहे तो. आपण तुम्हाला जे खरेदी करायचे होते ते खरेदी करायला जायचे का?" विरेन मध्ये बोलला.
" नको.. आपण यांची वाट बघत इथेच बसूयात." राधा नाराजीने म्हणाली. अनिरुद्ध हळूहळू चालू लागला. त्याच्या मनात गोंधळ सुरू होता. सानवी ऐकून घेईल का? ऐकून घेतलं तरी, तिचे आईबाबा तिला पाठवतील का आपल्यासोबत? त्याने दरवाज्याची बेल वाजवली. शोभाताईंनी दरवाजा उघडला.
" तू इथे काय करतो आहेस?" दरवाजात उभ्या राहूनच त्या बोलल्या.
" आई, आत नाही का येऊ देणार?" अनिरुद्धने विचारल्यावर नाईलाजाने त्या बाजूला झाल्या. "सानवीला बोलवाल का? मला तिच्याशी बोलायचे आहे."
" सानवी, तुझ्याशी बोलणार नाही." पेपर वाचत बसलेले प्रदीपराव म्हणाले.
" का?"
" तू समजतोस काय स्वतःला? तुझी हिंमत कशी झाली तिच्या अंगावर हात उगारायची?" प्रदीपराव रागाने थरथरत होते.
" बाबा, माझी चूक झाली. रागात हात उचलला गेला माझा."
" आम्ही आमच्या मुलीला मानाने जगवलं, मोठं केलं ते कोणाच्या हातचा मार खायला नाही."
" बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर. परत असं होणार नाही. एक संधी द्या मला." अनिरुद्ध कळवळून बोलत होता पण प्रदीपरावांना त्याची दया येत नव्हती.
" कसली संधी द्यायची? उद्या ती तुझ्यासोबत गेली आणि तुला परत राग आला तर मग काय जीव घेशील तिचा? तुला दुसरी बायको मिळेल रे.. पण आमची लेक एकुलती एक आहे. आम्ही काय करायचं?" प्रदीपरावांचे बोलणे ऐकून अनिरुद्धला आता राग आला.
" बाबा, याचा अर्थ तुम्ही तिला परत पाठवणारच नाही का?"
" तू माझ्याशी आवाज चढवून बोलतोस? नाहीच पाठवणार जा. आता येतील ते घटस्फोटाचे कागदच."
" माझे आईबाबा बरोबर बोलत होते, तुम्हाला सानवीचे लग्नच करायचे नव्हते. तुम्हाला ती तुमच्यासोबतच रहायला हवी होती. यासाठी बळी दिलात तुम्ही माझा. घटस्फोटाचे कागदच हवे आहेत ना? तुम्ही कश्याला त्रास करून घेता? मी देतो पाठवून."
" अनिरुद्ध, तुला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे?" दरवाजात विरेन, राधा आणि पृथासोबत उभ्या असलेल्या सानवीने डोळ्यात प्राण आणून विचारले. तिला बघून अनिरुद्ध गडबडला. आता या क्षणी तिला जवळ घेऊन तिच्या ओठांवर त्याच्या प्रेमाची मोहर उमटवायची त्याची इच्छा होत होती. पण पाठीमागे असलेले चार डोळे त्याला खुपत होते.
" मला नाही.. तुझ्या आईबाबांना विचार. आणि तुझे जे काही ठरेल ते मला कळव. मी वाट बघतो." अनिरुद्ध उठून जायला निघाला. त्याला हळू हळू चालताना बघून सानवीच्या ह्रदयाचा ठोका चुकला. विरेन अनिरुद्धचा हात धरून घराबाहेर पडला. हे काय चालले आहे हे न समजून गोंधळलेली सानवी हा ताण सहन न होऊन चक्कर येऊन खाली पडली.
सानवीचे आईबाबा पाठवतील तिला अनिरुद्धच्या घरी की तिला घ्यायला लावतील घटस्फोट? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा