नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग १९
मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध सानवीला घ्यायला येतो तर प्रदीपराव त्याचा अपमान करतात. आता बघू पुढे काय होते ते.
"विरेन, आधी राधाला तिच्या घरी सोडू आणि मग तू मला सोड." अनिरुद्ध डोळे न उघडता म्हणाला.
" नको.. आधी तुम्हाला घरी सोडतो. मी काकूंशी बोलते मगच घरी जाते." राधा मध्येच बोलली.
" काही गरज नाही काकूंशी बोलायची. मला दोनदा येजा करावी लागेल. त्यापेक्षा मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो आणि मग आम्ही घरी जातो." राधा हिरमुसून बसली. त्याकडे लक्ष न देता विरेनने गाडी तिच्या घराकडे घेतली. त्याने बाजूच्या सीटवर बसलेल्या अनिरुद्धकडे बघितले. सानवीच्या घरातून निघाल्यापासून तो गप्प बसला होता. काहीतरी वादळ खदखदत होतं त्याच्या मनात. खरंतर तो वर जायच्याआधी तिथे काय झाले होते त्यालाच ठाऊक. अनिरुद्ध सानवीच्या घरी जाताच सानवी तिथे आली होती. विरेनला बघून खुश झालेली ती सोबत असलेली मुलगी राधा आहे हे बघून मात्र निराश झाली होती. दोघांनाही घरी चला असा आग्रह करून तिने वर नेले तेव्हा त्यांच्या कानावर अनिरुद्धचा 'घटस्फोटाचे कागदच हवे आहेत ना? तुम्ही कश्याला त्रास करून घेता? मी देतो पाठवून?' हेच शब्द ऐकू आले होते. सानवीला आणायला गेलेला अनिरुद्ध असं का बोलला याचा विचार करून विरेनच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं. राधाचे घर आले म्हणून विरेनने गाडी थांबवली.
" निघते मी." राधाने अनिरुद्धला सांगितले.
अनिरुद्धने डोळे उघडले. एकवार राधाकडे बघितले. सगळी शक्ती एकवटली आणि बोलायला सुरुवात केली.
अनिरुद्धने डोळे उघडले. एकवार राधाकडे बघितले. सगळी शक्ती एकवटली आणि बोलायला सुरुवात केली.
" राधा, तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे मला माहित नाही, माहीत करून घ्यायचेही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव माझे सानवीवर प्रेम आहे आणि तिच्यावरच राहिल. मी तर तुला सल्ला देईन की माझ्यासारख्या लग्न झालेल्या पुरूषाचा विचार करण्याऐवजी दुसर्या कोणाचा तरी विचार कर. आणि हो सानवीच्या घरी जे काही तू पाहिलंस ते फक्त आपल्यातच ठेवलंस तर फार उपकार होतील." अनिरुद्ध हात जोडत राधाला म्हणाला. विरेनने गाडी अनिरुद्धच्या घराच्या दिशेने वळवली.
" आता तरी बोलशील?" विरेनने विचारले.
" एका चुकीची एवढी मोठी शिक्षा विरेन?" अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी होते.
" कसली चूक? कसली शिक्षा?"
" सानवी गेली ती मी तिच्यावर हात उगारला म्हणून. कधी कधी बाबा आईवर हात उगारतात. आपल्या आजूबाजूलाही आपण बघतोच की रे. त्या दिवशी सानवी आईला प्रत्युत्तर करत होती. मला ते पटलं नाही. माझाही हात वर झाला. सानवी इथून गेल्यावर मला माझी चूक समजली. त्याच चुकीची माफी मागण्यासाठी मी गेलो होतो तर तिच्या बाबांनी थेट घटस्फोट घ्यायला सांगितला. आमचं एकमेकांवरचं प्रेम, आम्ही एकत्र घालवलेले क्षण सगळे मातीमोल का रे? मी एकदा फक्त हात उचलला तर म्हणे मी तिचा खूनही करू शकतो? खरंच? एवढा दुष्ट आहे का रे मी? आणि सानवीसुद्धा हे ऐकून काहीच बोलली नाही? खरंच वाया गेलं का रे माझं प्रेम?" अनिरुद्ध विरेनच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. जवळपास महिनाभर झालेला सानवीचा विरह, स्वतःचा झालेला अपघात आणि आज लग्न तुटेल की काय अशी निर्माण झालेली परिस्थिती.. त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं सगळं.
" अनिरुद्ध, सांभाळ स्वतःला." विरेन अनिरुद्धची समजूत काढत म्हणाला.
" कसं सांभाळू? अरे काही महिनेच झाले आहेत आमच्या लग्नाला आणि लगेच ही अवस्था? मी कल्पनाही करू शकत नाही सानवीशिवाय राहण्याची. आणि माझं बाळ जर खरंच या जगात येणार असेल तर त्याच्याशिवाय सुद्धा." अनिरुद्ध बोलत असतानाच विरेनला पटकन काहीतरी आठवलं.
" अरे, ऐक ना.. वहिनींच्या घराखाली त्या आम्हाला भेटल्या. आम्ही सोबत आहोत म्हणून त्यांची मैत्रिण निघून गेली. वहिनींनी तिच्या हातून कसलीतरी फाईल घेतली. त्यातून एक कागद खाली पडला. तो त्यांना देईपर्यंत त्या पुढे निघून गेल्या होत्या. आणि नंतर जे काही झालं त्या भानगडीत माझ्या काहीच लक्षात राहिलं नाही. तो कागद मी तसाच खिशात ठेवला. हा घे तुझ्याकडे ठेव." विरेनने खिशातून तो कागद काढला. तो डॉक्टरांच्या फाईलमधला सानवीची माहिती लिहिलेला कागद होता.
" काय सांगितलं असेल रे डॉक्टरांनी?" अनिरुद्धला काळजी, उत्सुकता आणि खूप काही वाटत होते.
" फोन करून विचारूयात का?" विरेनने विचारले.
" हो पण सांगणार काय?"
" सांगूयात की हरवलेली फाईल सापडली म्हणून." विरेनने सुचवले.
" आणि ते आपल्याला सांगतील? तुला चढली नाही ना?" अनिरुद्धने विचारले.
" प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? गाजराची पुंगी.. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली." बोलता बोलता विरेनने सापडलेल्या कागदावरील नंबरवर फोन लावायला सुरुवात केली सुद्धा.
" हॅलो.. हा डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा फोन आहे ना?"
" हो.. काय काम आहे?"
" ते मला एक फाईल सापडली आहे. तुमच्या डॉक्टरांचा पेशंट आहे बहुतेक." विरेनने फोन लाऊडस्पीकरवर ठेवला होता. अनिरुद्ध त्यांचे संभाषण ऐकत होता.
" भरपूर पेशंट येतात आमच्याकडे. तुम्ही नाव सांगा पटकन. तसेही क्लिनिक बंद व्हायची वेळ झाली आहे."
" अच्छा.. काहीतरी सानवी म्हणून नाव आहे. आणि आजचीच तारीख देखील आहे." रिसेप्शनीस्टला सकाळी डॉक्टरांची खाल्लेली बोलणी आठवली. तिच्या तोंडून पटकन निघून गेले,
" अच्छा ती ॲबॉर्शनवाली?" तो शब्द ऐकताच विरेनने फोन कट केला. त्याने अनिरुद्धकडे बघितलं. त्याची उरलीसुरली आशा धुळीला मिळाली होती.
" सानवीला बाळ नको आहे.. तिला माझे बाळ नको आहे. म्हणजे तिला मी पण नको आहे. तिला घटस्फोट हवा आहे ना? देईन मी. प्रेम म्हणजे फक्त घेणं नसतं, देणंही असते. दाखवून देईन मी तिला." अनिरुद्ध भकासपणे बोलत होता आणि त्यावर काय बोलावे हे न सुचलेल्या विरेनने गाडी चालवायला सुरुवात केली.
अनिरुद्धने घरात पाऊल ठेवताच माधवराव कडाडले.
" झालं मनासारखं? आलात आमची अब्रू वेशीला टांगून?"
" काय झाले बाबा?" अनिरुद्ध अजिबात बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
" काय झालं? तुमची लाडकी बायको तुम्हाला घटस्फोट देणार म्हणे? याचसाठी मी म्हणत होतो राधाशी लग्न करा. आता घ्या घटस्फोट. आमच्या सात पिढ्यात कोणी असं केलं नव्हतं." माधवरावांचा आवाज टिपेला पोहोचला होता. "त्यांच्याकडून कागद येण्याआधी आपल्याकडून कागद गेले पाहिजेत. समजलं?"
" तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा." निराश अनिरुद्ध खालमानेने आपल्या खोलीत गेला.
" बाबा, तुम्ही काही बोललात अनिरुद्धला?" सानवीने प्रदीपरावांना विचारले.
" मी कश्याला काय बोलू?" प्रदीपराव नजर चुकवत म्हणाले.
" कारण त्याने माझ्यावर उगारलेला हात तुम्हाला जास्त खटकला होता." सानवी शांतपणे बोलत होती.
" हो.. खटकलं होतं, खटकणार. तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे आम्ही तुला. त्याला त्याची चूक दाखवून देणं गरजेचंच होतं."
" पण बाबा घटस्फोट? माझा विचार केलात तुम्ही?"
" त्यात काय विचार करायचा? या अश्या माणसासोबत राहण्यापेक्षा वेगळी हो. सुखी होशील." शोभाताई म्हणाल्या.
" बरं.. मी सुखी होईन ही. पण माझं बाळ? ते होईल सुखी त्याच्या बाबाशिवाय?" सानवीने विचारताच शोभाताई आणि प्रदीपराव स्तब्ध झाले.
" गप्प का बसलात? द्या ना उत्तर.. बाबाशिवाय माझं बाळ राहू शकेल का?"
" सानवी, तू ???" शोभाताईंनी विचारले.
" हो.. तीच टेस्ट करायला गेले होते. आले तर घरात हे सगळं. मला जगू दे ना माझं आयुष्य. ठरवू दे ना काय करायचं ते. झाले आहे मोठी मी. किती वर्ष पंखाखाली ठेवाल मला?" सानवी त्राग्याने म्हणाली.
" तुला आमच्या प्रेमाचा त्रास होतो आहे?" दोघांनीही अविश्वासाने सानवीला विचारले.
" तुमच्या प्रेमाचा नाही.. अतिप्रेमाचा. पण तुम्ही हे समजून घेत नाही की जसं तुमचं माझ्यावर प्रेम आहे तसंच अनिरुद्धचंही आहे. चुकला तो, मान्य आहे मला. पण मला रहायचं आहे त्याच्यासोबत. घ्या ना समजून मलाही." सानवी रडत म्हणाली.
" आमचं चुकलं. आम्ही तुला विचारायला हवं होतं. आता तू म्हणत असशील तर त्याची माफी मागतो." प्रदीपराव अपराधीपणे म्हणाले.
" तुमची मान खाली झालेली मला नाही चालणार. मी सोडवते माझ्या संसारातला गुंता. पण तुम्ही तो वाढवू नका म्हणजे झालं." सानवी म्हणाली.
नमस्कार.. काल मी फेसबुकवर एक मेसेज केला होता की कोणीतरी ही कथा माझी परवानगी न घेता वापरते आहे. तर ती व्यक्ती आहे छाया मिसाळ. मी मुद्दाम हे या कथेच्या भागात लिहिते आहे कारण हा भाग त्या त्यांच्या व्हिडिओसाठी जेव्हा वाचतील तेव्हा तरी त्यांना समजेल. बौद्धिक संपदा नावाचा एक प्रकार असतो. मी लिहिलेली कथा ही फक्त तुम्हाला वाचण्यासाठी असते. त्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी नाही. कोणतीही कथा लिहिण्याआधी आम्ही विचारमंथन नावाचा प्रकार करतो. ती कथा कशी मांडायची यापासून त्यातील पात्रांचे स्वभाव, त्यांची नावे काय ठेवायची इथपर्यंत. कथेवर दिवसभर येताजाता विचार केल्यानंतर ती कथा लिहून काढायला एक ते दोन तास लागतात. आणि आम्ही केलेले हे कष्ट तुम्ही आमची परवानगी न घेता ती कथा दहा मिनिटात वाचून संपवून टाकता. सलाम तुमच्या या कार्याला. एवढेच जर व्हिडिओ बनवायचे असतील तर लेखकाची परवानगी घेऊन, त्याला योग्य तो मोबदला देऊन करायची हिंमत ठेवा. नसेल तर साहित्यचोरी करू नका. तुमच्यासारख्या लोकांमुळेच अनेक लेखक लेखन सोडून देतात.
सानवी आणि अनिरुद्धच्या संसारातला गुंता वाढेल की सुटेल बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा