Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग २०

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग २०

मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्धला असे वाटते आहे की सानवीला बाळ नको आहे आणि सानवीला वाटते आहे की अनिरुद्धला घटस्फोट हवा आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" अनिरुद्ध, प्लिज फोन उचल.. अनिरुद्ध प्लिज.." सानवी अनिरुद्धला फोन लावत होती. अनिरुद्ध.. तो मात्र दारूची बाटली घेऊन बसला होता. सानवी आणि बाळ आपल्या आयुष्यातून निघून जाणार ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. समोर फोन वाजत होता. त्याने एकदा दुर्लक्ष केले. परत फोन वाजला.

" सुखाने दारूही पिऊ देऊ नका. जगूही देऊ नका, मरायलाही देऊ नका." बडबडतच अनिरुद्धने फोन उचलला.

" हॅलो.."

" अनि..." सानवीने तिथून बोलायला सुरुवात केली.

" सानवी.. तू? तू फोन केलास? अरे व्वा. आपलं लग्न झालं आहे हे आठवलं तुला?"

" अनिरुद्ध, असं का बोलतो आहेस? मी केला ना तुला फोन? त्यादिवशी सुद्धा मी आले होते तिथे."

" अरे हो.. तू आली होतीस इथे. माझ्या आईवडिलांना काय काय बोललीस आणि गेलीस. मी गप्प बस सांगत होतो. पण नाही.. आपल्याला आपण कसे बरोबर आणि ते कसे चूक हे दाखवून द्यायचे होते ना.."

" अनिरुद्ध तू दारू पितो आहेस?" सानवीला संशय आला.

" दारू? नाही.. उपाय आहे हा. सगळी दुःख घालवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. जालिम रामबाण उपाय. आईवडिलांना स्वतःच्या मनासारखे वागायचे आहे, बायकोला स्वतःच्या आईवडिलांची काळजी आहे. आणि मी? माझी तर कोणाला काहीच पडलेली नाही. मला मन आहे, भावना आहेत पण नाही. तुला माहिती आहे सानवी.. तू इथून निघून गेलीस आणि विरेनने मला सांगितले की मी बाबा होणार आहे."

" तुला समजलं ते??" सानवीला धक्का बसला होता.


" अश्या गोष्टी लपून रहात नाही. खूप खुश झालो होतो मी. तुला घ्यायलाही येणार होतो पण माझी गाडी घसरली, मी पडलो, मला लागलं. मी रोज तुझ्या फोनची वाट बघायचो.. पण तू फोन नाही केलास. मी विरेनच्या मोबाईलवरून तुझी चौकशी करायचो. तुला एकदाही.. एकदाही विरेनला मी कसा आहे, असं विचारावंसं वाटलं नाही का ग?" अनिरुद्ध बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून सानवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.

" अनि.. तू खूप दारू प्यायला आहेस. आपण तू शुद्धीवर असल्यावर बोलूयात का?"

" अरे हो.. मी विसरलोच होतो. तुला दारू आवडत नाही ना. चुकून हात उगारला गेला तर त्याची माफी ही मागू न देता एवढी मोठी शिक्षा देते आहेस तू मला. आता याच्यासाठी काय शिक्षा आहे?"

" शिक्षा मी तुला दिली की तू देतो आहेस? तू तरी मी तुझ्या घरातून निघाल्यावर चौकशी केलीस का माझी?"

" सानवी.. भांडण नको ना. तसंही तुला जे हवं आहे ते तू करणारच. तुला तर साधं मला विचारावं किंवा सांगावंसही वाटलं नाही." आपलं बाळ सानवीला नको आहे हे आठवून अनिरुद्धच्या डोळ्यातून पाणी आलं.

" भांडण मलाही नको आहे.. म्हणूनच तर तुला फोन केला ना. तर तू दारूच्या नशेत बोलतो आहेस."

" अहंकाराच्या नशेपेक्षा दारूची नशा बरी." अनिरुद्धचे दारूच्या नशेतले बोलणे ऐकवेनासे झाल्याने सानवीने फोन कट केला. ते बघून अनिरुद्ध खिन्नपणे हसला.

" चेहरा बघायचा नाही, आवाजही ऐकायचा नाही. हेच का ते प्रेम?" वैफल्याने त्याने दारूचा ग्लास फेकून दिला. तो आवाज ऐकून माधवराव आणि ज्योतीताई दोघेही अनिरुद्धच्या खोलीत आले. दारूच्या नशेत बडबडणारा अनिरुद्ध बघून ज्योतीताईंनी रडायला सुरुवात केली.

" वाट लावली त्या मुलीने माझ्या लेकाच्या आयुष्याची."

"उद्या बघतच राहील ती. मगाशीच वकिलांशी बोललो आहे मी. आतापर्यंत कागदपत्र तयारही झाली असतील. उद्या सकाळपर्यंत त्यांच्या हातात पडतील. मग मजा येईल." माधवराव ज्योतीताईंना समजावत म्हणाले.

" पण अनिरुद्ध स्वीकारेल हे सगळं?"

" त्याला स्वीकारावंच लागेल."


रात्रभर सानवी तळमळत होती. अनिरुद्धचे बोलणे आठवून रडत होती. ती जाताच त्याने परत दारू प्यायला सुरुवात केली होती. दारू पिऊन वाटेल तसं बोलत होता. आपण जर तिकडे गेलो आणि त्याने दारू पिऊन रागाच्या भरात हात वगैरे उचलला तर? उद्या तो शुद्धीवर आला की सगळं बोलून घेऊ. असा नव्हता माझा अनि.. त्याला सतत मी समोर हवी असायची. एकेका स्पर्शासाठी तडफडत असायचा.. आणि आता तोच समोरही येत नाहीये. बाळं होणार आहे, हे समजल्यावर पण त्याला आनंद नाही झाला. त्याला नक्की बाळ हवं आहे की नको? काय करु मी म्हणजे माझं आयुष्य सुरळीत होईल. विचार करता करता कधीतरी रात्री सानवीचा डोळा लागला. सकाळी जाग आली ती बेलच्या आवाजाने. सानवी उठून बाहेर आली तर तिचे बाबा सही करून रजिस्टर घेत होते.

" एवढ्या सकाळी?" सानवीला आश्चर्य वाटले.

" तुझ्या नावाचे आहे." पाकिटावरचे नाव वाचत प्रदीपराव म्हणाले.

" माझे? मला कोण आणि काय पाठवणार?"

" वकिलाचा पत्ता दिसतो आहे." प्रदीपराव म्हणाले. सानवीने पुढे येऊन ते रजिस्टर उघडले आणि वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता ती तिथेच सोफ्यावर बसली.

" सानवी.. काय झाले?" घाबरलेल्या शोभाताईंनी विचारले.

" बघतो.. घटस्फोटाचे कागदपत्र आहेत." प्रदीपराव नजर फिरवत म्हणाले.

" काय?? काल आपण फक्त बोललो तर लगेच यांनी कागद बनवले सुद्धा? मी तर म्हणते तयारच असतील फक्त पाठवून दिले लगेच." शोभाताई रागाने म्हणाल्या.

" मी बोलतो माधवरावांशी. बघतो बोलून काही मार्ग निघतो का ते?" प्रदीपराव म्हणाले.

" काही गरज नाही बाबा. त्यांना घटस्फोट हवा आहे ना.. मी देते." सानवी डोळे पुसत म्हणाली.

" अग पण बाळ??" शोभाताई म्हणाल्या.

" त्याने जबाबदारी झटकली म्हणून मी झटकणार नाही. माझं बाळ आहे.. मी वाढवीन." निर्धाराने सानवी म्हणाली. तिने आत जाऊन परत अनिरुद्धला फोन लावला. तो ही झोपेतच होता. त्याने फोन उचलला.

" बाळाबद्दल समजूनही तू हे पाऊल उचललंस?" सानवीने येणारा हुंदका आवरत विचारले.

" मी? मी काय केले?" गोंधळलेल्या अनिरुद्धला समजतच नव्हतं सानवी काय म्हणते आहे ते.

" माझ्या हातात आत्ता तू पाठवलेले घटस्फोटाचे कागद आहेत."

अनिरुद्धला आठवलं. काल तो घरी आल्यावर माधवराव चिडलेले. तो सानवीची समजूत घालायला जाणार तोच त्याला सानवीला नको असलेलं बाळ आठवलं. तिला जर माझ्यासोबत रहायचं नसेल तर मी का तिच्यावर जबरदस्ती करू? हा विचार त्याच्या डोक्यात आला.

" तुलाच संबंध ठेवायचे नाहीत ना माझ्याशी? मग..." अनिरुद्ध बोलताना चाचरला.

" तुझी इच्छा. त्या कागदपत्रांवर लिहिल्याप्रमाणे लग्नाला वर्षही न झाल्यामुळे समुपदेशकाची एक मिटिंग ठेवली आहे. इच्छा नसली तरीही त्याला सामोरं जावंच लागणार आहे. मग तेव्हा भेटू. एवढी तयारी करून ठेवली असशील असं वाटलं नव्हतं." सानवीने ह्र्दयावर दगड ठेवत फोन ठेवला. तिथे अनिरुद्धच्या डोळ्यातही पाणी होते. भांडणानंतर सानवीने समोरून दोनदा फोन केले होते. काल रात्री तो काय बोलला हे जरी त्याला नीट आठवत नसलं तरी आता तिच्या आवाजातली वेदना त्याला स्पर्शून गेली. बाबांनी खरंच घटस्फोटाचे कागद बनवले का? हे विचारण्यासाठी तो आवरून खाली गेला. तिथे राधाही आली होती. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो माधवरावांकडे गेला.

" बाबा, तुम्ही सानवीकडे काही पेपर पाठवलेत?"

" तू मला जाब विचारणार?" माधवरावांनी विचारले.

" मला हो की नाही तेवढं सांगा."

"तूच म्हणालास ना , तुम्हाला हवं ते करा. मग मी केलं. मला चहा द्या. मला निघायचं आहे."

" काल मी जे काही बोललो ते रागाच्या भरात होतं.. आणि.." समोर चहा घेऊन उभी असलेल्या राधाला बघून अनिरुद्ध अजून चिडला. " एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल की सानवी सोडून मी दुसर्‍या कोणासोबत राहीन तर ते शक्य नाही. सख्खे आईवडील आहात ना? मग का माझ्या संसारातल्या अडचणी सोडवण्याऐवजी वाढवता आहात? एवढाच जर मी नकोसा झालो असेन तर मी जातो माझ्या फ्लॅटवर. इथे राहून त्रास करून घेण्यापेक्षा तिथे मित्रांमध्ये राहतो. ते समजून तरी घेतील." अनिरुद्ध निर्वाणीचे म्हणाला.


समुपदेशकाच्या ऑफिसमधली सानवी आणि अनिरुद्धची भेट शेवटची असेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all