Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग २१

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग २१


मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध आणि सानवी दोघांचेही गैरसमज कमी न होता वाढतच चालले आहेत. आता बघू पुढे काय होते ते.


" सानवी.. झाले का आवरून?" शोभाताईंनी आवाज दिला. सानवी खोलीबाहेर आली तर दोघेही तयार होऊन बसले होते.

" तुम्ही कुठे चाललात?" सानवीने त्यांना आश्चर्याने विचारले.

" कुठे म्हणजे? तुझ्यासोबत. तू एकटी कुठे जातेस? तो तुला परत काही बोलला तर?" प्रदीपराव म्हणाले.

सानवीला समजू न देता प्रदीपरावांनी माधवरावांना फोन केला होता. त्यांचं फोनवरचं तुटक बोलणं ऐकून हा घटस्फोट अटळ आहे हे त्यांना समजले होते. बाळाचा विषय त्यांच्याजवळ काढायचा नाही हे सानवीने शपथ घालून सांगितल्याने ते काहीच बोलले नाहीत. फॅमिली कोर्टात सानवीला कसलाही त्रास होऊ नये एवढीच त्यांची इच्छा होती. मेडिकल कारण देऊन सानवीने वर्क फ्रॉम होमच चालू ठेवले होते. घरी राहून तब्येत सुधारण्यापेक्षा तिची तब्येत खालावतच होती. बाळाचं कारण देऊन शोभाताई तिला जबरदस्ती खायला लावायच्या पण खोल गेलेले डोळे, त्याभोवतीची काळी वर्तुळं मात्र लपत नव्हती. कशी होती आणि काय झाली आहे हिची अवस्था? दोन क्षणात प्रदीपरावांच्या मनात विचार येऊन गेले.

" बाबा, काही होत नाही तिकडं. आणि आता मला कणखर व्हायलाच हवं. तुम्ही दोघेही नका येऊ. तुम्ही परत आजारी पडलात तर मला झेपणार नाही." हसण्याचा प्रयत्न करत सानवी म्हणाली.

" अग पण.." शोभाताईंनी बोलायचा प्रयत्न केला.

" जाऊ दे तिला. काही लागलं तर कळव. आम्ही दोघेही येतो लगेच." प्रदीपराव शोभाताईंना शांत करत म्हणाले. सानवी निघाली. तिने वकील वगैरे काहिही केले नव्हते. अनिरुद्ध म्हणेल तिथे सही करायची.. बस.. एवढेच तिने ठरवले होते. ती कोर्टाच्या इथे पोहोचली. समोरच अनिरुद्ध उभा होता. तिला बघून तो पुढे आला पण जागीच थबकला. सानवीसुद्धा त्याला बघतच राहिली. वाढलेली दाढी, अस्ताव्यस्त केस, चुरगळलेले कपडे.. हा असा का आला आहे? सानवीच्या ह्रदयात गलबललं. सानवी त्याच्या दिशेने गेली.

" तू आता इथे?" सानवीने विचारले.

" तुझी अर्धा तास लवकर येण्याची सवय माहिती आहे. एकटी असशील तर वैतागशील म्हणून.." अनिरुद्ध बोलता बोलता थांबला. सानवी काहीच न बोलता त्याच्याकडे बघत होती.

" लवकर आलोच आहोत तर चहा घेऊयात?" अनिरुद्धने विचारले.

" चल.." सानवीने होकार देताच अनिरुद्धने पुढे हात केला, तो हात मागे घेणार तोच सानवीने त्याचा हात धरला. दोघेही जवळच्या हॉटेलमध्ये गेले.

" चहाच सांगू ना?" अनिरुद्धने विचारले.

" मी चहा सोडला आहे. ज्यूस चालेल." सानवी नजर चोरत म्हणाली.

" सोडलास म्हणजे?" आश्चर्याने अनिरुद्धने विचारले.

" चहाने खूप ॲसिडिटी वाढली म्हणून डॉक्टरांनी चहा बंद करायला सांगितला."

" ओह्ह.." अनिरुद्धने ऑर्डर दिली. खूप दिवसांनी अनिरुद्ध समोर बसला आहे हे बघून सानवीच्या मनावरचा ताण उतरला होता. पुढे जे होणार आहे ते होईलच पण हा क्षण तिला सोडायचा नव्हता. बहुतेक त्यामुळेच तिला आज भूक लागल्यासारखे झाले होते. सानवीचा ज्यूस आणि अनिरुद्धची कॉफी आली. तोपर्यंत दोघेही अनोळखी असल्यासारखे बसले होते. ज्यूसचा घोट घेताच सानवीची भूक अजून वाढली.

" अनि.. अनिरुद्ध.. मला भूक लागली आहे."

" काय खाशील? सँडविच मागवू का?"

" नको.. तुला आवडत नाही ना.. इडलीसांबार? तू कंपनी देणार असशील तर.."

" इडली सांबार तुला आवडत नाही ना?" अनिरुद्धला धक्क्यावर धक्के बसत होते.

" पण आता मला खावंसं वाटतं आहे. तू कंपनी देशील?" क्षणभर अनिरुद्धला लग्नाआधीची सानवी आठवली. येताजाता त्याच्यावर हक्क गाजवणारी.

" मागवतो.." त्याने परत ऑर्डर दिली.

" कशी आहेस?" धीर करून अनिरुद्धने विचारले.

" कशी दिसते आहे?" सानवीने हसायचा प्रयत्न केला. अनिरुद्धला तिच्या चेहर्‍यातला फरक जाणवला. मनात तिच्याविषयी काळजी दाटून आली.

" तू स्वतःकडे लक्ष देत नाहीस का? चेहरा बघ कसा झाला आहे?" अनिरुद्धच्या आवाजात काळजी जाणवत होती.

" लक्ष न देऊन कसे चालेल? स्वतःची काळजी घ्यावीच लागते.. इच्छा असो वा नसो. शेवटी त्याची जबाबदारी आहे ना?" सानवी म्हणाली. आईबाबा दोघं न म्हणता सानवी त्याची का म्हणते आहे हे अनिरुद्धला समजले नाही. पण तरीही मनातला एक प्रश्न त्याला विचारायचा होता म्हणून त्याने तिकडे दुर्लक्ष केले.

" आतातरी खुश आहेस?" त्याने हळूच विचारले.

" तुला दिसते? खुश तर तू असशील.. घटस्फोटाचे कागद पाठवून दिलेस, आता भरपूर दारू प्यायची.. राधा असेलच तिथे." सानवी कडवटपणे बोलली.

" कागद मी नाही पाठवले. बाबांनी पाठवले. मी फक्त काही बोललो नाही कारण तुलाच मी नको होतो. म्हणून तर बाळाला.." अनिरुद्धला पुढचे शब्द उच्चारणे सुद्धा जड झाले होते. त्याच्या डोळ्यात पाणी आले.

" बाळाला.. बाळाला काय अनिरुद्ध?" सानवीने डोळे बारीक करत विचारले.

" काही नाही.."

" मला ऐकायचे आहे." सानवी हट्टाने बोलली. "तुला माझी शपथ."

" तुला मी आणि माझं बाळ नको होतं म्हणूनच तू डॉक्टरकडे गेली होतीस ना.. ॲबॉर्शन करायला." अनिरुद्ध बोलून गेला. सानवीने डोक्यावर हात मारला.

" तुला कोणी सांगितलं?"

" तुला काय करायचंय?" खरंतर सानवीच्या या पवित्र्यावर अनिरुद्ध गडबडला. त्याला वाटलं होतं त्याच्या या प्रश्नाने सानवीला अपराधी वाटेल. पण ती तर उलटंच वागत होती.

" पटकन सांगतोस?" सानवीचा आवाज चढला.

" तू ज्या हॉस्पिटलमध्ये गेली होतीस तिथे फोन करून विचारले."

"तुला कसं माहित मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले होते ते?"

" विरेनला तुझा केसपेपर सापडला होता. त्यावर त्या डॉक्टरांचा नंबर होता."

" मूर्ख, बेअक्कल..." सानवीने अनिरुद्धला मारायला सुरुवात केली. ते बघून ऑर्डर घेऊन आलेला वेटरही घाबरला.

" सानवी.. स्टॉप इट.. लागतं आहे. मारायला काय झालं?" अनिरुद्धने तोंडावर हात ठेवत विचारले.

" मूर्ख माणूस.. गेले काही दिवस तुझ्यामुळे मला आणि माझ्या बाळाला किती त्रास झाला आहे तुला माहिती तरी आहे का?" सानवी रडत म्हणाली.

" मॅम, हे इथे ठेवू का?" घाबरलेल्या वेटरने हळूच विचारले. अनिरुद्धने त्याला खूण केली. वेटरने पटकन प्लेट्स ठेवल्या आणि तो तिथून निघून गेला. वेटर जाताच अनिरुद्धची ट्यूब पेटली.

" मला आणि माझ्या बाळाला म्हणजे? तू ॲबॉर्शन नाही केलेस?" अनिरुद्धचा विश्वास बसत नव्हता.

" मी तुझ्यासारखी डोक्यावर पडले आहे का? माझ्या बाळाला स्वतःच्या हाताने.. पण एकक्षण आला होता की जेव्हा वाटलं होतं आपलंच नातं डळमळीत आहे. मग त्या बाळाला या जगात आणण्यात काय अर्थ? पण डॉक्टरांनी माझी समजूत काढली. आणि मी ॲबॉर्शन करायला नाही फक्त विचारायला गेले होते."

" मग त्या बयेने मला असं का सांगितलं? मी तर तिला तुझं नावही सांगितलं होतं." अनिरुद्धला आता त्या बाईचा राग आला होता. सानवीने डोक्याला थोडा ताण दिला. तिला आठवलं ती बोलत असताना मध्ये आलेली रिसेप्शनीस्ट.

" कदाचित तिने अर्धवट ऐकलं असावं. पण तुला अक्कल नाही का? एवढी नाजूक गोष्ट.. तुला मला विचारून खात्री करून घ्यावीशी वाटली नाही का?" सानवीचे रडणे थांबले होते. पण रागाचा पारा चढत चालला होता.

" मला वाटलं.. आईबाबा बोलले, मी हात उगारला म्हणून तुला माझ्यासोबत रहायचे नाही. त्यात तुझे बाबा म्हणाले घटस्फोट हवा. मग कोणालाही असं वाटणारच ना की तुला हे बाळ नको आहे." अनिरुद्ध अपराधी स्वरात बोलत होता.

" तुला वाटलं... व्वा.. बाळ म्हणजे काय ताटातली भाजी आहे? नको आहे म्हणून काढून टाकायला?" सानवीच्या डोळ्यात बोलता बोलता पाणी आले. ते बघून अनिरुद्ध पुढे झाला.

" मी अजूनही तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत." त्याने हलक्या हाताने तिचे डोळे पुसले. तिला पाणी प्यायला दिले.

"अच्छा.. म्हणजे तुला नाही माझ्या बाळाला इडलीसांबार खायचं आहे का? माझ्यासारखं होणार आहे." अनिरुद्ध हसत म्हणाला. पण हसता हसता त्याला अचानक काहीतरी आठवलं आणि तो गप्प झाला.


का झाला असेल अनिरुद्ध अचानक गप्प. दोघांचं भांडण नक्की मिटेल ना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all