Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. अंतिम भाग

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग २२

मागील भागात आपण पाहिले की समुपदेशनासाठी गेलेले सानवी आणि अनिरुद्ध एकमेकांशी बोलतात. आता बघू पुढे काय होते ते.


" काय झालं? बोलता बोलता का थांबलास?" इडली खाता खाता सानवीने विचारले.

" माझी चूक झाली म्हणून तू मला मारलंस. पण तू नाही का लगेच सही करून कागदपत्र पाठवले?" आता चिडायची वेळ अनिरुद्धची होती.

" मी तुला दोनदा काहीतरी सांगायला आले होते. पहिल्यांदा तर आईबाबा बोलले आणि दुसऱ्यांदा तू त्या राधाला घेऊन काय आलास, घटस्फोट काय मागितलास.. नंतर फोन केला तर दारू पिऊन तू नको तेवढी बडबड केलीस. मलाही वाटणारच ना, तुला माझी गरज नाही म्हणून. "

" तू असा विचार करूच कसा शकतेस? तुझ्याविना काय अवस्था झाली आहे बघ माझी." अनिरुद्ध गंभीरपणे बोलला.

" अनि.. जर मी आज लवकर आले नसते तर तू खरंच माझ्यापासून वेगळा होऊन दुसरं लग्न केलं असतंस?" सानवीच्या डोळ्यात पाणी होतं.

" एवढंच ओळखलंस मला? चुका माणसाकडूनच होतात ना? मला मान्य आहे मी खूप चुकलो.. पण तुझ्याशिवाय नसतो राहू शकलो. गेले काही दिवस मी माझ्या मित्रांसोबत राहतो आहे." अनिरुद्ध म्हणाला.

" का??" सानवीच्या डोळ्यात आश्चर्य होतं.

" कारण आईबाबा जे वागत होते ते मला पटत नव्हतं. तुझ्यासमोर मी त्यांना उलटं बोलू शकत नव्हतो त्याचा कुठेतरी त्यांनी गैरफायदा घेतला. तू जाताच राधाचं घरात येणं मला नाही आवडलं. दुसरा उपाय नव्हता माझ्याकडे."

" पाठी वळून बघितलं की मलाही असं वाटतं की मी पण बाबा बरे झाल्यावर लगेच घरी परत यायला हवं होतं. तेव्हाच आले असते तर एवढं रामायण झालं नसतं."

" जे झालं ते झालं.. आता ते विसरून पुढे तर जायला हवं ना? कसं जायचं ते तू सांग."

" मी सांगायचं म्हणजे? तुला काही मत नाही का?"

" मी आजपर्यंत तुझ्या मताच्या पलिकडे कधी गेलो आहे?" अनिरुद्ध मस्का मारत म्हणाला. सानवीने समाधानाने डोळे बंद करून घेतले.

" तुला सांगू अनिरुद्ध.. मी किती तरी रात्री जागून काढल्या आहेत फक्त तुझे हेच शब्द ऐकण्यासाठी. जीव तळमळायचा तुझ्याशी बोलण्यासाठी. पण दुसरं मन नाही म्हणायचं.. असं वाटायचं की आपण आपलं ओझं तुझ्यावर का टाकायचं? म्हणून फोन करायला पण नको वाटायचं. पण आता नाही. अनि, मला नाही रहायचं तुझ्याशिवाय. मला आपला छानसा संसार हवा आहे." आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता अनिरुद्धने सानवीला जवळ घेतले.

" तुला जे आणि जसं हवं आहे तसंच होईल." तेवढ्यात सानवीचा फोन वाजला. प्रदीपरावांचा फोन होता.

" सानवी, पोहोचलीस का?"

" हो बाबा.." सानवीने डोळे पुसले.

"तू रडते आहेस का? तो परत तुला काही बोलला का?" प्रदीपरावांनी धास्तावून विचारले.

" नाही बाबा.."

" मग झाले तुमचे कौन्सिलिंग?"

" होईल थोड्या वेळातच. ठेवू का फोन? मी बाजूच्या हॉटेलमध्ये जरा खायला आले आहे."

" निघालीस की कळव. आम्हाला काळजी वाटते." सानवीने फोन ठेवला.

" आता?"

" आधी जाऊन ते सगळं कॅन्सल करून यायचं. मग आपण वेगळं राहूयात. तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आईवडिलांपासून दूर." अनिरुद्ध म्हणाला.

" अरे पण.." सानवीने बोलायचा प्रयत्न केला.

" मी विचार करूनच बोलतो आहे. आपण दोघेही एकुलते एक म्हणून आपल्या आईवडिलांचा आपल्याबाबतीतला ओव्हर पझेसिव्हनेस हेच कारण आहे आपल्यामधील दुराव्याचे. मला सांग बहिणभावंडांची भांडणे होतात तेव्हा ते मारामारी नाही करत? आताही तू मला दहा लोकांसमोर मारलंस.. त्याचा बाऊ होत नाही. पण माझा हात वर झाला.. जे पूर्णतः चुकीचंच आहे त्याचे कारण देऊन तुझ्या आईवडिलांनी दरी वाढवली. तुला तुझ्या आईवडिलांची काळजी घेणं गरजेचं आहे हे समजून न घेता माझ्या आईवडिलांनी दरी वाढवली. मग आता काय करायचे?" अनिरुद्ध बोलत होता.


" आम्हाला माफ करायचं.." माधवरावांचा आवाज आला. दोघांनीही चमकून त्यादिशेने बघितले. समोर माधवराव, प्रदीपराव, ज्योतीताई आणि शोभाताई उभ्या होत्या.

" तुम्ही सगळे इथे??" अनिरुद्धने आश्चर्याने विचारले.

" हो.. आमच्या चुकीचे अपराधात रूपांतर होऊ नये म्हणून. " शोभाताई खालमानेने बोलल्या.

" पण अचानक?" सानवीने विचारले.

" विरेनने आमचे डोळे उघडले. काल त्याने आम्हाला खूप समजावलं. आमचं काय आणि कसं चुकलं हे दाखवून दिलं. आमची ही थोडी घाईच झाली तुला समजून न घेण्यात. खरंतर विकत आणलेल्या रोपालाही थोडे दिवस आहे त्या परिस्थितीत ठेवावे लागते. मग माणसाला वेळ लागणारच.. हेच फक्त समजलं नाही. तेच आजूबाजूच्या गोष्टी ऐकून अनिरुद्ध घरजावई होईल का ही भिती.. खूप चुकीचे वागलो आम्ही."

" आम्हीसुद्धा.. खरंतर जसं तुम्ही एकटे राहता तशी सवय लावून घ्यायला पाहिजे होती. पण मायेचे पाश सुटत नाहीत." शोभाताई म्हणाल्या.

" हो ना.. पण आता नाही हो अडकवणार तुम्हाला या सगळ्यात. जिथे रहायचे तिथे रहा.. पण सुखाने रहा." ज्योतीताई म्हणाल्या.

" असं कसं? या दिवसांत तर वहिनीला घरच्यांची जास्त गरज आहे.. मग कुठेही कश्या राहतील त्या?" गाडी पार्क करून आलेला विरेन म्हणाला.

" म्हणजे?" ज्योतीताईंनी आश्चर्याने विचारले.

" म्हणजे आपण आजी होणार आहोत." शोभाताईंनी सांगितले.

" खरंच?" माधवराव आणि ज्योतीताई दोघांना झालेला आनंद दिसून येत होता.

" हो.." म्हणत सानवी लाजली.

" मग आधी का नाही सांगितलं हे?"

" बाबा, तुम्ही जर फक्त होणाऱ्या बाळासाठी मला स्वीकारले असते तर ते मलाच पटले नसते." शांत पण ठामपणे सानवी म्हणाली.

" ते ही आहेच.. पण आता तुम्ही एकटे राहण्याचा विचार करू नका. या दिवसात सोबतीला कोणी असलेलं बरं." माधवराव म्हणाले.

" हो.. तू सासरी राहिलीस तरी आमचं काही म्हणणं नाही. आम्ही नाही ओ तुला सतत बोलावणार." शोभाताई डोळ्याला पदर लावत म्हणाल्या.

" तू जरी माहेरी राहिलीस तरी आमचे काही म्हणणे नाही. बाळ आणि तू सुखरूप असलीस म्हणजे झालं." ज्योतीताई म्हणाल्या.

" एवढा समजूतदारपणा आधी दाखवला असता तर?" अनिरुद्ध पुटपुटला.

" आता दाखवत आहेत तर नशीब समज. नाहीतर बसावं लागलं असतं हातात दारूची बाटली घेऊन त्या राधाला बघत." विरेन अनिरुद्धच्या कानात म्हणाला. अनिरुद्धने डोळे वटारून विरेनकडे बघितले. पण त्याला भीक न घालता विरेन बोलू लागला.

" मी एक सुचवू का? म्हणजे पटत असेल तर बघा.. सध्या काही दिवस तुम्ही गावी रहा. तसेही तुमचं वर्क फ्रॉम होम चालूच आहे. नंतर मग काही दिवस इथे रहा."

" वर्क फ्रॉम होम कायमचं नसणार आहे. कधी ना कधी तरी संपणारच. त्यानंतर काय?" सानवीने विचारले.

" तुम्ही फार पुढचा विचार करता राव. आता असलेल्या क्षणाचा आनंद घ्या ना." विरेन म्हणाला.

" असं नाहीये भाऊजी.. पुढचा विचार करावाच लागतो. कारण ज्या गोष्टींचा आपण विचार करत नाही त्याच गोष्टी दत्त म्हणून पुढे उभ्या राहिल्या की वाद होतात. गेले काही महिने हे वाद बघितल्यावर नको वाटतं आहे." सानवी म्हणाली.

" मी एक सुचवू?" प्रदीपराव म्हणाले.

" बोला की.. विचारताय काय?" माधवराव उत्तरले.

" माझ्या रिटायरमेंटला दोनचारच वर्ष उरली आहेत. माझा विचार होता की तुमच्या गावात एखादं घर घ्यायचं, थोडी मिळत असेल तर शेती करायची. तुम्ही तिथे आहातच. एकमेकांना आपली सोबतही होईल. हे दोघे इकडच्या घरात राहतील."

" बाळ झाल्यावर?" ज्योतीताईंनी विचारले.

" बाळंतपण गावीच करू. मग एक महिना तुम्ही एक महिना आम्ही असं करू. हेच आहे ना मनात?" शोभाताई म्हणाल्या

" हो.. पण तुझी नोकरी?"

" जिथे तुम्ही तिथे मी.."

" ठरलं तर मग.. तुम्हाला चालेल का पण?" दोघांच्याही आईवडिलांनी विचारले.

" ज्यामुळे वाद होणार नाहीत असा कोणताही उपाय चालेल.." अनिरुद्ध आणि सानवी दोघेही म्हणाले. आणि मोठ्यांना नमस्कार करायला वाकले.
" नांदा सौख्यभरे.." चौघांनीही आशीर्वाद दिला.

" नांदू द्या मात्र सौख्यभरे.." अनिरुद्ध आणि सानवी दोघेही म्हणाले. ते ऐकून सगळे हसू लागले.


नांदू द्या ना सौख्यभरे.. सर्वप्रथम कथेवर केलेल्या प्रेमासाठी सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद. कथेचा विषय हा आजूबाजूच्या घटनांवरून सुचलेला. माझ्या आधीची पिढी ही सहसा नवर्‍याला उलटं न बोलणारी.. सगळे त्रास बर्‍यापैकी सहन करणारी. अगदी कमी प्रमाणात होत असलेले घटस्फोट. माझी पिढी, नवर्‍याच्या अरे ला कारे करणारी. अगदीच नाईलाज झाला तर घटस्फोट घेणारी. पण आत्ताची पिढी? वर्षाच्या आत घटस्फोट? एवढं नक्की काय होत असावं की थाटामाटात लग्न केलं जातं आणि लगेचच घटस्फोट. बऱ्याचदा वाचण्यात येतं की मुलीची आई मुलीच्या संसारात लुडबूड करते म्हणून हे प्रमाण वाढलं आहे. मुलीकडचे म्हणतात सासूच्या स्वभावामुळे मुली नांदत नाहीत. फक्त एवढंच कारण असू शकेल? कोणत्याही सुनेला नवीन घरी गेल्यावर वेळ हवा असतो. तो वेळ न देताच तिच्याकडून भरमसाठ अपेक्षा ठेवल्या जातात. कधी अर्थाचा अनर्थ काढला जातो.. एखादं सुंदर नातं बहरण्याआधीच सुकून जातं. संयम.. जो आजकाल कोणाकडेही आढळत नाही. प्रत्येकाला घाई असते.. मुलाच्या आईला सुनेला आपल्या साच्यात घडवण्याची, मुलीच्या आईला मुलीला त्रास होत नाही ना हे बघायची. थोडा वेळ द्या ना त्या दोघांनाही. त्यांचं पटत नसेल, चुकत असेल तर नक्की बोला.. पण त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत ना. याचा अर्थ हा नाही की त्यांची प्रत्येक गोष्ट ऐका. पण कुठेतरी त्यांना जाणीव होऊ देत काय चूक काय बरोबर याची. काही जणांना म्हणणे पटेल काही जणांना नाही. सानवी अनिरुद्ध सारखं प्रेम असेल तर कधीनाकधी गैरसमज दूर होऊन ते एकत्र येतील ही. पण नाही येऊ शकले तर एकापेक्षा जास्त आयुष्यांची परवड होईल. त्यामुळेच पालकांना सांगावेसे वाटते, नांदू द्या ना त्यांना सौख्यभरे.. अडीअडचणीत पाठिशी उभे रहा पण त्यांच्यासाठी अडचण होऊ नका.

अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all