नाण्याची एक बाजू भाग १
जलदकथा लेखन स्पर्धा नोव्हेंबर २०२५
विषय :दुरून डोंगर साजरे
जलदकथा लेखन स्पर्धा नोव्हेंबर २०२५
विषय :दुरून डोंगर साजरे
समिक्षा सोप्यावर हातात चहाचा कप घेऊन गहन विचार करत बसलेली होती. साधना ताई तिच्यासमोर येऊन बसल्या तरी तिचं लक्ष नव्हतं. साधना ताईंनी समिक्षा समोर चुटकी वाजवली.
“समू, कुठे हरवली आहेस?”
साधना ताईंच्या आवाजाने समिक्षा विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.
“आई, तू कधी आलीस?”
“जेव्हा तू कसला तरी विचार करत होतीस ना, तेव्हाच इथे येऊन बसले. तू एवढा कसला विचार करत होतीस?” साधना ताईंनी विचारले.
“आई, काही लोकं किती नशीबवान असतात, त्यांना सगळं सहजासहजी मिळत आणि इकडे आपण शंभर रुपये मिळण्यासाठी सुद्धा किती संघर्ष करावा लागतो.” समिक्षाने आपल्या हातातील कप समोरील टीपॉय वर ठेवत उत्तर दिले.
“काही लोकं म्हणजे कोण हे मला जरा सांगशील का?” साधना ताईंनी तिच्याकडे भुवया उंचावून बघितले.
“आई, तुला माझ्या शाळेत असणारी कावेरी आठवतेय का?” समिक्षाने साधना ताईंकडे बघून विचारले.
“कावेरी मराठे.” साधना ताईंनी थोडा डोक्याला ताण दिला.
“हो, तीच. आई, तुझी स्मरणशक्ती दांडगी आहे.” समिक्षाच्या डोळ्यात आईबद्दल कौतुक होते.
“असणारच, मी दररोज चार बदाम भिजवून खाते. तुलाही खायला सांगते, पण तू ऐकत नाहीस.” साधना ताई गालातल्या गालात हसून म्हणाल्या.
“बदाम पुराणावर आपण नंतर कधीतरी बोलू. तर मी कावेरी मराठे बद्दल सांगत होते. आई, शाळेत असताना मी पायी चालत जायचे, तर ती सायकल वर शाळेत यायची. अकरावीला गेल्यावर बाबांनी मला सायकल घेऊन दिली, तर तिच्या बाबांनी तिला स्कुटी घेऊन दिली होती. माझी त्यावेळी त्याबद्दल काहीही तक्रार नव्हती.
मी मन लावून अभ्यास करायचे आणि ती टंगळमंगळ करत काठावर पास व्हायची. आई, आज तिची आणि माझी अचानक भेट झाली. मी बसची वाट बघत स्टॉप वर उभी होते.
माझ्यासमोर एक सफेद रंगाची स्कोडा येऊन उभी राहिली. त्यात पुढील सीटवर ड्रायव्हर आणि मागच्या सीटवर कावेरी बसलेली होती. कावेरीने मला लिफ्ट दिली.
सहा महिन्यांपूर्वी तिचं लग्न एका बिझनेसमन सोबत झाले. हातात महागडा फोन, ब्रँडेड पर्स, गळ्यात दागिने तिचा थाट पाहण्यासारखा होता. मला तिची असुया वाटली नाही, पण मनात एकच विचार आला की, तिच्या वाट्याला संघर्ष का आला नसेल?” समिक्षाने तिच्या मनात असलेलं सगळं काही बोलून दाखवल.
“समू, तू याबद्दल कधी कावेरी सोबत बोलली आहेस का? तिला या सगळ्याबद्दल काय वाटत? हे जाणून घेतलं आहेस का?” साधना ताईंनी विचारले.
“नाही.” समिक्षाचे उत्तर.
साधनाताई पुढे म्हणाल्या,
“ मग एकदा या सगळ्याबद्दल तिला काय वाटत हे विचार. तू हे सगळं बाहेरून बघत आहेस, पण प्रत्यक्षात काय आहे हे कावेरीच तुला सांगू शकेल.
“ मग एकदा या सगळ्याबद्दल तिला काय वाटत हे विचार. तू हे सगळं बाहेरून बघत आहेस, पण प्रत्यक्षात काय आहे हे कावेरीच तुला सांगू शकेल.
समू, कोणाचाही विचार करताना फक्त बाहेरची बाजू बघू नये, आतमध्ये काय आहे हे समजल्यावरच आपला तर्क लावावा. डोंगर दुरून दिसताना खूप छान वाटतो, पण त्याच्यावर चढायला गेल्यावरच तो किती कठीण आहे हे समजत. दुरून डोंगर साजरे हे म्हणतात ते काही खोटं नाहीये.
कावेरीच्या आयुष्यातील सत्य जेव्हा तुला समजेल तेव्हा तुलाही माझं म्हणणं पटेल बघ.” साधना ताई.
“आई, तू ना प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करत असतेस. मला कावेरी बद्दल जे वाटलं ते तुला सांगितलं. तू म्हणते तसं कावेरीच्या आयुष्य असेल असं मला वाटत नाही. आज तिच्या चेहऱ्यावरून ती खूप आनंदी दिसत होती. आता तू म्हणतेस म्हणून मी तिच्या बेस्ट फ्रेंड अंजली सोबत या विषयावर बोलेल. बघू आपल्यातील कोण बरोबर असेल?”
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
