Login

नाण्याची दुसरी बाजू भाग २

Every Story Has Two Sides
नाण्याची दुसरी बाजू भाग २

साधना ताईंसोबत बोलल्यापासून समिक्षाच्या डोक्यात कावेरी बद्दल टिकटिक सुरू होती. आपली आई चुकीचा विचार करते हे तिला पटवून द्यायचे होते.

कावेरीची मैत्रीण अंजलीचा फोन नंबर शोधायला समिक्षाने सुरुवात केली.

“हाय रागिनी, समिक्षा बोलतेय.”

“बोला मॅडम, इतक्या दिवसांनी या गरीबाची आठवण कशी काढली?” रागिनी.

“तू आणि गरीब, काहीही. तुझ्याकडे अंजलीचा नंबर आहे का?” समिक्षाने विचारले.

“कोण अंजली?” रागिनीचा प्रश्न.

“कावेरी मराठेची मैत्रीण.”समिक्षा.

“ती अंजली होय. तिचा नंबर तुला कशाला पाहिजे?” रागिनी.

समिक्षाने तिला आई व तिच्यात झालेलं बोलणं सविस्तरपणे सांगितले.

“ओके, म्हणजे तुला काकूंना चुकीचं ठरवायचं आहे तर.” रागिनी.

“रागिनी, तू पण कावेरीला ओळखत आहेच ना, ती कधी काही दुःखात असेल असं तुला वाटत का? तिच्याकडे स्टेशनरी सुद्धा एकसे बढकर एक असायची.” समिक्षा.

“समिक्षा, काकूंनी त्यांचे अनुभवाचे बोल सांगितले. तिच्याही आयुष्यात काहीतरी दुःख असेलच ना. काकू म्हणतात तसं दुरून हे डोंगर साजरे असूच शकते. तुझी शंका दूर करायची असेल तर मी तुला अंजलीचा नंबर पाठवते. तू शहानिशा करून घे.” रागिनीने सांगितले.

रागिनीने समिक्षाला अंजलीचा नंबर पाठवला. अंजलीला समिक्षाने फोन लावला व तिच्यात व आईमध्ये झालेलं बोलणं सांगितलं.

सगळं ऐकल्यावर अंजली म्हणाली,

“समिक्षा, या विषयावर आपण भेटून बोलूयात. फोनवर बोलण्यासारखा हा विषय नाहीये. एक काम कर. तू मला दोन तासांनी अभिनव नगरच्या कॉर्नरला भेट. आपण तेथून कावेरीच्या घरी जाऊयात. काही गोष्टी तुला समजतील आणि काही मी नंतर सांगेलच.”

समिक्षा अंजली सोबत कावेरीच्या घरी जायला तयार झाली. अंजलीच बोलणं ऐकून समिक्षा थोडी कन्फ्युज झाली होती. अंजलीला नेमकं काय सांगायचं होत हे तिला समजलं नाही.

“आई, मी अंजली सोबत कावेरीच्या घरी जाणार आहे.” समिक्षाने आईला सांगितले.

“तू जाऊन ये म्हणजे पुन्हा तू स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करणार नाहीस आणि ते कसे सुखी आणि तू कशी दुःखी हे तुला जाणवणार नाही.” साधना ताई म्हणाल्या.

“आई, हल्ली तू बोलताना खूप कठीण शब्द बोलायला लागली आहेस. मला त्याचे अर्थ काही समजत नाही.” समिक्षा.

“अलीकडे मी ईरावरील मराठी कथा वाचत आहे. त्यावर एकसे बढकर एक कथा असतात, त्या कथा वाचून माझे विचार आणि भाषा बदलली आहे. तू पण वाच, तुलाही त्या कथा नक्की आवडतील.” साधना ताईंनी तिला आपल्या मोबाईल मधील ईराब्लॉगिंग हे अँप दाखवले.

“मी आता पहिले कावेरीची कथा ऐकून येते, मग ईरावरील कथा वाचते.” समिक्षा घरातून बाहेर पडली.

समिक्षाचा अंदाज खरा ठरेल की साधना ताईंचा? बघूया पुढील भागात….