नाण्याची एक बाजू भाग ३ (अंतिम)
अंजली समिक्षाची वाट बघत अभिनव नगरच्या कॉर्नरला उभी होती.
“हे काय समिक्षा, मी किती वेळेपासून तुझी वाट बघत होते.” अंजली थोडी चिडली होती.
“सॉरी यार, ते निघताना आई बोलत बसली होती तर थोडा उशीरच झाला.” समिक्षा.
“तुला कावेरी बद्दल जाणून घ्यावं वाटलं हे आवडलं मला, पण काकू चूक आहेत हे नाही आवडलं, असो काही वेळात तुला सगळं कळेलच.”
अंजली व समिक्षा कावेरीच्या घरी गेल्या. कावेरी मोठ्या बंगल्यात रहायला होती. गेटवर सिक्युरिटी गार्ड होता.
अंजलीने त्याला तिची व समिक्षाची ओळख सांगितली. सिक्युरिटी गार्डने फोन करून शहानिशा केली व त्या दोघींना आत सोडण्यासाठी गेट उघडले. सिक्युरिटी गार्ड स्वतः त्यांना आत घेऊन गेला. लॉनवर वेताच्या खुर्च्या व टीपॉय होता. तिथे त्यांना बसण्यास सांगितले. सिक्युरिटी गार्ड निघून गेला.
“आपल्याला घरात जाऊ का दिले नाही?” समिक्षाने अंजलीकडे बघून विचारले.
“आता हे तू समिक्षाला विचार.” अंजलीने उत्तर दिले.
काही वेळाने एक बाई त्यांच्यासाठी पाणी व कॉफी घेऊन आली.
“कावेरी अजून आली नाही.” अंजली तिच्याकडे बघून म्हणाली.
“मॅडम येतीलच.” हे बोलून ती बाई निघून गेली.
“ह्यांच्या घरातील कामगारांना ड्रेस कोड दिसतोय.” समिक्षा.
“हो.” अंजली.
त्यांची कॉफी पिऊन होईपर्यंत कावेरी तिथे येऊन बसली.
“तुम्ही दोघी न कळवता अशा अचानक का आल्या?” कावेरीने दोघींकडे बघितले.
“मैत्रिणीच्या घरी यायला कळवून यावं का लागत?” समिक्षा अगदी सहज म्हणाली.
“हे तुझ्या मैत्रिणीच घर नाहीये. अंजली, हीच ठीक आहे, पण तुला तर सगळं ठाऊक आहे ना तरी…” कावेरी हळू आवाजात बोलत असली तरी तिचा सूर चढलेला होता.
“समिक्षाला रिऍलिटी दाखवून दयायची होती म्हणून.” अंजलीने कावेरीला सगळ्याची कल्पना दिली.
कावेरीने डोक्याला हात लावला.
“समिक्षा, मी तुला आता इथे जास्त काही सांगू शकणार नाही. अंजली तुला सगळं सांगेल. फक्त एवढंच सांगेल की, काकू जे बोलत आहेत ते खरं आहे. दुरून डोंगर साजरे. माझं आयुष्य बाहेरून बघताना जेवढ भारी वाटत आहे ना तेवढंच ते जवळून अतिशय त्रासदायक आहे. मी कशी जगत आहे ते मलाच माहीत.
स्वतःच्या आयुष्याची तुलना कधीच कोणासोबत करू नकोस. श्रीमंत घर, गाडी, ड्रायव्हर हे लांबून बघताना खूप छान वाटत, पण जवळ आल्यावर ते आयुष्य कस आहे हे कळत. तुला सगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य तरी आहे, मला तेही नाहीये.
तुला लिफ्ट दिल्यावर घरी येऊन मला दहा मिनिटे स्पष्टीकरण द्यावे लागले.” कावेरी बोलत असताना तिचा मोबाईल वाजला.
“चला आपली बोलण्याची वेळ संपली आहे. पुन्हा इथे येण्याआधी मला एक फोन कर. शक्यतो इथे येऊच नका.” कावेरी घराच्या दिशेने निघून गेली.
समिक्षा मात्र आश्चर्याने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.
“समिक्षा, आपण पण निघुयात.” अंजली व समिक्षा दोघी गेटमधून बाहेर पडल्या.
अंजली काही न बोलता समिक्षाला एका जवळच्या कॉफी शॉपमध्ये घेऊन गेली. ग्रील सँडविचची ऑर्डर तिने दिली.
“समिक्षा, तुला काय बोलावे हे समजत नाहीये ना, तर ऐक. कावेरी सायकलने शाळेत यायची, पण तिला शाळा आणि घर सोडून कुठेही जाण्याची मुभा नव्हती. तिच्या वडिलांनी तिच्या सायकलला जीपीएस ट्रॅकर लावलेला होता. आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड असलो तरी आजवर कावेरी कधीही माझ्या घरी आलेली नाही.
तिने गाड्यावरची पाणीपुरी सुद्धा खाल्लेली नाही. तिला ते स्वातंत्र्य नव्हतंच. आपल्या सारख्या सर्वसाधारण घरच्या मुली तिच्या मैत्रिणी असणं हे तिच्या आई वडिलांना मान्य नव्हत आणि सासरच्यांना तर अजिबातच मान्य नाहीये.
आपल्याला घरात येऊ दयायला ते कधीच परवानगी देणार नाही. कावेरी माहेरी गेली की मग तिथल्या लँडलाईन वरून मला फोन करते. सासरी असल्यावर तिची इच्छा असली तरी तिला मैत्रिणींशी बोलता येत नाही.
श्रीमंत घरात जन्म घेणे तिच्यासाठी श्राप ठरला आहे.” अंजलीने तिला थोडक्यात सांगितले.
“अंजली, हे सगळं किती भयानक आहे. अशी श्रीमंती असण्यापेक्षा आपली परिस्थिती चांगली आहे. निदान आपल्याला हवं ते करता तरी येत. आईचे अनुभवाचे बोल अगदी बरोबर आहेत. श्रीमंतीचा डोंगर दुरूनच साजरा बरा.” समिक्षाने आपली प्रतिक्रिया दिली.
घरी जाऊन आईला सगळं खरखर तिने सांगितलं व आईला सॉरी बोलली. इथून पुढे आईच्या अनुभवाचे बोल ऐकायचे तिने ठरवले व लांबून काही कितीही छान दिसत असल तरी जवळ गेल्यावर ते कसे असेल याचा अंदाज न बांधण्याचा विचार तिने ठरवला.
समाप्त.
©®Dr Supriya Dighe
