नराधम ( भाग एक )
विषय: आशेचा किरण
ही गोष्ट माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकाची आहे. त्यांचे आणि माझे घरचे संबंध असल्यामुळे मला पहिल्यापासून त्यांची सगळी हकीकत माहित आहे. मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो. स्वभावाने ते अत्यंत मनमिळाऊ होते. कोणाच्याही मदतीला ते धावून जात. परंतु आर्थिक दृष्ट्या ते थोडे कमजोर असल्याने नातेवाईक त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करीत. फक्त आपल्या कामासाठी त्यांचा बरोबर वापर करून घेत . काम झाल्यानंतर त्यांच्याकडे सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष करीत.
दुर्दैवाने त्यांच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. खरोखर अशी वेळ कोणावरही येऊ नये. सुरुवातीला त्यांच्या छातीमध्ये एक न दुखणारी छोटीशी गाठ झाली. ही गाठ न दुखणारी आणि छोटीशी असल्याने त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्या नंतर त्यांना थोडा थोडा ताप येऊ लागला. काही दिवसांनी हे गाठ वाढली आणि दुखायला लागली. ताप तर काही केल्या उतरत नव्हता. एकदिवस त्या गाठीला तोंड फुटलं आणि त्यातून सतत एक विचित्र वासाचा चिकट स्त्राव वाहायला लागला. तेव्हा ते डॉक्टरांकडे गेले.
डॉक्टरांना काय वाटले कुणास ठावूक. त्यांनी पेशंटला टाटा हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं. तिथं त्यांच्या बऱ्याच टेस्ट केल्या गेल्या. दुर्दैवाने ब्रेस्ट कॅन्सरचे निदान केले गेल.
भल्या भल्या लोकांची कॅन्सरचं नाव काढल्या बरोबर गाळण उडते . त्यात ते दोघेच होते. त्या नवरा बायकोला मानसिक आधार द्यायला दुसर कोणीच नसल्यामुळे ते दोघं खूप घाबरून गेले.
काय करावे त्या सूचना डॉक्टरांनी त्यांना दिल्या. मुख्य म्हणजे न घाबरता योग्य उपचार करण्याची सल्ला दिला. कारण कोणत्याही आजारात जर पेशंट मनाने खचला तर त्याला बरं करणे हे डॉक्टरांच्या हातात राहत नाही. त्यामुळे हिम्मत ठेवून आजाराला समोर जाणं ही महत्त्वाची प्रमुख गोष्ट असते.
त्यासाठी अगोदर त्यांना केमोथेरपी करण्याचा सल्ला दिला. त्या गोष्टीचा त्यांना प्रचंड त्रास झाला. दुखणं वाढतच चाललो होत. गाठीचा त्रास होतच होता. त्याबरोबर उलट्या, लूज मोशन व्हायला लागले.
बाह्य त्रास देखील खूप व्हायला लागला. मुख्य म्हणजे त्यांची भूक नाहीशी झाली होती. डोक्यावरचेच काय पण भुवयासकट अंगावरचे एकूण एक केस निघून गेले होते. त्यांच्या लांब सळसळत्या काळ्या केसांचा त्यांना खूप अभिमान होता. त्यामुळे ते केस गेले तेव्हा त्यांना खूप दुःख झालं .
केमोची संख्या वाढवली होती तरी देखील आजार आटोक्यात येत नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ब्रेस्ट रिमुव्ह करण्याचा सल्ला दिला. ही गोष्ट अत्यंत दुःखदायक होती. त्याच्याबद्दल बोलणं खूप सोपी गोष्ट आहे. परंतु जो पेशंट त्या परिस्थितीतून जातो. तेंव्हा त्याला जो मानसिक त्रास होतो त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. शेवटी जीवावर उदार होऊन त्यांनी ब्रेस्ट रिमुव्ह करण्याचा मार्ग निवडला.
त्यानंतर देखील त्यांना डॉक्टरांनी सांगितले की पूर्णपणे आजार मुळापासून नष्ट झालेला नाही. तेव्हा त्यांना जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत काही औषध बरेच दिवस घ्यावे लागतील. त्या गोष्टीला देखील ते तयार झाले.
ही ट्रीटमेंट करायला त्यांना बरीच आर्थिक तडजोड करावी लागली. स्वतःचं राहतं घर विकावं लागलं. दागिऱ्यांची मोडतोड करावी लागली. अनेक सामाजिक संस्थांकडून मदत घ्यावी लागली. काही नातेवाईकांनी उपकार केल्यासारखी त्यांना मदत केली.
आणि एक दिवस त्यांना एक जाहिरात दिसली.
( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी
लेखक: दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा