Login

नराधम ( भाग दुसरा )

काहीवेळा डॉक्टरांच्या रूपात आपल्याला आशेचा किरण दिसतो. पण हाच डॉक्टर जीव घ्यायला निघाला तर..


नराधम ( भाग दुसरा )

विषय: आशेचा किरण

त्यांना एका वर्तमानपत्र एक जाहिरात दिसली. जाहिरात अशी होती.

आजवर ऍलोपॅथी मध्ये कर्करोगावर शंभर टक्के इलाज उपलब्ध नाही. परंतु आयुर्वेदामध्ये या आजारावर खात्रीलायकपणे शंभर टक्के उपचार पद्धती उपलब्ध आहे. शिवाय हे उपचार करतांना  कोणतेही साईड इफेक्ट्स पेशंटवर होत नाही. कोणताही कर्करोग असलेला आणि कोणत्याही  स्टेजमध्ये असलेला कॅन्सर पेशंट या उपचार पद्धतीने पूर्णपणे बरा होतो. खरं म्हणजे मृत्यूच्या दारात तळमळत असलेल्या पेशंटसाठी ही बातमी म्हणजे संजीवनी होती.

मुंबईतल्या  उपनगरातल्या एका डॉक्टरने ती जाहिरात  दिलेली होती. डॉक्टर एमडी होते. पण आयुर्वेदाचा देखील त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला होता. अनेक पदव्या त्यांना मिळालेल्या होत्या. हजारो कॅन्सर पेशंट वर त्यांनी हे उपचार केलेले होते. आणि ते कल्पनेच्या पलीकडे यशस्वी झाले होते.

परदेशात देखील त्यांच्या या ज्ञानाचा गौरव केला गेलेला होता. त्यातल्या त्यात त्यांनी कॅन्सरवर विशेष संशोधन केले होते. आणि त्यांचा दावा होता की हा रोग त्यांच्या औषधामुळे मुळापासून नष्ट होऊ शकतो. फक्त काही दिवस त्यांची औषध न चुकता घ्यायची. आणि त्यांनी सांगितलेलं पथ्य पाणी काटेकोरपणे पाळायचं.

त्यानंतर त्या जाहिरातीमध्ये अनेक रुग्णांचे अनुभव सांगितलेले होते. या नातेवाईकांनी पाहिलं की डॉक्टरांनी बरे केलेले किती तरी रुग्ण सध्या ते असलेल्या परिस्थितीपेक्षा कितीतरी भयानक अवस्थेत होते.  त्यांची पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक होता. आणि आता ते सामान्य जीवन जगत होते.

  याशिवाय त्या डॉक्टरांना पंतप्रधानासकट अनेक मंत्र्यांनी सन्मानित केले होते. पंतप्रधान आणि अनेक मंत्र्यां सोबत त्या डॉक्टरांचे फोटो दिलेले होते. अनेक परदेशी नागरिकांसोबत देखील त्यांचे फोटो काढलेले होते. कित्येक मेडिकल कॉन्फरन्सेस मधे त्या डॉक्टरांनी आपले संशोधन सादर केलेले होते. कित्येक मेडिकल जर्नल मध्ये त्यांचे संशोधन प्रसिद्ध झालेले होते. कित्येक देशांनी त्यांच्या औषधांचे पेटंट कोट्यावधी रुपयात विकत घेण्याची तयारी दाखवली होती. परंतु आपण भारतीय आहोत याचा त्यांना अतिशय अभिमान होता.

त्यांना असे आढळून आले होते की कर्करोगावर आयुर्वेदामध्ये हमखास उपाय असणारी एक औषध प्रणाली आहे.  त्या प्रणाली वर त्यांनी अजून संशोधन करून त्यांच्या उपचारांना जागतिक मान्यता मिळवली होती. परंतु  हे ज्ञान बाहेरच्या जगात देऊन पैसे कमावण्यापेक्षा भारतातल्या जनतेची या रोगापासून मुक्तता करून सेवा करण्याचे त्यांनी ठरवले होते.

आजार बरा न झाल्यास पैसे परत करण्याची त्यांनी गॅरंटी दिली होती. डॉक्टर मुंबईला होते पेशंटला ट्रीटमेंट देण्याच्या आधी फक्त एकदा तरी त्यांना दाखवायची  गरज होती. त्यानंतर कोणीही औषध घेऊन गेला तरी चालणार होतं. जेव्हा त्या लोकांनी ही जाहिरात वाचली तरी त्यांना खूप आनंद झाला.

मुंबईला तसे केमोथेरपी साठी येतच होते. तर येता येता या डॉक्टरकडे जाऊन आयुर्वेदिक औषध घेतली असती तरी चाललं असतं. म्हणून त्यांनी विचार केला की ऍलोपॅथी ट्रीटमेंटच्या सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट देखील करावी. काय सांगावं कदाचित त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंट हा आजार मुळापासून नष्ट होऊन जाईल.

त्यांनी या थोडी कळ सोसून त्यांनी या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं .