नॅरेटीव्ह ! पार्ट 1

.
एक नऊ वर्षाची गोंडस मुलगी. पण तिच्या नेत्रांमध्ये अश्रू दाटले होते. ती रडत होती. कारण समोर तिच्या लहान भावाला पुरवले जात होते. ती मुलगी तिच्या लहान भावाला हलवत होती. उठवण्याचा प्रयत्न करत होती. कुणीतरी हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. मग जगभर तो व्हिडीओ व्हायरल झाला. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. कोण होती ती मुलगी ? आणि तिच्या भावाचा कशामुळे मृत्यू झाला होता ? पश्चिम आशियातील " वासव " प्रांतातले मुसाईद आणि वसाईद असे दोन देश. या दोन देशांमध्ये युद्ध चालू होते. दोन्ही देशांमध्ये मुसाईदी आणि वसाईदी या धर्माचे लोक राहत होते. ब्रिटिशांना " आधुनिक समस्यांची जननी " म्हणतात ते उगीच नाही. जिथे सूर्य मावळत नाही अश्या साम्राज्यावर राज्य केलेल्या ब्रिटिशांनी प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र करताना तिथे भांडणे लावली. सर्वत्र आगी लावून ब्रिटन आता एका कोपऱ्यात निवांतपणे बसला आहे. असो. तर धर्माच्या आधारावर ब्रिटिशांनी या वासव भूमीवरही विभागणी केली. पण दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता नांदली नाही. सातत्याने युद्धे झाली. अश्याच एका युद्धात मिसाईलच्या आक्रमणाने या मुलीने आपला लहान भाऊ गमावला. 


◆◆◆


पवनकुमार म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा नुकताच नियुक्त झालेला कॅप्टन. देशभर त्याच्याच नावाची चर्चा होती. बरेच जण त्याची तुलना महेंद्रसिंग धोनीसोबत करत होते. त्याला रात्री एक फोन आला.

स्क्रीनवर " पश्मिना " हे नाव झळकत होते. पवनने लगेचच तो फोन उचलला. 

" बोला वहिनी , इतक्या रात्री फोन केला. सर्व ठीक आहे ना ?" 

पश्मिना रडत होती. 

" ह्यांना समजवून सांगा प्लिज. त्यांनी आज पण मला मारहाण केली. "

" तुम्ही काळजी करू नका. मी उद्या शेहजादशी बोलतो. "

शेहजाद शेख हा भारतीय क्रिकेट संघात नवीनच दाखल झालेला बॉलर होता. न्यूज अँकर असलेली पश्मिना हिच्यावर त्याचे प्रेम जडले होते. म्हणून दोघांनी विवाह केला होता. आता मात्र दोघांचे संबंध बिघडले होते.


◆◆◆


" प्लिज , माझ्या घराला तोडू नका. मोठ्या मेहनतीने घर बांधले आहे. पाया पडते तुमच्या. " कविता विनवणी करत होती. 

आजूबाजूला लोक जमले होते. त्यांच्याही नेत्रात आसवे दाटली होती. पण बुलडोझर चालवणाऱ्याच्या पाषाण हृदयात किंचितही दयेचे पाझर फुटत नव्हते. कविताचा लहान मुलगा जो नुकताच चालायला शिकला होता तोही आईची ही अवस्था पाहून रडू लागला. माय-लेक असहाय अवस्थेत होते. अखेरीस त्या घरावर बुलडोझर चालवले गेले आणि ते घर पाडले गेले. कविताचा संसार उध्वस्त झाला होता. त्या धुळीच्या साम्राज्यात कपाळावर हात धरून कविता बसली. तिच्या डोळ्यातले अश्रू आटले होते. तिचा लहानगा मुलगा आईजवळ येऊन रडू लागला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हळहळले. कुणीतरी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.

◆◆◆

मुख्यमंत्रीने ट्विटरवर एका मुलीचे कौतुक केले. कारण त्या मुलीने तिच्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. " सायली " असे त्या मुलीचे नाव होते. सायलीच्या कॉलेजमध्ये " अर्णव " नावाचा मुलगा होता. अर्णव तिला त्रास द्यायचा. एकेदिवशी अर्णवने सायलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण सायली वाचली. तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

क्रमश...

🎭 Series Post

View all