Login

नॅरेटिव्ह ! पार्ट 3 ( अंतिम भाग )

.
काही वर्षे उलटली. मुसाईद लोकांचा वर्षातून एकदाच येणारा पवित्र सण आला. सर्व मुसाईदी लोक आनंदात होते. उत्साहात आपला सण साजरा करत होता. अचानक सीमावर्ती भागातून रॉकेटस येऊन धडकले. सर्वत्र गोंधळ उडाला. मग पॅराग्लायडरच्या सहाय्याने काही दहशतवादी मुसाईदांच्या भूमीवर उतरले. त्यांनी निरपराध लोकांवर बेछूट गोळीबार केला. कितीतरी लहान मुले , स्त्रिया आणि पुरुषांना ओलीस बनवून नेले. लगेचच मुसाईदच्या पंतप्रधानाने युद्ध घोषित केले. वसाईदांच्या भूमीवर रातोरात मिसाईल्स सोडले गेले. शाळा , कॉलेज , हॉस्पिटल हे देखील उध्वस्त झाले. सर्वत्र हाहाकार उठला. जगभर मुसाईद लोकांवर टीका झाली. ट्विटरवर " #जस्टीस फॉर वसाईद " ट्रेंड चालू लागला.

काही वसाईदी दहशतवादी पकडली गेली. पूर्वीच्याच अमेरिकन संपादकाने एका दहशतवादीची मुलाखत घेण्याचे ठरवले. जेव्हा तो दहशतवादी समोर आला तेव्हा संपादकाचे लक्ष दहशतवादीने गळ्यात घातलेल्या चांदीच्या लॉकेटकडे गेले. ते लॉकेट संपादकाला पूर्वी पाहिल्यासारखे वाटले. दहशतवादी बोलू लागला.

" मुसाईद लोकांचा दोष नाही. त्यांनी तर नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. आम्ही मात्र द्वेषच करत राहिलो. गेलेली जमीन बळकावण्यापेक्षा आहे तेवढ्या जमिनीत आम्ही स्वर्ग बनवू शकलो असतो. त्यांनी प्रचंड प्रगती केली. म्हणून त्यांना विश्वात आज भरपूर मान आहे. आम्ही मात्र आमच्या भावी पिढ्यांना वारसा म्हणून द्वेषच दिला. दहशतवादच दिला. बालपणीपासून माझ्या मनातही तेच विष पेरले गेले. वसाईद लोक हॉस्पिटलच्या खाली भुयार बनवून तिथे दहशतवादी लपवायचे. मुसाईद लोक रॉकेट टाकण्यापूर्वी आम्हाला पूर्वसूचना द्यायचे. पण वसाईद लोक दहशतवादी लोकांनाच मदत करायचे. जगाला वाटते की वसाईद लोक फार निरपराध आहेत. पण सत्य हेच आहे की आम्ही आमच्याच कर्माची फळे भोगत आहोत. जे पेराल तेच उगवेल. "


◆◆◆


पश्मिना शेहजादला भेटण्यासाठी त्याच्या हॉटेल रूममध्ये आली होती. 

" हे बघ , आपल्या वैयक्तिक गोष्टी तू बाकी क्रिकेटर्स आणि कमिटी मेम्बर्सला का सांगत आहेस ? त्यामुळे माझी इमेज खराब होत आहे. "

" कारण मला आपले नाते वाचवायचे आहे. "

" नाते ? सगळीकडे माझी बदनामी करून मी तुझ्यासोबत राहीन असे तुला वाटले तरी कसे ? मला घटस्फोट हवाय. "

" का ? उपभोगून झाले म्हणून सोडून देतोय. मी टिशू पेपर नाही की मला वापरून फेकून देशील. मला चांगलेच ठाऊक आहे की तुझे त्या टीव्ही अभिनेत्री इशितासोबत अफेअर सुरू आहे. "

" ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. "

" हेच संस्कार दिले होते का तुझ्या आईने तुला ?"

पश्मीना शेहजादच्या आईविषयी अभद्र बोलू लागली. शेहजादला रहावले नाही. त्याने पश्मिनाला गच्च पकडले.

" माझ्या आईविषयी काही बोलायचे नाही. "

पश्मिना रडू लागली. तिने आधीच सीसीटीव्ही कॅमेरा लपवून ठेवला होता. व्हिडीओ एडिट करून तिने तो सोशल मीडियावर पोस्ट केला. शेहजादविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. खरेतर पश्मिनाने फक्त पैश्यासाठी शेहजादसोबत विवाह केला होता. जेव्हा हवे तेवढे पैसे मिळत नव्हते तेव्हा ती शेहजादचा मानसिक छळ करू लागली. दोष नसतानाही त्याची चारचौघात बदनामी करू लागली. शेहजादचे करियर बरबाद झाले. त्याला पश्मिनाला प्रचंड रक्कम द्यावी लागली. दोघांचा घटस्फोट झाला.


◆◆◆


मुख्यमंत्रीची मुलाखत होती. रिपोर्टरने स्क्रीनवर एक फोटो दाखवला.

" सर , तुम्ही पाठवलेल्या बुलडोझरने या कुटूंबाला रस्त्यावर आणले आहे. तुम्ही नजर मिळवू शकता या कुटुंबाशी ?"

" हे बघा. या घरी राहणारा एक इसम ज्याचे नाव समीर होते तो दंगल करताना , दगडफेक-जाळपोळ करताना आढळला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्याची खात्री केली. मगच आम्ही बुलडोझर पाठवले. "

" पण सर मग समीरला अटक करा. त्याचे घर पाडून तुम्ही पूर्ण कुटुंबाला शिक्षा का देताय ?"

" त्याला खूपवेळा अटक झाली. राष्ट्रविरोधी लोकांमुळे तो वेळोवेळी सुटला आहे. आम्हाला खबर मिळाली आहे की त्याच्या घरातून अवैध सामान सापडले आहे. तो दारूगोळ्याची तस्करी करायचा. बंदूके विकायचा. त्याची पत्नीदेखील या सर्वांमध्ये सामील होती. "

" हे आरोप खरे आहेत की खोटे याचा निवाडा न्यायालय करेल. पण माझा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कुटुंबाची काय चूक होती ?"

" कुटुंबाला काहीच माहिती नसेल असे तुमचे मत आहे का ? जग इतकं धुतल्या तांदळासारखे नसते हो. मला माझ्या राज्यात शांतता हवीय. गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी माझी प्रतिमा कितीही मलिन झाली तरी चालेल. ते हलाहल विष मी हसत हसत ग्रहण करेल. " मुख्यमंत्री ठामपणे म्हणाले.

***

रविवार असल्यामुळे सायली एकटीच मुव्ही बघायला गेली होती. मूव्ही बघून बाहेर आल्यावर कुणीतरी तिचे अपहरण केले. तिला जेव्हा जाग आली तेव्हा समोर अर्णव उभा होता.

" आठवतोय मी ? दहा वर्षांपूर्वी तू माझ्यावर खोटा आरोप लावला होता. आज मी खरोखरच तुझा बलात्कार करणार आहे. आणि आपला व्हिडिओ व्हायरल करणार आहे. ये. " अर्णव जवळ जात म्हणाला.

" हे बघ. तू जर माझा बलात्कार केलास तर तुला शिक्षा होईल. " सायली रडत म्हणाली.

" ती तर आधीच झाली आहे. माझ्या कुटुंबाची सर्वत्र बदनामी झाली आहे. किती त्रास झाला आम्हाला. तू तर कधी कोर्टातही येत नव्हतीस. "

" अर्णव , मला माफ कर. मला प्रसिद्ध व्हायचं होत. म्हणून मी तुझा वापर केला. माझ्या आईची ही कल्पना होती. प्लिज मला माफ कर. "

सायलीने तिचा गुन्हा कबूल केला. लगेचच पोलीस आले आणि सायलीला अटक झाली.

****

हल्ली सोशल मीडियाच्या जगात आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक बातमी काही प्रमाणात खरी असली तरी ती बातमी ज्या दृष्टीकोनातून मांडली गेलीय तो दृष्टीकोन योग्य असेलच असे नाही. पडद्यामागून काही ठराविक प्रभावशाली लोक एक विशिष्ट विचारसरणी आपल्यावर लादत असतात. त्यासाठी उपलब्ध पुरावे , आकडेवारी वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. कुण्या एका विचारसरणीचे समर्थन करत नाहीये. पण लगेचच मत बनवण्यापूर्वी सत्य जाणून घेण्याचा आणि नाण्याची दुसरी बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न करावा. या चारही घटना सत्य परिस्थितीवर आधारित आहेत. सीमेवरच्या शत्रूंना ठार करणे सोपे आहे पण विषारी विचारसरणीला हरवणे कठीण आहे.