Login

नशीब झाडाचे

Nashib Zadache
नशीब. झाडाचे .©®विवेक चंद्रकांत

काही माणसाचे नशीब फुटके असते. तसेच एखाद्या झाडाचेही असते का? असावेच.... कारण मी स्वतः बघितले आहे.

आत्येभावाने नाशिकला गेलो होतो तेव्हा राय आवळ्याचे छोटेसे रोप दिले. सुदैवाने कारमध्ये गेलो होतो म्हणून ते सुखरूप घरी आले. आम्ही ते कंपाऊंडच्या बाहेर लावले. (, घराच्या मागच्या बाजूला, तिथे त्याला वाढायला मोकळी जागा मिळेल म्हणून.)

सुरुवातीला बरेच दिवस ते वाढेही ना सुकेही ना. आम्ही त्याला आठवणीने पाणी टाकायचो. कदाचित इथल्या मातीशी जुळवून घ्यायला वेळ लागत असावा. मग अगदी संथपणे त्याने वाढायला सुरुवात केली. आमच्यकडे एक कष्टकरी बाई ज्या दिवशी तिला काम नसेल त्या दिवशी बागेची( बाग छोटीशीच आहे )साफसफाई करायला येते.वाढलेले गवत, नको असलेली तरी उगवलेली रोपटी, वाळलेली पाने असे सगळे गोळा करून ती बाहेर टाकते. त्यादिवशीही ती आली, कचरा गोळा केला एका टोपलीत आणि बाहेर टाकला तो नेमका त्या रायआवळ्याच्या इवल्याश्या रोपट्यावर. ते बिचारे कुठून सहन करणार? ते मोडून गेले. थोडया वेळाने ही गोष्ट लक्षात आली. हळहळ वाटली. कचरा बाजूला करून पुन्हा आजूबाजूला माती लावून त्याला उभे केले. थोडया दिवसांनी त्याला पुन्हा पाने फुटली आणि आमच्या जीवात जीव आला.

काही महिन्यांनी ते बऱ्यापैकी वाढले. आमच्या ट्वीन प्लॉट. बाजूला जे राहतात त्याचीही बाग आहे.त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या माणसाने त्यांचीही बाग साफ केली. खूप वाळलेली पाने होती... ती गोळा करून एका कोपऱ्यात लावली आणि त्याला आगं लावली. थोडयावेळाने आग वाढली तो कोपरा नेमका राय आवळ्याच्या झाडाजवळ होता. आसेने झाडाची सगळी पाने जाळून गेली. खोड तेवढे राहिले. लक्षात आले ते दुसऱ्या दिवशी.... आम्ही आशाच सोडली, आता हे रोपटे काही येत नाही.

काही दिवस गेले आणि पुन्हा त्या रोपट्याला पालवी फुटली. आता आम्हीही त्याला नियमित पाणी टाकू लागलो. पावसाळा लागला. सुदैवाने मागच्या वर्षीचा दुष्काळाचा बॅकलॉग भारून काढत यावेळी जबरदस्त पाऊस झाला.रान माजले म्हणतात तशी झाडें वाढली. रायावळा पुरुषभर उंचीचा झाला. आता काही चिंता राहिली नव्हती.. पण म्हणतात दैव एखाद्याच्या पाठीमागे लागते. तसे झाले.

एकदा दोन माणसे कुऱ्हाड घेऊन आली. बागेतली अस्ताव्यस्त वाढलेली झाडें व्यवस्थित तोडून देऊ म्हणाले. आम्ही हो म्हणालो. खरेच खूप वाढली होती झाडें... पाणी देतांना चिंचोळा रस्ता झाला होता. त्यांना कोणकोणती झाडें कापायची कशी कापायची हे दोनदोनदा सांगितले. अर्धा तास उभा राहिलो. पण सकाळची वेळ होती. काहीतरी काम निघतेच. अर्धा तास बाहेर गेलो परत आलो तर काय...
रायावळ्याचे झाडं तोडून झाले होते. फक्त फूटभर खोड शिल्लक होते. संताप झाला पाण आता बोलून उपयोग नव्हता. खूपच उदास वाटले. त्यांना म्हणालो " अरे हे झाडं तोडायचे नाही सांगितले होते ना? "
त्यांना काही लक्षात आलेच नाही..

बरेच दिवस झाले. पाणी देत होतो, पण फक्त खोड.. तेही अर्धवट चिरलेले.. शक्यता वाटतं नव्हती.
काल सहज गेलो. झ तुडलेल्या (तोडलेल्या ) झाडाकडे पाहिले. आणि एकदम wow निघाले तोंडातून. खोडातून छोटी पालवी फुटली होती.
"Bravo my boy" मी ओरडलोच.

रायावळ्याला बोलता आले असते तर म्हणाला असता..
"झुकेगा नही स्साला......."
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.