नसतेस घरी तू जेव्हा : भाग १

नवरा बायकोच्या प्रेमाची गोष्ट!
अद्वैत नुकताच अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला आणि त्याने घड्याळाकडे पाहत आवरायला सुरूवात केली. आरशात पाहून तो केस विंचरत होता इतक्यात राधिका त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.

"राधिका प्लीज समोरून बाजूला हो, मला आवरू दे नाहीतर ऑफिसमध्ये जायला उशीर होईल." अद्वैत राधिकाला बाजूला सरकवत म्हणाला तशी राधिका पुन्हा त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले.

"ऑफिस रोजचं असते की तुला पण आज जरा लवकर येशील घरी " राधिका अद्वैतच्या डोळ्यात आशेने पाहू लागली.

" राधिका अगं ऑफिस कायं माझ्या काकाचे आहे का? असं मध्येच कसे लवकर येता येईल? आज लवकर येण्यासारखे असे काय आहे? हे बघं तुझ्या बुटीकचे काही शॉपिंग वगैरे करायला जायचे असेल तर अगोदरच सांगतो मला वेळ नाही अजिबात. " राधिकाचे हात गळ्यातून बाजूला काढत अद्वैत केस विंचरत म्हणाला तसे राधिकाने तोंड फिरवले.

" अद्वैत तुला लक्षात सुद्धा नाही का रे आज कायं आहे ते? "

" हे बघं राधिका आता सकाळी सकाळी हे प्रश्न उत्तरांचे खेळ नको आहेत मला, कायं आहे आज? तुझा वाढदिवस तर लांब आहे आणि मुलांचे दोन महिन्यांपूर्वीच झाले. मगं अजून कायं आहे?" अद्वैतने जरा वैतागूनच विचारले.

"ह्म्म.. माझा अंदाज बरोबर होता मला अगदी शंभर टक्के खात्री होती की तू विसरला असणार म्हणून. " राधिका हिरमुसून म्हणाली तसे अद्वैतने तिच्याकडे पाहून रागाने एक कटाक्ष टाकला.

" बरं आता रागाने बघू नको असा. ऐक ना अद्वैत तू मला लग्नासाठी विचारले होते आणि तुझ्या प्रेमाची कबुली दिली होती त्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मी आपल्यासाठी काहीतरी प्लॅन केले आहे प्लीज तू लवकर येशील संध्याकाळी आज." अद्वैतच्या चेहर्‍यावरून हात फिरवत राधिका बोलली तसे अद्वैतने तिला स्वतःपासून दूर केले.

" राधिका सकाळी सकाळी काय बालीशपणा लावला आहेस गं? आपलं लग्न होऊन अकरा वर्षे झाली आहेत नवीन लग्न झाल्यासारखे काय वागत आहेस तू?

तुझं बरं आहे स्वतःचे बुटीक कधीही जा काय फरक पडतोय मला तिथे ऑफिसमध्ये हिशोब द्यावा लागतो मिनिटाचा देखील माझ्या बॉसना.
आता डबा तयार असेल तर दे मला लवकर उशीर होतोय आणि हे असले काहीतरी प्लॅन वगैरे करण्यापेक्षा जरा मुलांकडे लक्ष देत जा जास्त बरं होईल." ऑफिसची बॅग उचलत अद्वैत रागारागाने खोलीमधून बाहेर जाऊ लागला तसे राधिकाने त्याचा हात धरला आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली पुन्हा.

"अद्वैत असा रागावून नको ना रे जाऊ. ऐक ना.. आय लव्ह यू " राधिका अद्वैतच्या मिठीत शिरली हळूच.

"तुला उशीर होतोय हे सांगितलेले कळतं नाही का गं एकदा? सारखं कायं तेच तेच. माहीत आहे मला तुझं प्रेम आहे ते त्याशिवाय लग्न झाले का आपले आणि इतके वर्ष सोबत आहोत. जरा कामाकडे लक्ष दे आणि मला डबा दे लवकरऽऽ " राधिकाला दूर ढकलून अद्वैत खोलीतून रागाने बाहेर पडला.

स्वतःच्या डोळ्यातून येणारे अश्रू रोखून राधिका स्वयंपाकघरात गेली आणि तिने डबा आणून अद्वैतच्या हातात दिला. अद्वैतने डबा हिसकावून घेतला जवळ जवळ आणि तिला 'बाय' न करताच तो निघून देखील गेला.

अद्वैतच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहून राधिकाला एकदम भरून आले ती खुर्चीवर बसली आणि इतक्यात "आईऽऽ" अशी हाक तिच्या कानांवर ऐकू आली तसे पुन्हा तिने स्वतःच्या विचारांना झटकले.

"आईऽऽ बघं ना श्रेयसने माझी हेअर क्लिप तोडली" श्रुती रडतंच खोलीमधून बाहेर आली आणि तिच्या पाठोपाठ श्रेयस सुद्धा.

"आई मी काही मुद्दाम नाही केले गं चुकून झाले." श्रेयसने स्पष्टीकरण दिले.

"श्रुती, श्रेयस अरे कायं चालू आहे तुमचे सकाळी सकाळी? भाऊ बहिण असे भांडत नसतात बरं. श्रुती आपण नवीन हेअर क्लिप आणूयात तुला आणि श्रेयस असे पुन्हा हात नाही लावायचा श्रुतीच्या वस्तूंना बहिण आहे ती तुझी. चला बघू खोलीतून लवकर बॅग घेऊन नाष्टा करायला या नाहीतर शाळेत जायला उशिर होईल." आपल्या जुळ्या मुलांची समजूत घालून राधिकाने त्यांना आत पाठवले आणि स्वयंपाकघरात जाऊन मुलांसाठी बनवलेले सँडविच ती प्लेटमध्ये घेऊन बाहेर आली. तिने डायनिंग टेबलवर प्लेट्स ठेवल्या इतक्यात तिचे सासू सासरे मंदिरातून घरी आले.

" राधिका हा घे प्रसाद अगं आज आरतीच्या वेळी पोहचलो तर एकदम छान दर्शन झालं आणि प्रसाद ही मिळाला. बरं नाष्टा झाला आहे का? भूक लागली आहे." सासूबाई राधिकाच्या हातात प्रसाद देत बोलल्या.

"हो तुम्ही बसा मी आलेच घेऊन." राधिकाने एकीकडे चहा ठेवला आणि कढईतले पोहे गरम केले.

पोहे आणि चहा घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली. मुलांना खाऊ घालून तिने शाळेच्या बसमध्ये बसवले आणि घरी येऊन सासू सासर्‍यांना गोळ्या देऊन तिने बाकीचे आवरले आणि बुटीकमध्ये गेली.

' अद्वैत इतका का रागवला? मी एवढे प्लॅन केले ते कॅन्सल करायचे का आता? त्याचे माझ्यावर पूर्वी सारखे प्रेम राहिले नाही का?' राधिकाच्या मनात काम करता करता विचार डोकावून गेला.

क्रमशः

राधिकाला तिचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल का? हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all