नसतेस घरी तू जेव्हा : भाग २

नवरा बायकोच्या प्रेमाची गोष्ट!
आज ऑफिसमध्ये जास्त काम पाहून अद्वैतची नुसती चिडचिड चालू होती.

'सकाळी सकाळी राधिकाने काय कमी डोकं खराब केलं होते की आज बॉसने सुद्धा जास्त काम दिलं आहे' स्वतःशीचं बडबडत तो पुन्हा कामात गुंतला. संध्याकाळी घरच्या लँड लाईनवरून त्याच्या मोबाईल वर फोन आला तेव्हा त्याने उचलला नाही सुरूवातीला पण पुन्हा फोन आला तसा त्याने तो उचलला.

"हॅलो अद्वैत अरे राधिका अजून घरी आली नाही आणि तिचा फोन सुद्धा बंद येतोय जरा पाहतोस का खूप काळजी वाटतेय." फोनवरून अद्वैतचे बाबा त्याला सांगत होते.

"अहो बाबा कामात असेल येईल ती साडेपाच तर वाजले आहेत. उगाचंच काळजी नका करत जाऊ मला काम आहे मी ठेवतो फोन." अद्वैतने फोन ठेवला.

'ह्म्म आता राग धरून बसली असेल. माहीत नाही कधी हिला अक्कल येणार आहे ते घरी गेल्यावर पाहतोच हिला आज.' असे म्हणतं अद्वैतने समोरच्या फाईल्स मध्ये डोके खुपसले.

रात्री सात वाजता तो घरी पोहचला तेव्हा मुले त्याला सोफ्यावर तोंड पाडून बसलेली दिसली.
"श्रुती श्रेयू कायं झालं बाळांनो? असे तोंड पाडून का बसला आहात?"

"अरे अद्वैत राधिका अजून घरी आली नाही आणि तिचा फोन बंद आहे." अद्वैतच्या आईने त्याला सांगितले.

"काय राधिका अजून घरी आली नाही? अगं फोन करायचा ना मला आणि बाबा कुठे आहेत?" अद्वैतने बॅग टेबलवर ठेवतंच विचारले.

" अरे ती शेजारच्या कॉलनीत नाही का राधिकाची मैत्रीण राहते तर तुझे बाबा तिकडे राधिका आहे का ते पहायला गेले आहेत" अद्वैतला आईने सांगितले.

"तुम्ही लोकं नाही तेव्हा फोन करता एरवी मगं आता फोन करायला कायं झाले होते बाबांना मला?" अद्वैत रागातच बोलला.

"अरे मगाशी त्यांनी फोन केला तेव्हा तुचं त्यांना म्हणाला ना कामात आहे, म्हणून त्यांनी फोन नाही केला पुन्हा. " अद्वैतच्या आईने स्पष्टीकरण दिले इतक्यात त्याचे बाबा घरात आले.

" अद्वैत बाळा बरं झालं तू आलास अरे राधिका तिथे त्या मैत्रिणीकडे सुद्धा नाहीये. तू एकदा तिच्या बुटीकमध्ये पाहून ये बरं मला आता खूप काळजी वाटतं आहे पोरीची हल्ली कायं कायं ऐकायला मिळते. ही पोरं पण आल्यापासून आई नाही म्हणून हिरमुसली आहे काही खाल्ले पण नाही." अद्वैतचे बाबा काळजीने बोलले.

" आई बाबा तुम्ही नका एवढी काळजी करू. मी सांगतो ती बुटीकमध्येच बसली असेल सकाळी थोडे रागात बोललो तर आता नाराज असतील मॅडम. आज मात्र हिच्या वागण्याची हद्द झाली आहे मी जाऊन येतो बुटीकमध्ये तोपर्यंत आई तू मुलांना खायला घाल काहीतरी." आई बाबांना समजावून अद्वैत मुलांजवळ गेला.

" श्रुती, श्रेयू हे बघा आई ना तिच्या बुटीकमध्येच असणार मी तिला घेऊन येतो तुम्ही शहाणी मुले आहात ना चला मगं लवकर लवकर जेवणं करून होमवर्क करा तोपर्यंत मी तुमच्या आईला घेऊन येतो आणि येताना चॉकलेट घेऊन येतो तुमच्यासाठी. " अद्वैतने समजावले तशी दोन्ही मुले आजीबरोबर जेवायला गेली.

अद्वैत पट्कन फ्रेश झाला आणि चावी घेऊन गाडीवर राधिकाच्या बुटीकच्या दिशेने निघाला.

'राधिका हल्ली असे काय वागतेय ते कळतंच नाही. घरी मुलांचे कायं हाल झाले आहेत. हिला आज चांगलेच समजावून सांगावे लागेल.' विचार करतच तो राधिकाच्या बुटीक जवळ पोहचला देखील पण बुटीक बंद असलेले पाहून त्याला जरा धक्काच बसला.

अद्वैतने फोन काढून पुन्हा एकदा राधिकाला फोन लावून पाहिला पण तिचा फोन बंद येत होता. त्याने राधिकाच्या बुटीक मध्ये काम करणार्‍या तिच्या मैत्रिणीला फोन लावला.

"हॅलो अद्वैत दादा बोला ना" पलिकडून आवाज आला.

"अगं सायली राधिका तुझ्यासोबत आहे का?" अद्वैतने विचारले.

"नाही दादा राधिका ताई आणि मी बुटीक बंद करून निघालो साडेपाच वाजता. कायं झाले तुम्ही असे का विचारत आहात?"

"सायली अगं राधिका घरी आली नाही आणि तिचा फोन देखील बंद आहे."अद्वैतने माहिती दिली.

"अरे बापरे! राधिका ताई कुठे गेली असेल? दादा एक विचारू का ताईची तब्येत बरी आहे ना म्हणजे आज ताई बुटीकमध्ये खूप शांत होती म्हणून विचारले. " सायलीने विचारले तसा क्षणभर अद्वैत थांबला.

" अगं हो ठीक आहे एकदम. बहुतेक ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल मला म्हटली होती सकाळी मी पाहतो. तू नको काळजी करू मी फोन करतो तुला. " अद्वैतने फोन ठेवला खरा पण आता त्याला देखील काळजी वाटायला लागली.

'राधिका कितीही नाराज असली तरी ती असे बेजबाबदारपणे वागणार नाही. तिला मुलांची काळजी असते मगं आज कुठे गेली आहे ती? बाबा म्हणतात तसे राधिकाला काही झाले नसेल ना?' अद्वैतच्या मनात प्रश्न डोकावून गेले तसा राधिकाच्या काळजीने तो देखील अस्वस्थ झाला.

क्रमशः

राधिका नक्की कुठे बरं गेली असेल? तिला काही झाले नसेल ना हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all