नसतेस घरी तू जेव्हा : भाग ३

नवरा बायकोच्या प्रेमाची गोष्ट!
अद्वैतने चावी फिरवली आणि तो पुन्हा घराकडे निघाला. संपूर्ण रस्त्यात 'राधिकाला कुठे शोधायचे' हाच विचार त्याच्या मनात डोकावत होता. तो घरी पोहचला तेव्हा त्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला.

बाईक लावून अद्वैतने फोन उचलला, तो घरात जाऊ लागला आणि अचानक "कायं?", म्हणून इतक्या जोराने ओरडला की हॉलमध्ये बसलेले त्याचे वडील उठून दाराजवळ आले.

"बरं बरं ठीक आहे मी येतो." एवढे बोलून अद्वैतने फोन ठेवला खरा पण त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव त्याच्या वडिलांच्या नजरेतून सुटले नाहीत.

"अद्वैत कायं झालं अरे?"

"बाबा आई आणि मुले कुठे आहेत?"

"अरे मुलांना जेवायला घातले हिने आणि आता मुले खोलीत अभ्यास करत आहेत" वडिलांनी सांगितले तसा अद्वैत थोडा शांत झाला आणि बोलायला लागला.

"बाबा राधिकाचा अपघात झाला आहे ज्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले त्यांनी फोन केला होता मला मी जाऊन येतो जरा तुम्ही प्लीज आत्ताच मुलं आणि आईला काहीच नका सांगू ते घाबरून जातील. मी तुम्हाला तिथे गेल्यावर फोन करतो." अद्वैतने फोनवरचा वृत्तांत त्याच्या वडिलांना सांगितला तेव्हा ते देखील घाबरले.

"अरे बापरे अद्वैत काय सांगतोय हे? तू लवकर जा आणि मला कळवं बघू मी आहे इकडे. " अद्वैतच्या वडिलांनी त्याला ताबडतोब निघायला सांगितले.

अद्वैत कधी नव्हे ते फुल स्पीडने बाईक चालवत हॉस्पिटलमध्ये पोहचला. रिसेप्शनिस्ट जवळ चौकशी करून तो राधिका ज्या रूममध्ये होती तिथे गेला तर तिच्या डोक्याला पट्टी बांधली होती आणि राधिका शांत झोपली होती. तिच्या शेजारी एक स्त्री बसली होती.

"तुम्ही यांचे मिस्टर का?"

"होऽऽ" अद्वैतने उत्तर दिलं.

"मीच तुम्हाला फोन केला होता मगाशी. या ताई हायवे साईडला ते कॅफे आहे तिथून थोड्या पुढे खाली पडल्या होत्या रक्ताच्या थारोळ्यात मला अपघात कसा झाला ते नाही माहीत पण मी यांना इथे घेऊन आले. त्यांची गाडी तिथेच काही लोकांच्या मदतीने मी पार्क केली. माझ्या कारमधून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येताना वाटेत त्या बेशुद्ध पडल्या पण एक बरे झाले मी त्या अगोदर त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला ते त्यामुळे मला तुम्हाला संपर्क करता आला. " त्या स्त्रीने उत्तर दिले.

" खूप खूप आभार तुमचे. आजकाल कोणी मदत करत नाही हो पण तुम्ही माझ्या बायकोला घेऊन आलात तुमचा ऋणी आहे मी. "

" अहो आभार काय मी फक्त माणुसकी निभावली बाकी काही नाही. हे त्यांचे सामान आता मी निघते. तुम्ही डॉक्टरांना भेटून घ्या. "अद्वैतच्या हातात राधिकाची पर्स आणि तुटलेला मोबाईल देऊन ती स्त्री निघून गेली.

अद्वैत राधिका जवळ गेला. तिच्या चेहऱ्यावर थोड्या जखमा होत्या आणि डोक्यावरची ती पट्टी पाहून त्याला भरून आलं. इतक्यात एक नर्स तिथे आली. अद्वैतने डॉक्टरांचे कॅबिन विचारले आणि तो त्यांना भेटायला गेला.

"डॉक्टर ज्यांचा अपघात झाला आणि थोड्या वेळापूर्वी ज्यांना अ‍ॅडमिट केले तिचा नवरा आहे मी. काय झालं आहे माझ्या बायकोला?"

"हे बघा मिस्टर तुमच्या बायकोच्या मेंदूला जबरदस्त मार लागला आहे त्या बेशुद्ध आहेत म्हणून स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले आम्ही त्यांना त्या शुद्धीवर आल्याशिवाय ट्रीटमेंट नाही करता येणार. आजची रात्र जरा धोक्याची आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की त्या उद्यापर्यंत शुद्धीवर येतील अशी. तुमची मनःस्थिती समजू शकतो पण प्लीज टेक केअर " अद्वैतला सत्य परिस्थिती सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून डॉक्टरांनी अद्वैतला समजावले.

अद्वैत डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडला तितक्यात त्याचा फोन वाजला. घरून फोन होता. अद्वैतने फोन उचलला.
"हॅलो अद्वैत अरे कशी आहे राधिका? कायं झालं? " पलिकडून त्याच्या वडिलांनी विचारले.

"बाबा ती ठीक आहे थोडं लागलं आहे ती आराम करतेय तिला आज रात्री इथे ठेवावे लागेल तर ऐका ना तुम्ही आईला सांगा हे असे झाले आहे ते आणि तिला काहीही कारण देऊन मुलांना झोपवायला सांगा आणि तुम्हीही आराम करा मी इथे थांबतोय. काळजीचे काही कारण नाही." अद्वैत खोट बोलला.

"बरं अद्वैत तू थांब तिच्याजवळ पण काही लागतं असेल सांग बरं. "

" हो बाबा काळजीचे खरंच काही कारण नाही. तुम्हीही आराम करा " अद्वैतने त्याच्या वडिलांना खोटंच सांगितले तो पुन्हा राधिका जवळ आला आता मात्र त्याचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले.

अद्वैतला एकदम सकाळचा प्रसंग आठवला तसे त्याला अपराधी वाटायला लागले खूपचं...
" हे बघं मी पुन्हा ओरडणार नाही राधिका पण प्लीज उठ हे असे तुला पहायची सवय नाही मला. शिक्षा नको देऊस अशी ही प्लीज उठं ना.
हे देवा माझ्या राधिकाला बरं करं." अद्वैतने राधिकासाठी देवाजवळ प्रार्थना केली.

रात्रभर तो तिच्या जवळ बसून होता, पहाटे त्याचा डोळा लागला कधीतरी. तो उठला तेव्हा रूममध्ये नर्सची धावाधाव सुरू होती ते पाहून त्याचं अवसान गळालं एकदम.

क्रमशः

कायं झालं असेल नेमकं? हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all