नसतेस घरी तू जेव्हा : भाग ५ (अंतिम भाग)

नवरा बायकोच्या प्रेमाची गोष्ट!
अद्वैत फोनवर रागातच बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला इतक्यात त्याची आई खोलीमधून बाहेर आली.

"अद्वैत कायं झालं अरे?"

"अगं आई मी कालचं ऑफिसला सुट्टी टाकली आणि कारण ही सांगितले पण आज सकाळी बोलावले आहे मला दुपारनंतर सुट्टी मिळेल म्हणे. आता मुलांचे आवरायचे आहे, राधिकाला डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये पण जायचे आहे." अद्वैत चिंतातूर झाला.

"अद्वैत हे बघं तू मुलांना उठवं त्यांचे आवर आणि डबा घेऊन मी आणि तुझे बाबा जातो तू जा ऑफिसला. " आईचे बोलणे अद्वैतला पटला. त्याने अगोदर स्वतःचे आवरले नंतर मुलांना उठवून त्यांचे आवरायला लागला.

" हे कायं श्रुती तुझे शूज कुठे आहेत आणि श्रेयस तुझे मोजे?"

"बाबा ते आईलाच माहीत आहे " दोन्ही मुलांनी उत्तर दिले तेव्हा अद्वैतने त्याच्या आईला विचारून पाहिले.

"अद्वैत अरे इथे स्वयंपाकघरात राधिकाने ताबा घेतलाय तसे मला फार ठाऊक नाही म्हणजे वरवर डबे माहीत आहेत पण मुलांचा शाळेत द्यायचा दुपारचा खाऊ कुठे ठेवला ते देखील माहीत नाही आणि तू मला त्यांच्या इतर वस्तूंबद्दल कायं विचारतो आहेस बघं तुचं" अद्वैत मुलांच्या खोलीत जाऊन शोधायला लागला कसे बसे त्याला सापडले एकदाचे. आजींनी मुलांना डब्यात पटकन उपीट करून दिले, अद्वैतने खाऊ खाण्यासाठी थोडे पैसे दिले. मुले शाळेत गेली तसा अद्वैत देखील आवरायला लागला.

ऑफिसची फाईल्स त्याला सापडता सापडेना तसे त्याने सवयीप्रमाणे 'राधिका' हाक मारली आणि पुन्हा हसला. राधिकाला विचारून त्याने फाईल घेतली आणि ऑफिसमध्ये गेला.

दुपारी ऑफिस सुटल्यावर मात्र तो थेट हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा राधिका कडून त्याला त्याचे आई बाबा येऊन गेल्याचे लक्षात आले. पुढचे दोन दिवस ही सायली राधिका बरोबर हॉस्पिटलमध्ये थांबली आणि अद्वैत मुलांसाठी म्हणून घरी गेला.

राधिका आता पूर्णपणे बरी झाली होती आणि काळजी करण्यासारखे काही नव्हते तिला अ‍ॅडमिट होऊन तीन दिवस झाले होते. तिची तब्येत बरी असल्याने डॉक्टरांनी ही अद्वैतने डिस्चार्जचे विचारले तेव्हा लगेचच डिस्चार्ज दिला. राधिका ते ऐकून खूप खूश झाली. तिला कधी एकदा ती घरी जाऊन मुलांना भेटतेय असे झाले होते.

अद्वैत राधिकाला घेऊन घरी गेला तेव्हा तिच्या सासूबाईंनी तुकडा ओवाळला. मुलं तर राधिकाला सोडायला तयारच नव्हती. अद्वैतने त्यांना राधिकाला आराम करायची गरज आहे सांगितले तेव्हा मुले शांत झाली.

संध्याकाळी अद्वैत राधिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचे आहे काही गोळ्या बदलायच्या आहेत असे आई बाबांना सांगून घरातून बाहेर पडला.
राधिकाला त्यात गैर वाटले नाही काहीच पण कारची दिशा बदलली तशी ती गोंधळली.

"अद्वैत हॉस्पिटल विरूद्ध दिशेला आहे आपण कुठे जातोय?" राधिकाने अद्वैतला विचारले तेव्हा अद्वैतने तिच्या ओठांवर बोट ठेवले.

"शांत बस जराऽऽ" असे म्हणून अद्वैतने तिचा हात पकडला तशी राधिका बावरली. अद्वैतने एका साईडला कार थांबवली, तिचे डोळे बंद केले रूमालाने.

"अद्वैत कायं चालू आहे?"

"थांब गं थोडावेळ" असे म्हणून अद्वैतने पुन्हा कार चालवली. काहीच वेळात कार थांबली. अद्वैतने राधिकाचा हात धरून खाली उतरवले आणि तिच्या डोळ्यांवर असलेली पट्टी बाजूला केली.

त्याने प्रेमाची कबुली दिलेला तोच कॅफे आज फुलांनी सजला होता. अद्वैत तिला घेऊन वर गेला. वर ओपन स्काय व्यूह मध्ये तो फुलांनी डेकोरेट केलेला टेबल अधिकच शोभून दिसत होता. आजूबाजूला हार्ट शेपचे फुगे होते. राधिका तर हे सगळे पाहून भारावून गेली इतकी की समोर अद्वैत गुडघ्यावर बसला आहे याचे देखील भान नव्हते तिला.

"राधिकाऽऽ" अद्वैतने हळूवार साद घातली तश राधिका भानावर आली. समोर अद्वैत हातात फुले घेऊन गुडघ्यावर बसला होता.

"अद्वैत कायं आहे हे? उठं बघू "

"थांब राधिका अगं आता तर कुठे शहाणपण आलं आहे बोलू दे मला.
राधिका आय लव्ह यू सो मच!

तुला वाटेल इतके दिवस तुला ओरडणारा मी आज कायं बालीश सारखे वागतोय म्हणून पण तुझ्या अपघाताने हे शहाणपण आलं आहे गं मला.
या पाच दिवसांत लक्षात आलं की तुझी किती सवय होऊन गेली आहे. मुलांच्या शाळेच्या वस्तू, आई - बाबांच्या गोळ्या, स्वयंपाकघरातील खाऊचे डबे इथपासून ते माझ्या प्रत्येक फाईल्स पर्यंत तुला ठाऊक आहे.

या तीन दिवसांत तू नसताना घराची अवस्था पाहिली आहे मी.
'नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो!'

तु नव्हती तर मला या गाण्याचा अर्थ उलगडला खरा तेव्हाच. इतके वर्ष एकटीने तू किती नेटाने सांभाळून घेतले सगळे आणि तुझे बुटीक ही पाहत आलीस पण या सगळ्यात कायम आपले एखादे क्षण, मुलांचे, आई बाबांचे वाढदिवस अगदी उत्साहाने साजरे केलेस. तुझा अपघात झाल्यावर लक्षात आलं की तू हे छोटे छोटे क्षण खास बनवतेस, कायम प्रेम व्यक्त करतेस म्हणून माझं आयुष्य इतकं सुखाच्या रंगांनी भरलेलं आहे.

मला तुला हॉस्पिटलमध्ये पाहून वाटलं कदाचित मी तुला गमावणार आणि त्याच क्षणी तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली. तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मी. लग्नाअगोदर आम्ही मुलं सहज प्रेम व्यक्त करतो पण लग्न होऊन दहा वर्षे लोटली की ते प्रेम व्यक्त करणं कुठे जातं कायं माहीत.

खरंतर मुलं झाल्यावर जबाबदारी वाढते ती आईची जास्त पण तू मात्र कायम माझी बायको न राहता प्रेयसी म्हणून ही एखाद्या क्षणी भरभरून प्रेम दिलसं मी मात्र माझ्यातला प्रियकर हरवून बसलो होतो पण आता मला लक्षात आलं आहे की जोपर्यंत आपली व्यक्ती सोबत आहेत तोपर्यंत तिच्यावर भरभरून प्रेम करावं पण ते प्रेम कधीतरी शब्दांतून व्यक्त ही करावं...
कारण कोणीतरी आपल्यावर प्रेम करतं हे ऐकणं याशिवाय खरे सुख काहीच नाही. कायम मला अशीच साथ दे. आय लव्ह यू सो मच! " अद्वैतचे बोलणे ऐकून राधिकाने अद्वैतला उठवले आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवून ती त्याच्या मिठीत विसावली.

*समाप्त*

प्रेम असणं पुरेसे नसते कधीतरी तर ते व्यक्त करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते!

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all