नसतोस घरी तू जेव्हा...

About Women Life

रात्रीचे दहा वाजले होते . राधा किचनमध्ये सगळे काम उरकून, पोरांना झोपवून , खिडकीतून बाहेर पाहत उभी होती .बाहेर रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती .दिवे लागलेले होते आणि सोसायटीतली वर्दळही कमी झाली होती. ती आतून थकलेली होती, सगळ्यांचा विचार, सगळ्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्यात ती स्वतः हरवत चालली होती . तिच्या आवडी निवडी, छंद ,स्वतःसाठी द्यायचा वेळ सगळंच थांबल होत. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते, कारण तिचा जोडीदार बर्याच काळापासून खऱ्या अर्थाने तिच्याजवळ नव्हता .अनेक महिन्यांपासून तिचा नवरा अनिकेत नोकरी, काम, ऑफिस टूर, विविध कोर्सेस या निमित्ताने सतत व्यस्त होता. घर सांभाळायचं ,मुलांना सांभाळायचं ,त्यांच्या शाळा ,क्लास सांभाळायचे, आई-वडील त्यांचे रुटीन याकडे बघायच. घरातली खरेदी ,बिल आर्थिक व्यवहार सांभाळणं सगळ तिच्या अंगावर आलं होतं .तिला समजत होतं अनिकेतला स्वतःचा विकास करायचा आहे, करिअरमध्ये पुढच्या पायरीवर जायचं आहे. त्याच्या अनुपस्थितीत तिच्या खांद्यावर आलेल्या जबाबदारी ची आता तिला सवय होत चालली होती , पण रोजच्या जगण्यातील ताण आणि एकटेपणाने ती खचत चालली होती. बरेचदा तिला कोणाच्यातरी खांद्याची गरज भासायची , पण जोडीदाराची जागा कोणीही घेऊ शकत नव्हतं . आपल्या दोघांमध्ये नात्याची डोर जरा सैल झाली आहे असं सतत वाटायचं तिला.
तिच्या गोष्टी न बोलता समजून घेणारा, तिच्या हसण्यातल दुःख ओळखणारा जोडीदार ती शोधत होती, पण सगळं काही एकटीने निभवाव लागणार होतं. आज मनाची तगमग अगदी टोकाला गेली होती, वातावरणात सुद्धा अचानक झालेला बदल जाणवत होता. दिवसभर रणरणत्या उन्हाने घामाच्या धारा वाहत असताना अचानक थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. आपण आपलं मन नेहमीच मारत असतो ,याला जबाबदार आपणच.. म्हणून सगळा रोष स्वतःवर घेत होती.
" का कळेना दाटते डोळ्यात पाणी ,
मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही...
तेवढा ओल्या सरींनी घात केला ,
नाही तर माझी तशी तक्रार नाही "
अशी काहीशी अवस्था तिच्या मनाची झाली होती. राधा बऱ्याचदा स्वतःला विचारायची मी सगळं नीट करू शकेल ?सगळ्या जबाबदाऱ्या पेलू शकेल? तिच्या मनात संशयाचे ढग जमायचे. पण तरीही ती रोज सकाळी उठून नवीन दिवसाची सुरुवात करत होती .मुलांचा हसरा चेहरा , समाधान तिला उभ करत होत. माझ्यावर विसंबणारे घर ,नवरा ,मुलं आहेत मी कमकुवत होऊ शकत नाही ,ती स्वतःशीच म्हणत असे. विचारांची तंद्री तुटली तशी तिने घड्याळ बघितलं, काटा आता अकरावर सरकला होता. मुले झोपली होती तेव्हा ती नवऱ्याची वाट बघत स्वतःला एक कप कॉफी घेऊन सोफ्यावर बसली, तेव्हा तिला जाणवलं या एकटेपणात तिने स्वतःच एक नवीन विश्व शोधल आहे .एक अशा स्त्रीच जी एकट्या बळावरही सगळं जग पेलू शकते. जोडीदाराच्या अनुपस्थितीतही ती खचली नाही, तर अधिक मजबूत झाली. ती आता जबाबदारीला घाबरत नव्हती तर तिला समजून, स्वीकारून निभावत होती. ती दिवसेंदिवस शिकत होती की आयुष्यातल्या जबाबदाऱ्या, संघर्ष कधीच संपत नाही , पण त्यांना निभावताना आपण अधिक सशक्त होत जातो...
©️ वृषाली हणमंते गांगल.