Login

नातं की इगो

नातं जपताना सांभाळताना आपला अहंकार सुद्धा कमी करावा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
नातं की इगो?


"अगं कुठे आहेस तू?कालपासून तुला किती फोन केले तुझा फोन का बंद येतोय!" मीनाक्षीने तिच्या लहान बहिणीला विचारलं.


"घर सोडून निघाले मी." सखी म्हणाली.

"घर सोडून निघालीस याचा अर्थ काय? तुला कळतंय का तू काय बोलतेस. तुझ्या नवऱ्याचा फोन आला होता मला. अगं काय करून निघाली आहेस तू..तुला कळतंय का?"मीनाक्षी फोनवर जरा चढ्या आवाजातच म्हणाली.


"हो..मी काय करतेय ते मला चांगलच कळतंय. मी त्याच्याकडे आता परत जाणार नाही. ठरलंय माझं!"सखी म्हणाली.


"तुझं ठरलंय म्हणजे?मूर्ख आहेस का तू. एवढ्याश्या क्षुल्लक कारणासाठी दोन मुलांना घेऊन घर सोडलंस ते!"मीनाक्षी रागातच म्हणाली.


"क्षुल्लक कारणासाठी घर नाही सोडलं ताई. तुला नाही माहित त्याने माझ्यासोबत काय केलं ते, त्यामुळे तू मला आता काहीच सांगू नको आणि बोलू पण नको. मी ठरवलं आहे मला इथून बाहेर पडून काय करायचं आहे ते. पण मी त्याच्याकडे पुन्हा जाणार नाही बास!" सखी म्हणाली.


"हे बघ सखी मला सगळं माहित आहे काय झालं आहे आणि कोण काय बोललं आहे ते. तू किती तापट आहेस ते ही मला चांगलं माहित आहे. गेली सतरा वर्ष तो तुला कसा सांभाळतोय हे पाहिलं आहे मी. आणि तू त्याच्याशी काय वागतेस हे ही चांगलच माहित आहे. त्यामुळे गपगुमान माघारी जा."मीनाक्षी म्हणाली.


"तू त्याचीच बाजू घेणार मला माहीत होतं म्हणून मी तुझा पण फोन उचलत नव्हते पण आता असं वाटते उगाच तुझा फोन उचलला."सखी तिरसटपणे म्हणाली.


"उगाच म्हणजे? कालपासून तुला इतके कॉल करतोय आम्ही ते उगाच करतोय का? मूर्ख समजतेस का सगळ्यांना. तिकडे किशोर तुला फोन लावून लावून टेन्शनमध्ये आलाय कारण तू त्याला ब्लॉक केलं आहेस आणि वर तेवढं कमी म्हणून दोन मुलांना सोबत घेऊन निघाली आहेस. समीक्षाचं सोड गं ती मोठी आहे पण अंशचा तरी विचार करायचा होता. एवढस अडीच महिन्याचं बाळ त्याला घेऊन तू दोन दिवसांपासून फिरतेस अक्कल आहे का गं तुला? "यावेळी मीनाक्षी जरा भडकलीच.


"हे बघ ताई..त्याने मला बॅट ने मारलं आणि यावेळी मला ते सहन झालं नाही म्हणून मी निघाले." सखी म्हणाली.


"हो.. बॅटने मारलं. तू काय केलंस गं असं की त्याने तुला बॅटने मारलं ते ही सांग मग!" मीनाक्षी म्हणाली.


"मी त्याला म्हणाले मी ड्रेसवर ओढणी घेणार नाही. अगं दिवसभर घरात ओढणी काय करायची आहे. मला म्हणे मोठी सून आहेस तर तशी वाग ना जरा. आता मोठ्या सुनेसारखे वागायचे म्हणजे यांची हाजीहाजी करायची का? सारखं सारखं त्यांना काय हवं नको ते बघत बसायचं का?कधी खरेदीसाठी पैसे मागितले की पाच सहा हजार देऊन म्हणायचं कर ऍडजस्ट. माझ्या इथल्या मैत्रिणी क्लब मध्ये जातात.. किटी पार्टी करतात आणि मी एवढी शिकून सवरून काय करते तर ह्यांची सेवा!"सखी म्हणाली.


"हाजीहाजी कोण करायला सांगतं तुला. आणि दिलंस सासू सासऱ्यांना काय हवं नको ते तर काय बिघडलं? वय झालंय त्यांचं. दिलंस चार टाईम त्यांच्या हातात तर काय झालं गं ?तुला मनासारखं जगू देतात ना.. मग घेतलीस ड्रेसवर ओढणी तर कुठे काय बिघडलं. सासू सासऱ्यांनी काय कमी लाड केलेत का तुझे. त्यांनी तुझ्यात आणि त्यांच्या मुलीत कधीच फरक केला नाही उलट जेवढी मोकळीक त्यांनी त्यांच्या मुलीला दिली नव्हती त्यापेक्षा जास्त त्यांनी ती तुला दिली. आणि तू हाजीहाजी करायचं म्हणतेस. अगं आता कुठे त्यांची सेवा करण्याची संधी तुला मिळत होती तर तू तिथून मुलांना घेऊन पळून निघालीस. आणि सखी..याआधी तुला हजारदा सांगितलं आहे इतरांशी स्वतःची तुलना करत जाऊ नको. पाच सहा हजार तुला खरेदीला कमी पडतात हेच मुळात आश्चर्य करण्यासारखं आहे. नशिबाने एवढं सगळं छान मिळालं. आहे तुला पण तुला ते उपभोगायचं नाहीये तर तुला काय करायचं.. किटी पार्टी आणि क्लबिंग.."मीनाक्षी म्हणाली.


"जाऊदे सोड मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. असही मी त्याला आधीच घटस्फोटाचे पेपर्स दिले आहेत. त्याने त्याच्यावर सह्या करून मला या सगळ्यातून मोकळं करावं. माझं आणि माझ्या मुलांचं काय करायचं आहे ते बघायला मी समर्थ आहे."सखी म्हणाली.


"बरं झालं घटस्फोटाचे पेपर्स दिलेस ते. आता मी त्याला सांगते फोन करून की, बाबा..त्याच्यावर सह्या कर आणि तू मोकळा होऊन तुझं छान आयुष्य जग. माझ्या बहिणीची तेवढी पात्रता नाही की तुझ्यासारखा चांगला नवरा तिला भेटला. आता निघाली आहेस तर पुन्हा त्यालाच काय आम्हाला पण फोन करू नकोस. मी किशोरला सांगते तू जिथे कुठे आहेस एकदम आनंदात आहेस."मीनाक्षी म्हणाली.


मिनाक्षीचं बोलणं ऐकून सखी जरा घाबरलीच. आपण रागाच्या भरात घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही याचा विचार करायला लागली. पण तिचा इगो तिच्या निर्णयाच्या आड येत होता. स्वतःची चूक असतांना सुद्धा तिला झुकायचं नव्हतं. दोन दिवस बाहेर राहून बाळाची तब्बेत खराब झाली.


"हॅलो..ताई! अगं कृष्णाला रात्री अचानक ताप भरला आहे. काय करू सुचत नाहीये."सखी रडवेली होऊन म्हणाली.


"मी काय सांगणार तुला. तुझी तू समर्थ आहेस निर्णय घ्यायला. घरातून निघण्याचा निर्णय घेतांना काहीतरी विचार केलाच असशील ना!"मीनाक्षी तिरसटपणे म्हणाली आणि फोन ठेऊन दिला.


"हॅलो किशोर..मी नागपुरात आहे. तुला लोकेशन पाठवते प्लीज घ्यायला ये. कृष्णाला बरं नाहीये. मला खूप टेन्शन आलंय रे. माझ्याकडे पैसे पण नाहीयेत. ताईला फोन केला तर ती नीट बोललीच नाही माझ्याशी."सखी रडत रडत म्हणाली.


"ठीक आहे. मला लोकेशन पाठव. मी गाडी पाठवतो. जरा कामात आहे आत्ता त्यामुळे मला येणं शक्य नाहीये."किशोर जरा तटस्थ होऊन म्हणाला.


"बरं."सखी जरा खोल आवाजात म्हणाली.


जवळपास चारेक तासांनी सखीची गाडी दाराजवळ येऊन थांबली. एरव्ही गाडीचा हॉर्न ऐकून घरातून धावत पळत गेटजवळ घ्यायला येणारा किशोर आज समोर असून सुद्धा घ्यायला पुढे आला नाही.


"हॅलो..पोचलीस का घरी?" मीनाक्षीने तासाभराने कॉल करून सखीला विचारलं.


"हो पोचले. ताई..सॉरी अगं..मी चुकले! रागाच्या भरात मी काय केलं हे आता समजलं आहे मला."सखी खजील होऊन म्हणाली.



"सगळ्यांसोबत जाऊन बस आणि फोन स्पीकरवर टाक. मला सगळ्यांशी बोलायचं आहे."मीनाक्षी म्हणाली.


"हां ताई..मी आले सगळ्यांसोबत. बोल आता."सखी नजर खाली ठेवून म्हणाली.


"सखी.. मुलांना घेऊन निघून जाण्याचा निर्णय तू चुकीचा घेतला होतास. समजा त्यात तुझं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आम्ही. हे बघ सखी..आपल्याकडे जेवढं आहे त्यातच नेहमी समाधान मानावं. नशिबाने तुला इतकं छान सासर भेटलं आहे. आपल्या आई बाबांची कमी तुला कधीच कमी पडली नाही त्या घरात. आई बाबा अपघातात गेल्यानंतर तुला त्यांचं प्रेम तुझ्या सासू सासऱ्यांनीच दिलं ना गं? किशोर तुला इतकं जपतो..तुझ्या त्या पैसेवाल्या माजोरड्या मैत्रिणींमुळे तू तुझं आयुष्य का खराब करतेस? अशा बायका मुलींमुळेच आपल्या आईबाबांच्या गाडीचा अपघात झाला होता आठवतो ना? सखी..तुझ्या माणसानं जप. पैसा आज आहे आणि उद्या नाही. समजतंय का मी काय बोलते ते. आणि घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारचं!" मीनाक्षी म्हणाली.


"सॉरी ताई पुन्हा असं होणार नाही आणि मी ते घटस्फोटाचे पेपर्स पण फाडून टाकले. आई बाबा..किशोर खरंच सॉरी..माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला."सखी सगळ्यांसमोर हात जोडून म्हणाली.


"सखी..मी पण सॉरी अगं. यावेळी माझा पण तोल सुटला आणि कधी नव्हे ते मी तुला बॅटने मारलं."किशोर सखीचा हात हातात घेऊन म्हणाला.


"चला..आता सगळं छान झालं आहे. आता दोघांनी एकमेकांना माफ करा आणि नव्याने सुरुवात करा. राग रुसवे सोडा. मीनाक्षी.. बाळा तू पण आता सखी वरचा राग सोड हां.."


"अहो आई..सखी माझी लाडुबाई आहे. तिच्यावर कसं राग धरून राहणार मी. पण कधीकधी कठोर सुद्धा वागता आलं पाहिजे ना. आणि तुम्ही सुद्धा तिला जास्त सूट देऊ नका. खोटा खोटा का असेना..सासुरवास करत जावा अधेमधे म्हणजे ती जास्त शेफारणार नाही. तुमच्या लाडाने तिला जास्तच बिघडवलं आहे."मीनाक्षी गंमत करत म्हणाली.
आणि बिघडलेल्या नात्याची घडी पुन्हा एकदा नव्याने बसली.