Login

नातं तुझे अन माझे भाग 2

Unconditional lovestory

रोहित बळजबरीने का होईना तयार  आहे राधाला भेटायला. तसा रोहित पहिलीच मुलगी पाहणार होता पण राधाचे तसे नव्हते. राधाची ही चौथी  वेळ होती. तिच्या अपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत जोडीदाराकडून....

जसा रोहित मितभाषी,  तर राधा अत्यंत बडबडी अन बिनधास्त मुलगी अन तितकीच समंजस, स्पष्टवक्ती. राधा मॉडर्न विचारांची असली तरी राहणीमान अन विचार यांना  एक पारंपारिक टच होता. दिसायला देखणी असली तरी तिला कुठेही गर्व नव्हता. 

राधाला  दोघांनी असे घरी न भेटता बाहेर भेटणं मनापासून आवडले होते. तीही संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर जाणार होती रोहित ला भेटायला. 

संध्याकाळी 6 वाजता दोघेही एका कॅफे मध्ये भेटले. रोहित बरोबर वेळेत आला पण राधाला ट्राफिकमुळे  थोडासा  उशीर झाला. 

तिने घाईतच तीची गाडी पार्क केली.  आत गेल्यानंतर, फोटो पूर्वीच पाहिल्याने तिला तो लगेच दिसला.त्याचे लक्ष  फोनमध्ये होते. 

हाय, मी राधा... सॉरी ट्राफिकमुळे थोडा उशीर झाला.. 

रोहित ने वर मान करुन पाहिले 
क्षणभर तिला बघत राहिला, तिने लेमन कलरचा चुडीदार घातलेला,दिसायला सुंदर अशी चेहेऱ्यावर स्मित हास्य पण  लगेच स्वतःला सावरत... उभा राहत 
हाय मी रोहित... बस ना... सॉरी काय, मी समजू शकतो.मीही थोड्याच वेळापूर्वी आलोय. 
काय घेणार... 

मला कॉफी चालेल. 

रोहितने दोन कॉफी ची ऑर्डर केली... अन तिच्याकडे पाहिलं.

मला आवडली ही कल्पना बाहेर भेटण्याची... नाहीतर फार दडपण येते... काय बोलायचे होते...

त्यावर तो हसून म्हणाला, हो मी पाहिली होती माझ्या बहिणीची अवस्था म्हणूनच मी पहिले बाहेर भेटण्याचे  ठरवले. मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो.  तू माझी सगळी माहिती वाचलीच असशील.. तू विचारू शकतेस  मला... पण तरीही  मला त्याआधी काही सांगायचे आहे.. 

तेवढ्यात वेटरने  वाफाळत्या कॉफीचे दोन मग टेबलवर आणून ठेवले .
कॉफी घेऊन राधाला  एकदम प्रसन्न वाटले . तीही उत्सुकतेने ऐकू लागली. 

रोहित पुढे बोलू लागला. मी सध्या नोकरी करतो पण पर्मनंट नाही.आई बाबा गावाकडे छोटेसे घर आहे तिथेच असतात, अधून मधून माझ्याकडे येतात. पण  मी नोकरी  केव्हाही सोडू शकतो.. माझे बिझनेस  करायचे स्वप्न आहे. सर्व शिकण्याचा हिशोबाने अन अनुभव म्हणून   मी ही नोकरी करतोय... म्हणजे कंपनी खूप काही पॅकेज वगैरे देत नाही.पण सध्यातरी माझ्या गरजा भागतात. म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं झालं तर मी अजून सेटल नाही... अजून स्वतःचे घर नाही 
अन तो बोलतच  होता. 

राधा त्याला मध्येच थांबवत... अरे अरे थांब, जरा श्वास घे, किती सलग  बोलतोयस.  अन स्वप्न बघणे चुकीचे नक्कीच नाही ना. छान, आवडले मला तुझी तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची तळमळ पाहून...मग तू स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल तर करतोयस .. पण बिझनेसच का ? 


मला रोजगार उपलब्ध करायचा आहे गरजू लोकांना.जो की त्यांना  सहज उपलब्ध होईल . नोकरी शोधत असतांनाच काही कडू गोड  अनुभव आले अन मी ठरवलंय असे. 
पण  घरच्याना हे खूळ वाटायला लागलेय. म्हणून लग्नाची घाई करताय.. म्हणजे जबाबदारीच्या ओझाखाली दबून मी आपोआप  नोकरीच  करेल.तो जरा वैतागत म्हणाला  

ती यावर गोड हसून म्हणाली, अच्छा असे आहे तर...म्हणजे तुझा नकार आहे का? पण लग्न झाल्यावर ही तू स्वप्न करूच शकतो की पूर्ण. माझ्या मते  जर आयुष्यात  योग्य  जोडीदार योग्य वेळी  भेटला तर आपल जगणं सुखकर अन सोपं होते.. 

म्हणजे मला असे नव्हते म्हणायचे  पण तरी मला असे वाटते की तू काही निर्णय घेण्यापूर्वी तुला माझ्याबद्दल हे माहिती असावे .... त्याला जाणीव झाली की घरचांचा राग आलाय अन त्यात जरा जास्तच बोललोय आपण... 
पण तरी त्याच्या हेही लक्षात आले की आज  कितीतरी दिवसांनी तो मोकळेपणाने बोलत होता तेही  पहिल्याच भेटीत....  

 काही वेळ बोलून दोघेही आपापल्या घरी निघाले.पण निर्णय मात्र अजून झाला नव्हता.  माझा  निर्णय नाही झालाय अजून... जमलेच तर पुन्हा भेटू... मग ठरवू. राधाने इतके बोलून त्याचा निरोप घेतला.  

रोहितला  तर तिच्याकडून नकार अपेक्षित होता.पण का कुणास ठाऊक पण मनात एक भीती वाटत होती तिच्या नकाराची.

 एक दोन दिवस असेच गेले न राहवून रोहितने राधाला पुन्हा भेटायला बोलवलं. राधा तशी खुश झाली. कारण त्याचे विचार ऐकून तिला वाटले की तो नकार देणार.. पण मनात कुठेतरी आवडला होता,तिचाच भाषेत सांगायचे तर क्लिक झाला होता. तिचा शोध संपला होता कारण तिला ही तिच्या जोडीदारामध्ये असाच स्वप्नाप्रति  आत्मविश्वास अन जिद्द, एकनिष्ठता हेच तर गुण हवे होते. पहिल्याच भेटीत सर्व प्रामाणिकपणे सांगितले त्याने इथेच तिला तो आवडला... तीही जणु वाटच पाहत होती ह्या क्षणाची. 
आज पुन्हा दोघेही भेटले पण आज   छोट्याश्या हॉटेल मध्ये ....

तू त्यादिवशी काही बोलली नाहीस, मला वाटले तुला  राग आलाय माझा.माझ्याबद्दल उगाच काही निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा  तू नकार देऊ शकतेस... उगाच तुझा  वेळ वाया नको जायला म्हणून... 

होका... नकार ऐकण्याची घाई झालीय का तिने मिश्किल हसत विचारले. 
 पण मला कळेल का की तुझा लग्नापूर्वीच सेटल होण्याचा अट्टाहास का? 

हो आजकालच्या मुलीच्या ह्याच तर अपेक्षा असतात ना. म्हणजे स्वतः शिक्षण पूर्ण करून इच्छा असेल तरच  नोकरी करायची पण त्याच वयाचा मुलगा मात्र सेटल हवा, स्वतःचे घर हवे अन बरेच काही. मग अशावेळी समानता वगैरे  काही नसते.मुलीचे पालकही त्याच साच्यात विचार करतात.  नाहीका... पण मला सांग फक्त पैसा जास्त म्हणजेच कर्तृत्व मोठे का?? 

हा तुझा गैरसमज आहे. अन मी फार वेगळी आहे कदाचित. अन तुझ्या माहितीसाठी सांगते, मी स्वतः खंबीर आहे  वेळप्रसंगी माझ्या नवऱ्याला अन माझा  संसार सांभाळायला.मी एक स्वावलंबी मुलगी आहे.  तू विचारले नाहीस तरी सांगते मीही एका खाजगी कंपनीत आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून. 
म्हणजे बघना काहीजण लग्नाआधी सेटल असतात, आपण लग्नानंतर होऊ शकतो मी तरी अशा विचाराची आहे. 

पण  आज आपण इथे भेटलोय, मी तुला निदान काही दिवस तरी  मोठ्या हॉटेल्स मध्ये नाही नेऊ शकणार, नेहमी शॉपिंग नाही जमणार... वेळ लागेल थोडासाच पण किती ते नाही माहीत.. 

कधी कधी अपूर्णतेतही   वेगळीच मजा असते अरे .म्हणजे रेडी घरात जाण्यापेक्षा आपण कष्ट करून जमवलेल्या पैशातून घेतलेल्या घरात जास्त समाधान मिळेल. अन तूझी साथ असेल तर मला इथला चहाही  फाईव्हस्टार पेक्षा बेस्टच लागेल. 
तुझ्या स्वप्नांच्या प्रवासात मी तुला साथ द्यायला तयार आहे...माझा होकार आहे... ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.  

रोहितचे तर डोळे आनंदाने चमकले.जिथे त्याची मोठी स्वप्ने ऐकून, ती पूर्ण करण्याची धडपड पाहून इतर अगदी जवळचे लोकही त्याच्यावर हसत होते तिथेच त्याची भावी जोडीदार त्याला साथ द्यायला तयार होती.कारण आजही मुलं जास्त कमवत नसतील तर तो किती मागे आहे, कसा कर्तृत्ववान नाही हेच दाखवले जाते. 
 पण तरीही त्याने विचारलेच, का? 

आवडली मला तुझी एकनिष्ठता.जो आपल्या स्वप्नाप्रति, कामाप्रति इतका एकनिष्ठ आहे तो प्रेमातही एकनिष्ठ असणार यात काही शंकाच नाही. अन बघ ना ह्या सर्वात ना तू मला  माझ्या भूतकाळाबाबत काही विचारलं नाही पण तरी तुझी  भविष्यासाठीची काळजी...भेटल्यापासून काही न लपवता सर्व खरं काय ते सांगून टाकलेस. आयुष्यात पैशापेक्षा माणूस जास्त महत्वाचा अन  दिवसाच्या शेवटी समाधान महत्वाचे.म्हणून मी तयार आहे, होकार आहे माझा.  

रोहित चहा चे पैसे देणार तितक्यात राधाने पैसे दिले सुद्धा अन पुढे निघाली.... 

तिच्या अगदी समोर जात तिचा हात हातात घेत रोहित.. 
छान बोलतेस तेही इतक्या  समंजसपणे,  थँक्स... मला ही आवडेल तुझी साथ आयुष्यभरासाठी...

यावर राधा गोड हसली. 

अनमोल जीवनात  तुझी साथ  हवी आहे....
आयुष्याच्या अखेरपर्यंत हात तुझा  हवा आहे ...... 
आलीगेली कितीही संकटे तरीही
 न डगमगणारा.. 
विश्वास तुझा हवा आहे...

क्रमशः
✍️ प्राजक्ता कुलथे-उदावंत 

कसा वाटला आजचा भाग? 
लेखन वितरणाचा हक्क लेखिकेकडे राखीव.माझ्या नावासहित कथा शेअर करायला हरकत नाही. 
@प्राजक्ता 

0

🎭 Series Post

View all