राधा रोहितच्या लग्नाला आता 6 महिने झाले होते.राधा कधी तक्रार करत नसली तरी तिला रोहित जास्त वेळ देऊ शकत नव्हता अन तिची नवीन लग्न झाल्यावर पाहिजे तशी हौसही होत नव्हती.
रोहित काय ठरवलंय तू, नोकरी केव्हा सोडणार? राधा
अग हो ह्या 6 महिन्यात माझे लोन क्लिअर होईल मग मी पुढचं पाऊल उचलायला मोकळा.
अरे पण मी करते काहीतरी अड्जस्ट तू आताही मोकळा आहेस की...
नाहीग मला ना खूप वाईट वाटते कधी कधी.. तू पहिलेच किती करतेस माझ्यासाठी.आपला रोजचा खर्च भागवता भागवता माझा पगार पुरत नाही, बाबांचे महिन्याचे औषधेही तू घेतेस. अन तू सांगत नसली तरी बरेच किरकोळ खर्च तू करतीयेस.
अरे माझा आहे पुरेसा पगार, मग मी हातभार लावू शकते माझ्या संसाराला. ते माझेही सासरे आहेत बरं का...
हो ग पण ते आधीच माझ्यावर नाराज असतात अन मी त्यांच्याच बाबतीत कमी पडतोय.
ते नाराज नाही म्हणता येणार पण त्यांना काळजी वाटते तुझी. आजही सर्वच पालकांना असेच वाटेल की आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित असावे.पूर्वी पासून नोकरी करत आल्याने व्यवसाय म्हणजे उगाच डोकेदुखी वाटते.
हो ते ही आहेच.
मग तू काय ठरवले, जमेल हळूहळू सर्व.पण सुरुवात केली म्हणजे त्यातल्या अडचणी समजतील ना.
हो मी पुढच्या महिन्यात ठरवतो. रोहित काही प्रोजेक्ट्स बनवून देत होताच.
पण काही महिने तरी नोकरीवर अवलंबून असणाऱ्या त्याच्या कंपनीत नेमकी काही लोकांना काढण्यात आले त्यात रोहितचेही नाव होते. झाले आता पुढे कसे हा प्रश्न समोर उभा राहिला.इथे संसार अन गावाकडे पैसे पाठवायचे ते वेगळे अन त्यात व्यवसाय म्हंटल की भांडवल हवे.तसाच हताश मनाने रोहित बाईक चालवत होता. गाडीच्या चाकाबरोबर त्याच्या मनाची चाकही गरागरा फिरू लागली.
रोहित घरी आला तसा शांतच होता. त्याला आता नोकरीचे लगेच कसे राधाला सांगावे याचा संकोच वाटत होता. आज तो लवकरच घरी आलेला, काही वेळात राधा ही ऑफिसहून घरी आली. त्याने ती येण्यापूर्वीच बनवलेला नाश्ता अन चहा तिला दिला. तशी राधा खुश झाली. कायरे आज काय विशेष?
नाही ग, सहजच आज थोडा लवकर आलोय. म्हणून वाटले तुझ्यासाठी करावे काहीतरी. ज्यामुळे तू खुश होशील.पण त्याने नोकरीबद्दल सांगणे कटाक्षाने टाळलं.
थँक्स, आज आईची आठवण झाली बघ मला.
अग तेच सांगणार होतो मी, तुला पाहिजे तर तू जाऊन ये काही दिवस. तो काळजीने बोलत होता.
कायरे मागच्याच वेळी तर तू राहायला नाही म्हणत होतास अन आज अचानक....
अग म्हणजे तुला ही आठवण येत असणार ना म्हणून... तो नजर दुसऱ्या दिशेला करत बोलला.
तशी राधाने त्याचा हाताला थोपटत विचारलं... बोलना काय झाले, काही अडचण आहे का?
नाही ग, तसे काही नाही.
त्याचा चेहरा स्वतःकडे करत... आयुष्याच्या ह्या प्रवासात आपण आता नेहमीच सोबतीला आहोत.
आज माझी नोकरी गेली. मी अजून काही दिवस तरी पूर्णतः अवलंबून होतो नोकरीवर... कसे होईल सर्व... माझ्यामुळे तुलाही त्रास . तुला पाहिजे तर काही दिवस तू आपल्या घरी गावी जा पण तुझी नोकरी आहे मग असे कर तू तुझ्या आई बाबाकडे जा काही दिवस. तो एकटाच बराच वेळ बडबडत होता.
तुला असे वाटलेच कसे... मी तुला ह्या परिस्थितीत सोडून जाईल... तीही जरा चिडतच म्हणाली.
अग काहीच दिवसासाठी बोलतोय मी.कदाचित हे संकट नसून हीच एक संधी असेल... जे झालं ते झालं पण मी ह्या संधीचे सोने करणार. पण माझे तुझ्याकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून... खरं तर त्यालाही तिला असे बोलायला जीवावर आले होते.
मी कुठेही जाणार नाही.मी काय तुला अशी घाबरट वाटते का? की असं झाल्यावर मी पळून जाईल, रागातच म्हणाली अन त्याला हलकेच मारू लागली .
तस त्याने तीला प्रेमाने जवळ घेतले. थँक्स.. तू तर माझी ताकद आहेस... तुझ्या साथीने मी जे ठरवलं आहे ते लवकरच करून दाखवेल मला खात्री आहे.
भयावलेले मन अन स्वप्ने जिवावर उधार...
कधी तो देवही तटस्थ -
सापडलीस तू मला,
आता आपल्यालाच आपला काय तो आधार...
दोघांनीही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली. सुरुवातीला जवळजवळ वर्षभर रोहितला पाहिजे तसे यश काही मिळत नव्हतेच. राधाची साथ असली तरी तिच्यावर आर्थिक जबाबदारी भरपूर होती. त्यामुळे तीही तिच्या कामात व्यस्त होती.तरीही तिने कधीच तक्रार केली नाही, माहेरी अन सासरीही तिने सर्व छान चालू आहे असेच दाखवले. कारण नवऱ्याचा स्वाभिमान आपण जपला नाही तर बाकीचे तरी का जपतील अशा विचाराची होती ती.
काही काळातच दिवस रात्र मेहनत घेऊन रोहितने ज्या काही मशीनची विक्री करत होता त्या स्वतः बनवून विकण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला व्यवसाय करतांना इतरांना कमी खर्चात रोजगारही उपलब्ध करायचा होता.
पहिली मशीन नवनवीन समस्याना सामोरे जात त्याने बनवायला घेतली.काही दिवसातच त्यामध्ये तो यशस्वी झाला.थोडयाच काळात त्याने अशा मशीनचे उत्पादन सुरु केले तेही कमीतकमी दरात विकल्या. त्याने त्याचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केले.
फायदा किती झाला त्यापेक्षाही ती मशीन यशस्वी झाली यातच त्याला जास्त समाधान वाटे.
पाच वर्षांनंतर ...
रोहितचे आता मोठे वर्कशॉप होते.नविन असला तरी त्याचा प्रामाणिक अन कष्टाळू स्वभाव अन हुशारी त्यामुळे तो यशस्वी उद्योजक म्हणून त्याचे नाव झाले होते.राधा ही आता तिचा जॉब सोडून रोहितला मदत करत होती. सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे त्याला त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये मदत करत होती. फार नाही पण १५-२० लोक त्याच्याकडे कामाला होते. तो ऑर्डरनुसार बऱ्याच मशीनचे उत्पादन करत असे.बऱ्याच स्वयंरोजगार संस्थेला त्याने रोजगार उपलब्ध करून दिला.
रोहित अन राधाने आज एका सुंदर अशा फ्लॅटचे बुकिंग केले. आज त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या कमाईवर हा फ्लॅट बुक केला होता.कुणाचीही मदत न घेता. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद अन समाधान होते.
आज मी खूप खुश आहे.आता आपण आपल्या स्वतःच्या घरी राहणार.रोहित
आपल्या बाळाचेही आगमन नविन घरात होणार तर... राधा हळूच त्याच्या कानात म्हणाली.
काय म्हणजे.. आपले बाळ...कधी समजले... रोहितने खूप आनंदाने विचारलं.
तिने मानेनेच होकार दिला..अरे काही दिवसापूर्वीच चाहूल लागली मला, पण मला तुला आज सांगायचे होते. तसे त्याने तीला जवळ घेतले, तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आता मात्र त्याचे डोळे पाणावले होते.
राधा खूप थँक्स.माझ्या आयुष्यात येण्यासाठी.. आज तुझी साथ मिळाली म्हणून माझे स्वप्न सत्यात उतरले.कोणत्याही परिस्थितीत तुझे नेहमी आनंदी अन पॉसिटीव्ह असणे मला नेहमी नवी उमेद देते.म्हणूनच फक्त मी... नाही आपण आज इथवर पोहोचलो. दोघेही काही काळ थोडे भावुक झालेले.
काहीच वेळात दाराची बेल वाजली... रोहितने दार उघडले.. तर दारात रोहित अन राधा दोघांचेही आई बाबा. सर्वच जण खूप खुश होते.
या ना आत... तुम्ही सर्व अचानक... रोहित ने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
तितक्यात राधा आली अरे मीच फोन केला होता.
सर्वांनीच दोघांचेही अभिनंदन केले.
काय रोहितसाहेब , माझ्यावरचा राग गेला की नाही मग.... रोहितचे बाबा.
बाबा...साहेब म्हणून मला लाजवू नका. मला तुमचा राग कधी नव्हताच... तुम्ही मला जे पाहिजे ते लगेच हजर केले असते तर मी प्रयत्नच केले नसते अन इथवर पोहोचलोच नसतो.
अरे मुलाने खूप यश मिळवावे, कशाची कमी पडू नये हेच तर स्वप्न असते रे आईबापाचे. पण मनात एक भीतीही असते की यश नाहीच मिळाले, मनासारखं नाहीच झाले तर ह्या स्वार्थी जगात त्यांना जमेल का, निभाव लागेल का... तसेच माझेही झाले रे.... बोलताना त्यांचा आवाज जड झाला होता...
बाबा तुम्ही नका खूप विचार करू.तुम्ही तुमच्या जागी योग्य होते तर मी माझ्या जागी योग्य होतो.उलट तुम्ही मला आर्थिक मदतीला नकार दिला म्हणूनच तर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी जिद्दीने प्रयत्न केले.तुम्ही विरोध नसता केला अन सहज पैसे दिले असते तर कदाचित माझे प्रयत्न कमी पडले असते. रोहित
पण तरीही मला वाटते की माझे चुकलेच मी तुला सारखं टोचून न बोलता, विरोध न करता तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक तरी प्रयत्न करू द्यायला हवा होता.मग ठरवायला हवे होते. तरी तुझी आई मला नेहमीच सांगायची, आर्थिक मदत भलेही करू नका पण त्याची मानसिकता चांगली ठेवा. पण काय करणार तुझा बाप असलो तरी मीही एक माणूस आहे. मीही कधीतरी चुकणार...पण आता तुम्हीही भावी पालक आहात तुम्ही माझ्यासारखी चूक कधीही करू नका.त्यांच्या डोळ्यात पाणी होते अन ओठावर हसू होते. एक समाधान होते.
दोघेही एकमेकांना समजावत होते अन उपस्थितांच्या डोळयांत आनंदाश्रू होते.
तसे रोहितच्या आईने राधाला प्रेमाने जवळ घेतले. आम्ही थोडे चुकलो असू तरीही तुझ्या रूपाने ती चूक दुरुस्त झाली हे मात्र अगदीच नक्की.
यावर राधा गोड लाजली.
जावई बापू तुम्ही तुमचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. खरंय स्वप्न पाहणे सोपे पण ते पूर्ण करणे तेवढेच मेहनतीचे असते... तुमचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटतो... राधाचे बाबा रोहित ला म्हणाले.
रोहितनेही त्यांना धन्यवाद केले, जेव्हा मी अगदी शून्य होतो त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला अन राधाचा हात माझ्या हातात दिला. त्यामुळे मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील.
सर्वांच्या चेहऱ्यावर आज आनंद अन समाधान होते.
स्वप्नाच्या प्रवासात जेव्हा बुद्धीच्या पलीकडे जाऊन स्वतःला पाहतो, स्वतःवर खुश होतो, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो, तेव्हाच तर खरे आयुष्य जगणं सुरु करतो. सुखदुःखात लढताना धडे शिकतो. जिंकलो तर समाधान असते अन हरलो तर अनुभव असतो साथीला पुन्हा लढण्यासाठी.
अशक्य काहीच नसते फक्त शक्य करू शकतो हा विश्वास स्वतःवर असायला हवा....
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा