नाटक पाहणं - मनमुराद आनंद सोहळा
"अग ए तुझं आटोपले की नाही. अग चल लवकर. ह्या नाटकाचा आज १००वा प्रयोग आहे म्हणजे सगळे नामवंत दिग्गज कलाकार येतील. दहा पंधरा मिनिटं आधीच जाऊ. तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेऊ." असं वसंतरावांनी म्हणताच ललिता बाई पटकन बाहेर येऊन म्हणाल्या,
"हो चला चला". त्यांना बघून ते म्हणाले,
"काय वेंधळीआहेस ग . एव्हढा आठवणीने मोगऱ्याचा गजरा आणला तो माळ ना."
"अरे हो खरंच की"
त्या लगोलग आत गेल्या आणि फ्रीजमधील गजरा घेऊन आल्या आणि वसंतरावाना म्हणाल्या,
"अहो जरा तुम्हीच माळा ना " आणि चक्क लाजल्या.
"अजूनही तू तितकीच सुंदर दिसतेस " आणि त्यांना गजरा माळून दिला. हे सर्व असं आणि असेच काही वर्षांपूर्वी घडत होते. आताच्या लोकांना हे काकूबाई सारखे वाटते.
दोघे लगेचच निघून नाट्यगृहापाशी आले पाहतात तो काय ' हाऊसफुल ' ची पाटी त्यांना दिसली. ते मनोमन खूष झाले कारण त्यांनी शहाणपणा करून पेपर मध्ये जाहिरात बघितल्या बरोबर ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं. त्यांना तिसऱ्या रांगेतली तिकिटे मिळाली होती. त्यांनी आत प्रवेश केला आणि ते आनंदाचे डोही आनंद तरंग वातावरण पाहून त्यांचे मन उल्हासित झाले. वसंतराव मान्यवरांना नमस्कार करत होते. खरोखर नाट्यगृहातील वातावरण खूपच आल्हाददायक होते . स्त्रियांनी ठेवणीतल्या साड्या नेसल्या होत्या. बहुतेक स्त्रियांनी सुवासिक गजरे माळले होते तर कोणी गुलाबाचे एखादे फुल आंबाड्यावर तिरकस घातले होते . एखाद्या हौशी स्त्रीने नथही घातली होती. पुरुषही काही मागे नव्हते. काही जणांनी कुर्ता पायजमा घातला होता. काहींनी छान शर्ट पँट घातले होते. काहींनी जॅकेट घातले होते. सर्वत्र अत्तराचा, सेंटचा नव्हे, सुवास दरवळत होता.
पहिली घंटा झाली आणि सर्व जण आपापल्या जागेवर स्थानाबद्ध झाले. हलक्या आवाजात चर्चा चालू होत्या. स्त्रिया एक दुसरीच्या साडीची प्रशंसा करत होत्या तर पुरुष माना वळवून कोणी ओळखीचे दिसते का पाहत होते. इतक्यात दुसरी घंटा झाली. लोकांमध्ये उत्साहाचे वारं संचारलं. हलक्या आवाजात गप्पा चालूच होत्या. इतक्यात प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती तिसरी घंटा झाली. सगळे एकदम चिडीचूप झाले. पडदा वर गेला. नाटकाबद्दल निवेदन झाले आणि पहिला अंक सुरू झाला. लोक तल्लीनतेने नाटक पाहत होते. दर्जेदार संवादफेकीवर टाळ्यांचा कडकडाट होत होता. पूर्वी तीन अंकी नाटक असायचं. त्यामुळे दोन मध्यंतरं असत. मध्यंतर झालं की सर्वांर्ची गर्दी बटाटेवडे आणि गरमागरम चहा पिण्याकडे वळायची. नाटक आणि मध्यंतरात वडा आणि चहा हे समीकरणच होतं. जे बाहेर येत नाहीत त्यांच्यासाठी वडे नाट्यगृहात नेण्याची सोय होती.
नाटक उत्तरोत्तर रंगत होतं. वसंतराव आणि ललीताबाई खूप खूष होते त्यांना मनाप्रमाणे पुढील खुर्च्या मिळाल्या म्हणून. त्यांच्या पुढील रांगेत मान्यवर लोक बसले होते. त्यांच्या संगतीत नाटक पाहण्याचा योग म्हणजे दुग्धशर्करा योग. नाटकाचे तिन्ही अंक झाले होते. कलाकारांनी स्टेज वर येऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं. टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. ह्या आधी प्रेक्षकांना संगीत नाटकांची पर्वणी असायची. तो काळ खूप वेगळाच होता. एखादे पद प्रेक्षकांना आवडले तर ते पुन्हा घेण्यासाठी आग्रह व्हायचा. अशा रीतीने कधी कधी प्रयोग संपायला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागायचा. आपल्याला दर्जेदार संगीत नाटकांची परंपरा लाभली आहे.
आतासुद्धा काही नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नट आणि नट्या दर्जेदार कलाकृती द्यायची प्रथा राखून आहेत. काहींच्या नावे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. त्यांनी जणू ह्या क्षेत्राला वाहून घेतले आहे . म्हणूनच वाटते की पुढच्या पिढीला उत्तम नाटके बघण्याचा योग नक्कीच येईल.
हल्ली नाटयगृहातील वातावरण वेगळंच असतं. एकतर आता नाटकं दोन अंकीच असतात. प्रयोग भरपूर होतात पण पूर्वीचा माहोल नसतो. साडी, गजरा माळून येणारी स्त्री विरळाच. बहुतेक जणी पंजाबी ड्रेस, जीन्स टॉप असे घालून येतात. पुरुष पण टीशर्ट जीन्स घालून येतात. काही जणं नाटकाला येतात पण मोबाईल मध्येच दंग असतात. नाटकाच्या सुरुवातीला महत्वाची सूचना करावी लागते ," कृपया आपले मोबाईल बंद ठेवावेत अथवा सायलेंट मोड वर ठेवावे. " ही सूचना ऐकून सुद्धा अरसिक प्रेक्षक आलेला फोन घेतात आणि शेजारील प्रेक्षक आणि स्टेजवरील कलाकाराची देखील तंद्री भंग करतात.
सगळ्याच प्रयोगांना ' हाऊसफुल ' च्या पाटया लागण्याची कलाकार आणि नाटयरसिक वाट पाहत आहेत. खरोखर सिनेमा पाहणं आणि नाटक पाहणं यात खूप फरक आहे. सिनेमा मध्ये रीटेकला वाव असतो तर नाटकात प्रत्यक्ष अभिनय पाहता येतो. मनमुराद आनंद लुटता येतो. वसंतराव आणि लालिताबई नाटकाच्या धुंदीतच घरी परतले पुन्हा एखादे छान नाटक बघायचे असे ठरवूनच.
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा