Login

नाते जगावेगळे

Story of independent girl who finds her pure love and explains what it matters to her

नाते- जगावेगळे

हिंजवडीच्या मॅकडोनाल्ड ला निलेश ने गाडी वर केली आणि आत शिरला....कॉर्नरच्या एका टेबलावर प्रिया शांतपणे बसली होती..तो तिच्या टेबलपशी गेला आणि समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला, 
" प्रिया! काय ऐकतो आहे मी हे? नक्की काय सुरू आहे तुझे? हे बघ तुला माहिती आहे की मी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.
 माझा विश्वास तू आहेस आणि मला खात्री आहे की तू खरं काय ते सगळं नक्की बोलणार. 
हे बघ तुझी स्वतंत्र वैचारिक वृत्ती मला माहित आहे आणि मी कायम आदर केला आहे तुझ्या विचारांचा पण तरीपण मला जाणून घ्यायचे आहे तुझ्याकडून......" 
भडाभडा निलेश बोलत होता. त्याच्या बोलण्यात आश्चर्य नक्कीच होते. त्याचा बोलायचा ओघ इतका प्रचंड होता की त्याचे होईस्तोवर आपण बोलायला नकोच हे प्रिया ने पक्के ठरवले. 
प्रिया आणि निलेश हे खूप घट्ट मैत्री च ज्वलंत उदाहरण. निलेश ला काय वाटत आहे या क्षणी किंवा त्याला काय अपेक्षित आहे हे तिला पूर्णपणे माहीत होते.
 त्याची काळजी आणि त्यामागील त्याचे आपल्या मैत्रिणीबद्दल चे प्रेम हे खूप निखळ होते आणि म्हणूनच प्रिया त्याला सामोरी गेली होती नाहीतर सगळ्यांना धुडकावून लावणारी ती इतकी शांत आणि संयमी हे गणित कठीणच होते.
" अंग काय म्हणतोय मी! कुठे लक्ष आहे तुझं!"
"कुठे म्हणजे घोड्या ! तुझ्याकडे बघतेय, तुझंच ऐकतेय."
" हे बघ तुला माहीत आहे की मला आडून बोलायचं नाही पण मला स्पष्ट बोलत पण येत नाहीये.... 
का ते कळत नाही पण मला सगळं जाणून पण घ्यायचं आहे, बोल."
"अरे निलेश तुला काय झालंय नक्की? काय ऐकलंय? काय बोलायचं आहे ? जरा शांत होशील का आधी! थांब मी दोघांसाठी कॉफी सांगते मग बोलूयात"
तिने कॉफी ऑर्डर केली आणि कॉफी घेऊन ती टेबलावर आली...
"घे..." ती एवढंच म्हणाली....
शांतपणे फक्त ते दोघे एकमेकांच्या मनाचा ठाव घेत कॉफी पित होते. कोणीही बोलत नव्हते पण दोघांच्याही मनात प्रचंड खळबळ सुरू होती.
शेवटी प्रिया ने पुढाकार घेत " निलेश अगदी स्पष्ट विचार आणि बोल काय जे मनात आहे ते! 
कुठलाही आडपडदा न ठेवता सगळं विचार म्हणजे तुला उत्तर देईल."

" मग ऐक, सर्वप्रथम हेच की मला तू आनंदी हवी आहेस,  तुला कोणी काही बोलावं हे मला सहन होणे शक्य नाही, त्यामुळे आज तू एक मुलगी किंवा मी एक मुलगा हे विसरून तुझ्याशी बोलतोय!"

"अरे ये शहाण्या, मला मैत्रीण म्हणतोस आणि आज हे काय तू मुलगा मी मुलगी! 
मला तुझी काळजी कळतेय जो फरक आजवर आपल्यात आला नाही तो आज पण नको....
 मित्रा बोल काय ते." प्रिया हसत म्हणाली त्यामुळे निलेश थोडं रिलॅक्स झाला, काळजीने काळवंडलेला त्याचा चेहरा थोडा शांत झाला.

प्रिया, मी तुझ्या वागण्यातील फरक खूप नोटीस केला आहे. तू खूप बदलली आहेस,आनंद वाटतो तुला असं बघून. छान राहतेस पण या सगळ्या जोडीला खूप काहीतरी नवीन सोबत बाळगते आहेस अस वाटतंय. 
जग हे खूप विचित्र आहे,तू आनंदात असलीस तरी त्यांचे पोट दुखेल पण दुःखात असेल तर मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतील.
 या सगळ्यात तू कधी पडली नाहीस पण आताच फरक हा खूप वेगळा जाणवतो आहे." 
निलेश बोलायचा प्रयत्न करत होता त्याला ते नीट जमत नाहीय हे तिला कळतं होत आणि हेही माहीत होतं की त्याला काय बोलायचं आहे पण तरी ती फक्त शांत बसून त्याच्या कडे बघत होती. 

"निलेश तुला माझ्या आणि सोहम बद्दल बोलायचं आहे का?" तिने डायरेक्ट विचारले तसं तो चपापला. 

आपण योग्य करतोय का हा विषय काढून की नाही हेच त्याला काळात नव्हते पण तरी तो तिच्याकडे प्रश्नार्थक बघत होता.

प्रिया म्हणाली " निलेश नक्की याच विषयावर ना?"

"हो प्रिया! तू आणि सोहम ? म्हणजे नक्की काय ते? कसं बोलू कळतं नाहीय पण काहीतरी वेगळं नक्कीच जाणवतंय."

" निलेश वेगळं नाही तर खूप स्पेशल आहे  हे! सोहम माझं सर्वस्व मानते मी आणि हो आहेच तो!" प्रिया  खूप ठामपणे म्हणाली.

तिचा तो ठामपणा बघून निलेश शॉक झाला. त्याला तिचं इतकं स्पष्ट बोलणं अपेक्षित नव्हतं तो फक्त आ वासून बघत होता.

"अरे तो आ जो झाला आहे ना तुझा तो मीट आधि."हसत ती म्हणाली.
तो फक्त बघत होता तिच्याकडे...

"ऎक न कार आणली आहेस का?"
" हो,का ग?"
 उठत ती म्हणाली " चल इथून, आपण शांत निवांत ठिकाणी बोलू यात! तुझ्याकडे वेळ आहे का?"
निलेश बोलला " प्रिया आज तुझ्यासाठीच वेळ काढून आलो आहे मी. मी सांगितले आहे माझ्या असिस्टंट ला की मला कॉल सुध्दा करायचा नाही अगदीच महत्वाचं असल्याशिवाय. तुझं काय? तू सुटी घेतेय का आज?"

"हो चल, तू येणार म्हणाला तेव्हाच मला सगळ्याची कल्पना होती त्यामुळे मी आधीच अर्धा दिवस सुट्टी टाकलीय. 
तुला आपले नेहमीच ठिकाण आठवत असेल अजून तर चल तिथेच " आश्वासक आणि कॉन्फिडेंट हसत ती म्हणाली.

काही न बोलता त्याने पार्किंग मधून कार काढली, प्रिया शांत पण अगदी आत्मविश्वासी नजरेने त्याच्याकडे बघत त्याच्या बाजुला बसली. असाच थोडा वेळ गेला गाडी त्याने हिंजवाडीच्या मागच्या साईड ने पिरंगुट रोड ला घेतली...गाडी हळूहळू गर्दीपासून लांब येत होती. 

प्रिया म्हणाली " निलेश बोल काय विचारायचे आहे तुला?"

" तुला नक्की कळतंय का प्रिया तू काय बोलत आहेस ते? सोहम ला मी ओळखतो, खूप चांगला आहे तो हे नक्की. तो सज्जन आहे, चांगला व्यक्ती आहे एक छान कलाकार आहे पण हे सगळं वेगळं आहे. 
मी जे बोलतो आहे ते खूप आणि खूप पर्सनल लेव्हल वर च आहे!"

"मग बोल ना,  काय मनात येतंय तुझ्या म्हणजे मला पण कळेल की मी कसं बोलावं. 
तुझी अपेक्षा तुझ्या शब्दात व्यक्त कर मला पण सोपं होईल सांगायला." प्रिया म्हणाली.

 सावकाश ड्राईव्ह करत तो बराच वेळ बाहेर बघत होता आणि शब्दांची जुळवणी करत होता, मग बोलला " प्रिया तू त्याला सर्वस्व मानते असे म्हणतेस पण तुला माहीत आहे का की तो लग्न झालेला आहे?"

"हो नक्कीच!"

" मग हे असं कस म्हणू शकतेस? तू तुझ्या आयुष्याशी खेळते आहेत कळत नाही का? तो काय मानतो? म्हणतो? की पुरुष म्हणून समजतो??"

"एक मिनिट" त्याला थांबवत आणि थोडं रागावून ती म्हणाली "कृपया अदबीने बोल त्याच्याबद्दल! मला नाही चालणार की कुठल्याही प्रकारे त्याचा डिस-रीस्पेक्ट झालेला आधीच सांगते आणि हो तो कसा आहे हे मला जगापेक्षा नक्कीच जास्ती माहीत आहे!"

तिला आपण दुखावून चालणार नाही हे माहीत असल्याने नमतं घेत" प्रिया माय डिअर इकडे बघ."

तिने कोरड्या नजरेने बघितले तास हलकस हसत तो म्हणाला" मला जजमेंटल व्हायच नाहीय आणि नाही कोणाला दोष द्यायचा. 
मला जाणून घ्यायचं काय ते आणि हो जर थांबवणं योग्य असेल तर ते करेन आणि जे आहे ते योग्य असेल तर मी तुझ्या सोबत असेंन" आश्वासक स्पर्श तिच्या खांद्याला करत तो म्हणाला.

"हे बघ खूप स्पष्ट सांगतेय, मी आणि सोहम जे बांधलो गेलो त्यासाठी कोणतही बंधनच नाहीय मुळात. 
जे काही आहे ते भावनांचे,मनाचे आणि ते स्वीकारले  म्हणून त्या प्रेमाचे बंध आहेत.....
 हो खूप खूप आणि खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर इतकं की मी त्याच्या वाचून जगंण हा विचार सुद्धा करू शकत नाही. 
इंफॅक्ट मी जगणारच नाही हे नक्की, आणि तुला नवल हे वाटत आहे न की मी हे म्हणतेय जी इतकी रिजिड राहिले आणि खंबीर जगलें आणि जेव्हा वेळ होती तेव्हा लोकांना फटकारले."

"नाही असं नाहीय,मला तू अशी जगायला हवीय की ज्यात तुला कधी पश्चाताप नसावा आणि तू खचून पुढे जगली हे नकोय. जे काही आहे ते तितक्याच भक्कम पणे आहे का दोन्ही बाजूला?"

" निलेश खात्रीशीर आहे हे. जितका माझा माझ्यावर विश्वास आहे ना, किंबहुना त्यापेक्षा जास्तीच त्याच्यावर आहे. 
मला तो हवाय माझ्या आयुष्यात पण त्यासाठी त्याचे काही  वाईट होणे हवं मला नकोय.
 तो जसा आहे तो मला प्रिय आहे. त्याच्या ही मनात माझ्याबद्दल ही आणि तितकीच गाढ भावना आहे हे मला प्रत्येक वेळी त्याच्या बघण्यात, वागण्यात आणि मुख्य म्हणजे त्याच्या सहवासात जाणवते... 

माझा पूर्ण विश्वास आहे तो त्याच्यावर आणि त्याच्या प्रेमावर. 

आयुष्य खूप वेगळं असत रे हे मला काळाने शिकवले. कदाचित तुला सांगूनही नाही समजणार पण ती ओढ ते ती शक्ती मला जाणवते. 
कधीही कुठलीही अपेक्षा त्याने माझ्याकडून केली नाही तरी मी त्याच्याकडे ओढली गेली....
त्याने आजवर फक्त दिलच आहे! ज्याला व्यवहाराची परिभाषा कळतं नाही कळतं तर फक्त समोरच्याच हास्य, त्याचा आनंद आणि त्याच्यासाठी करणं असा व्यक्ती कोणाला फसवेल का रे?"

"मी असं म्हणत नाहीय पण तुझं आणि त्याच आयुष्य हे वेगळ असणार याची तुला कल्पना आहे ना?"

" हो रे नक्कीच! हे बघ जे माझ्या नशिबात आहे ते माझेच आहे ते मला मिळतंय आणि मिळणार हे पण नक्की त्यापेक्षा जास्त कोणाला मिळत नसते... 

माणसाने कितीही आदळआपट केली तरी नाशिबात असेल ते बदलत नाही आणि माझा विश्वास आहे की जे आहे ते खूप मौल्यवान आहे.
 निखळ विश्वास, निखळ प्रेम आणि भक्कम आधार जो मनाला यापेक्षा अजून काय हवे तूच सांग? 
एक स्त्रीला नक्की काय हवे रे आयुष्यात?  प्रेम, विश्वास आणि रिस्पेक्ट हे सगळं मला मिळतंच आहे मग मी कशाला भिऊ?
आणि तू मला सांग मनाने मनाला मान्य केलेली अलिखित भाषा यापेक्षा अजून प्युअर ते काय रे? 
जगात भावनेपेक्षा मोठे काहीच नाही, त्या विश्वासक स्पर्शापेक्षा मोठे काहीच नाही त्या नजरेतील तेजापेक्षा आनंदापेक्षा दुसरे काहीच मोठे नाही. 
जग काय बोलेल जर कळले तर याचाच विचार करतोस का तू ? की तुझ्या लेखी याची परिभाषा ही वेगळ्या शब्दात होते?"

" प्रिया मी तुला चूक हा शब्द कसा म्हणेल?"
"म्हणजे दुसरे म्हणतील असेच ना?"
"हो, मला त्याची भीती वाटत आहे!"

" तुला शपथेवर एक सांगते, लोक स्वतःचं बघतात आणि त्याप्रमाणे उल्लेख करतात. 
मला त्याची पर्वा नाही, माझे प्रेम आहे आणि हो खुप खोलवर आहे.
जग त्याला काय म्हणत आणि काय लेबल लावते ते मला फरक करणार नाही. 
कोणीही काहीही म्हणो माझा त्याच्या असण्यावर विश्वास आहे, त्याच्या भावनांवर आहे त्यापुढे सगळं नगण्य! त्याने मला त्याचा आयुष्यात जी जागा दिली ती मला मान्य आहे जे मला नाव ठेवतील ते काय धुतले तांदूळ का रे? 
 आणि असले काय आणि नसले काय मी माझ्या प्रेमाशी प्रामाणिक आहे आणि जोवर श्वास आहे तोवर तशीच राहीन. अरे जगाने जर मला त्याची सखी या वेगळ्या अर्थाने म्हणले तरी मला तो गर्व आहे कारण जे असेल ते त्याची असे असेल...
आणि म्हणतील तर. त्याचे असणे, त्याच म्हणणे,  हे माझ्या लेखी गर्व आहे त्याच्या अस्तित्वाचा." 

"प्रेम हे असं असते हे मला पण आत्ता कळले! ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला कायम अवेलेबल ठेवता, तो आणि तोच तुमची मुख्य प्रायोरिटी तुम्हाला असते आणि ते सांगावं लागत नाही की बोलुन दाखवावे पण लागत नाही...आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे अपेक्षा विरहित असते रे...." 

कुठेतरी खोलवर विचारात ती बाहेर बघत बोलत होती आणि हा तिचे भाव फ़क्त टिपत होता.

काही क्षण पुन्हा शांत गेले, एक खोलवर श्वास त्याने घेतला आणि म्हणाला,
 " प्रिया मला तुझा अभिमान वाटतोय की जी हिम्मत तू  बाळगली आहेस,  विश्वास तुला वाटतोय त्यासाठी. 

तुझ्या भावनांचा मी आदर करतो, काळजी वाटत होती ती खूप वेगळ्या अर्थाने पण तू खंबीर आहेस. मी कायम तुझ्या सोबत आहे, तुझा मित्र, तुझा घोडा, गाढव जे म्हणशील ते." हसत तो म्हणाला.

वातावरण जरा निवळले त्याने तिलाही बर वाटलं, हलकं यासाठी की तिने आज सगळे विचार बोलून दाखवले.
बोलत बोलता ते मुळशी पर्यंत पोहचले होते. 

" मॅडम मला भूक लागलीय तुझा काय विचार आहे?"
"मला पण रे..."ती हसत म्हणाली..

मग त्याने जे पहिले हॉटेल सारखा ढाबा दिसला तिथे कार पार्क केली...
 ती खूप क्लीअर आहे हे त्याला जाणवले आणि तो निश्चिन्त झाला, तेवढ्यात तिचा फोन आला म्हणून ती बोलायला बाजूला गेली आणि हा आपला जेवण येऊन ती येण्याची वाट बघत बसला. जवळपास 25 मिनिटांनी ती आली आणि त्याच्याकडे बघत कान धरत ती "सॉरी" असे गोड हसत म्हणाली. 

त्यानेही हसत प्रतिसाद दिला आणि जेवण्यावर दोघेही तुटून पडले....
 आजची ही दोन मित्रांची लंच डेट खूप समाधानी आणि पूर्ववत खेळी मेळीची झाली होती कारण प्रिया चे जगावेगळे नाते निलेश ला नक्की उमगले होते...

©®अमित मेढेकर