नाते.. ऋणानुबंधाचे!
भाग - तीन.
"थांबावेच लागेल तुम्हाला. तसेही हे तुमच्यामुळेच झाले आहे. वॉकला जाता आणि गेटचे कुलूप काढून ठेवता. म्हणून चोर सहजासहजी बागेत शिरू शकला."
राधिकाने शेवटी शामरावांवर निशाणा साधला. ती शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून मग ते निमूटपणे गप्प बसले.
******
दुसऱ्या दिवशी राधिका अंमळ लवकर उठली. बागेतील गुलाबचोर जो पकडायचा होता.
"रोज सोबत फिरायला चल म्हणून उठवतो ते कधी उठत नाहीस आणि आज बरी उठलीस गं?" आपली काठी आणि डोक्यावरची टोपी सावरत शामरावांनी तिला हटकलेच तशी ती खाऊ की गिळू नजरेने त्यांच्याकडे पाहायला लागली.
"तुम्ही कुठे निघालात?" ती.
"फिरायला. आणखी कुठे?" डोक्याला ताण देत ते.
"चोर पकडायचा आहे हे विसरलात ना? मी आहे ना म्हणून आपला संसार टिकला नाहीतर काय झाले असते कुणास ठाऊक." बायकांचा पेटंट डायलॉग राधिकाने फेकून मारला तसे त्यांना कालची चर्चा आठवली आणि ते कॉटवर काठी ठेवून बसले.
"आता असे बसलात काय?" राधिकाची कुरकुर सुरू झाली.
"मग काय करू म्हणतेस?" त्यांचा भोळा प्रश्न.
"अहो, गेटचे कुलूप काढून ठेवा ना. चोर यायला नको का?" नवऱ्याला कसे काहीच कळत नाही असा चेहऱ्यावर भाव घेऊन तिने शामरावांना कुलूप काढायला पिटाळले आणि ती चोराची वाट बघत बसली.
सकाळचे साडेपाच पावणेसहा वाजत आले होते. सूर्य हळूच उगवत होता. राधिकाच्या मनात आशा पल्लवीत झाल्या होत्या. तिच्या अपेक्षेप्रमाणे पुढच्या पाच मिनिटातच हळूच गेट कलल्याचा आवाज आला.
"अहो, चोर आलाय. तुमची काठी घ्या बघू." शामरावांच्या कानात ती खुसपुसली.
आता काठीने ही चोराला बदडणार तर नाही ना असा विचार त्यांना स्पर्शून गेला. त्यांनी भीतभीतच तिच्या हाती काठी ठेवली.
"अहो मला कसली देताय? तुम्ही पकडा आणि चला माझ्यासोबत." दाराचा पडदा सरकवून ती निघालीसुद्धा.
"ए, थांब जरा. माझ्या बागेतील फुलं चोरतेस होय?" नुकत्याच उमललेल्या गुलाबफुलाजवळ एक हात पोहचलेला दिसताच राधिका दारातून ओरडली. तसा तो हात झटक्याने मागे झाला.
चोर पकडल्याचा राधिकाला कोण आनंद झाला होता. आता या चोराला काय शिक्षा करायची असा विचार करत शामरावासह ती बागेत आली. तिला वाटलं फूल तोडणारी कोणीतरी एखादी स्त्री किंवा आणखी कोणी असावे पण गुलाबाच्या झाडाजवळ एक आठ नऊ वर्षांची चिमूरडी उभी होती.
"काय गं? असे दुसऱ्यांच्या बागेतील फुलं चोरतात होय? हेच शिकतेस का तू?" खाली नजर करून उभ्या असलेल्या त्या चिमुरडीला रागवावे की नाही या संभ्रमात पडलेल्या राधिकाने मध्यम स्वरात विचारले.
अंगावर असलेला साधा फ्रॉक, एक दोन ठिकाणी फाटलेली स्वेटर, विस्कटलेले केस, भर थंडीत अनवाणी आलेल्या तिला बघून नाहीतरी तिच्या हृदयात कालवाकालव झाली होती. पण चोराला रागावणेही भाग होते.
"फुलं नाही एकच फूल घेत होते आणि चोरत नव्हते तर तोडून घेत होते." राधिकाने 'चोर' म्हटलेले त्या चिमुकलीला रुचले नाही हे स्पष्ट दिसत होते.
"वा गं वा! तीन दिवसांपासून तीन गुलाब नेलेस मग ते एक फूल कसे? फुलंच झालीत ना ती? आणि कोणाला न विचारता तोडतेस म्हणजे त्याला चोरीच म्हणतात, कळलं?" राधिका तरी कुठे हार मानणार होती.
"पण रोज इथे कोणी असायचेच नाही तर कोणाला विचारणार ना? म्हणून मी माझेच तोडत होते आणि तसेही त्याला हे माहीतच आहे की." ती मुलगी स्पष्टीकरण देत म्हणाली.
"त्याला म्हणजे कोणाला? कोणाच्या सांगण्यावरून फुलं घेतेस तू?" राधिकाने कुतूहलाने विचारले.
"त्याला म्हणजे बाप्पाला. तिकडे कोपऱ्यातील देवळात बाप्पा आहे ना त्यालाच तीन दिवसापासून हे फूल वाहत होते." ती चिमुकली
"अगं पण मग हा जास्वंद फुलांनी लडबडलेला आहे ना. त्यातली घ्यायची फुलं. माझ्या गुलाबाच्या उमललेल्या एकुलत्या एक फुलाला का नेतेस?" राधिका.
"आई आजारी आहे ना म्हणून. मला वाटलं जरा वेगळं फूल वाहिलं की बाप्पा खूश होईल आणि आईला लवकर बरे करेल. आजचा शेवटचा दिवस होता. आजी घेऊ ना मी हे फूल?" तिच्या निरागस व्यक्तव्याने राधिकाचे डोळे भरून आले.
"हो बाळ खुशाल घेऊन जा." राधिका काही बोलत नाही हे बघून शामराव म्हणाले.
"पण आजी?" तिला राधिकाची संमती जास्त गरजेची वाटत होती.
राधिका देईल का तिला होकार? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा