नाते.. ऋणानुबंधाचे! भाग -दोन

नव्या नात्याची गोड कथा.

नाते.. ऋणानुबंधाचे!

भाग -दोन.


"असं कोण म्हणतं? तुझ्या कष्टाचे मोल आहेतच की." ती नेमके कशावरून बोलते आहे हेच त्यांना कळत नव्हते, पण सांगणार कसे ना?


"नाहीच आहे मोल. नाहीतर सुहास मला सोडून असा परदेशात स्थायिक झाला असता का?" ती.


"अच्छा! सुहासबद्दल बोलते आहेस होय." शामरावांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


"आणि आता त्याच्याबद्दल काय बोलायचं गं. आपलंच लेकरू, नाही राहावं वाटलं त्याला इथे आपल्यासोबत तर आपण काय करणार ना? तसेही त्याने आपल्याला त्याच्याकडे अमेरिकेत राहायला बोलावले होते की पण तूच नाही म्हणालीस."


"हो बोलावलं होतं. पण कायमस्वरूपी नाही ना? आणि तसे असते तरी या वयात मी आपला देश सोडून कधीच गेले नसते." राधिकाच्या मनात आता राग उसळला होता.


"मग झाले तर. आत्ता त्याच्याबद्दल बोलून कशाला वाईट वाटून घेत आहेस?" शामरावांचा प्रश्न.


"मुळात त्याच्याबद्दल मी बोलतच नाहीये." राधिकाने आपला राग बिचाऱ्या मटारच्या दाण्यावर काढला.


शामरावांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आता हिच्या मनात आणखी दुसरं काय आहे हेच त्यांना कळत नव्हते.


"सुहास काय नि गुलाब काय, दोघेही सारखेच." तिचे पुटपुटणे त्यांच्या कानावर पडले आणि कान एकदम टवकारलेच.


"काय गं? हा गुलाब कोण आणिक? आणि मला कसा माहित नाही? आपल्याला एकच मुलगा आहे ना?" चेहऱ्यावर भोळे भाव आणून त्यांनी विचारले तसे रागाने लाल झालेली राधिकाची नजर त्यांना पार चिरून गेली.


"गुलाबाबद्दल बोलतेय मी. आपल्या बागेतील गुलाब. तुम्हाला तर कशाचे सोयरेसुतकच नसते." तिच्या आवाजाला पुन्हा धार चढली.


"म्हणजे?"


"म्हणजे म्हणून काय विचारता? आठवते ना, दोन महिन्यापूर्वी गुलाबाचे रोपटे आणले होते. त्याला रोज मायेने मी पाणी घालत होते. जोपासत होते. मुलासारखं प्रेम होतं हो त्याच्यावर. त्याला कळ्या आल्या तेव्हा किती आनंद झाला होता माहितीये ना? परवा पहिलं फूल उमलले तेव्हा तर आनंदाश्रू डोळ्यात उभे होते." सांगताना आताही राधिकाचे डोळे पाणावले.


त्यांनाही ते आठवले. खरंच त्या अबोल रोपट्यात ती गुंतली होती खरी. पहिले फूल उमलायला आले तेव्हा त्यांची आवडती खीर सुद्धा तिने बनवली होती. एकुलता एक मुलगा परदेशात स्थिरावला तेव्हापासून मुलाचा नाद सोडून तिने तिच्या बागेतील फुलझाडात स्वतःला गुंतवून घेतले होते. ती झाडं हीच तिची मुलं झाली होती.


"काय झालं तुझ्या गुलाबाला?" तिचा रडका चेहरा बघून त्यांना या क्षणी गहिवरून आले.


"कोणी तरी तोडून घेऊन गेले." रुद्ध स्वरात ती म्हणाली.


"खरंच माझ्या मायेचे काहीच मोल नाही का हो? माझ्या बागेत फुललेला गुलाब चोरताना त्या चोरट्याला काहीच कसे वाटले नाही? तिकडे त्या सुहासच्या बायकोने माझ्या सुहासला माझ्यापासून तोडले आणि या चोराने माझ्या गुलाबाला." डोळे पुसत ती.


"राधे, किती गं रडशील? आणि बोल तरी किती लावशील?" तिचा हात अलगदपणे आपल्या हातात घेत शामराव म्हणाले.


"अगं, आपण जीव तेवढा लावायचा. माया करायची. वाढवायचं. आपलं कर्तव्य आपण पार पाडायचे. बाकी सगळे त्या विधात्यावर सोडून द्यायचे असते असे सुहास इथे कधीच परतणार नाही हे कळल्यावर तूच मला समजावले होतेस ना? मग विसरलीस कशी? सुहास काय आणि आपल्या बागेतील गुलाब काय, त्यांचे करण्यात तू कुठे कमी पडली नाहीस बरं. मग का अशी मनाला लावून घेतेस." राधिकाला समजवताना तेही हळवे झाले होते.


"तुम्ही म्हणता ते पटतेय हो. पण मनाला कसे समजावू? आता मला देखील छडा लावायचा आहे की दोन दिवसापासून कोण माझ्या बागेतील गुलाबाला चोरून नेत आहे. एकदा का चोर पकडला ना तर त्याला सोडणार नाही मी."


हो, नको सोडूस. हवं तर उद्या मी सुद्धा वॉकला न जाता घरीच थांबतो आणि चोराला पकडण्यात मदत करतो, झाले तर मग? चल आता स्वयंपाक करूया." तिच्या हातातील मटाराचे भरलेले भांडे पकडत ते म्हणाले.



"थांबावेच लागेल तुम्हाला. तसेही हे तुमच्यामुळेच झाले आहे. वॉकला जाता आणि गेटचे कुलूप काढून ठेवता. म्हणून चोर सहजासहजी बागेत शिरू शकला." राधिकाने शेवटी शामरावांवर निशाणा साधला. ती शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून मग ते निमूटपणे गप्प बसले.


लागेल का गुलाबचोराचा छाडा? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******


🎭 Series Post

View all