Login

नाती सांभाळताना.....

नाती सांभाळताना होणारी परवड आणि त्यातून तिने शोधलेला मार्ग
नाती सांभाळताना

भाग 1

" संयोगी, अगं आवर लवकर, किती वेळ? उशीर होतो आहे बघ आपल्याला. नाहीतर परत साहेब ओरडतील. " कल्पेश चा आवाज आला. पाठोपाठ बुलेटची धडधड ऐकू आली, तसे संयोगिने गॅस पुसण्याचा कपडा वॉशिंग प्लेस मध्ये फेकला आणि युनिफॉर्म ठीकठाक करत हॉल मध्ये आली.

पॅसेज मधील आरशात बघत तिने कॅप घातली. तसें हॉल मध्ये सोफ्यावर पेपर वाचत बसलेल्या सासूबाईंनी आवाज दिला,

" संयोगी, आज उशीर करू नकोस बाई फार. ड्युटी संपली कि, लगेच घरी ये. आणि जरा भाज्या ही घेऊन ये येता येता. मी रात्रीच्या जेवणासाठी कुकर लावून ठेवते. भाजी आणि पोळ्याचं काय ते तूच बघ. "

" हो आई मी बघते सगळं. तुम्ही नका काळजी करू. आणि भाजी ही आणते येताना. निघू आता मी? नाहीतर कल्पेश चिडेल माझ्यावर. प्रयत्न करते मी वेळेत येण्याचा. "

" संयोगी येतेस की मी निघू? " सतत वाजणाऱ्या हॉर्न सोबत कल्पेश चा आवाज देखील वाढला होता. ते तरी शूज पायात अडकवत संयोगी बाहेर आली. तिला माहीत होते की, पूर्ण रस्ताभर कल्पेशची बोलणी खावी लागणार आहे. तेही तिचा काहीही दोष नसताना!!

पहाटे पाच वाजता उठायचं, साफसफाई, अंगण झाडून सडा रांगोळी, चहापाणी ,नाश्ता स्वयंपाक , डब्बे भरणे, त्यानंतरचे आवराआवरी या चार तासांचा वेळ भरकन निघून जात असे.

कल्पेश ला सगळं काही हातात द्यावे लागत असे. चहा, नाश्ता ,त्याचा युनिफॉर्म हे तर द्यावेच लागणार, पण टूथ ब्रश टॉवेल न्यूज पेपर सगळ्या गोष्टी हातातच हव्या... हक्काची बायको घरात आल्यावर स्वतःच्या हाताने स्वतःची कामे करणे म्हणजे कल्पेश ला कमीपणाचे वाटे. नव्या नव्याने सासूबाई झालेल्या कल्पेश च्या आईला देखील सुनेला मदत करणे म्हणजे स्वतःचा अपमान वाटत असे.

वर्षभरापूर्वीच संयोगी लग्न करून या घरात आली होती. नवीन घर नव्या जबाबदाऱ्या नवी माणसे, नवीन नाती यांच्याशी जुळवून घेण्याचा ती प्रामाणिक प्रयत्न करत होती. कधी चुकत धडपडत स्वतःचे मन मारत, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होती. पण नोकरी आणि नाती सांभाळताना तिची चांगलीच दमछाक होत होती.


असं म्हणतात, "आय लव यू, आय मिस यु, " तोंडापूरते म्हणणारे नवरे खूप असतात. पण खरं प्रेम तोच करू शकतो, जो बायकोला, "आय अंडरस्टँड यू " असे म्हणतो, आणि तिला समजून घेतो.

संयोगीलाही अशाच नात्याची अपेक्षा होती. कल्पेश ने आपल्याला समजून घ्यावं , आपल्यावर विश्वास दाखवावा, आपल्या प्रत्येक गोष्टीत त्याने साथ द्यावी. असं संयोगीला मनोमन वाटत असे. परंतु कल्पेश मात्र अजून तेवढा समजदार झालेलाच नव्हता.

लाडोबा, बबड्या ,असणाऱ्या कल्पेश ला स्वतः शिवाय इतर काही दिसतच नव्हते. अभ्यासात हुशार, इतर सर्व गोष्टीत पुढे असणाऱ्या कल्पेश ला मात्र , सांभाळून घेण्याची, मन राखण्याची कला अवगत नव्हती. आईनेही त्याच्यापर्यंत कोणती जबाबदारी येऊ दिली नव्हती. आणि त्याबद्दल त्या माऊलीला जास्तच अभिमान होता.

ए एस आय असणाऱ्या कल्पेश ला योगायोगाने त्याच्या क्षेत्रातील त्याच्याच हुद्द्यावर असणारी संयोगी पत्नी म्हणून मिळाली होती. लग्नानंतर तिची पोस्टिंग देखील तो काम करत असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये झाली होती.

कर्तबगार , कर्तव्यदक्ष , वेळेची बंधन पाळणारी, संयोगीची ओळख होती. ' नथिंग इज इम्पॉसिबल फॉर मी ' असं म्हणणाऱ्या संयोगी ला मात्र आता प्रत्येक वेळी तडजोड करावी लागत होती. बोलणी ऐकावी लागत होती.

आता देखील घरातून निघाल्यापासून कल्पेश तिच्यावरच ओरडत होता. ती कुठे आणि कशी कमी पडते आहे यावरच तो बोलत होता. नात्याचा सन्मान करणारी संयोगी मात्र निमुटपणे कल्पेशची बडबड ऐकून घेत होती. डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या आसवांना रोखून धरत होती.

तेवढ्यात बुलेट पोलीस स्टेशन समोर येऊन थांबली. खिशातील रुमालाने डोळे पुसत संयोगी ऑफिसमध्ये आली. कर्तव्याशी बांधलेले तिचे नाते निभावण्यासाठी....