Login

नाती सांभाळताना... भाग 2

नाती सांभाळताना होणारी परवड आणि त्यातून शोधलेला मार्ग
नाती सांभाळताना

भाग 2

संयोगी अतिशय लाडाकोडात वाढलेली आई वडिलांची एकुलती एक लेक. लग्नानंतर बरीच वर्ष संयोगीच्या आई-वडिलांना मूलबाळ झाले नव्हते . नवस सायास, उपवास तपास, वैद्यकीय उपचार घेऊन देखील संयोगीच्या आईची कूस उजवली नव्हती.

मुलाचा वंश पुढे वाढणार नाही, ही धास्ती मनात घेऊन संयोगीच्या आजोबांना एक दिवस हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

कर्म धर्म संयोगाने त्याच महिन्यात, एवढी वर्षे तरसणाऱ्या या जोडप्याला इवल्या जीवाची चाहूल लागली. आजोबांचे जाणे आणि या चिमुकल्या जीवाचे आगमन यात काहीतरी योगायोगच असावा, म्हणून सर्वांनी या गोड परीचे नाव "संयोगी " ठेवले.

मुळातच धाडसीपणा चिकाटी , कष्ट करण्याची तयारी , घेऊन आलेल्या संयोगिने स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस दलामध्ये काम करण्याचे स्वप्न पाहिले.

'आपल्या लाडक्या नातीने असं चोरा गुंडांसोबत वावराव, रात्री अप रात्री काम करावं ,' हे आजीला मान्य नव्हतं. आजीला दुखावून काम करणं हे संयोगीला शक्य नव्हतं. आजीसाठी तिने आपला हट्ट सोडला. पण आपल्या नातीने नातं निभवण्यासाठी केलेली तडजोड आजीला जाणवली. आणि तिनेही आपला हट्ट सोडला. संयोगिनी पोलीस इन्स्पेक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच, संयोगिनी आपला ठसा उमटवला. शाळेबाहेर अथवा महाविद्यालयाबाहेर उभे राहून मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना तिने चांगलाच धडा शिकवला. तिच्या या कामाबद्दल वरिष्ठांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. कर्तव्यासोबत जातीचे हे नातं फुलत असताना, घट्ट होत असताना घरच्यांनी तिच्यासाठी लग्नाची बोलणी करण्याची सुरुवात केली.

तिला आकाश कवेत घ्यायचे होते, काहीतरी करून दाखवायचे होते, तिचा आदर्श असणाऱ्या किरण बेदी प्रमाणे तिला गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनायचे होते. पण आपली ही स्वप्न बाजूला ठेवून तिने घरच्यांच्या इच्छे खातर बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला

लग्नाच्या या वेदीवर होकार नकार, पसंती ना पसंती , व्यवहार करत करत शेवटी कल्पेशच्या स्थळाला होकार मिळाला. कल्पेश तिच्या क्षेत्रात तिच्याच हुद्द्यावर काम करत असल्याने त्यांची चिंता मिटली होती.

सारखा जोडीदार मिळाला म्हणून संयोगी खुश होती. नवीन नवलाईचे सुख अनुभवत होती. लग्न आधीचे ते मंतरलेले दिवस, क्षण भरभरून जगत होती. होणारी पत्नी, प्रेयसी , मैत्रीण या नव्यानेच तयार होणाऱ्या नात्याला प्रेमाने फुलवत होती.

'प्रत्येक क्षण भरभरून जगणं 'हे संयोगीच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होते.
नोकरी, कल्पेश,आई वडील या ती हरवून गेली होती.

दोन्ही घरांमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली होती. लग्नाची खरेदी,, हॉल, केटरर्स,पत्रिका, गडबड गोंधळ या वातावरणाची मजा काही औरच असते! उत्साह धावपळ , हसण्याचे , गप्पांचे आवाज, निमंत्रणाचे फोन कॉल्स, केळवण या सगळ्यांमध्ये संयोगिने मनापासून सहभाग घेतला. लग्न लागले आणि संयुगीने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.


नव्याची नवलाई संपली. नवीन नाती मनापासून जोडू पाहणाऱ्या संयोगीला वास्तविकतेचे चटके बसण्यास सुरुवात झाली. आईच्या घरातून नोकरीसाठी निघताना संयोगिला, चहाचा, कप जेवणाचा डबा हातात मिळायचा. पण लग्नानंतर पहिल्यांदा नोकरीसाठी जाताना मात्र सासूबाईंनी आदेश दिला.

' कल्पेश साठी मसाल्याची भाजी कर. आम्हा दोघांना मसाल्याची भाजी चालत नाही, त्याला डब्यात चटणी , लोणचे, कांदा सगळे द्यावे लागते. तो नाश्ता करूनच ऑफिसला जातो. त्यामुळे नाश्त्यासाठी काही वेगळा पदार्थ कर. '

बापरे! हे सगळं ऐकताना संयोगीला बहिणाबाईंची,

" अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके
मग मिळते भाकर"

या कवितेचा भावार्थ उमगला. हे सगळे सांभाळताना, या अग्नी दिव्यातून जाताना किती दमछाक होणार आहे, याची कल्पना आली.

या सगळ्या धावपळीमध्ये, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मात्र ती स्वतःला विसरून गेली होती. कोमेजून गेली होती.

रात्रीचे जागरण, पहाटेपासून कामाची गडबड , जेवण नाश्त्याच्या वेळा नाही, आणि विश्रांतीचा अभाव यामुळे तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार झाली होती . तिला कमालीचा अशक्तपणा जाणवत होता.

आताही तिने गाडीवरून उतरून ऑफिसमध्ये पाय ठेवला, पण काही क्षणातच चक्कर येऊन कोसळली.....