नात्याची नवी पालवी भाग-११(अंतिम)

अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या संधीने दोन जीवांच्या नात्याला फुटलेली पालवी!
नात्याची नवी पालवी भाग- ११(अंतिम)

"काय हो, हे गुंड आणि बाकी ते जंगल लिहिणे वगैरे जरुरी होते का?" शरण्या लटक्या रागात म्हणाली.

" ते जास्तचं झाले का गं ?" अभय तिच्या हातातून काही कागद घेऊन पाहत म्हणाला.

"नाहीतर काय, मी म्हणे एक अबला नारी आणि तुम्ही काय तर देव माणूस अशी प्रतिमा ह्यात दाखवली आहे."

"अग कथा ही काल्पनिक असते. तू काय सर्व मनावर घेत आहेस." तो हसत म्हणाला.

"बाबा..." म्हणत आठ वर्षाची मुलगी पळतच घरी आली.

"किती हा उशीर चिऊ?" शरण्या जरा रागे भरतच म्हणाली.

"बाबा, मी उशीरा येणार हे सांगितले होते ना." नाक उडवत अभयला एका बाजूने मिठी मारत ती म्हणाली.

"हो. जा लवकर हात-पाय धुवून ये. मी माझ्या चिऊसाठी मस्त थालीपीठ बनवले आहे. " तो शाळेतून आलेल्या आपल्या मुलीला बोलत होता.

रात्री त्यांची लेक झोपली असताना शरण्याने अभयच्या कुशीत शिरत म्हंटले, " कथेत खरे का लिहिले नाही?"

"तुला पुन्हा त्रास झाला असता. त्या गोष्टीला आता नऊ वर्ष झालेत तरीही कधीतरी रात्री तू दचकतेस." तो कपाळावर ओठ टेकवत म्हणाला.

अभय हा लेखक तर होताच पण पेशाने डॉक्टर होता. नऊ वर्षांपूर्वी शरण्या त्याला एका रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. त्याने तिच्यावर उपचार केले आणि घरी फोन केले असता त्यांनी अत्याचार झालेल्या मुलीला आपली मुलगी मानण्यास नकार दिला. तिची मनस्थिती ठीक नसायची त्यातच तिला झालेल्या अत्याचारामुळे लगेच दिवस गेले होते. तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला. श्रावणी म्हणजे तेच नको असलेले बाळ होते जे अभयने स्वतःचे नाव देवून आपलेसे केले होते.

आधी श्रावणीचा बाबा मग शरण्याचा मित्र शेवटी तिचा नवरा तो बनला होता. शरण्याचा नात्यांवरचा विश्वास घरच्यांनी ओळख न दाखवल्यामुळे उडाला होता.

सकाळी लवकर उठून आधी स्वतःचे आजचे हॉस्पिटलचे कामकाज पाहून त्याने पुढील भाग लिहायला घेतला.

(कथेत)
"मग श्रावणी तुला मी बाबा म्हणून पसंत आहे ना?" त्याने विचारले.

"अभी तू माझा बाबा आहेस?" निरागस चिऊने विचारले.

"तुझी आई हो बोलली ना लग्नाला मगच मी तुझा बाबा होऊ शकतो." तो चेहरा लहान करून म्हणाला.

"आई, कर ना अभीशी लग्न मला माझा बाबा हवा आहे." ती हट्ट करत म्हणाली.

"बरं, तुम्हाला अजून काही बोलायचे आहे का?"

"हो, आपण पहिले आई-बाबा बनू मग नंतर नवरा-बायको." तो श्रावणीला जवळ घेतच म्हणाला.

दोनच दिवसांत त्यांनी कोर्ट मॅरेज करायचा निर्णय घेतला.
दोघेही लग्नबंधनात अडकले गेले आणि पुढे सुखाने श्रावणीसह राहू लागले.

एवढे लिहून त्याने कथा संपवली.


त्यासोबतच अभय भूतकाळात गेला. आधी पेशंटशी लग्न करतोय म्हणून त्याच्यावर खूप टीका झाली. अनाथ असलेला तो, श्रावणीला अनाथ होऊ देणार नव्हता. त्याचे आयुष्य हे संघर्षाने भरलेले होते. त्यातच त्याच्या आयुष्यात शरण्या आली.

वीस वर्षाचीच होती तेव्हा ती. कित्येक महिने तर बोलतच नव्हती त्यात ती गरोदर आहे, याचेही तिला भान नसायचे.

नर्स तिचे सर्व करायच्या पण त्याही पैसे देऊनच काम करणाऱ्या होत्या. जेव्हा शरण्याला पाचवा महिना लागला तेव्हा तिला सर्व समजायला लागले होते. अत्याचाराने पीडित असलेली मुलगी आणि पुढे आलेले पोट पाहून तिने स्वतःला खूप वेळा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता.

शेवटी त्याने कागदोपत्री तिच्याशी लग्न करून तिला घरी आणले आणि विविध डॉक्टरांशी बोलून तिची योग्यवेळी प्रसूती केली. शरण्या मुळातच थोडी अल्लड आणि शांत स्वभावाची होती. तिचा निरागसपणा अभयला भावला. त्याने खूप समजून सांगितल्यावर त्या बाळाचा ह्यात काहीच दोष नाही हे तिलाही पटले. तिच्या कलाने घेत शरण्याने एका वर्षाने त्याला नवरा म्हणून त्याचा अधिकार दिला होता.

अभयचे व्यक्तिमत्त्व मुळातच संयमी आणि विचारी होते. त्यामुळे शरण्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली होती. त्यातच त्याच्या लेखन कौशल्याची भुरळ तिला पडली नाही तर नवलच होते. पुढे पदवी आणि त्यानंतरचे शिक्षणही तिला घेण्यात अभयने मदत केली होती. तिला स्वतःच्या पायावर उभे करून भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्याने गरजेचे समजले होते.

"डॉक्टर अभय इथेच आहेत का?" दारावर ओळखीचा आवाज आला.

"हो." हसूनच त्याने उत्तर दिले आणि भूतकाळातून बाहेर आला.

"झाली कथा लिहून?"

"वाचक म्हणून आलात की बायको?" त्याने मिश्किलपणे विचारले.

तिने हसतच ती कथा वाचायला घेतली आणि म्हणाली "शीर्षक विसरलात डॉक्टर साहेब."

"नाही विसरलो. तूच सुचव." तो तिच्याजवळ जात म्हणाला.

"आठवले की सांगते." असे म्हणून ती मुलीच्या आवाजाने बाहेर निघून गेली.

'कथा जरी मी थोडी बदलली असली तरी त्यातही आणि आताही आपले नाते आपल्या मुलीमुळेच सुरू झाले होते. तुम्ही दोघी कोणालाही आवडणाऱ्या अशाच आहात.'
असे स्वतःशीच म्हणून तो हॉलमध्ये आला.

"बाबा, मला सहलीला जायचे आहे. आई नाही म्हणत आहे." आईची तक्रार करत श्रावणी म्हणाली.

"का गं? माझ्या चिऊला जाण्याची परवानगी देत नाहीस?"

"तुम्हाला कारण माहीत आहे. मला यावर वाद नको." असे म्हणून शरण्या तिच्या कामासाठी बाहेर पडली.

"बाबा, आई मला एकटी कुठेचं का पाठवत नाही?" नाराज झालेली श्रावणी विचारत होती.

"तू सहलीला येते म्हणून सांग. हे घे त्यासाठी पैसे. आईशी मी बोलतो. ठीक आहे?" त्याने तिला समजावून सांगितले.

तिने हसतच आपल्या बाबांना सहलीला जाण्याची परवानगी दिली म्हणून आनंदाने मिठी मारली.

रात्री झोपताना,

"तुम्ही तिला परवानगी का दिलीत अभय?" जरा रागानेच म्हणाली.

"कारण तू तिला जास्त रोकटोक केलेली मला आवडत नाही. तुला तिला एकटीला पाठवण्याची भीती वाटते मान्य आहे पण ह्याने तू तिला बाहेरचे जग पाहण्यास रोखू शकत नाहीस." आवाजात जरब आणत अभय म्हणाला.

"मलाही काळजी आहेच, एका दिवसात ती परत येईल. मी सर्व चौकशी केली आहे शरू. नको काळजी करू. तिला आपण बंधनात नाही ठेवू शकत राणी." तो तिला समजावत म्हणाला.

तिलाही ते पटले. शांत वातावरणात फक्त प्रीतस्पर्शाची देवाणघेवाण चालू होती. थोड्या वेळाने दोघेही झोपले.

"अभय.. उठा...उठा.." ती जोरात ओरडत म्हणाली.

"काय झाले शरू?" तो झोपेतून घाबरतच उठला.

"मला नाव सुचले?" ती आनंदाने म्हणाली.

"कशाचे?" झोपेच्या तंद्रीत न समजून त्याने विचारले.

"कथेचे नाव." ती हसत म्हणाली.

"देवा, जीव घेशील एकदिवस शरू. किती घाबरलो मी." तिला स्वतःजवळ खेचत तो म्हणाला.

ती "ऐका तर."

"बोला." त्याने तिला मिठीत घेत विचारले.

"त्या गोष्टीत आणि आपल्या गोष्टीत एक साम्य आहे."

"कोणते?" त्याने तिच्याकडे पाहत विचारले.

"त्या दोघांच्या नात्याला नवी पालवी फुटली होती. माझ्या जीवनात तुमचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही नसता तर मी.." डोळ्यांतील अश्रूने ओठांतले शब्द थांबवले होते.

"मी नसतो तर कोणी दुसरे असते." तो सहजच म्हणाला.

"असे नाही. तुम्ही खूप निस्वार्थी आहात. मला आणि श्रावणीला तुमच्यामुळे समाजात मान मिळत आहे. माझी सर्व नाती सोडून गेलीत तेव्हा तुम्ही मला सांभाळले आणि माझ्याशी नाते जोडून आपल्या नात्याला जगासमोर आणले."

अभयसाठी हे सर्व सोपे होते का तर नव्हते. शरण्याला मानसिक आधाराची खूप गरज होती. तिला सांभाळताना कधी तो प्रेमात पडला हे त्यालाही समजले नाही. कोणाचाही स्पर्श स्वतःला करून न देणाऱ्या शरण्याला त्याने डॉक्टर म्हणून व्यवस्थित उपचार तर केलेच पण तिचे मन जपत, तिच्या कलाने घेत कधीच तिच्या परवानगीशिवाय तिला त्याने स्पर्श केला नव्हता. एक वर्ष तिला प्रेम होण्याची जाणीव होण्यासाठी थांबला होता. दोघांत आधी मैत्रीचे नाते निर्माण करून मगच त्याने वैवाहिक जीवनाची सुरुवात केली होती.

श्रावणीला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिचा बाबा हा तिचा मित्र होता. सगळ्यांत आधी कोणतीही गोष्ट ती आई आधी अभयला सांगायची. पुढे दुसरे मूलं नको म्हणून त्याने न सांगता नसबंदीची शस्त्रक्रिया केली होती.

त्याग फक्त स्त्रियाच करतात असे नाही हे अभयने दाखवून दिले होते.

अभय " कथेचे नाव तर सांग."

शरण्या म्हणाली, "कथेचे नाव नात्याची नवी पालवी !"

"मस्तच." अभयने लगेच शीर्षक लिहिले.

शुष्क झालेल्या दोन जीवांना
नात्याची नवी पालवी फुटली
आधी मैत्रीची अन् नंतर प्रेमाची
त्यांची गाडी अशी सुसाट सुटली

समाप्त.

वाचकांचे खूप आभार.

🎭 Series Post

View all